१२ सप्टें, २०११

गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.....


आज सकाळी साधारण ६.३० च्या सुमारास लालबागच्या राजाच गिरगाव चौपाटीवर विसर्जन झाल आणि प्रतिमात्मक अर्थाने मुंबईतील सार्वजनिक गणेशमुर्तींच्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली.त्याच बरोबर पुण्यासह उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व मानाच्या गणेशमुर्तींच देखिल एव्हाना विसर्जन झालेल आहे.त्या मुळे साक्षात परमेश्वराने आपल्या लाडक्या भक्तांच्या भेटीसाठी येण्याच्या आनंदवारीची संपुर्ण सांगता आता झालेली आहे.
या संपुर्ण उत्सवाच्या काळात भक्तीने भारलेल्या व उत्साहाच्या आवेगात काहीश्या बेशिस्त झालेल्या जनसमुहाला नियंत्रीत ठेवण्याची तारेवरची कसरत करताना कार्यकर्त्यांची आणि विशेष करुन महाराष्ट्र पोलीस दलाची मोठी कसोटी लागलेली होती.त्यातच दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभुमीवर अति दक्षतेचा इशारा दिलेला असल्याने राज्यातील संपुर्ण पोलीस यंत्रणेवर प्रचंड शारिरीक आणि त्याचबरोबर न जाणवणारा मानसिक ताण आलेला होता.अर्थात याची कल्पना तुमच्या माझ्या सारख्या घरात बसुन विसर्जन सोहळयाचा टीव्हीवर आनंद लुटणार्‍‍यांना येण शक्यच नाही.
अश्या तणावपुर्ण परिस्थितीतही अहोरात्र रस्त्यावर उभे असलेले थकलेभागले पोलीस जनसामान्यांना जराही जाणिव न करुन देता शांतपणे शिस्त लावत होते.तेव्हा पोलीसांकडुन देखिल तणावाच्या परिस्थितीत कस वागायच हे शिकण्या सारख बरचं काही आहे हे लक्षात येतं.
आता आज आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनाचा सोहळा व्यवस्थित पार पडला आहे. तेव्हा श्री गणरायाच आनंदाने, उत्साहाने आणि निर्विघ्नपणे विसर्जन होण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व पोलीस यंत्रणेच आणि त्यातही रस्तोरस्ती अहोरात्र दक्ष उभ्या असलेल्या सर्व पोलीसांच आपण सर्वांनीच न विसरता निश्चितच कौतुक केल पाहीजे.