१३ फेब्रु, २०१०

जाणीव


जाणीव

नेहमी प्रमाणे रेल्वे ब्रिजवरुन चाललो होतो .आज फ़रक इतकाच होता की ,सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी कमी होती. चालता चालता माझ लक्ष त्या दोघांकडे अचानकपणे गेलं. एक ८-९ वर्षाचा छोटासा गोड मुलगा त्याच्या आजोबांकडे काहीतरी हट्ट करत होता.आजोबांनी त्या छोट्याच्या हट्टापुढे बहुदा मान तुकवली असावी कारण तो छानस खुदकन हसला.त्याच्या निरागस चेहर्यावरच वरच ते हसु इतक लोभसवाणं होत की मला त्या आजोबा-नातवा मधली गंमत जाणून घेण्याची तीव्र ईच्छा झाली. सुट्टीचा दिवस असल्याने मलाही घाई नव्हतीच. त्यांना कळणार नाही अश्या रितीने त्यांच्या बाजूला जावून उभा राहीलो .
खर सांगायच तर लहान मुले आणि त्यांचे आजी - आजोबा यांच्या मधिल गोड नात्या बद्दल मला नेहमीच कौतुक आणि कुतूहल वाटत असत.एक धडपडणार बाल्य तर दुसरं थरथरणार व्रूद्धत्व.आजोबा आणि नातू यांना एकमेकांचे हात घट्ट धरुन रस्त्याने चालताना माझ्या प्रमाणे आपणही कित्येक वेळा पाहिल असेल. त्या वेळी नक्की कळत नाही की , कोण कोणाला आधार देतोय ते ?. चालताना बर्याच वेळा नातू पुढे पुढे पळण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आजोबा त्याला कसेबसे थोपवत असतात.हे सर्व पाहिल की असं वाटत की अतिरेकी उत्साहाला अनुभवान आलेल शहाणपण जणू थोपवत आहे. असो .
त्या आजोबांनी खिश्यातून हळूच एक नाण काढल आणि ते नातवाच्या हातावर ठेवल.नातवाने ते थोड्याच अंतरावर वजनकाटा घेवून बसलेल्या म्हातारबाबांना दिलं नंतर तो वजन करण्यासाठी काट्यावर उभा राहीला.तितक्यात त्या छोट्या मुलाचे आई-बाबा तिथे आले.त्यां छोट्याच्या आईच्या चेहर्या वरच्या आठ्यां वरुन आजोबांच आणि छोट्याच वागण तिला अजिबात पसंत पडलेल नाही हे स्पष्ट्च दिसून येत होत.बायकोची नाराजी पाहून मुलगा आजोबांना हळूच काहीतरी बोलला. त्या वर आजोबा ठामपणे म्हणाले " अरे, पण माझी या बाबतची जाणीव काही वेगळीच आहे."
हे वाक्य ऎकल आणि मी चमकलोच.नेहमी पेक्षा काहीतरी वेगळ असं ते आजोबा बोलले होते नक्कीच.मी अजूनच कान टवकारले.बायकॊच्या चेहर्यावरच्या आठ्या जास्तच आक्रसलेल्या पाहून ,मुलगा थोडा अस्वस्थ होत म्हणाला," ते सर्व ठिक आहे .पण ईथे आत्त्ताच वजन करायच काय़ अडल होत का?."
आजोबा : " जरा ऎकशीक का माझं ?"
मुलगा : " काय ऎकू. तुमच नेहमीच काहीतरी जगावेगळ असत"
आजोबा : " अरे, मनूचा छोटासा हट्ट पुरवायचा नाही का ?"
मुलगा : " म्हणून काय इथे रस्त्यावर........"
आजोबा : " मनूला त्याच काट्यावर वजन करायच होत. मग मी विचार केला की त्याचा हट्ट तर पुरवला जाईलच पण त्याच बरोबर त्या म्हातारबाबांना मदत देखिल होईल."
आजोबांचे हे विचार मुलाला आणि त्याच्या बायकोला हे पटलेले नाहीत हे कळत होतच.पण हे ऎकल्यावर मला मात्र जाणवला ,दोन विभिन्न वयातल्या व्यक्तींच्या द्रुष्टीकोनातील फ़रक.त्या छोट्याच्या आई-बाबांना त्यांच्या मुलाने असे रस्त्यावर वजन करणे कमी पणाचे वाटले होते. तर आजोबांना ...........
त्यांना १ रुपयामध्ये आपल्या नातवाच्या चेहर्यावरचा आनंद तर पाहायला मिळालाच होता पण त्यातून त्या म्हातारबाबांना त्यांचा स्वाभिमान न दुखावता केलेली मदत जास्त समाधान देवून गेली होती . ते म्हातारबाबा परिस्थीतीच्या अगतीकतेमुळे या वयात सुध्दा कमवायला मेहनत करत होते.हे करत असताना त्यांना कोणाच्या दयेची अपेक्षा नसल्याने भीक मागण्याचा सरळधोप मार्ग सोडून स्वाभिमान जपत वजनकाट्याव्दारे चार पैसे पोटा साठी कमवू पाहात होते.हे सगळं त्या आजोबांच्या जाणीवा जाग्रुत असल्याने त्यांना कळल पण त्या तरुण जोडप्याला ... ?
हा प्रसंग माझ्या मनाला वेगळीच जाणीव करुन देणारा ठरला.अश्या प्रकारचे आपल्या जाणीवा जाग्रुत करणारे असे अनेक प्रसंग आपल्या आजुबाजुला घडत असतात जे टीपण्या साठी हव असतं आजोबां सारख संवेदनशील मन .पण ते झापडबंद विचारांमुळे आपल्याला जाणवत नाहीत.
दुसरा एक प्रसंग माझ्याच बाबतीत घडलेला आहे.कधी नव्हे ते भाजी घेण्यासाठी एकदा मी बाजारात गेलो होतो .त्या मुळे भाव वैगरे करायची सवय असण्याचा प्रश्नच नव्हता.त्या ब्रीजवरच्या प्रसंगा पासून मी शक्यतोवर म्हातार्या माणसांन कडुनच खरेदी करायचो .तेव्हडिच त्यांना मदत.तिथे एक आजीबाई भाज्या घेऊन बसलेल्या दिसल्या .मी त्यांच्या कडुन दोन भाज्या भाव न करताच घेतल्या.पैसे देण्या पुर्वी आजूबाजूला सहजच लक्ष गेलं.पाहिल की सगळेच भाव करत होते.ते पाहून पैसे देण्यापुर्वी सहजच विचारायच म्हणुन आजी बाईना म्हणालो , " आजी, एकदम दोन भाज्या घेतोय तेव्हा २ रुपये तरी कमी करा ना ." आजींनी माझ्याकडे चमकून पाहील . हे भोट गिर्हाईक असे काही विचारेल अशी त्यांना अपेक्षित नसावं . त्या म्हणाल्या, " बाळा, येक ईचारु.तुले राग नाय ना येणार ?" माझ्या सारख्या पस्तीशीतील्या पुरुषाला बाळा म्हणणार्या आजींना मी काय बरं बोलणार. त्याच पुढे म्हणाल्या," हॉटेलीत जातू ना रं". मी म्हणालो " जातो ना कधितरी." त्यानी विचारल ," तीथ वेटरले बक्षिसी बी द्येतो का रं?" मी फ़ुशारुन म्हणालो,"देतो की" हे मी म्हटल्यावर त्या नंतर आजी जे म्हणाल्या त्याने माझ्या डोळ्यात अंजनच घातलं. त्या म्हणाल्या " हॉटेलीत जातोस. तिथ पैका मोजतोस अन वेटरले बक्शीशी बी देतोस.मग या आज्येशी भाव करतो का रं?.या उमरमधी ही आज्ये गरमीमधं इथं बसत्येत त्याच तुला काय बी वाटत नाय रे ?".हे ऎकल्यावर मीच काय पण ज्या्च्या मनात थोडीतरी संवेदना शिल्लक आहे असा माणूस काय बरं बोलणार.
मी त्या आजीला ईतकच बोललो की,"आजी,तुमचं म्हणण मला एकदम पटल बघा.एक नक्की सांगतो या पुढे भाजी घेताना तुमच्याशीच काय दुसर्या कोण्याही आजीं बरोबर भाव करणार नाही." माझं बोलणे ऎकल्यावर आजी हसल्या. ते हसण निर्व्याज्य होत खिजवणार नव्हत. त्याच पुढे म्हणाल्या,"बाळा,पिशवी पुढं कर की जरा".मी नकळतच पिशवी पुढे केली. आजीने छोटीशी कोथींबीरीची जुडी पिशवीत टाकली.मी म्हणालो,"हे कशाला आजी".त्या म्हणाल्या,"अरं बाळा,तुन माझ म्हातारीच गुमान ऎकलस मग मी बी तुझं थोडस ऎकू नगं का रं.माज्याच परसातली हाय म्हणुन ही जुडी तुले देत्येय .आजी म्हंण्लास मग माजं ऎक अन ठिव ही गुमान". आजीच म्हणणं किती समर्पक होत नाही ?.त्या मुळे तो प्रसंग सुध्दा माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. त्यानंतर मी भाजी घेताना आजतागायत भाव केलेला नाही.
या दोन पसंगातून मी नक्कीच खुप काही शिकलो .आजोबांनी शिकवलं की दुसर्याला मदत करताना त्याचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहीजे.तर आजींनी शिकवल की व्यवहार करताना समोरच्या माणसाचा देखिल विचार केला पाहीजे.त्यांनी असही शिकवल की आपल म्हणण पटवताना दुसर्याच्या भावना देखिल कश्या प्रकारे जपायच्या असतात. त्या दोघांच्या अनुभवातुन त्यांच्या मतांच जाणिवेत रुपांतर झालेल होत कारण त्यांना दुसर्याच्या मतांचा विचार करता येत होता.
आपल्याला आलेल्या अनुभवातून आपली देखिल मतं तयार होतात.त्या मतांना उराशी धरुन आपण समोरच्या्शी वागत असतो.हे करत असताना समोरच्या्ची पण त्याच्या अनुभवातून मत तयार झालेली असतात याचा विचार आपण करत नाही.त्या मुळे मत मांडताना आपण एकमेकांना अनाहुतपणे दुखवतो .पण त्या आजी -आजोबां सारख आपण जेव्हा दुसर्याच्या मताचा विचार करायला शिकू तेव्हा आपल्या मतं देखिल जाणिवेत बदलतील हे नक्कीच.
तेव्हा आजुबाजुला घडणार्या घटना काहीतरि देत असतात हे लक्षात असु द्या.

 
 

२ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

दोन्ही अनुभव सुंदरच..

भानस म्हणाले...

मैत्रेया,खरेच किती महत्वाचे आहेत हे दोन्ही अनुभव आणि तू मांडलेसही सहज सुंदर.