८ सप्टें, २०१२

सत्त्याचा ’बाप’ (भाग-३)


सत्त्याचा ’बाप’ (भाग-३) 


नंतरचे दोन दिवस धावपळीचेच गेले. मी सुध्दा रजाच घेतली होती.दरम्यान सत्त्याच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत गेली. दरम्यान कुटुंबा कडुन सत्त्याने केलेल्या भानगडीची सविस्तर माहिती कळली होती. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्हणे त्यानं एका मुलीला प्रपोज केलं होतं पण तिने नकार दिल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.अर्थात त्यामुळे त्याची प्रकृती थोडी सुधारल्यावर पोलीस चौकशी पण झाली. पण ’या’चं मित्रमंडळ भरपुर असल्याने सर्व गोष्टी निस्तरत्या आल्या .
रविवारी संध्याकाळी दरदिवशी प्रमाणे हॉस्पीटलला गेलो.तर समोर वहिनीच दिसल्या.चेहरा खुपच दमलेला पण तरीही त्यावरचा आनंद जाणवत होता.गेल्या तीन-चार दिवसात सर्व धावपळ त्याच करत असल्याचं मलाही जाणवलं होत. त्या मुळेच पहिल्यांदाच त्यांच्या बद्दल माझ्याही मनात आदर निर्माण झाला होता. मला पाहाताच त्या म्हणाल्या,
"सत्त्या, आता ठीक आहे बरं का"
"डॉक्टर काय म्हणतात"
"आता काळजीच काहीही कारण नाही असं म्हणाले. फक्त विकनेस आहे तो कमी झाला की घरी सोडतील"
माझ्या तोंडुन अनाहुत पणे वाक्य बाहेर पडलं, " ग्रेट वहिनी. मानलं तुम्हाला."
मनात कुठेतरी या बाबाची या प्रसंगातली निष्क्रीयता मनाला खटकली होतीच.
"मी कसली ग्रेट. हे नसते तर मला तर निभवता आलचं नसतं."
"असं कसं. आम्ही पाहात होतो तुमची सर्व धावपळ."
"माझी धावपळ तुम्हाला दिसली पण हे गेल्या तिन दिवसात आयसीयु समोरनं हाललेच नाहीत रे?"
हे मात्र नाकारता येत नव्हतं. हा बाबा सकाळचा आंघोळीचा वैगरेचा एक-दीड तास सोडला तर सतत आयसीयुच्या बाहेर ठाण मांडुन होता. त्याच सत्त्यावरचं प्रेम लक्षात घेता ते अपेक्षित देखिल होतच आम्हाला.
सत्त्या आता बरा झाला आहे हे कळल्यावर त्याला देखिल खुप आनंद झाला असेल हे लक्षात आलं. मी वहिनींना विचारल तर म्हणाल्या, "असतील ईथेच जवळपास कुठेतरी."
बघीतल तर हे साहेब आयसीयुच्या बाजुच्या गॅलरीत उभे राहुन  सुर्यास्त पाहात उभे. मी हळुच तिथे गेलो. त्याच्या पाठीवर हात ठेवुन म्हणालो," आपला सत्त्या बरा झाला यार. हॅटस टु यु अ‍ॅन्ड वहिनी."
त्याने माझ्या कडे पाहीलं.त्याचे डॊळे लालसर आणि पाणावलेले दिसत होते. तो म्हणाला," बर झाल आलास. तुझीच वाट पाहात होतो."
अरे हा असा काय बोलतोय. मी गेले दोन दिवस सारखा येत जात होतो हे बाबाच्या लक्षात आलेल नाही की काय?. मी थोडासा हिरमुसलोच. पण माफ केल. आपुन भी समझ सकता है उसकी हालत.
 मग मीच म्हणालो," चल सत्त्याला भेटु."
"तु जावुन ये मी तुझी बाहेर वाट पाहातो."
मला याच्या सर्कीटपणाची कल्पना असल्याने जास्त वाद न घालता सत्त्याला भेटायला वॉर्ड मध्ये गेलो. समोरच्याच बेड्वर सत्त्या होता. त्याचा निस्तेज चेहरा पाहुन मी मनातुन हाललोच. पण धीर करुन त्याच्या जवळ गेलो. मला पाहुन सत्त्या हसला. काय नव्हत त्या हसण्यात.
"कसा आहेस चिन्या"
सगळे त्याला सत्त्या म्हणत असले तरी मी मात्र  त्याला चिन्याच म्हणायचो. सत्त्याची आणि माझी खास जवळीक होती. आमच घर हे त्याच जणु दुसरं घरच होतं.
"बरा आहे."........
"अरे काका, बाबा कुठे आहे. घरी गेलाय का?"
"नाही रे, बाहेरच उभा आहे."
"मग मला भेटायला आत का आला नाही. रागावलाय का?"
"नाही रे. चिन्या"
"काका, बाबा रागावला आहे माझ्यावर."
"अरे असे वेडे विचार काय करतोस."
"खरचं काका, मी शुध्दीवर आल्या पासुन बाबा एकदाही भेटायला आला नाही रे."
आता मात्र मला काय बोलाव ते सुचेनाच. याचा असला सर्कीटपणा मला समजण्याच्या पलीकडचाच होता.
"जास्त बोलु नकोस आणि विचारही करु नकोस. विश्रांती घे."
"काका, बाबाला सांग ना रागावु नकोस, मी चुकलो, प्लीज मला माफ कर."
आता मात्र मला तिथे उभं राहावेना. डोळ्यात येवु घातलेलं पाणी कस बस थोपावलं. चिन्याच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि चटकन बाहेर आलो.समोर हा उभाच. मी त्याला काहीतरी बोलणार तेव्हड्यात ’तो’च म्हणाला," मला माहित आहे तुला काय बोलायचय. पण आत्ता नको."
"अरे पण..............."
"छोड यार. तुझा चिन्या बरा झालाय ना. मग सेलीब्रेट करुया."
“आज....
“ काय झाल. मला रिलॅक्स व्हायचयं. मग बघु पुढचं पुढे.
“ अरे चिन्याला भेटुन तर घे. तो तुझी वाट पाहातोय.
“ काय घाई आहे. तु लाडका  काका  भेटलास आणि ही तर सारखी आत बाहेर करतच आहे.मी भेटेन सावकाश."
"अरे पण..."                                                             
"चल रे. तो काही आता पळुन जात नाही आणि मी आयुष्यात कधिही पळुन गेलो नाही. माहीत आहे ना तुला.
“ एकदा दोन मिनीटं तर भेट. मग जावु आपण.
“ आता येतोस की एकटाच जावु.
त्याच्या आविर्भावा वरुन कळलं की साहेब ऎकण्याच्या मुड मध्ये नाहीत. तेव्हा मी जर जास्त बोलण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच हा बाबा एकटाच निघुन गेला असता. आणि तसही त्याला नाही म्हणायला मला आत्ता पर्यंत कधी जमलच नव्हत मग आज तरी कसं शक्य होतं. तरी सुध्दा शेवटचा उपाय म्हणुन म्हणालो,” वहीनींना सांगुन जावुया. त्या वाट पाहात बसतील.
आमचं सेलीब्रेशेन म्हणजे काय याची वहिनींना चांगलीच कल्पना असल्याने आज तरी त्या नक्कीच नाही म्हणतील याची आशा होती.
“ मी तिला तु येण्या पुर्वीच सांगुन ठेवलयं. तु आल्यावर आपण दोघं बसणार आहोत ते.
“ वहिनी हो म्हणाल्या......
“साल्या तुला खोटं वाटत असेल तर बोल तिच्याशी मोबाईलवर.
वहिनींना हा कधी खोट सांगत नाही याचा अनुभव आम्हा सर्व मित्रांना होताच. तरी देखिल आज वहिनी याला हो कश्या  म्हणाल्या याच आश्चर्यच वाटलं.अर्थात याही पेक्षा मी हॉस्पीटल मध्ये भेटायला नक्कीच येणार याची याला खात्री होती याचचं मला जास्त बर वाटलं. खोटं कशाला बोलु.
कुठल्या बार मध्ये जायच तो प्रश्नच नव्हता कारण नेहमीचा बार ठरलेला होता. आम्हाला दोघांना बार मध्ये पाहुन गल्ल्यावरचा सदानंद शेट्टी देखील जरा चमकलाच. कारण त्यालाही एव्हाना सत्त्या हॉस्पीटल मध्ये अ‍ॅड्मीट असल्याच कळलेलं होतचं. त्यामुळे तो याला बघुन हैराण झाला. याच लक्ष नाही पाहुन त्याने मला नजरेनच सगळ ठिक आहे ना विचारलं. मी पण सगळ ठीक आहे असं खुणेनच त्याला सांगितलं. हा बार म्हणजे आमच्या ग्रुपचा जणु दुसरा अड्डाच होता. प्रसंग बरावाईट कसलाही असो आम्ही जमणार ते ईथेच. पण आज प्रसंग काहीसा वेगळाच होता. कधी नव्हे ते आम्ही फक्त दोघच खुप दिवसांनी आलो होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: