६ सप्टें, २०१०

एका गोड मुलीची गोष्ट

               एका गोड मुलीची गोष्ट

परवा परवाचीच गोष्ट. माझी मुलगी टी.व्ही. वर एक चित्रपट पाहात होती. एक जागरुक बाप (?) म्हणुन ती नक्की काय पाहात आहे हे मी उत्सुकतेने डोकावून बघीतलं. आणि बघता बघता मी पण त्या चित्रपटात गुंगून गेलो.चित्रपटाची गोष्ट साधी सोपी होती.चित्रपटाची नायिका आहे एक लहान मुलगी जी एक प्रसि्ध्द गायिका आहे. लहानपणीच आई गेलेल्या या मुलीच् स्वत:च एक भावविश्व आहे ज्यात आहेत , तिचे बाबा, भाउ एक जीवलग मैत्रीण आणि भाबडा मित्र.तिच्या बिनमुखवट्याच्या जगातले हे सर्व तिच्यावर तिच्या गुण दोषांसकट प्रेम करत असतात आणि ती पण ........
तरीही लहान वयातल्या प्रसिध्दी मुळे तिच बालपण कुठेतरी हरवून गेल असल्याने तिच्यातल निरागस मन कंटाळून गेल आहे.त्या मुळे ही मुलगी तिच्या शहरापासुन दुर जायच ठरवते. त्यानुसार ती तिच्या आपल्या माणसां सोबत तिच्या दिवंगत आईच्या माहेरी जाते. तिच्या आजीच या आईविना मुलीवर अतिशय प्रेम आहे. ती आजी आपल्या अकाली देवाघरी गेलेल्या मुलीच प्रतिबिंबच जणु या नाती मध्ये पाहात असावी.त्या मुळे आजी कडुन कॊडकौतुक करुन घेण्यात या मुलीचा वेळ मजेत चालला आहे.पण अचानक काही घटना अश्या घडत जातात की ज्या मुळे ह्या मुलीच गुपीत उघड होत.सगळ्या गावाला कळत की ही लहान मुलगी एक प्रसिध्द गायिका आहे.आपले गुपीत सगळ्या गावाला कळल आहे हे लक्षात आल्यावर ती मुलगी परत एकदा आपल्या मुळ शहरी जीवनाकडे नाईलाजाने परत येते.
पाहा ना ही गोष्ट किती साधी सरळ आहे.पण त्या मध्ये दाखवलेल्या काही गोष्टी बरच काही सांगून जातात.प्रसिध्दी मुळे अकाली बालपण हरवून बसलेली ती मुलगी,वडीलांचे व त्या मुलीचे आपसातील भावबंध ,आजीची निरपेक्ष प्रेमळ माया,त्या मुलीचे एखाद्या सर्वसामान्य मुली सारखे आपल्या मैत्रीणी बरॊबर होणारे रुसवेफूगवे हे सर्व अतिशय सहज व सुंदर पणॆ त्या सिनेमात मांडले आहे.
हे सगळ वाचल्यावर तुम्हाला आपल्या देशात वर्षाला शेकडोवारी निर्माण होणार्‍या एखाद्या कौटुंबीक सिनेमाची कथा मी सांगत आहे अस वाटल असेल नाही का ?पण ही कथा आहे हॅना मोंटानाच्या एका चित्रपटाची. हॅना मोंटानाचा चित्रपट असो वा टीव्हीवर नियमित पणे सादर होणारी सिरीयल त्या मध्ये जी जीवनमुल्ये दाखवली आहेत ती पाहीली की अमेरीका असो वा आपला देश दोन्ही कडे आदर्श मानली गेलेली जीवनमुल्ये यातील साम्य प्रकर्षाने जाणवत.यातुन हेच सिध्द होत की माणूस कुठलाही असो मुलभुत भावना सारख्याच असतात.
हॅना मोंटानाच्या सिरीयलच्या एका भागात तिच्या वडीलांच्या आईच एक पात्र दाखवल आहे.त्या भागात अस दाखवल आहे की सारखी सारखी बंद पडणारी या आजीची जुनी पुराणी खटारा मोटार भंगारात देवून मायली व तिचे वडिल नविन गाडी तिला भेट देतात........... त्यांना अस वाटत की नविन गाडी पाहुन आजी खुष होईल. पण होत भलतचं. या आजीच आपल्या जुन्या पुराण्या खटारा मोटार गाडीवर खुप प्रेम आहे कारण त्या गाडी सोबत जुळल्या आहेत तिच्या तरुण पणातल्या गॊड आठवणी.त्यामुळे आजी जेव्हा तिच्या जुन्या गाडी बाबतच्या भावना जेव्हा व्यक्त करते तेव्हा मायली व तिच्या वडिलांना आपली चुक उमजते. वापरा आणि फेका ( Use & throw ) या असल्या जमान्यातील ही अमेरीकन आजी आपल्याला पण आपल्या आजीची आठवण करुन देत नाही का?.मग आठवते ती आपल्या आजीने तिच्या जुन्या पान्या नऊवारी पातळ्यां पासुन बनललेल्या गोधड्यांची उब. आज ती मायेची उब कोठेतरी हरवली आहे.
हॅना मोंटाना ही भुमिका करणारी मायली सायरस आणि हॅना हे पात्र यांना वेगळ करताच येत नाही.ही भुमिका मायली जणु जगतेच आहे असच वाटत कारण मायलीने हॅनाची भुमिका तिच्यातली निरपेक्ष प्रेमाला असुसलेली छोटी मुलगी जाणुन घेवून साकारली आहे. आणि महणूनच हया लहान गोड मुलीची गोष्ट मला पाहाताना खुप आनंद वाटतो.