२१ जून, २०१०

युनिकोड गीता

                 ॥ युनिकोड गीता ॥
                                                            अर्थात
 संगणकावरील मराठी,आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र )
                                               लेखक: श्री. माधव शिरवळकर

                  सन १९९६ सालची गोष्ट. महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकारी-कर्मचारी यांना संगणक शिकणे नुकतेच अनिवार्य केले होते.त्यामुळे मी देखिल संगणक प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. सुरुवातीचे ते दिवस आठवले की आज गंमत वाटते. त्या वेळी मी संगणक ऑन-ऑफ़ करायला सुध्दा घाबरत होतो. एखाद अ‍ॅप्लीकेशन चुकीने अचानक पणे बंद झाल तर संगणक बिघडणार तर नाही ना अशी कुशंका मनात यायची. यथावकाश प्रशिक्षण पुर्ण झाल. त्या नंतर सरावासाठी घरी संगणक घेतला. त्या मुळे हळूहळू भीड चेपत गेली. त्यातूनच पुढे मित्रांशी चॅट आणि ई-मेल सुरु झाल. इंग्रजीवर पुरेसे प्रभुत्व नसल्याने मी मिंग्लिश म्हणजे मराठी शब्द इंग्लीश मुळाक्षरांच्या आधारे लिहायचो. उदा. मला आनंद झाला हे वाक्य मी maala aanand jhala असं लिहायचो.अश्या कसरती कराव्या लागत असल्यातरी नव्याची नवलाई असल्याने मी बरेच मोठ मोठे मेल लिहीत असे. त्यामुळे माझ्या मित्रांना ते मेल वाचण्याचा आनंद होण्या ऎवजी कष्टच जास्त व्हायचे
                 दिवस जात राहीले, वर्षेही गेली. मिंग्लिश मधुन चॅट आणि ई-मेल सुरुच होते. दुर गेलेले जिवलग त्यातुन भेटत राहीले आणि तुटले असते असे संबंध टीकून राहीले. पण का कोण जाणे संगणका विषयी आपुलकी तरीही वाटत नव्हती.. आपल्या माणसांशी संवाद साधताना मराठीतून लिहीता येत नसल्याने मनाला समाधान वाटत नसे.त्यातून संगणकावर मराठीतून कसे लिहीता येईल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग मित्रांकडुन काही मराठी फ़ॉंट मिळवले. ते वापरुन ई-मेल पाठवले पण ते ज्याला पाठवले त्याला वाचताच आले नाहीत कारण तो मराठी फ़ॉंट त्याच्या संगणका मध्ये नव्हता. एकंदरीत संगणकावरून मराठीत संवाद साधता येण काहीस अशक्यच वाटत होत.
                     वर्षे ही उलटतच हॊती पण संगणक काही आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी भाषेला स्विकारायला तयार होत नव्हता आणि त्यामुळे माझ्या सारख्या अनेकांना तो आपलासा वाटत नहता. याच दरम्यान मधे मधे कधीतरी कोणा कडुन "युनिकोड" बद्द्ल कानावर पडत होत.पण युनिकोड बद्द्लची माहिती देणार अस कोणीच नव्हत. लिहीण्याची तिव्र इच्छा मराठीतूनच लिहाव अशीच असल्याने मनात रुखरुख सतत असायची. याच दरम्यान काही वर्तमानपत्रात ब्लॉग बद्दल वाचायला मिळालं. त्यातूनच अनेक लोक ब्लॉग लिहीताना मराठीचा वापर करतात अशी माहीती पण मिळाली.माझ्या एका मैत्रीणीने तिने मराठीतून ब्लॉग लिहायला सुरुवात केली असल्याच चॅट करताना सांगीतल. सुरुवातीला विश्वास वाटला नाही .पण नंतर ती खरोखरच मराठीतुन ब्लॉग लिहीत आहे अशी तिचा ब्लॉग पाहील्यावर खात्रीच पटली. त्यातुन मग मलाही मराठीतुन ब्लॉग लिहावा अस वाटायला लागल. मग तिच्या कडुनच काही टीप्स घेतल्या आणि ब्लॉग लिहायला मी पण सुरुवात केली.
               ब्लॉगवरचे माझे लेख मी बराहा मध्ये लिहुन ते कॉपी-पेस्ट द्वारे ब्लॉगवर टाकत असताना मला एक मेसेज नेहमी यायचा. त्या मध्ये माझा लेख UNICODE-UTF8 मध्ये रुपांतरीत करायचा का अशी विचारणा केली जायची..त्या मुळे माझ्या लक्षात यायला लागल की माझ्या लेखातील फ़ॉंट्स UNICODE मधे रुपांतरीत करण खुप गरजेच आहे. त्यातुन UNICODE बद्दलची उत्सुकता वाढतच गेली..आणि अचानक हाती आल "ते" पुस्तक. श्री. माधव शिरवळकर लिखीत " संगणकावरील मराठी,आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र )"
            महाभारताच्या रणांगणावरील अर्जुनाला पडलेल्या अनेक प्रश्नांच निरसन जस भगवान श्रीकॄष्णाने "भगवत गीता" सांगुन केल तसच या पुस्तकाने माझ्या मनातील युनिकोड विषयीच्या सर्व प्रश्नांच निरसन केल आहे. या पुस्तकात युनिकोड विषयीची माहिती ईतकी सविस्तर दिली आहे की, ती इतरांना सांगुन IMPRESS करता य़ेइल. या पुस्तकात आहे युनिकोडची चळवळ व इतिहास,तिची वाटचाल , भारतीय भाषा व देवनागरी लिपी यातील तिच योगदान, तिचा भविष्यकाळ आणि बरच काही. त्या मुळे हे पुस्तक म्हणजे माझ्या दॄष्टीने "युनिकोड गीता"च आहे. तेव्हा हे पुस्तक संगणकावर मराठीतून लिहु पाहाणार्‍या सर्वांनी जरुर वाचाव आणि आपल्या माय मराठीतून खुप खुप लिहुन मराठीचा झेंडा संगणका विश्वात फ़डकवावा असे सर्वांना मी अवाहन करतो.



४ टिप्पण्या:

भानस म्हणाले...

यादीत लिहून ठेवते.:)

Mallinath म्हणाले...

बरहामध्ये युनिकोड न वापरता आपण कसे लिखाण करत होतात? मला प्रयत्‍न करूनही अजून जमलेले नाही.

Devendra म्हणाले...

प्रिय भानस
सातत्याने माझ्या ब्लॉगवर भेट देवुन नोंद घेतेस बर वाटत. ब्लॉगवरच लिखाण हे "स्वांत सुखाय" असल तरी त्याची नोंद इतरांनी घ्यावी ही सुप्त ईच्छा मनात असतेच हे कस नाकारता येइल

Devendra म्हणाले...

प्रिय Mallinath
माझ्या या लेखाची नॊंद घेतल्या बद्दल आभार. बराहा मधले काही फ़ॉंट युनिकोडला योग्यप्रकारे सपोर्ट करत नसावेत अस मला वाटत. कारण जेव्हा पासुन मी बराहातला मंगल फ़ॉंट वापरुन तो मजकुर ब्लॉगवर कॉपी पेस्ट करत आहे तेव्हा पासुन UNICODE-UTF8 मधे मजकुर परावर्तीत करा असा मेसेज येत नाही. मंगल हा फ़ॉंट विंडोज एक्सपी मध्ये असल्याने तस होत असेल अस मला वाटत.