१४ फेब्रु, २०१०

गझल



गझल



माकड हसलं आणि त्या क्षणीच माणसात त्याच रुपांतर झाल अस म्हणतात.तसच काहीस मिशी फ़ुटली की ममाज बॉयच पुरुषात रुपांतर झाल अस समजायला हरकत नसावी.पुरुषांच्या बाबतीत मिशी फ़ुटण आणि "प्रेमात " पडण हे बहुतेक वेळा एकाच वेळी होत असतं. प्रेमात पडण यातच त्या पहिल्या वाहिल्या प्रेमाच पुढे काय होणार ते उमजुन येत असलं तरी त्या प्रेमाचा अनुभव न घेतलेला करंटाच म्हणायला हवा. पहिल्या प्रेमात आपण कधि पडलो ,कसे पडलो हे कदाचीत आठवणार नाही पण ते मनाच्या कोपर्यात शेवट पर्यंत जिवंत असतं

पहिल्या प्रेमाची एक गंमत असते ती म्हणजे जगाला जे दिसत असत त्याच्या एकदम उलट प्रेमात पडलेल्या त्या दोघांना दिसत असत.तिच साध्या साध्या गोष्टींवर उगाचच हसण इतरांना भलेही बालिश वाटो पण त्याला मात्र त्यातून तिचा हसरा स्वभाव दिसत असतो.तिचा सावळा खरंतर काळ्यापेक्षा थोडासाच उजवा असलेला रंग त्याच्या नजरेला मात्र गोर्यापान व पाढंर्या पालीसारख्या (?) असलेल्या मुलींपेक्षा तजेलदार दिसत असतो. तिची तिरकी नजर मित्रांना भलेही "चकणी" वाटत असेल पण त्याला तो प्रेमाचा हळुवार कटाक्ष वाटत असतो. तसचं त्याचा अतिरेकी फ़टकळ स्वभाव लोकांना भलेही उर्मट वाटत असला तरी ती मात्र त्याच्या स्पष्ट्वक्तेपणावर बेहद खुश असते.त्याच्या निरर्थक व अनावश्यक कॉमेंट्स लोकांना भलेही पाचकळ वाटू देत पण तिला मात्र त्यातून त्याचा हजरजबाबी स्वभाव दिसत असतो. तसच भर उन्हात वेड्या सारख फ़िरताना इतरांना जाणवणार ऊन त्या दोघांना मात्र चांदण्याची जाणीव करुन देत असत. गर्दीमध्ये त्या दोघांना एकमेकां शिवाय इतर जगाची जाणि्व सुद्धा होत नाही. खरचं पहिल्या प्रेमात किती गंमत असते नाही ?

असेच काहीसे दिवस माझ्या ही आयुष्यात कधिकाळी आले होते.कालपरवा पर्यंत शेजारच्या पाजारच्या मुलींनी आम्हा मित्रांच्या खेळामध्ये केलेली लुडबुड मला अजिबात आवडत नव्हती. पण अचानक पणे आमच्या खेळामध्ये तीने केलेली लुडबुड मला मात्र आताश्या खटकत नव्हती. तिच लहानपणा पासून गळणार शेंबड नाक अचानकपणे गळायच कस काय थांबल होत काय जाणे. पण तस झाल होत खरं. माझ्याशी कमरेवर हात ठेवून भांडणारी ती अचानक पणे माझ्याशी न भांडता माझी बाजू घ्यायला लागली होती. आणि मी .....................

माझ्या जिवन कंठ्श्य मित्र पश्याने तिला शेंबडी म्हटलेलं मला आताशा का कोण जाणे आवडत नव्हत .चिंचा पाडताना होणारी तिची त्रेधातिरपीट पाहून मी अनाहुत पणॆ तिला चिंचा पाडायला मदत करायला लागलो होतो. सुरुवाती सुरुवातीला जाणवल नाही पण लक्षात यायला लागल होत की लपाछपी खेळताना मी जिथे लपायचो तिथेच ती मागोमाग येउन लपायची.माझ्यावर राज्य असेल तर मला सहज दिसेल अश्या ठिकाणी ती मुद्दाहूनच लपायची .खोट कशाला सांगू मी पण माझ्यावर राज्य असेल तर ती समोर दिसली तरी न दिसल्य़ा सारख करुन दुसर्यालाच शोधायचो .खरचं पहिल्या प्रेमात किती गंमत असते नाही ?

असेच दिवस चालले होते आणि अचानकपणे मला शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागलं. आई-बाबा आणि घरापासून दुर अस पहिल्यांदाच राहात होतो.त्यामुळे सुरुवातीला सुरुवातीला एकटेपणा जाणवत असायचा. पण हळूहळू हॉस्टेलमध्ये मित्र मिळाले . मग मात्र धमाल सुरु झाली. पार्ट्या, पिकनिक्स आणि अचानक पणे मिळालेल्या स्वात्रंत्र्यामुळे अंगात जणु वारं संचारल होत. माझ घर रेल्वेने फ़क्त दोन -अडीच तासांच्या अंतरावर असल्यामुळे सुरुवाती सुरुवातीला आठवड्यात किमान एकदा आवर्जुन घरी जायचो. पण जशी जशी मित्रांची मैफ़ील जमत गेली तस तस आठवड्याला घरी जाणारा मी ,काही दिवसांनी महिन्याने-दीड महिन्याने जावू लागलो होतो. त्यामुळे आताश्या तिच्या भेटी पण क्वचीतच होऊ लागल्या होत्या. खर सांगायच म्हणजे हॉस्टेलच्या रंगीबेरंगी दिवसात मित्रां शिवाय दुसर कोणीच दिसत नव्हत.

असाच एकदा खुप दिवसांनी घरी गेलो होतो.नेहमीप्रमाणे बाहेरच्या अंगणात खूर्ची टाकून बसलो होतो. ती माझ्या घरी आली होती. बहुदा माझ्या आईने तिला बोलावल असाव. मला समोर पाहुन ती गोंधळली . मी भेटेन अशी तिला अपेक्षा नसावी. सारखी बडबडणारी आणि छोट्या छोट्या गोष्टींवर हसणारी ती खुप शांत वाटली. तिच्यातला हा बदल इतर कॊणाला नसेल पण मला फ़ारच जाणवला. ती काहीच बोलत नाही म्ह्टल्यावर मीच बोलत सुटलो. ती फ़क्त ऎकत होती. शेवटी ती हळूच इतकच म्हणाली, " जाऊऊऊ.. काकू वाट पाहात असतील ". सालं एव्हड बोलतोय याच काहीच वाटत नाही. मी वैतागलो,म्हटलं, "जा". ती जाता जाता फ़क्त हसली. नौटंकी साली.

दोन दिवसांनी नेहमीप्रमाणे मी हॉस्टेलला परत गेलो.त्याच दिवशी मित्रांनी कोजागरीची पार्टी ठरवली होती. कधी नव्हे तो सोमरसा ऎवजी चक्क दुध्द्पानाचा बेत होता. त्या मुळे काही केल्या पार्टीला रंग चढत नव्हता.त्यामुळे कधी एकदा बारा वाजतात आणि दुध पिवून झोपी जातो अस झाल होत . अचानक एका मित्राने कॅसेट लावली. कॅसेट तरी धमाल असेल अशी आम्हा सर्वांची अपेक्षा होती. पण त्या ऎवजी संथ सुरावटींनी कॅसेट्ची सुरुवात झाल्याने सर्वच त्या मित्रावर वैतागलो.सुरावट संपली न संपली तोच मखमली आवाज कानावर आला. या पुर्वी तो आवाज कधि ऎकला नव्हता . पण हळुहळु त्या गाण्यातले शब्द प्रथम कानात आणि नंतर मनात अलगत उतरत गेले.सगळेच मग बोलायचे बंद झाले. हॉस्टेलची गच्ची, वातारणातली रात्रीची निरव शांतता ,पोर्णिमेच्या चंद्राचा शांत प्रकाश या मुळे सैलावत गेलेलं मन .....

या सर्वामुळे घरापासून दुर असलेले आम्ही सर्व हळवे झालो होतो.शब्द आणि तो आवाज यानी आमच्या मनावर जणू गारुडच करुन टाकल होतं. कधी न ऎकलेल अस काही मनावर उमटत होत.

आणि अचानक मला तीची आठवण आली.सगळ आजुबाजुच जग जणू धुक्यातच हरवून गेल्यासारख झाल. तिच दिसण,तिची नजर, ..... तिच आणि तिचच अस्तीत्व या शिवाय दुसर काही नाही.

कॅसेट संपली तसे आम्ही सर्व भानावर आलो. कसली कॅसेट ,कुणाची कॅसेट वैगरे चौकशी सुरु झाली. तो मित्र म्हणाला" अरे ही जगजीतसिंगची गझलची कॅसेट आहे."

गझल.... गझलशी माझी ती पहिलीच ओळख होती. आणि गझलचीच का तीची पण मला अवचीत पटलेली पहिलीच ओळख होती.गझलनेच मला न कळलेली "ती " समजली होती.


म्हणुनच सांगतॊ, पहिल्या प्रेमात आपण नक्की कधी पडलो तो क्षण त सांगता येत नाही कारण ते प्रेम आहे तेच मुळी कळ्लेल नसत.पण त्या प्रेमाची ओळख ज्या क्षणी पटते तो क्षण काही केल्या विसरता येत नाही.

गझल आणि पहिल्या प्रेमचि पहिली ओळख एकाच वेळी मला झाली.त्यामुळे जस पहिल प्रेम मनात कायम राहाणार आहे तसच गझलच सुध्दा माझ्या जिवनात नेहमीच स्थान असणार आहे.

"गझल मुळेच मला अव्यक्त्ततेतून व्यक्त होणार्या तिच्या भावना समजल्या. आणि त्या नंतर माझ्या मनाला एकच चाळा लागला तो म्हणजे बोलल्या जाणार्या प्रत्येक शब्दांमधून व्यक्त होणार्या अर्थापेक्षा न बोलल्या गेलेल्या शब्दांमधून व्यक्त होणार्या भावना जाणुन घेण्याचा.ही सवय समोरच्याला अधिक उमजून घेण्यासाठी मला फ़ार उपयोगी पडली आहे. तुम्हीही असा प्रयत्न करुन पहा म्हणजे त्या मधुन तुम्हालाही अद्यापपावतो न कळलेली माणस कदाचीत कळतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: