१९ फेब्रु, २०११

शिवजयंती २०११


श्री छत्रपती शिवाजी महाराज



आज महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे.महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणा स्थान. त्यांना त्रिवार वंदन करताना त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र व महाराष्ट्र धर्म आज अस्तित्वात आहे का याचा विचार मनात यायलाच हवा....आणि अर्थातच तसा विचार आपण सर्व मायबोलीकर आपल्या आपल्या परीने निश्वितच करत असालच.
आपल्या महाराष्ट्र राज्याची सध्याची आर्थिक, सामाजीक , भाषीक आणि त्याहुन महत्वाची म्हणजे राजकीय परिस्थिती पाहुन छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म आपण विसरत चाललो आहोत की काय अशी शंका माझ्या मनात येते.त्या मुळे मी माझे महाराष्ट्र धर्मा बद्दलचे विचार खरं म्हणायच माझ्या भावना आपणा पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. माझा हा प्रयत्न आपण समजुन ( आणि सहन करुन.... ) घ्याल अशी खात्री असल्यानेच हे धाडस.

जय महाराष्ट्र जय मराठी

आपला
मैत्रेय१९६४.

*************************************

महाराष्ट्र धर्म आठवावा
वन्ही मनी चेतवावा
एल्गार पुन्हा करावा
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

बलीदान ते पुर्वजांचे
नित्यस्मरुनी मनामनाते
शिवराजधर्म तो जाणावा
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

जातपात पंथ विसरुनी
जाणावी अस्मिता महाराष्ट्राची
आण घ्यावी मायबोलीची
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

लढलो देश रक्षणासाठी
नाही कोणत्या स्वार्थासाठी
सांगावे हे अभिमानाने
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

आठवावे बलिदान ते
बाजी मुरार अन तानाजीचे
धर्मनिष्ठ शंभुराजांचे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

गवतालाही फुटले भाले
फक्त याच मातीमध्ये
लक्षात नेहमीच ठेवावे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

आण आम्हाला शिवरायांची
वारकर्‍यांच्या भक्तीमार्गाची
याचे भान असो द्यावे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

रोहीडेश्वराशी संकल्प केला
स्थापण्या राज्य मरहट्ट्यांचा
हेतु जाणावा महाराजांचा
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

महाराजांचे करण्या स्मरण
नाही उत्सवा्चे प्रयोजन
नित्य करावे शिव-चिंतन
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

मावळे आम्ही महाराजांचे
जाणीव असावी मनामध्ये
सावध चित्ती सदा असावे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

***************************