२ ऑग, २०१०

ट्रेकवाली

                                                                    ट्रेकवाली


सोमवार म्हणजे आठवड्याची सुरुवात,तिही मुंबई सारख्या धावपळीच्या जीवनातली.त्या मुळे घरातून ऑफ़ीससाठी बाहेर पडताना जिवावर आल होत. त्यातच बाहेर रपारपा पाऊस पडत हॊता. पाउस असा अंगावर झेपावत असताना कामावर जाव अस मनाला पटत नव्हत. म्हणुन नेहमीच्या मित्रांना फ़ोन केले.म्हटल ऑफ़ीसला दांडी मारुन जाऊया भिजायला कोठेतरी.पण कोणीच तयार नव्हत म्हणुन चरफ़डत गाडी पकडली.मन मात्र बैचैन होत.छान पाऊस पडत असताना मला ऑफ़ीसला जाव लागतय याच दुख:होत होत. नेहमीप्रमाणे खिडकीत बसायला जागा मिळूनही मुड नसल्याने गप्पा न मारता डोळॆ मिटून स्वस्थ बसलो.आजुबाजुला मित्रांची भंकस चालू असली तरी मन दुसरीकडेच होत.मिटलेल्या डोळ्यांसमोर अचानक तिची आठवण आली.............
तो ८७ सालचा जुलै महिना होता.त्या दिवशी सकाळ पासुनच पावसाने चांगलाच जोर पकडला होता.मधला वार असल्याने ऑफ़ीस होत.पण वय तरुण असल्याने मनासारखे वागायचेच ते दिवस होते.तेव्हा ऑफ़िसला दांडी मारुन पावसात भिजायला जाव अस ठरवल.सॅक भरली आणि निघालो.आईला माझ्या अश्या वागण्याची सवयच होती त्यामूळे तिलाही त्याच काहीच वाटल नाही. "संभाळुन जा रे" ईतकच ती म्हणाली.
कल्याणहून लोकल,मग कर्जतहून बस अस करत राजमाचीचा ट्रेक करण्यासाठी कोंडीवड्याला गेलो.एकटयाने जात असलोतरी ट्रेक दरम्यान एखादा ग्रुप नक्कीच भेटेल अशी खात्री होती.झालही तसच.अगदी माझ्याच बसमधुन ती दोघ उतरली होती.या स्टॉपवर उतरली होती म्हणजे ती दोघही नक्कीच राजमाचीला जाणार होती यात शंकाच नव्हती. म्हणुन थोड थांबून त्यांच्या मागेमागे जाण्याचा निर्णय घेवून टाकला.विचार केला तेव्हडीच सोबत होईल.
हळूहळू गाव मागे पडल. सुरुवातीला ती जोडी बरोबर चालत होती. नंतर त्यांच्यात काहीतरी बोलाचाली झाली व तिला सोडुन तो झपाझप चालत पुढे निघुन गेला. मी मात्र थोडस अंतर राखुन तिच्याच गतीने शांतपणॆ मागेमागे चालत होतो.त्या निरव शांततेत काही वेळाने तिलाही मी मागे आहे याची जाणिव नक्कीच झाली होती. पण तिही एकटी असल्याने माझी सोबत तिला हवीशी वाटत असावी. पावसाळ्यातला राजमाची ट्रेक मनाला भु्लवणारा असतो. त्या निवांत आणि नैसर्गीक वातावरणात मन शांत होत असल तरी काही वेळाने दुसर्‍या कोणाशी बोलून मन व्यक्त करण्याची अनिवार उर्मी मनात येतेच. तिलाही माझ्या सारखच वाटत असाव.पण ही अबोल्याची कोंडी कशी दुर करावी हे मला कळत नव्हत.
ती निसर्गवेडी होती हे तिच्या छोट्या छोट्या हालचालीतून दिसत होत.रस्त्यात मधोमध फ़ुललेली रानफ़ुल असोत की मधे मधे येण्यार्‍या फ़ांद्या-झुडुपांना ती चालताना टाळत होती वा हळुवार पणे बाजुला सारत होती.चालता चालता मधेच एका झाडावर फ़ुललेल गर्द जांभळ्या रंगाच रानफ़ूल तिला दिसल.ते तोडुन घेण्याचा स्त्रि सुलभ मोह तिलाही आवरला नाही.पण दोन-चार उड्या मारुनही ते काही तिला जमल नाही.तेव्हा निराशेने तिने मागे वळुन माझ्याकडे पाहील.ती नजर ईतकी बोलकी होती की मी झटकन पुढे झालो अन तिला ते फ़ुल तोडुन दिल.त्या क्षणी पहिल्यांदाच आम्ही दोघांनी एकमेकांकडे निरखुन पाहील. रुढार्थाने सुंदर म्हणावी अशी ती नक्कीच नव्ह्ती . पण तरीही कोणाचही लक्ष वेधुन घेतील तिचे डॊळे जरुर होते. ती ह्ळूच थॅंक्स म्हणाली आणि चालू लागली. मी पण मग मुकाट्याने तिच्या मागोमाग चालू लागलो.सोबत असण्याचा आधार दोघांनाही वाटत होता.निसर्ग कितीही सुंदर असला तरी एकटेपणात तो अंगावर येतो.त्याचा पुर्णपणे अनुभव घ्यायचा असेल तर सोबत ही हवीच.
थोड्या वेळाने तिच्या मागोमाग चालण्याचा मला कंटाळा आला.म्हणुन संधी साधुन मी एका वळणावर तिला ओलांडुन पुढे चालू लागलॊ.तिला ते जाणवल की नाही कोण जाणे पण ती ईतकच बोलली " संभाळुन रे. आता पुढे ओढे आहेत बर कां". मग मात्र माझ्या पुरुषी अहंकाराला ठेच पोहोचली. मनात म्हटल " आली मोठी ट्रेकवाली.स्वत:ला काय समजते कोण जाणे.".
असच काही वेळ चालल्यावर खरच एक ओढा आला.डोंगरात पावसाळ्यात तयार झालेल्या ओढयांना नैसर्गीक उतार असल्याने ओढ ही असतेच. त्या मुळे हा ओढा ओलांडताना तिला माझी मदत मागावी लागणार असा मी अंदाज केला.ट्रेकवालीची गंमत करण्यासाठी एकट्याने ओढा ओलांडायचा मी ठरवल. त्या प्रमाणे मी पटकन पुढे जाऊन ओढ्यात पाय टाकला.पण पाण्याच्या तिव्र ओढीने माझा पाय सटकला आणि पाण्यात आडवा झालो.अचानक काय झाल ते माझ मलाच कळलच नाही.पाण्याला अपेक्षेपेक्षा चांगलीच जास्त ओढ होती जीचा अंदाज काठावरुन पाहाताना जाणवला नव्हता.त्या मुळे मी स्वत:ला सावरायच्या आत सात-आठ फ़ुट खाली घसरलो.घसरता घसरता माझ्या हाताला एक कपार लागली.तिला पकडुन मी स्वत;ला थोडस सावरल.पण माझ्या दुसर्‍याच क्षणी लक्षात आल हे काही खर नाहीपाण्याला ओढ ईतकी जास्त होती की हा आधार जास्त वेळ मला पुरणार नव्हता.उतार असल्याने मान वर ठेवण्याचा प्रयत्न करुनही नाकातोंडात पाणी जातच होत.काय कराव तेच समजत नव्हत. तेव्हड्यात एक हात समोर आला. ती म्हणाली" अरे, पटकन हात पकड.". मी विचार केला की ही एव्हडी किरकोळ. माझ वजन पेलवेल का हीला. मी हात पकडायला का घुटमळतो आहे हे तिच्याही लक्षात आलं.ती म्हणाली,"माझी काळजी करु नकोस. पटकन हात पकड."  अर्थात मलाही दुसरा पर्याय नव्हताच.कारण एकट्याने मला बाहेर पडता येणार याची मलाही एव्हाना कल्पना आली होतीच.मग काय बुडत्याला काडीचा आधार.मी तिचा हात पकडला.तिच्या अंगात माझ वजन पेलण्याच बळ असेल का ही माझी शंका लवकरच दुर झाली.तिने शांतपणे पण हळुहळु मला ओढत बाहेर खेचुन काढल.बाहेर पडल्यावर मी पण तिला म्हणालो"थॅंक्स".ती फ़क्त हसली आणि बाकीच सर्व बोलले ते डोळे. त्यात फ़क्त होती काळजी ना कुठला अभिमान वा कुचेष्टा.
पाण्याच्या आवाजा वरुन ओढ्याच पाणी जवळच कुठेतरी खुप खाली पडत असल्याच माझ्या लक्षात आल होत.संकटातुन बाहेर पडल्यावर आपल्या वरच संकट नक्की किती मोठ होत हे जाणुन घ्यावस मला वाटल.मी त्या आवाजाच्या दिशेने उतरु लागलो.ती पण काही न बोलता माझ्या मागे मागे चालत होती. चाळीस- पन्नास पाऊल आम्ही खाली उतारलो असेल ना असेल आणि समोरच ते दृश्य पाहुन मला छातीत धडकीच बसली. ते पाणी तेथून प्रचंड वेगाने दरीत कोसळत होत. मी जर ओढ्यात आजुन पाच-सहा मीटर खाली घसरलो असतो तर.................
मग मात्र आम्ही दोघही काहीच न बोलता वर परत आलो.खर म्हणजे मला मनातून खुप काही सांगायच होत पण तोंडातून शब्दच फ़ुटत नव्हते.समोर मरण पाहील्यावर दुसर काय होणार म्हणा.नंतरचा ट्रेक मात्र व्यवस्थित पार पडला.राजमाची खालच्या गावात तिचा मित्र वाट पाहातच होता.एव्हना दोघां मधला तणाव कमी झाला होता.बोलता बोलता त्याच्या बोलण्यातून तिने हिमालयीन माऊंटरींग असोशियनचा अ‍ॅडव्हान्स माऊंटरींग कोर्स केल्याची माहीती तर मिळाचीच पण त्याच बरोबर तिने आत्ता पर्यंत राजमाचीचे बावीस ट्रेक केल्याच पण कळल.
मग माझ्या लक्षात एक एक गोष्टी यायला लागल्या.त्या ओढ्याची कल्पना असल्याने तीच संभाळुन जा अस आपुलकीने सांगण.तसच माऊंटरींगच्या प्रशिक्षणातून आलेला आत्मविश्वास.मला ओढ्यातुन बाहेर काढताना तिने स्वत:च्या शरिराला दिलेला विशिष्ट बाक ज्या मुळेच माझ वजन जास्त असुनही ती मला सहज बाहेर काढु शकली होती.तिच्या एकंदरीत वागण्या पुढे माझ वागण किती चुकीच होत ते माझ्या लक्षात आल.
चुक कबुल करण्याची आजुनही वेळ गेली नव्हती.मी मनापासुन म्हणालो,"मी तेव्हा खुप घाबरलो होतो.बर का".त्यावर ती ईतकच म्हणाली," होत रे अस कधीकधी".त्या नंतर मग परतीची वाट त्यांच्या सोबत मी पार पाडली.त्या प्रवासात मग मी तिचे ट्रेकींगचे अनुभव ऎकले.शेवटी एकदाचा ट्रेक संपला.निरॊप घेताना आम्ही एकमेकांचे पत्ते घेतले आणि परत भेटण्याचे वायदे ही केले.
पण खर सांगतो त्या नंतर आम्ही कोणीच एकमेकांना भेटलेलो नाही.पण आजही पाऊस पडत असला आणि मनात पावसाची भटकण्य़ाची उर्मी आली की मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी तिची आठवण येतेच.

३ टिप्पण्या:

Deepak Parulekar म्हणाले...

Awesome man !!

Every word is touching to heart!!

Regards
Deepak Parulekar

Devendra म्हणाले...

प्रिय दिपक,
प्रतिक्रिये बद्दल आभार. आपण लिहीतो त्याची कोणी दखल घेत आहे ही भावना सुखदच. प्रत्येकाच्या जिवनात असे प्रसंग येतातच नाही का?
मैत्रेय१९६४

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

ya sarya anubhvansathi tar trek la jayche aste mag kadhi yetos trekla?