२२ नोव्हें, २०१०

रविवार सकाळ

                             रविवार सकाळ

नेहमीचीच रविवार सकाळ......... आळसावलेली. अजुन थोडा वेळ झोपल पाहीजे अस वाटत होत पण पहिल्यांदा आलेला बायकोचा प्रत्यक्ष व नंतरचे मुलांमार्फत आलेले निर्वाणीचे निरोप लक्षात घेता अधिक काळ झोपण आरोग्यास हानीकारक ठरल असत.उठलो एकदाचा बापडा. मुलांची बाहेर हॉलमध्ये आईकडे संडे स्पेशल करण्याची लाडीगोडी सुरु होती.पण तिकडचा सुर काहीसा चढा असल्याच जाणवल. तेव्हा मी म्हणालो," चला, आज कोंबडी बनवूया.". चिकन येवजी कोंबडी कानाला जरा विचित्र वाटत नाही का? .पण काय करणार मनसे फ़ॅक्टरचा परीणाम ................ .यावर दोन्ही मुल एकदम खुष झाली. तिने मात्र माझ्या या वाक्यावर सुसंवादालाच सुरुवात केली. अश्या संवादाचा शेवट ,ज्या प्रमाणे तुमच्याही घरी होतॊ तसाच झाला. त्रिपुरी पौर्णीमेला घरात कोंबडी करण म्हणजे अब्रम्हण्यम हे मला मनोमनी पटलच.
थोड्या वेळाने तिच्याच बरोबर प्रभात फेरी करायला बाहेर पडलो.आम्ही राहातो तिथुन थोड्याच अंतरावर रेल्वे कॉलनी आहे.कॉलनीतली बैठी घर व त्याच बरोबर आवर्जुन जपलेली अनेक झाड-झुडप यामुळे शहराच्या मध्यभागात असुनही परिसर काहीसा निवांत असा आहे. कर्दळ,आळु,कोरफड, केळी, पपई या सारखी शहरात न दिसणारी पण गावातल्या घरच्या परसात हमखास आढळणारी झाड तिथे राहाणार्‍या लोकांनी लावलेली आहेत. एकंदरीत काय आजुबाजुला मोकळी जमिन मिळाली की माणसं घराच्या परसात आपल गाव रुजवायचा प्रयत्न करतात हेच खर...............
रविवारचा महत्वाचा एक कार्यक्रम म्हणजे निवांतपणे आलेली वर्तमानपत्र वाचण जे इतर दिवशी शक्य होत नाही.पहिल्याच पानावरची बातमी वाचुन स्वत:ला चिमटाच काढला.राज्याचे नविन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या वार्ताहर परिषदेत संपुर्णपणे मराठीतुनच बातचीत केली. एव्हडच नव्हेतर या पुढेही होणार्‍या वार्ताहार परिषदांत ते हिंदी व इंग्रजी प्रश्नांवरही फक्त मराठीतुनच उत्तर देतील अस ठणकाहुन सांगीतल. बापरे हा कॉंग्रेसचा मुख्यमंत्री आहे की मनसेचा............ थोडक्यात काय या पुढे मराठीच्या संबंधातील भावनीक मुद्द्यांवर आंदोलन करण्या ऎवजी मराठी तरुणांचे हृद्यसम्राट मा. राज ठाकरे यांना त्यांच्या पवित्र्यात बदल करावा लागणार आहे. अस केल नाहीतर शिवसेने सारखच मुख्यमंत्र्यांनी आमचे मुद्दे हायजॅक केले असे म्हणण्याची वेळ मनसेवर लवकरच आल्या शिवाय राहाणार नाही.
सगळ्यांना माहीत आहेच की, डिसेंबर मध्ये ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या ही संमेलना बाबत सुरुवाती पासुन वादविवाद झाले आहेत - पुढे ही करवले जाणार आहेत. त्या मुळे मराठी भाषेचा करमणुकपर उत्सव थाटामाटात पार पडेल यात शंका नसावी. भाषा ही फक्त व्यक्ती व्यक्तीं मधील संवादाच माध्यम नसुन ते ती भाषा बोलणार्‍या समाजाच्या राजकीय, सामाजीक व भाषीक मानसिकतेच्या अभिव्यक्तीच प्रगटीकरण आहे. पण हे लक्षात कोण घेतो. त्या मुळे मग मराठीच्या साहित्य दरबारात मा.अमिताब बच्चन हिंदीत बोलतात ,हिंदीत कविता म्हणतात आणि त्यालाच सगळ्यात जास्त दाद मिळते. याची ना खंत साहित्यीकांना ना दरबारात भक्तीभावाने उपस्थित असलेल्या तुम्हा-आम्हा साहित्य प्रेमींना......................
कालच्या वर्तमानपत्रात महाराष्ट्राच्या नविन मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाची माहीती आली आहे. किती समर्पक शब्द आहे खाते.....वाटप नाही का ?. असो. मा.श्री. राजेंद्र मुळक या मा. मुख्यमंत्रांच्या विश्वासातील राज्यमंत्रांकडे अनेक महत्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. ती अशी- वित्त व नियोजन व उर्जा (संबधीत कॅबिनेट मंत्री- मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार ), जलसंपदा ( संबधीत कॅबिनेट मंत्री- मा. श्री.सुनिल तटकरे ), उत्पादन शुल्क (संबधीत कॅबिनेट मंत्री- मा.श्री. गणेश नाईक). हा योगायोग म्हणायचा की चेकमेट ......................................
श्रेष्ठ रशियन कादंबरीकर व थोर तत्वचिंतक लियो टॉलस्टॉय यांच्यावर आजच्याच लोकसत्तात एक छान लेख आला आहे.वॉर अ‍ॅन्ड पीस या कादंबरीच नाव घेतल की आपसुकच टॉलस्टॉय यांची आठवण होतेच.अश्या या महान लेखकाची आठवण आणि त्याच्या बद्दलची माहीती या लेखामुळे मिळाली. याच निमित्याने थोड्याच दिवसान पुर्वी वाचलेल्या गॉन विथ द विंड ( अनुवाद - मोनिका गजेंद्रगडकर) या कादंबरीची आठवण झाली. अमेरिकेतल्या राज्या-राज्यां मधिल झालेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी आपल्याला कितीशी आवडॆल अश्या साशंकतेनेच मी ती वाचायला सुरुवात केली. पण खरच सांगतो ती कादंबरी वाचून भारावुन गेलॊ. स्कार्लेट ओ हारा ही म्हटली तर कादंबरीची नायिका. तिच्या आयुष्यातील घटनां भोवती ही कादंबरी रचली आहे. नायिकेच्या आयुष्यात तिच्यावर येणार्‍या संकटांना ती धाडसाने समोरी जाते.पण ज्याच्यावर ती मनापासुन प्रेम करते त्याच प्रेम शेवटपणे तिला मिळत तर नाहीच पण तिच्यावर जो प्रेम करत असतो त्यालाही ती शेवटी गमावुन बसते. त्या कादंबरीत एक वाक्य आहे. स्कार्लेटची आई तिला सांगते " पुरुषांवर आपण कितीही प्रेम केल तरी त्यांच प्रेम असत ते जमिनीवर.तिच्या साठी ते लढतात आणि वेळ प्रसंगी सर्वस्व गमावतात.".कादंबरीतल हे वाक्य माझ्या मनात एक विचार निर्माण करुन गेल.महाभारतातल्या कौरव-पांडवा मधिल युध्दासाठी अनेक कारणं होती त्या पैकी सर्वात महत्वाच म्हणजे भर दरबारात द्रौपदीचा द्युतानंतर कौरवांनी केलेला अपमान.हे जर महत्वाच कारण होत तर फक्त पाच गाव स्विकारुन युध्द टाळण्याचा प्रस्ताव कौरवां पुढे ठेवताना त्या मध्ये द्रौपदीची पण क्षमा मागण्याची अट का बर पांडवांनी टाकली नव्हती.जर दुर्योधनाने पांडवांचा तो प्रस्ताव मान्य केला असता तर ..................
येत्या १४ जानेवारी २०११ ला मराठे व अब्दाली यांच्यात दि.१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे झालेल्या संग्रामाला २५० वर्षे पुर्ण होत आहेत.या युध्दात धारातिर्थी पडलेल्या लाखो मराठी विरांच स्मरण सगळ्यांनाच असायलाच हव. हा फक्त दोन सत्तांमधिल संघर्ष नव्हता. अब्दाली हा मोगलांच्या दरबारातील मुसलमान सरदारांच्या ,विषेशत: नजीबखान रोहिल्याच्या विनंतीवरुन भारतात आला होता. तर मराठे हे हिंदुस्थानचे रक्षणकर्ते म्हणुन लढणार होते थोडक्यात एक पक्ष धर्मासाठी तर दुसरा देशासाठी लढ्णार होता.वास्तवीक पाहाता मराठ्यांचे हे ध्येय लक्षात घेता सर्व जनतेने सहकार्य करायला हवे होते. पण तसे घडले नाही. पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांनी दिलेल्या झुंजीचे शत्रुने - प्रत्यक्ष अब्दालीने-केलेले कौतुक पाहाता समस्त मराठी माणसांनी या लढाईचा अत्यंत अभिमान बाळगायला पाहिजे.पण लढाईतल्या अपयशावर आपण आपल्या पुर्वजांनी हिंदुस्थानच्या रक्षणासाठी पानिपतावर केलेल्या बलीदानाची किंमत करतो हे बरोबर नाही. जय-पराजय महत्वाचे नाहीत तर ज्या कारणांसाठी लढा दिला गेला ते कारण जास्त महत्वाच.पानिपतवर एकुण महत्वाच्या लढाया तिन झाल्या.पहिल्या दोन लढायातील विजयी पक्षाने दिल्लीवर राज्य केल तर तिसर्‍या लढाईत विजयी झालेला पक्ष-अब्दाली- मराठ्यांच्या शौर्याने दिपुन परत माघारी निघुन गेला. तेव्हा ध्येय उदात्त असेल तर हरणारी लढाई पण वेळप्रसंगी लढलीच पाहीजे. ............
तुमच्यापैकी बहुतेकांनी सिंदाबादच्या सफरी हे पुस्तक वाचल असेल.त्यातील एका सफरी मध्ये त्याला एक माणुस त्याच्या खांद्यावर एका म्हातार्‍याला घेवून चाललेला असलेला भेटतो.युक्तीने तो माणुस त्याच्या कडील म्हातार्‍याच ओझ सिंदाबादच्या खांद्यावर टाकतो आणि पळुन जातॊ. पळता पळता तो सिंदाबादला सांगतो या म्हातार्‍याच्या ओझ्या पासुन सुटका करुन घेण्याचा मार्ग एकच तो म्हणजे दुसर्‍या माणसाच्या खांद्यावर हे ओझ देण. तेव्हा मी ही तेच करायचा प्रयत्न करत आहे . तेच म्हणजे माझ्या मनात दिवसभरात घोळत असलेल्या विचारांच ओझ तुमच्या खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न. कळुद्या मला यात मी यशस्वी झालो आहे का नाही ते.‘

६ नोव्हें, २०१०

दीपावली २०१०

                                                दीपावली २०१०


प्रिय मायबोलीकरांनो,

आपण जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही असलात तरी आपले लक्ष महाराष्ट्रात घडणार्‍या छोट्या-मोठ्या, बर्‍या-वाईट घटनांकडे निश्चीतच असते. कोणाच अन्न कुठे वाढलेल असत ते सांगता येत नाही पण तरीही घरची ओढ मात्र सर्वांनाच असते. त्यामुळे तुम्ही कोठेही असलात तरी तुमच मन या महाराष्ट्राकडे असतच यात शंका नाही.त्याच प्रेमापोटी महाराष्ट्रात वेळोवेळी घडणार्‍या घटनांबाबतचा कानोसा वेगवेगळ्या दुरचित्रवाहिन्या , युनिकोडच्या प्रसारामुळे इंटरनेटवर उपलब्ध होत असलेली मराठी वर्तमानपत्रे आणि तुमच्या-माझ्यासारखे सारखे ब्लॉगवर लिहीणारे हौशी मायबोलीकर यांच्या मत-मतांतरावरुन आपण घेत असता. आपणास त्या वरुन सध्या महाराष्ट्रदेशी सर्वच काही आलबेल नाही हे देखिल ध्यानात नक्कीच ध्यानात आले असेल. त्या मुळे माझ्या प्रमाणेच आपणही काहीसे व्यथीत झाला असाल नाही का ?

उद्यॊगधंद्यात, शैक्षणीक क्षेत्रात आघाडीवर असलेला व तसेच सामाजीक दृष्टया पुरोगामी विचारसरणी असलेल्या आपल्या महाराष्ट्राची आजची अवस्था इकडे काहीसे वेगळे वातावरण असल्याची विदारक जाणिव करुन देते. आरक्षण मिळावे यासाठी सर्वच जातींमध्ये चाललेली चढाओढ , चालु असलेले उद्योग बंद करुन त्यांच्या मोक्याच्या जागी गर्भश्रीमंतासाठी बांधले जाणारे टोलेजंग टॉवर्स , गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्य़ा साठी करावा लागणारा दीर्घकालीन संघर्ष , धंदेवाईक दृष्टीकोन ठेवुन चालवल्या जाणार्‍या शिक्षणसंस्था व राजकारणासाठी या सर्व गोष्टींना खतपाणी घालणारे राजकारणी या सर्वांचा एकत्रीतपणे विचार केला तर आजचा महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे असा दावा कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी करता येत नाही.

मायबोली मराठी भाषेची अवहेलना महाराष्ट्रात जेव्हढी होते तेव्हडी परदेशातील माझ्या मायबोलीकरां कडुन अनवधानाने देखिल होत नसावी. त्यातच मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरातील परभाषीकांची वाढती संख्या आणि त्यांची सर्वच क्षेत्रातली जाणावणारी दादागिरी - पैशाची असो ,सांस्कॄतीक असो, वा संख्याबळाच्या ताकदीची - याचा विचार केला तर महाराष्ट्रचे राजकीय नेतृत्व अमराठी माणसाकडे जाण्याचा दिवस फ़ार दुर नाही हे जाणवत. महाराष्ट्र हे सर्वात जास्त वेगाने शहरीकरण होणार राज्य आहे. या बेलगाम वाढीसाठी मुख्यत: जबाबदार आहेत ते बाहेरुन येणार्‍या परभाषीकांचे लोंढे. ज्यामुळे फक्त शहरातील पायाभुत सुविधांवरच ताण पडतो अस नाही तर अप्रत्यक्षरीत्या त्याचा प्रतिकुल परिणाम छोट्या-मोठ्या गावांमधुन राहाणार्‍या सर्वसामान्य मराठी जनतेवर होत आहे. उदाहरणच द्यायच झाल तर मुंबईला अखंड २४ तास वीज मिळावी या करीता महाराष्ट्रातील अनेक खेडी १२ ते १५ तासांचे लोडशेडींग विनातक्रार सहन करीत आहेत किंवा मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या आसपासची जनता त्यांची मुल्यवान जमिन देवून वर पाणीटंचाईला तोंड देत आहे ही वस्तुस्थीती आहे. या निरपेक्ष त्यागाची जाणिव असण तर सोडाच पण पोटापाण्यासाठी आलेल्या उपर्‍यांनी म्हणे महाराष्ट्राचा विकास केला असे तारे तोडले जात आहेत. त्यामुळे अश्या प्रवृत्तींना सडेतोडपणे प्रत्युतर देण्यार्‍या राजकीय नेतृत्वाची आज प्रकर्षाने गरज आहे. पण पुरोगामी विचारांचा व नवनवीन संकल्पनांचा तत्परतेने स्विकार करणारा हा समाज गटातटात विभागुन गेला असल्यामुळेच येथे समर्थ राजकीय नेतृत्व उभ राहु शकत नाही हे लक्षात घेण आवश्यक आहे. परिणाम: ज्या समाजाने कधिकाळी देशाच राजकीय व तसेच सामाजीक नेतृत्व केल त्या मराठी भाषीक समाजाची स्वत:च्या राज्यातील आजची अवस्था विश्वास बसणार नाही इतकी वाइट झालेली आहे.

असे हे नकारात्मक व निराशेचे विचार दिपावलीच्या मंगल प्रसंगी व्यक्त करण काहीस अप्रस्तुत आहे याची मला जाणिव नक्कीच आहे. पण आपण आपल्या माणसां समोरच मन मोकळ करतो ना? माझा ब्लॉग लिहायला सुरुवात करताना मी नक्की अस काहीच ठरवलेल नव्हत आणि आजही ते तसच आहे. पण तरीही माझ्या ब्लॉगवर सहज म्हणुन डोकावून जाणारी व माझ्या विषयीच्या आपुलकीने नियमीत पणे भेट देणारी काही मंडळी या सर्व मायबोलीकरांना मी आपलच समजतो. त्याचच दृष्य प्रगटन म्हणजे माझ वेडबागड पण मनातल हे लिहीण. आवडल तर कौतुक करा पण काही आवडल नाही किंवा काही मत पटली नाहीत तर मात्र तुमच मत जरुर जरुर व्यक्त करा हीच विनंती.असो.

आपण सारे उत्सव प्रिय माणस आहोत. श्री गणरायाच्या आगमना पासुन ते दीपावली पर्यंत अनेक सण आपण साजरे करत असतो. या ऊत्सव जत्रेची सांगता दीपावली साजरी करुन होते. हा सण धार्मिक कमी तर उत्सवी जास्त आहे. याच सुमारास आपल्या उष्णकटीबंधातील देशातल्या वातावरणात काहीसा गारवा जाणवु लागलेला असतो. परिक्षा संपल्यामुळे घरा-घरातील लहान मुले नेहमी पेक्षा जरा जास्तच आनंदात असतात. त्याचा परिणाम आपल्यावर सुध्दा झाल्या शिवाय राहात नाहीच.तेव्हा आजुबाजुची परिस्थिती कितीही बिकट असली तरी आशेचा गारवा मनाला उत्साहीत करतोच. अस म्हणतात की कुठल्याही नाटकाचा शेवट हा आशादायी असावा जेणेकरुन प्रेक्षकाला सगळच काही संपलेल नाही व जगण्यासाठी बरच काही शिल्लक आहे अस विश्वास वाटतो. तेव्हा मी सुध्दा या संवादाचा शेवट शुभेच्छा देवुन करतो.


तेव्हा ही दीपावली आपणा सर्वांच्या जिवनात सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य घेवुन येवो याच माझ्या आपणास शुभेच्छा

जय महाराष्ट्र, जय मराठी

मैत्रेय१९६४