२४ फेब्रु, २०११

माझा ’संकुचित’ दृष्टीकोन


माझा दृष्टीकोन संकुचित आहे हे कबुल करायला मला आता अजिबात लाज वाटत नाही.अर्थात माझा दृष्टीकोन ’संकुचित’ आहे अस म्ह्णाल्याने कोणी लगेचच तसं समजु लागेल असा भ्रम मला नाही कारण मराठी माणसं चिकीत्सक फार हे मी जाणुन आहे.तेव्हा माझ्या संकुचितपणाचे पुरावेच तुमच्या समोर मांडतो.
  • मी बाजारात गेल्यावर कटाक्षाने मराठीत बोलतो.बरेचशे भाजीवाले मराठी नसतात याची कल्पना असुनही.
  • मला समोरच्या भाजीवाल्याने मराठीत उत्तर दिलं नाही तर मी पुढच्या भाजीवाल्या कडे जातो.
  • फळवाला तर बहुदा भैयाच असतो. मग स्वत:ची तंगडतोड करुन मराठी फळवाला शोधण्याचे कष्ट घेतो.त्या मराठी फळवाल्याने मग्रुरी केली तरी मलाच गरज असल्या सारखा केवीलवाणा चेहरा करुन त्याच्या कडुनच फळं घेतो.
  • समोरच्या माणसाने " कितना बजा" असं हिंदीत विचारल तरी मराठीतुनच वेळ सांगतो. बहुतेक वेळा विचारणारी माणसं मराठीच असतात आणि नसली तरी वेळ समजल्या सारखा चेहरा करुन निघुन जातात.
  • पान खाण्याची आवड आहे पण मराठी पानवाला सापडणं दुर्मिळच.पानाशिवाय पान हालत नसल्याने त्यातल्या त्यात मराठीतुन उत्तर देवु शकणारा पानवाला शोधतो.
  • टॅक्सीवाले-रिक्षावाले पण बहुदा परप्रांतीयच असतात पण तरीही त्यांच्याशी मराठीतुनच बोलण्याचा माझा अट्टाहास असतो.
माझ्या या संकुचित वागण्याने माझी बायको वैतागते कारण ती ’ग्लोबल’ विचारांची आहे. तिचही चुक नाही म्हणा कारण माझ्या अश्या वागण्याने बरेच वेळा तिची कुचंबणा व वेळेचा अपव्यय होतो. त्या मुळे आता माझा संकुचित पणा दिवसेन दिवस वेडेपणा कडे झुकत चाललाय याची तिला आता खात्रीच पटली आहे.
या रविवारचीच गोष्ट घ्याना. आम्ही दोघ बाजारात निघालो असताना मुलीने ’द्राक्ष’ आणायला सांगितली. सध्या द्राक्ष बाजारात मुबलक असल्याने ती सहज आणू असा बायकोचा समज. बाजारात गेल्यावर पहीले भाजी वैगरे घेतली. आता ’द्राक्ष’ घेवुया म्हणुन मी पहील्याच फळवाल्याला विचारलं," द्राक्ष कशी देणार." तो बोलला," साब,अंगुर तो पच्चीस रुपय्या पाव है. मगर चालीस को आधा लेलो." त्याने सांगतलेला भाव तसा वाजवीच होता.त्या मुळे बायकॊ त्याच्या कडुन खरेदी करणार होतीच. तेव्हड्यात मी तिला आडवलं.
मी म्हणालो," थांब जरा अजुन एक दोघांना विचारु."
मी भाजी घेताना जास्त चिकीत्सकपणा करत नाही हा तिचा नेहमीचा अनुभव. त्या मुळे तिला माझ्या म्हणण्याच जरा आश्चर्यच वाटल.पण ती काही बोलली नाही.मग आम्ही दुसर्‍या फळवाल्या कडे वळलो. पुन्हा तेच . मी द्राक्ष मागतोय तर तो मात्र अंगुर बेचतोय. मग मी पण पेटलोच... मराठी माणुस आहे पेटण्या शिवाय दुसरं काय करु शकतो?.मग मी एका मागे एक 'अंगुर'वाल्यांना नाकारण्याचा सपाटाच लावला आणि बायकॊ हाताशपणे माझ्या मागे मागे " अरे ऎक,अरे ऎक." म्हणत चालत होती. एका क्षणी मात्र मला तिनं आडवलचं.
मी म्हणालो, "काय झालं".
ती म्हणाली," अरे बाजारातले जवळपास सगळे फळवाले आता विचारुन झाले."
"मग"
"मग काय.अंगुर घ्यायचे नाहीत का?"
"अंगुर काय म्हणतेस. द्राक्ष म्हण द्राक्ष."
"तेच ते."
"तेच ते काय.अं "
"बरं बाबा द्राक्ष. घ्यायची आहेत ना नक्की आपल्याला."
"मग. तुला द्राक्षवाला दिसला की घेवुया."
मग तिच्या लक्षात आल की मी का द्राक्ष घेत नाही ते.
" अरे पण .... "
" पण बिण काही नाही. जो पर्यंत द्राक्षवाला भेटणार नाही तो पर्यंत ती खरेदी करायची नाहीत."
" म्हणजे आज द्राक्ष न घेताच घरी जायचा विचार दिसतोय बहुदा."
" मिळतील गं. जरा धिर धर."
" लेक घरी वाट पाहातेय. बाबा द्राक्ष आणणार याची"
बायकोन अगदी माझ्या भावनेलाच हात घातला.मग मी विचारात पडलो.तरी उसनं आवसान आणुन म्हणालो," द्राक्ष घेवुनच घरी जायचं".
यावर बायकोन असा काही चेहरा केला की मी पण मनातुन नर्व्हसच झालो.तेव्हड्यात समोर एक फळवाला दिसला. मनातल्या मनात देवाचं नावं घेवुन हळुच त्याला विचारलं,"द्राक्ष कशी".


आता पर्यंतचे अनुभव पचवुन माझाही धीर सुटायला लागला होताच की.
तो म्हणाला," तीस रुपये पाव साहेब."
" इतना महंगा क्युं. बाकी सब तो पच्चीस रुपया पाव विक रहा है"
" नाशिकची द्राक्ष आहेत साहेब"
माझ धेडगुजरी हिंदी ऎकुन त्याला गिर्‍हाईक मराठी असल्याच समजल असावं बहुदा.
तो चक्क द्राक्ष म्ह्णला... की मलाच भास झाला हे कळेनाच. माझा झालेला गोंधळ एव्हना बायकोच्या लक्षात आला होता.
मग तिनेच विचारलं" अर्धा किलो घेणार. पन्नासला दे."
" परवडत नाही. तेव्हडी खरेदीच नाही साहेब". त्याला समोरच्या दोघां पैकी आपलं गिर्‍हाईक(?) कोण कळलं होत.
आता द्राक्ष समोर होती पण बायको मुळे व्यवहार फ़िस्कटणार याची चिन्ह दिसत होती.मीच मध्ये पडलो.
" अगं घेवुन टाक. आपल्या नाशिकची द्राक्ष आहेत. छान गोड असतात."
" अहो पण....."
" जावु दे. द्राक्ष आहेत ना मग बस झालं"
मी द्राक्ष या शब्दावर ईतका जोर दिला की बायकोला मला काय म्हणायच ते चटकन ध्यानात आल. मग तिनेही जास्त खळखळ न करता द्राक्ष घेतली.
या प्रसंगा वरुन माझ्या संकुचित दृष्टीकोनाची तुम्हाला आता खात्री पटली असेलच.आज हे सगळं तुम्हाला आवर्जुन सांगायच कारण म्हणजे आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधली एक बातमी. बातमी आहे " मराठी इन्फोलाइन " या वेबसाइटला एक वर्ष पुर्ण झाल्याची. मराठी उद्योजकांना ’ग्लोबल’ व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी डोंबिवलीतल्या दोन मराठी मुलांनी ही वेबसाइट तयार केली असुन सध्या साडेचार हजार मराठी उद्योजक या साइटला नोंदीत झाले आहेत.किमान एक लाख मराठी उद्योजकांना या साइटवर नोंदीत करायच उद्दीष्ट या वेबसाइटच आहे.ही वेबसाइट सुरु करण्याची कल्पना कुणाल गडहिरे व दीपक उमरेडकर या दोन डोंबिवलीकर तरुणांना कशी आली ते समजुन घेण्या सारखं आहे. या दोघांना एकदा चहा पिण्याची तल्लफ आली असताना त्यातील एकाने मराठी माणसाच्याच टपरीवर चहा पिण्याचा हट्ट धरला. त्या साठी टपरीचा शोध घेता घेता त्यांना शेवटी मराठी माणसाची टपरी तर सापडलीच पण मनात एक अभिनव कल्पना देखिल सुचली. त्यातुन जन्म झाला " मराठी इन्फोलाइन " या वेबसाइटचा.
हे वाचल्यावर संकुचित दृष्टिकोनातुन किती मोठी कल्पना न ध्येय निर्माण होत हे मला जाणवलं.म्हणुन मला माझ्या ’संकुचित’ दॄष्टीकोनाची लाज आता वाटत नाही कारण याच संकुचित दृष्टीकोनातुन न जाणो पुढे कधितरी एखादी भव्य कल्पना सुचेलही.
तुर्त "मराठी इन्फोलाइन"  वेबसाइटची माहीती आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना करुन द्यावी ही ई-भाष्य कट्ट्यावरील समस्त मायबोलीकरांना विनंती.

आपला
मैत्रेय१९६४




७ टिप्पण्या:

भानस म्हणाले...

नाशिकची द्राक्षं... अहाहाSS !!! मी किती वेळा मिटक्या मारल्या म्हणून सांगू... :)

देवेन, शेवटी किंमत मोजून का होईना तुला हवी तशी द्राक्षं मिळाली. ;) पोराचे नशीब जोरावर होते.

वेबसाईट चे खास तुझ्या स्टाईल ने केलेली ओळख आवडली. सहीच!

Devendra म्हणाले...

भानस,त्या दिवशी मला असं वाटायला लागलं होत की बाजारात मिळत असलेली द्राक्ष उत्तरप्रदेश आणि बिहार मध्ये तर पिकवलेली नाहीत ना?. आणि द्राक्ष नाशिकला पिकत असली तरी विकणारे कोणं हा प्रश्न मनात सलतोच की?.

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

या संकुचित पणातच आपल भल आहे

mannab म्हणाले...

आपला संकुचित दृष्टीकोन वाचतांना मी मलाच शोधत होतो. कारण माझ्या या मराठी बोलण्याच्या अट्टाहासापायी मला बायकोची किती बोलणी खावी लागली आहेत. शेवटी मला एक तरी सापडला. आभारी आहे. परंतु याचा उपयोग काय ? मुंबईत सारे एकजात धेड गुजरी हिंदी बोलण्यात अभिमान समजतात.
मंगेश नाबर

Devendra म्हणाले...

प्रिय मंगेश, आपल्या सारखाच संकुचित दृष्टीकोन असलेले शोधण्याचा प्रयत्न असाच सुरुच ठेवुया. खात्री आहे एक दिवस मोर्चा नक्कीच निघेल. आभार.

mannab म्हणाले...

आजच्या मटामधील बातमीचा मथळा पहा. काय ही मटासारख्या वृत्तपत्रातील मराठी भाषा ? :-
अम्मासंग चाय;दिदीसंग तोडपाणी
15 May 2011, 1454 hrs IST

Forward Thinks म्हणाले...

Zakkaas !