अभिजात भाषा – मायबोली मराठी
मराठी
भाषेला ’अभिजात’ भाषा म्हणुन मान्यता मिळावी या करीता महाराष्ट्र शासनाने एका
समितीची स्थापना केल्याची माहिती मराठी भाषेत ब्लॉग लिहीण्यार्या तसेच मायबोली मराठी भाषेवर अत्यंत प्रेम करणार्या
तुमच्या-माझ्या सारख्या अनेक मायबोलीकरांना नसण्याचीच शक्यता आहे.खरं सांगायच
म्हणजे अशी समिती असल्याची व एखाद्या भाषेला ’अभिजात’ भाषा म्हणुन मान्यता
मिळण्यासाठी कोणते निकष आहेत या विषयीची माहिती सर्वप्रथम मला श्री. अनिल गोरे
(मराठीकाका) यांच्या कडुन आलेल्या ई-मेल मधुन मिळाली.ही माहिती ब्लॉगवर आज टाकु
उद्या टाकु असे करता करता ४-६ महिने पाहाता पाहाता निघुन गेले.पण याच संदर्भात
रविवार दि.२३ सप्टेंबर २०१२ च्या लोकसत्ता मधिल लोकरंग या पुरवणीतील ’पडसाद’ या
सदरात प्रसिध्द झालेल्या श्री.प्रविण धोपट यांच्या पत्राने या विषयाची माहिती
मायबोलीकरांना करुन देणे मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी व तिच्या प्रगतिसाठी अत्यंत
गरजेचे असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.
मराठी
भाषेला ’अभिजात’ भाषा म्हणुन केन्द्र सरकार कडुन मान्यता मिळण्यासाठी फक्त मराठी
अस्मितेचे ढोल वाजवुन काम होणार नाही.एखाद्या भाषेला
’अभिजात’ भाषा म्हणुन मान्यता मिळवण्यासाठी ती भाषा सुमारे १५०० ते २०००
वर्षांपासुन अस्तित्वात असल्याचे पुरावे सादर करावे लागतात. यात लिखित पुराव्यांना
खुप महत्व आहे. लिखित पुरावे हे कागद, भूर्जपत्र,
ताडपत्र,ताम्रपट,शिलालेख
किंवा लाकडी खांब-तुळई या वरील कोरलेला मजकुर या स्वरुपात असतात.
काळाच्या
ओघात बहुतांश लिखीत पुरावे नष्ट होण्याची शक्यता असते.त्यातच आपला महाराष्ट्र हा
लढवय्यांचा प्रदेश. हिंदुस्तानाच्या रक्षणाच्या दृष्टीने सतत सज्ज असलेल्या या
प्रदेशावर परकीय आक्रमकांचे वारंवार हल्ले झाले.औरंगजेब स्व;त २६ वर्षे या प्रदेशात मराठी सत्ता नष्ट करण्यासाठी तळ ठोकुन होता. अंतत:
स्वत;च या मातीत नष्ट झाला पण त्याच्या वा एकंदरीत मुस्लिम
आक्रमकांच्या देवळे ,शिल्प यांची तोडफोड करणे वा नालंदा-तक्षशीला
या सारख्या विश्वविख्यात विद्यापिठांना जाळुन
नष्ट करणे या विघातक कृत्यांमुळे आपल्या देशातील लिखित अशी बहुमोल ज्ञानसंपदा
मोठ्या प्रमाणात या पुर्वीच नष्ट झालेली आहे.
त्यामुळे
भाषेचा बोलण्यासाठी वापर करताना वापरल्या जाणार्या शब्दांची इतर भाषां मधील शब्दांशी तुलना
करून त्यापैकि कोणती भाषा अधिक जुनी या बाबत काही परिस्थितिजन्य पुरावे देता येतील
का यावर अभ्यासकांनी विचार करावा असे आग्रही मत श्री गोरे यांनी मांडले आहे.
त्या
अनुषंगाने श्री गोरे काका यांनी स्व:ताचे निरीक्षण खालील प्रमाणे मांडले आहे. ते
म्हणतात,
स्वत;चे
शरीर ,खाण्याचे पदार्थ,शेती,स्वत:चे घर,नातेवाईक या सबंधीचे शब्द कोणत्याही
भाषेत प्रथम निर्माण झाले असणार. त्यानंतर कपडे, सण,देवदेवतांची नावे,विज्ञान,तंत्रज्ञान
इत्यादि सबंधीचे शब्द निर्माण झाले असतील.स्वत;चे शरीर ,खाण्याचे पदार्थ ,शेती,स्वत:चे
घर, नातेवाईक या सबंधीचे बहुसंख्य मराठी शब्द छोटे आणि
जोडाक्षर नसलेले साधे शब्द आहेत. उदा; कान ,नाक, मन ,मान, घसा, इत्यादि शरीरा बाबतचे तर आई, बाबा, मामा, काका, भाऊ, ताई, माई, दादा इत्यादि नातेसंबंधा बाबतचे.तसेच लुगडे ,धोतर ,चादर ,सदरा ,उपरणे इत्यादि
कपड्या बाबतचे शब्द असे अनेक मराठी शब्द साधे आणि सोपे आहेत.
एकंदरीतच
मुळ मराठी शब्द हे साधे आणि सोपे असून जोडाक्षर असलेले बहुतांश शब्द हे अन्य भाषांतून
मराठीत आलेले दिसतात. अनेक वस्तु,भावना,संकल्पना यासाठी मराठीत साधे ,सोपे शब्द फार पूर्वीच
वापरले गेल्याने त्यानंतर निर्माण झालेल्या इतर भाषांना याच कारणांसाठी नवीन शब्द निर्माण
करावे लागले जे अर्थातच अधिक गुंतागुतीचे व क्लिष्ट आहेत. या परिस्थितीजन्य पुराव्यावरून
मराठी भाषा खूप जुनी असावी असे श्री गोरे यांचे प्राथमिक निरीक्षण आहे.
तर अभिजात
भाषा कोणत्या व मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळवणे महत्वाचे का या
बाबत श्री प्रविण धोपट त्यांच्या पत्रात म्हणतात :
भारतात
एकूण ३० अधिकृत भाषा असून त्यापैकि ४ भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे.
त्या ४ भाषा आहेत, संस्कृत,कन्नड, तमिळ आणि तेलगू .त्यामुळे त्या भाषांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून
प्रतिवर्षी ५०० कोटी त्या त्या राज्यांना मिळतात.त्यातील १० टक्के म्हणजे सुमारे
५० कोटी त्या भाषांच्या साहित्य संमेलंनांसाठी ती राज्ये खर्च करतात.तर मराठी
भाषेच्या साहित्य संमेलांनासाठी आपले महाराष्ट्र राज्य सरकार प्रतिवर्षी फक्त
२५ लाख देते तर त्यावर ही वादंग आणि चर्चा
होते.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर तिच्या विकासासाठी देखिल प्रतिवर्षी
५०० कोटी केंद्रा कडून मिळतील आणि त्यातील १० टक्के म्हणजेच ५० कोटी रुपयात
परदेशातही अत्यंत थाटामाटात माय मराठीच साहित्य संमेलन साजरा करता येईल.
मराठी
भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन
केलेल्या समितीने अथक परिश्रम करून मराठी भाषा गेल्या अडीच हजार वर्षापासून अस्तीत्वात असल्याचे पुरावे जमवले आहेत.या
समितीने केलेल्या संशोधनानुसार दोन हजार पाचशे वर्षापूर्वीच्या ‘विनयपिटक’ या बौद्ध ग्रंथात महाराष्ट्रचा उल्लेख
आहे.दीड हजार वर्षापूर्वीच्या श्रीलंकेतील सिंहिली लिपीतील ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ या ग्रंथात महाराष्ट्री भाषेचा उल्लेख आहे.या पुराव्यांमुळे मराठी
भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळायला हवी.वरुची या पाणींनीच्या समकालीन
विद्वानाने प्राकृत भाषांच व्याकरण लिहिलं.त्यान शोरशनी,
पैशाची, अर्धमाधगी आणि महाराष्ट्री या प्रकृत भाषांच व्याकरण
लिहिलं .त्यातला महत्वाचा उल्लेख म्हणजे ‘शेष महाराष्ट्रिवत’ हा नियम.त्यानुसार सर्व प्राकृत
भाषांचे उरलेले नियम मराठी प्रमाणे होते.भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत
असलेली ८० प्राचीन हस्तलिखिते या पुराव्यांना बळकटी देतात.सातवाहनांच्या काळातील ‘गाथसप्तशती’ हा मराठीतला आद्यग्रंथ आहे. भारतातल्या
येकुण हजार लेण्यांपैकी आठशे लेणी महाराष्ट्रात आहेत आणि या लेण्यांमधील सर्व
शिलालेख मराठीत आहेत.
तेव्हा
मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्याने
सहभागी होणारे सर्व लेखक, कार्यकर्ते, विश्लेषक, अभ्यासक, विचारवंत, पत्रकार, मराठी भाषेचा अभिमान असलेले
सर्वसामान्य मायबोलीकर आणि साहित्य
संमेलनाचे ‘सन्माननीय’ विरोधक या
सर्वांनी या पुढील साहित्य संमेलांनापूर्वी माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल
या करिता एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत.कारण
आपल्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद असू शकतात पण आपल्यात एक समान धागा आहे तो “
अमृततेही पैजा जिंके” त्या मराठी भाषेचा.
तसच
भावनेच्या भरात आपल्याला आपली भाषा श्रेष्ठ आणि अभिजात वाटण ही गोष्ट निराळी आणि
त्याला अधिकृत राजमान्यता मिळवणं हे
वेगळं. भाषा आहे तिथे भली बुरी साहित्य निर्मिती होत राहणारच. त्यामुळे भली-बुरी
साहित्य संमेलनही व्हायलाच हवीत पण कशी .....
२५
लाख नव्हे तर ५० कोटी खर्चून, अत्यंत
थाटामाटात आणि दिमाखात, आपल्या राजस माय मराठीला शोभेल अशी.
जय
महाराष्ट्र , जय मराठी
आपला
मैत्रय१९६४
आभार आणि श्रेय
१)
श्री अनिल गोरे ( मराठीकाका) ,भ्रमणध्वनी ९४२२००१६७१,
२)
श्री प्रविण धोपट यांचे या संदर्भात
रविवार दि.२३ सप्टेंबर २०१२ च्या लोकसत्ता मधिल लोकरंग या पुरवणीतील ’पडसाद’ या
सदरात प्रसिध्द झालेले पत्र.
टीप : मराठी
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा या बद्दल फेसबुकवर वा तत्सम माध्यमांव्दारे व ई—मेल
द्वारे कृपया प्रसार करा ही विनंती. या लेखातील श्री.गोरे यांची माहिती “लाल” रंगात तर श्री
प्रवीण धोपट यांची माहिती “ हिरव्या”
रंगात जाणीवपूर्वक दिलेली आहे.
२ टिप्पण्या:
व्दारा श्री शुभानन गांगल (फेसबुक वरुन)
चला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ.
याबाबतचा पहिला लेख पुढील लिंकवरून वाचा आणि आपला अभिप्राय द्या.
‘अभिजात मराठी भाषा वैभव’ या उपक्रमात सामिल व्हा.
http://attachments.wetpaintserv.us/xx4dRf8REQ2vvTbB-Rc5DQ259674
मायमराठीसाठी सर्वांनी एकत्र येऊन हे मोलाचे कार्य करूया.
...
खूप चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा