३० ऑग, २०१०

दहीहंडी- एक दुसरी बाजु

                                         दहीहंडी- एक दुसरी बाजु


         गेल्याच आठवड्यात २-४ दिवसांच्या अंतराने "दहीहंडी" बाबत दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी अशी होती की मुंबईतल्या जुन्या व नामवंत दहीहंडी मंडळांनी या वर्षी थर लावण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.तर दुसरी बातमी अशी होती की,उपनगरातल्या दहीहंडी मंडळांच्या संख्येत वाढ झाली असुन त्यातील एक मंडळ या वर्षी थरांचा नविन विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे.एकीकडे शहरातली जुनी नामांकीत दहीहंडी मंडळे थरांच्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेत असताना नव्याने तयार झालेली दहीहंडी मंडळे अधिक अधिक थर लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत हा विरोधाभास दिसुन येत आहे.दहीहंडी मध्ये भाग घेणारी बहुतांश कार्यकर्ते मंडळी मराठीच मग शहरातल्या व उपनगरातल्या मंडळांच्या दृष्टीकोनात व विचारात विरोधाभास का बर दिसुन येत असावा?
              मुंबईतला दहीहंडी उत्सव अनेक वर्षां पासून साजरा होत आहे. तथापी गेल्या ८-१० वर्षात तो साजरा करण्याच्या पध्दती मध्ये जाणवण्याजोगा फ़रक झालेला आहे.८-१० वर्षांपुर्वी दहीहंडीत भाग घेणे यात निव्वळ हौस व रग होती तर आता मात्र यात स्पर्धा व व्यवसायीकपणा आला आहे.जुन्या काळी ४-५ थर रचणे यात गंमत होती तर आता ७-८-९ थर लावण्यात एक थरार निश्चित तर आहेच पण त्याही पेक्षा मंडळा मंडळा मधिल जाणवणारी सुप्त स्पर्धा आहे.पाण्याच्या टंचाईमुळॆ म्हणा किंवा चाळीचाळीतुन राहाणारा मराठी कामगार वर्ग व पांढरपेशा समाज आता शहरामधुन उपनगरांमध्ये स्थलांतरीत झालेला आहे म्हणुन म्हणा,दहीहंडीतल्या गोपाळांवर पाणी टाकणॆ किंवा गॅलरीत सहकुटुंब उभे राहुन थर रचणार्‍यांच कौतुक करण हे आताशा दिसत नाही. एकंदरीतच काय हा उत्सव सामान्यांचा राहीलेला नाही.आता दहीहंडी उत्सव म्हणजे राजकीय पक्षांनी व नेत्यांनी प्रायोजीत केलेला उत्सव ( इव्हेंट) झालेला आहे. एखाद्या क्षेत्रात राजकीय मंडळी आली की जे काही बरेवाईट त्याच्या बरोबर येत ते सर्व या उत्सवात आलेल आहे.सर्वसामान्यांचा हा उत्सव हा आता पुर्णत: व्यावसायीक झाला आहे. दोन वर्षापुर्वी मंडळा मंडळातील याच स्पर्धेतुन ठाण्या मध्ये दोन मंडळांच्या तरुणांमध्ये मारामारी झाली होती.अर्थात या मागे स्पर्धे बरोबरच पारितोषीकाची भरभक्कम रक्कम हेही एक कारण होतच. असे प्रकार घडण म्हणजे दहीहंडी उत्सवाला गालबोट लावण्या सारखच आहे.
वास्तवीक पाहाता दहीहंडी असो वा गणेशोत्सव या मधुन सर्वांनी एकत्र याव आणि एकमेकांच्या सहकार्याने काही विधायक कार्यक्रम हाती घ्यावेत ही अपेक्षा आहे.पण आज होत काय आहे की या मधुन मराठी माणुस एक होण्याऎवजी एकमेकांचीच डोकी फ़ोडू लागला आहे.
त्यातच गिरणी कामगारांच्या संपा नंतर संपुर्ण कामगार वर्गच शहरातुन पार नाहीसा झालेला आहे तर पांढरपेशा मराठी समाज परिस्थीतीच्या रेट्यापुढे हतबल होवुन प्रथमत: उपनगरां मध्ये आणि हळूहळू बोरीवली-ठाण्या पलीकडे फ़ेकला जात आहे.हे सर्व असच चालू राहील तर अजुन ८-१० वर्षांनी पालघर-बदलापुर किंबहूना त्या पेक्षाही पुढेच दहीहंडी साजरी होईल अशीच बिकट परिस्थीती दिसते आहे.मोठ्या प्रमाणात मुंबईतुन बाहेर फ़ेकल्या जाणार्‍या मराठी माणसांच वास्तव हे कटू असल तरी नाकारता येणार नाही.जशी जशी ही मराठी माणस दुरदुर फेकली जातील तस तस दहीहंडी-गणेशोत्सव हे मराठमोळे सण मुंबईत साजरे हॊण कमी कमी होत जाणार आहे.त्या मुळे शहरातली जुनी नामांकीत दहीहंडी मंडळे जेव्हा थरांच्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतात त्यावेळी तो त्यांनी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेपोटी घेतलेला निर्णय नसुन कार्यकर्त्यांच्या अभावी घेतला गेलेला आहे की काय अशी रास्त शंका मनात उभी राहाते.
हे सगळ पाहील की भविष्या मध्ये मुंबई शहरात मराठी माणसांना भवितव्य व जागा राहील की नाही याच काहुर मनात उमटत.तेव्हा देव न करो अन मराठी माणसांच्या अभावी दहीहंडी व गणेशोत्सव हे उत्सव मुंबईत बंद न पडोत अशी येत्या गणेशोत्सवात श्री गणराया पुढे मन:पुर्वक प्रार्थना करण्या शिवाय दुसर आपल्या हाती तरी काय़?

                                                    जय महाराष्ट्र जय मराठी