१३ जाने, २०११

शौर्यस्मरण अर्थात पानिपत दि. १४ जानेवारी १७६१


महाराष्ट्राचा इतिहास हा पानिपतचा रणसंग्राम वगळुन लिहीताच येणार नाही. किंबहुना जास्त योग्य शब्दात म्हणायच तर समजुन घेताच येणार नाही.येत्या १४ जानेवारीला या रणसंग्रामाला २५० वर्षे पुर्ण होत आहेत पण त्याचे सुप्त परिणाम मराठी मनात व सामाजीक वर्तणुकीत आजही दिसतात. मग ते म्हणींमध्ये असो की दिल्लीच्या राजकारणात न्युनगंडाने वावरायची राजकीय मनोवृत्ती असो या मध्ये पानिपतच्या यशापशयाच प्रतिबिंब दिसुन येत अस मला वाटत. अश्या महत्वाच्या घटनेची पाहीजे तशी नोंद मराठी समाजाने घेतलेली दिसत नाही.पानिपतचे स्मरण म्हणजे जणु काही एखाद्या अप्रिय घटनेचे स्मरण अशीच काहीशी मनोभावना असल्याने हे होत असेल ही शक्यता असु शकते. त्या मुळेच या लढाईला २५० वर्षे पुर्ण होत असताना महाराष्ट्रात येत्या १४ जानेवारीला काहीच समारंभ वैगरे होताना दिसत नाहीत.पण याची दखल पानिपत ज्या राज्यात आहे त्या हरियाणा राज्याने मात्र आवर्जुन घेतलेली आहे.आणि त्याच श्रेय जात ते श्री.अजित जोशी,जिल्हाधिकारी, सोनपत ( हरियाणा) यांना. पानिपतच्या लढाईत तात्कालीन मराठी समाजाने दाखवलेल्या शौर्याचे , केलेल्या पराक्रमाचे व दिलेल्या हौतात्माचे स्मरण व्हावे या करीता त्यांनी " पानिपत प्रतिष्ठान " ची स्थापना केली. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन युद्धामध्ये शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. शुरांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्याची ही स्तुत्य पध्दत म्हणायला हवी. पानिपतच्या लढाईत अब्दालीशी लढलेल्या हिंदुस्तानातील एकमेव समाजाला,आपल्या मराठी समाजाला या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन आदरांजली वाहाण्याचा प्रयत्न हरियाणा राज्य करते त्या बद्दल त्या राज्याचे आपण सर्वांनी आभार मानायला हवेत.
अश्या पानीपतच्या लढाईच आणि तीच्या प्रयोजनाच विश्लेषण कराव असा माझा अभ्यास नाही. पण मराठ्यांच्या इतिहासाचा पराकोटीचा अभिमान असलेला एक इतिहास प्रेमी म्हणुन या संदर्भात जे जे काही आवर्जुन वाचल त्यावरुन माझी खात्री झाली की,"पानिपतचा रणसंग्राम हे मराठयांच्या गौरवशाली इतिहासातल सोनेरी पान आहे."
या लढाईच्या बाबत अत्यंत अभ्यासपुर्ण पुस्तक आहे ते श्री.त्रं.शं.शेजवलकर यांच "पानिपत १७६१" .तेव्हा प्रत्येक मराठी माणसाने मनातील पुर्वग्रह नाहीशे व्हावेत या साठी श्री.त्रं.शं. शेजवलकर यांच "पानिपत १७६१" (प्रकाशक - राजहंस प्रकाशन) जरुर जरुर वाचाव.त्या शिवाय साप्ताहीक विवेकचा १२ डिसेंबरचा २०१० चा " पानिपत रणसंग्राम- महाराष्ट्राची शौर्यगाथा" हा पानिपत विषेषांक  तसेच  लोकसत्ता रविवार दि. ९ जानेवारी २०११ ची लोकरंग पुरवणी या मध्ये या घटने बद्दल अत्यंत अभ्यासपुर्ण माहिती आलेली आहे. ती देखिल शक्य असल्यास मिळवुन जरुर वाचावी. 
"पानिपत १७६१" मध्ये श्री.त्रं.शं. शेजवलकर लिहितात," पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेली महत्वाच गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुन दुसर्‍या लुटारुंशी लढले नाहीत.हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पण हे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,या तत्वासाठी मराठे पानीपतास लढले."
मला वाटत हीच गोष्ट प्रत्येक मराठी माणसाने पानिपतच्या लढाईचे स्मरण करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे न की लढाईत झालेला पराभव. आपल्या पुर्वजांचा हा उद्दात दृष्टिकोन एकदा जर का कळला की मराठी माणसांच पानिपत होत नाही तर पानिपत करणारी आपण माणस आहोत ही मराठी अस्मिता निर्माण झाल्याशिवाय राहाणार नाही.
तेव्हा २५० वर्षांपुर्वी,१४ जानेवारी १७६१ या दिवशी हिंदुस्तानचे राज्यकर्ते व रक्षणकर्ते म्हणुन धारातिर्थी पडलेल्या शुरविरांना वंदन करत असतानाच मराठी रणरागीणींनी आपल्या सौभाग्याच दान पानिपतच्या रणसंग्रामात संक्रातीच वाण म्हणुन हसत हसत लुटल होत याची देखिल आठवण १४ जानेवारी २०११ रोजी ठेवुन आपल्या पुर्वजांना त्यांनी केलेल्या बलिदाना बद्दल आदरांजली वाहुया.

जय महाराष्ट्र, जय मराठी.



२ टिप्पण्या:

Devendra म्हणाले...

अधिक माहिती साठि विकीपेडीया वरील
http://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Panipat_(1761)
या लिंकला जरुर भेट द्या.

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

पानिपत,,? नव्हे हा आहे विश्वास पथ
http://durgaayan.blogspot.com/2011/01/blog-post_19.html