३१ डिसें, २०१०

नववर्ष २०११



प्रिय मायबोलीकर,


काही क्षणात आपल्या हिंदुस्तानात ईंग्रजी कॅलेंडर नुसार नववर्षाची सुरुवात होणार आहे.हे कॅलेंडर आपल्या ईतके अंगवळणी पडले आहे की आपल्या नविन वर्षाची सुरुवात चैत्र महीन्यातील गुढीपाडव्याला होत असते याची जाणिवच नसते.आपली पुढची पिढी तर जागतीकीकरणाच्या झंझावाटात आपली संस्कृती व आपली मायबोली या पासुन तुटत चालली आहे.वास्तव जगापेक्षा भासमय जगात ही पिढी जास्त रमते. संवादांपेक्षा एसएमएस , पत्रांपेक्षा ई-पत्र, मत व्यक्त करण्यासाठी फेसबुक,ऑर्कुट या सारख्या कम्युनिटी साईट्स आणि मन व्यक्त करण्यासाठी याहू सारखे निरॊपे ( Messengers) यांचा वापर सहजकत्या करणार्‍या या पिढीला पत्रातील ह्स्ताक्षरावरुन भावना समजुन घेण्यातली संवेदनशिलता व गंम्मत कशी बर कळणार. अर्थात सर्वच दोष त्यांचा नाही तर आपल्या पिढीचा आहे जी आज पंचेचाळीस ते पन्नास दरम्यानच्या वयोगटात आहे. आपल्या मुलांपर्यंत आपली संस्कृती पोहचवण्यात आपण कमी पडलो आहोत.कॉस्पॊपॉलीटीन संस्कृतीची भलावण करण म्हणजेच पुरोगामीपणा अशी आपण आपलीच समजुत घेउन घेतली आहे. मॅकडोनाल्ड मध्ये आपल्या मुलांना घेवुन जाण आणि बिसलेरीची पाण्याची बाटली देवुन आपल्या आजुबाजुच्या सर्वसामान्य माणसां पेक्षा आपण उच्च आहोत अशी त्यांची समजुत होण्यात आपलाही वाटा आहेच ना?
आपला देश हा आज तरुणाईचा देश म्हणुन ओळखला जातो.ही तरुणाई या ना त्या कारणाने घरापासुन दुरावत चालली आहे.अनेक घरात आई-वडिल एकटे तर कर्ती मुले परदेशात किंवा परगावात आहेत. अशी अनेक घरटी डोळे उघडे असतील तर आजुबाजुला सहज नजरेला पडतील. या ताटातुटीला नातेसंबधातला दुरावा हे कारण नसुन व्यवहारीक अगतीकता जास्त आहे हे ही मान्यच करायला हवं. मुल दुर गेलेल्या अश्या एकाकी वृध्द मंडळीना पैशाची गरज कमी तर सोबतीची गरज जास्त आहे.मनात असुनही किंवा शक्य असुनही अश्या मंडळींना मदत करणे अनेक कारणास्तव शक्य होत नाही. कारण काहीही असोत पण जग जवळ येत आहे अस म्हणताना जगा पासुन तुटत चाललेल्या माणसांची संख्या वाढतच चालली आहे.अश्या वेळी समुहने एकत्र येवून काही करण्याची गरज भासते.त्या दॄष्टीने काही संस्था प्रयत्न करीत आहेत ही आशेचीच किनार म्हणायला हवी. नुकताच पुण्याला काही कारणाने गेलो असता अश्याच एका संस्थाची माहिती मिळाली.ती संस्था म्हणजे " NRI Parent's Organisation, Pune ". या संस्थेच वैशिष्ट म्हणजे ज्या पालकांची मुल परदेशात आहेत अशी मंडळी या संस्थेची सदस्य आहेत.एकटे पणा कसा असतो ते प्रत्यक्षात अनुभवणारी माणसच दुसर्‍या समदु:खी माणसांना जास्त चांगल्या प्रकारे समजुन घेवु शकतात नाही का?या संस्थेतील व या प्रकारचे काम करणार्‍या प्रत्यकाच ..मग ती संस्था असो की व्यक्ती यांच कौतुक करायला हवच.
समाजा पासुन तुटत जाणारी दुसरी माणस म्हणजे आजुबाजुला काय चालल आहे त्याच भान नसलेली माणसं. समाजातील वाईट प्रवृत्ती विरुध्द प्रत्यक्ष काम करण ही सहज शक्य गोष्ट नाही हे मला देखिल स्वानुभवातुन कळतच की. पण आजुबाजुच सगळच आलबेल नाही किंवा खर सांगायच तर दिसत त्याहुन फारच फारच वाईट आहे हे कळुन न घेण म्हणजे असंवेदशीलताच नाही का?. नुकत्याच ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे म्हणतात "समाजा पुढचे प्रश्न मांडण्या साठी साहित्यीकांनी समाजातल्या प्रश्नांसंबंधी निश्चीत भुमिका घेण्याची गरज आहे". तेव्हा फक्त साहित्यीकांनी नव्हे तर आपल्या पैकी प्रत्येकानेच निश्चीत अशी भुमिका घेण्याची वेळ आता नक्कीच आली आहे.
टाटा हे आपल्या देशात आदराने घेतल जाणार नाव आहे.हे नाव फक्त एका उद्योग संस्थेचच प्रतिनिधित्व करत नाही तर संस्कृतीच प्रतिक आहे. पण निता राडीया टेप प्रकरणातुन आलेल सत्य या संस्कृतीची काळी बाजु दाखवत तेव्हा आपल्या पुढचे आदर्श अधिक डोळस पणे पारखुन घेण आवश्यक आहे हेच अधोरेखीत करत. अर्थात आदर्श या शब्दाचा अर्थ आता आपल्या महाराष्ट्रात फार वेगळा झालेला आहे.त्यामुळे शब्दकोशाच्या पुढील आवृत्यांमध्ये आदर्श या शब्दा समोर हे नविन संदर्भ देण्यात आले तर आश्चर्य वाटायच कारण नसाव.
अश्या परिस्थितीत भांबाहुन गेल्या सारख सर्व सामान्य माणसांना झाल आहे.आशेन पहाव असे समोर काही दिसत नसताना उमेद टिकवुन ठेवण्याची कसरत करण्याची वेळ नविन वर्षाला सामोरे जाताना आली आहे.अंधार असला तरि प्रकाशाची तिरीप नक्कीच दिसणार आहे हा दरवर्षीचा आशावादच आपल्याला या वर्षाला अलविदा करताना मनात नक्कीच असणार आहे.
आपल्या मनातील या आशावादाच सर्वांच समर्पक शब्दरुप खालील गझलेतुन व्यक्त होत .....चित्रा सिंग यांनी ही गझल गायली आहे.


इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये
सुबह होने को है माहौल बनाके रखिये
जीनके हाथोंसे हमे जख्मे नीहॉं पहुंचे है
वो भी कहते है के जखमोंको छुपाये रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये...........
कौन जाने के वो किस राह गुजर से गुजरे
हर गुजर गाह को फुलोंसे सजांये रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये ..........
दामने यार की झीनत ना बने आंसु
अपनी पलकॊं के लिये कुछ तो बचाकें रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये .......
तेव्हा नविन वर्ष आपल्या सर्वांच्या मनोकामना पुर्ण करणार आणि आपल्या देशातील सर्व माणसांच जीवन समाधानाच करणार असु दे या माझ्या मनपुर्वक शुभेच्छा.

 
जय महाराष्ट्र जय मराठी


आपला

मैत्रेय१९६४

२८ डिसें, २०१०

नव्या इतिहासाचा शोध

                                                    लेखक- डॉक्टर सुनिल भुमकर


पुण्यातील लाल महालातुन दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवल्याने पुणे महानगर पालीकेत झालेल्या सव पक्षीय खेळोमेळीच्या (?) चर्चेची सविस्तर माहिती आजच्या मराठी वर्तमानपत्रात आलेली आहे. या चर्चेत शिवसेना-भाजप आणि मनसे एका बाजुला तर दुसर्‍या बाजुला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसर्‍या बाजुला होती.तर चर्चेचे परिक्षक म्हणुन श्री.मोहनसिंग राजपाल,सन्माननीय़ महापौर,पुणे महानगरपालीका यांनी काम पाहीले .महानगर पालिकेतील तमाम मराठी नगरसेवकांची आपसाआपसात झालेली ही खेळोमेळीची चर्चा पाहाताना व अनुभवताना "मराठा तितुका मेळवावा" याची याच देही याच डोळा प्रचिती परिक्षकांना आली आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रुच आले असही काहीसे वाचनात आल आहे.
या घटनेतुन तसेच इतिहास संशोधक संभाजी ब्रिगेड संस्था यांच्या इतिहास संशोधनातुन उघडकीस आलेल्या काही नव्या शोधांमुळे आणि सर्व धर्म समभाव या संकल्पनेने माझे परम मित्र डॉक्टर सुनिल भुमकर हे फारच प्रेरीत झालेले दिसतात. त्यामुळे डॉ. भुमकर यांनी,त्यांना त्यांच्या प्रदिर्घ इतिहास संशोधनाच्या अभ्यासातुन नव्याने गावलेल्या मराठी साम्राज्याचा इतिहा्सातील काही भाग त्यांच्या ब्लॉगवर काहीश्या घाईघाईने प्रकाशीत केलेला आहे.डॉ.भुमकर यांनी प्रकाशीत केलेल्या भागातील मौत्तिके खालील प्रमाणे:
१. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले.
२. शिवाजीमहाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जिजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी (हिंदवी नव्हे) स्वराज्याची’ स्थापना केली.
३.शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते व त्यांनी त्याची प्रेरणा महात्मा गांधीं कडून घेतली होती.
४.आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले. कारण अफझल खान आणि शिवाजी महाराज खूप जुने दोस्त होते.
५.अफझल खान आणि शिवाजी महाराज या दोघा मित्रांच्या भेटीत अफझल खानला छातीत हार्टअटॅक’ ची अचानक जोरात कळ येवुन तो मेला. त्या वेळी महाराजांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले.
माझ्या मित्राने या शिवाय बरच काही नव महत्वाचे संशोधन मांडल आहे ते त्याच्याच प्रेमळ शब्दात वाचणेच योग्य ठरेल.
हे सर्व लिहिताना महाराष्ट्रातील जातीय सलोखा टीकुन राहावा म्हणुन माझ्या मित्राने अफझल खान आणि शिवाजी महाराज या दोघा मित्रांच्या भेटीच्या प्रसंगातील एक सत्य नमुद केलेले नाही.ते म्हणजे महाराजांचे डॉक्टर हे ब्राम्हण असल्याने खानाच्या औषध उपचारा साठी जाणुनबुजुन वेळेवर पोहोचले नाहीत हे ते सत्य.पण एकवेळ जातिय सलोखा तुटला तरी चालेल पण त्यांनी हे सत्य लपवुन ठेवु नये व पुढील भाग लिहीताना हा ब्राम्हणी कावा जरुर उघडकीस आणावा.
तेव्हा माझ्या मित्राने अभ्यासातुन परिश्रम पुर्वक संशोधीत केलेला इतिहास आपण जरुर वाचावा व त्याच्या अभ्यासास दाद द्यावी जेणेकरुन पुढील भाग लवकारात प्रकाशीत करण्याची त्याला प्रेरणा मिळेल हे नम्र आवाहन.

डॉ.भुमकर यांच्या ब्लॉगचा दुवा http://raamprahar.blogspot.com/2010/12/blog-post_27.html

आपला
मैत्रेय१९६४

१४ डिसें, २०१०

आधुनीक ब्लॉग-चौर्यकर्म

महाजालावर भटकत असताना हेरंब यांच्या "पुन्हा चोरशील" या ब्लॉगवरचा आधुनीक ब्लॉग-चौर्यकर्मा वरचा लेख वाचण्यात आला.या लेखात त्यांनी इतरांच्या ब्लॉगवरचे लेख ईत्यादी ढापणार्‍यांच्या चोरीचा पाठपुरवा कसा व का करायला हवा याच छान विवेचन केल आहे. त्यांची कल्पना छान पण त्याहुन जास्त महत्वाच पाठपुरावा करण्यातली त्यांची चिकाटी. म्हणुनच यावर तब्बल ५३ टीपण्या आल्यात. पण एक लक्षात येत की शेवटची टीपणी आहे ती २ ऑगष्ट २०१० ची. याचे दोन अर्थ निघतात -
(१) हा ब्लॉग जास्त जणां पर्यंत पोहोचला नाही किंवा
(२) ब्लॉग लिहीणार्‍या बहुतेकांचे अर्थाजन ब्लॉगवरील लिखाणावर अवलंबुन नसल्याने आपला लेख किंवा लिखाण दुसर्‍या कोणी चोरल्याची तितकीशी ची्ड ये्त नसावी.
या मुळे हेरंब यांचा उपक्रम कमी महत्वाचा ठरत नाही. अश्या चोर्‍या करणार्‍यांवर सामुदायीक रीत्या हल्ले चढवले नाहीत तर ते सोकावतील. तेव्हा हा ब्लॉग जास्त लोकांपर्यंत पोहोचुन चोरी करणार्‍या विरुध्दचा समुह कट्टा बनावा ही गरज आहे अस मला प्रामाणीकपणे वाटत. त्या मुळे मी माझ्या ब्लॉगवर हेरंब यांच्या ब्लॉगची लिंक देत आहे. ज्या ज्या कोणाला अश्या चोर्‍या आढ्ळतील किंवा या बाबत काही करायची इच्छा असेल त्यांनी या ब्लॉगला जरुर भेट द्यावी हे आवाहन.

हेरंब यांच्या ब्लॉगचा दुवा - http://punha-chorashil.blogspot.com

आपला

मैत्रेय१९६४





१२ डिसें, २०१०

मिशन काश्मीर

                           मिशन काश्मीर
                                         लेखक : रविंद्र दाणी
                                    प्रकाशक : अमेय प्रकाशन
                                       प्रथमावृत्ती : २३ जून २०१०
श्री. रविंद्र दाणी यांच्या सारख्या अभ्यासु पत्रकाराने लिहिलेले हे पुस्तक काश्मीर प्रश्नाची सर्वातोपरी माहीती तर करुन देतच पण त्याच बरोबर तेथील सद्यपरीस्थितीची भेदक जाणीव करुन देत.या पुस्तकाला अत्यंत समर्पक प्रस्तावना लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) एस.के.सिन्हा, माजी राज्यपाल जम्मु-काश्मीर व आसाम यांची आहे. पुस्तक संपुर्ण वाचल की प्रस्तावना लिहीण्यास श्री.सिन्हा यांच्या ईतकी अधिकारी व्यक्ती दुसरी कोणी नव्हती हे आपल्यालाही पटत. श्री. सिन्हा यांची लष्करी पार्श्वभुमी व माजी राज्यपाल जम्मु-काश्मीर ही ओळखच पुस्तकाची प्रस्तावना किती अभ्यासपुर्ण व परखड असेल याची कल्पना देते.
काश्मीर म्हणजे अव्दीतीय निसर्गसौंदर्य , चिनारचे वृक्ष,दाल सरोवर,शाही बागा, केशराची शेती,बर्फाच्छादीत हिमशिखरं व अनेक हिंदी चित्रपटातुन पाहीलेली मदनरती नायक-नायीकांची अंगमस्ती असे प्रणयरम्य चित्र डोळ्यापुढे उभ राहतं नाही का?पण या प्रणयरम्य चित्रामागच्या भेसुर वास्तविकतेच हे पुस्तक वाचल्या नंतर जे दर्शन होत त्यामुळे स्वप्न व सत्य यातील विरोधाभास मनावर ओरखडा काढुन जातॊ.
आजचा काश्मीर प्रश्न निर्माण झाला तो फाळणीच्या वेळी. फाळणीच्या वेळी हिंदुस्तानच्या ज्या ज्या भागात संस्थानांची सत्ता होती त्यांनी भारतात सामिल व्हायच की पाकीस्तानात याचा स्वयं निर्णय घेण्याचे अधिकार त्या संस्थानांना देण्यात आले होते. १५ ऑगष्ट १९४७ साली देश स्वतंत्र झाला पण त्यावेळी अनेक संस्थानांचा भारतात सामिल व्हायच की पाकीस्तानात याचा निर्णय झाला नव्हता. त्या पैकी दोन मोठी संस्थान म्हणजे हैद्राबाद व दुसर काश्मीर. भारतीय नेत्यांपैकी सरदार वल्लभभाई पटेल सोडले इतर भारतीय नेत्यांची, विशेषत: पंडीत. नेहरु यांची , काश्मीर प्रश्नी उदासीनताच होती.एकीकडॆ भारतीय नेत्यांची उदासिनता तर दुसरीकडॆ भारताचे तात्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंट्बॅटन व कायदेआझम जीना यांची काश्मीर पाकिस्तानात सामिल व्हाव या साठी धडपड सुरु होती. जीना यांनी राजे हरिसिंग यांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न केले.पण राजे हरिसिंग यांनी त्यांना दाद लागु दिली नाही.असे असले तरी काश्मीरचे राजे हरिसिंग यांची भारतात सामिल होण्याविषयी व्दीधा मनस्थीती होती.पण ज्या वेळी पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीरवर चढाई केली त्या वेळी पर्यायच उरला नसल्याने राजे हरिसिंग यांनी दि. २६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे भारतात विलयीकरण करण्याच्या विलयपत्रावर स्वाक्षरी केली. मग सुरु झाल ते घुसखोरां विरुध्दच युध्द. या युध्दात सुरुवातीच्या पिछेहाटी नंतर भारतीय सैन्याने एका मागुन एक ठिकाण ताब्यात घेण्यास सुरुवात केली.त्या मुळे भारतीय सैन्य लवकरच सगळे काश्मीर खोरे परत मिळवेल असे चित्र होते. अश्या रितीने भारतीय सैन्याची विजयपथावर वाटचाल सुरु असतानाच माउंट्बॅटन यांच्या सल्यावरुन(? की बदसल्यावरुन) पं. नेहरुंनी दि. १ जानेवारी १९४८ रोजी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघा पुढे नेला. त्या मुळे शस्त्रसंधी होवुन पाकिस्तानी घुसखोरांच्या ताब्यातील भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला तो गेलाच. पाकिस्तान विरुध्दची दोन युध्द जिंकूनही तो आपण परत मिळवु शकलो नाही हे लक्षात घेतल तर काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघा पुढे नेण्यात किती घॊडचुक झाली हे दिसुन येत.
त्यातच पुढे दि. २८ ऑक्टोबर १९४८ रोजी आकाशवाणीवरुन भाषण करताना पं. नेहरुंनी काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखी खाली जनमत घेतले जाईल असे जाहीर केले. याचाच आधार भारताला कोंडीत पकडण्यासाठी पाकिस्तान तसेच अतिरेक्यां कडुन घेतला जातो. काश्मीर बाबतची ही गुंतागुंत अजुनच वाढली ती घटनेत काश्मीरसाठी कलम ३७० ची तरतुद केल्याने. या कलमामुळे काश्मीरचे वेगळेपण अधिरेखीत होते असा स्वायत्ततेची मागणी करणार्‍या काश्मीरी नेत्यांचा आग्रह असतो . पण याच कलमा बद्द्ल पं. नेहरुंनी दि. २७ नोव्हेंबर १९६३ रोजी लोकसभेत केलेल्या निवेदनात कलम ३७० हे अस्थायी असल्याचे स्पष्ट केले होते ही बाब जनमत घेण्याची मागणी करणारे दहशदवादी असोत की काश्मीरचे तथाकथीत नेते असोत सोईस्कर रित्या विसरतात.
काश्मीरचे नेते स्वायत्तता देण्याची वारंवार मागणी करीत असले तरी राज्याची आर्थीक स्थीती अशी आहे की, स्वायत्तता दिल्यास तेथील राज्य सरकार आपल्या कर्मचार्‍यांना वेतन पण देवू शकणार नाही.राज्याचा बहुतांश आर्थीक केंद्र सरकार उचलत आहे.सर्व साधारण असा समज आहे की जम्मु- काश्मीर मध्ये सर्वत्र मुस्लीम बहुसंख्य आहेत.तथापी भौगोलीक दृष्ट्या विचार केला तर राज्याची काश्मीर खोरे,जम्मु व लडाख अशी तीन भागात विभागणी करता येईल. या तिनही भागातील समाज, भाषा व संस्कृती यात भिन्नता आहे काश्मीरमध्ये ३५% हिंदु आहेत. विशेषत: जम्मु भागात हिंदुंची संख्या जास्त आहे. एव्हडेच नव्हे तर पाकिस्तान मध्ये सुन्नी जास्त आहेत तर पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगीट- बाल्टीस्तान या भागा मध्ये शियांचे प्राबल्य आहे. त्या मुळे तेथेही शिया-सुन्नी संघर्ष सुरुच आहे. जम्मु -काश्मीरच्या २,२२,२३६ कि.मी. भुभागापैकी फक्त ४५.६२% भुभाग प्रत्यक्षामध्ये भारताच्या ताब्यात आहे. तर पाकीस्तानच्या ताब्यात ३५.१५% तर चीनच्या ताब्यात १६.९% भुभाग आहे. भारताच्या प्रत्यक्ष ताब्यातील भुभागा पैकी ४५% भाग जम्मुचा असुन त्या मधील लोकांचा कलम ३७० ला विरोध आहे.या बाबी लक्षात घेतल्या की काश्मीर प्रश्नाची गुंतागुंत ध्यानात येते.त्या मुळे फक्त धार्मीक अंगाने विचार करुन हा प्रश्न सुटेल असे म्हणने म्हणजे भाबडेपणा ठरेल.
भारताने या प्रश्नाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फार मोठी किंमत आजपावतो मोजली आहे.या प्रश्नातुन निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादा विरुध्दच्या छुप्या युध्दात भारताने प्रचंड आर्थीक किंमत भारताने मोजली आहे. गेल्या दोन दशकातच देशाचे काही हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. पाकिस्तानात दहशदवादी तयार होत असले तरि त्याची पाकिस्तानी लष्कराला फारशी किंमत मोजावी लागत नाही. तर पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगीट- बाल्टीस्तानचे लष्करी- भौगोलीक महत्वा बरोबरच आर्थीक महत्व फार मोठे आहे.या भागात एकंदर १४८० सोन्याच्या खाणी सापडल्या असुन तेथे युरेनियम, गंधक , लोखंड हे देखील मुबलक प्रमाणात आहे. सोन्याच्या १४८० खाणींपैकी फक्त ७० खाणींमधिल सोन्याची किंमत रुपये २५,००,००,००,००,००,००,००० ( २५ लाख अब्ज रुपये) आहे असा प्राथमीक अंदाज आहे.त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरच्या रुपाने भारताने फक्त जमीनच गमावली नसुन मोठ्या प्रमाणात मौल्यवान खनीज संपत्ती गमावली आहे हे या पुस्तकात प्रभावीपणे मांडले आहे.
१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला.त्या नंतर ३-४ महीन्यात पाकीस्तानने घुसखोरी केली. त्यातुन झालेल्या पहील्या संघर्षात भारताने अधिकारी-जवान मिळुन ११०३ जण गमावले. १९६२ च्या चीन विरुध्दच्या युध्दात अधिकारी-जवान मिळुन १३७३ जण गमावले,१९६५ च्या पाकीस्तान विरुध्दच्या युध्दात अधिकारी-जवान मिळुन १५०० गमावले,१९७१ च्या बांगला मुक्ती संग्रामात अधिकारी-जवान मिळुन २००० हुन अधिक गमावले तर १९९९ च्या कारगील युध्दात अधिकारी-जवान मिळुन ५२७ जण गमावले.थोडक्यात काय ६२ वर्षातील ५ युध्दात भारताने एकुण ६५१३ अधिकारी-जवान गमावले.तर दहशतवाद्यां बरोबरच्या संघर्षात भारतीय सुरक्षा दळांची प्राणहानी आहे १०,००० हुन अधिक अधिकारी-जवानांची तर जखमींची संख्या आहे १२,००० हुन अधिक. याचाच अर्थ खुल्या युध्दापेक्षा छुप्या युध्दाची किंमत कितीतरी अधिक आहे हे या पुस्तकात सप्रमाण दाखवुन दिले आहे.
असे हे काश्मीर खोरं भारताच्या ताब्यात आहे ते केवळ सुरक्षा दळांच्या तैनातीमुळे. साधारणपणे साडे तीन लाख सुरक्षा जवान काश्मीर खोर्‍यात तैन्यात आहेत.या सुरक्षा दळांना तेथील स्थानीक जनता कोणतेच सहकार्य देत नाही ही वस्तुस्थिती आहे. काश्मीर खोर्‍यातील तैनात जवानांची संख्या लक्षात घेता तेथे युध्दजन्य परिस्थितीच आहे. पण हे युध्द उघड स्वरुपाचे नसुन छुपे आहे.हे युध्द केवळ सिमेवर लढले जात नसुन ते गावागावात, गल्लीबोळात आणि घराघरातुन लढले जात आहे हे लक्षात घेतले तर भारतीय सुरक्षा दळांना किती कठीन परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे याची कल्पना येईल. पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या तक्त्यातील सरकारी आकडेवारी प्रमाणे :

कालावधी     अतिरेक्यांची संख्या            जवान-अधिकारी  संख्या

१९९० ते     ठार पकडलेले शरणागत             ठार        जखमी

२००९      २५१३५ २४१४६ १८८७                ४५६९        ६७०१

(टिप : अनधिकृत आकडेवारीनुसार ११००० हुन अधिक जवान-अधिकारी दहशतवाद्यां बरोबरच्या लढ्यात शहिद झालेले आहेत.)
त्या मुळे सहलीचा आनंद लुटण्या साठी आपल्या काश्मीरला जरुर जाव पण तेथील निसर्गसौंदर्य लुटताना आपल्या देशाने या साठी काय किंमत मोजली आहे त्याचा विचार पण मनात जरुर यायलाच हवा.
सर्वसाधारणपणे प्रकाशकाचे मनोगत पुस्तकात मांडण्याचा प्रघात नाही. पण काश्मीर प्रश्नाची संवेदनशिलता लक्षात घेवुन प्रकाशकाने आपले मनोगत मांडले आहे. पुस्तकाचे प्रकाशक श्री. उल्हास लाटकर ,अमेय प्रकाशन म्हणतात " काश्मीरचा भुतकाळ व वर्तमानकाळ अस्वस्थ करुन टाकतात. तिथे शांतता व स्थैर्य नांदाव या साठी अहोरात्र प्राणपणान लढणार्‍या तसेच बलिदान दिलेल्या भारतीय सुरक्षादळांतील शुरविरांच्या शौर्याला आदरांजली वाहुन मिशन काश्मीर हे पुस्तक वाचकांच्या हाती देत आहे.
हे पुस्तक वाचल्या नंतर भारतीय सुरक्षादळांच्या व वीरमरण आलेल्या सैनिकांच्या प्रती अभिमान व कृतज्ञता निर्माण झाल्या शिवाय राहात नाही व त्यातुन प्रकाशकाचा हे पुस्तक प्रसिध्द करण्या मागचा हेतु सिध्द होतो. आणि हेच लेखकाच लेखन सामर्थ व प्रकाशकाच यश आहे.



१० डिसें, २०१०

सन आठराशे सत्तावन्न (१८५७)

                      सन आठराशे सत्तावन्न (१८५७)


                                          लेखक - नारायण केशव बेहरे
                                       प्रकाशक - श्री विद्या प्रकाशन ,पुणे
                                          आवृत्ती - ३ री, दि. १० मे २००७

१८५७ चा विषय निघाला की,"१८५७चे स्वातंत्रसमर" हे स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर यांचे पुस्तक आठवते. आपल्या पैकी बहुतेकांनी हे पुस्तक वाचलेले असेलच. त्यामुळे हिंदुस्तानाच्या इतिहासातील या कालखंडा बद्दल एक निश्चित असे मत आपल्या मनात असत जे सावरकरांच्या पुस्तकावरुन तयार झालेल असत. त्या मतांना साधार छेद देण्याच आणि एका वेगळ्या अंगाने ’१८५७’ बद्दल विचार करण्यास प्रवृत्त करणार एक पुस्तक नुकतच माझ्या वाचनात आलं. पुस्तकाच नाव आहे " सन आठराशे सत्तावन्न " आणि त्याचे लेखक आहेत नारायण केशव बेहरे. १८५७ या कालखंडाच्या बाबत श्री. बेहरे यांनी लिहीलेल्या या अभ्यास पुर्ण पुस्तका बद्दल स्वत: वीर सावरकरांनी गौरवोद्गगार काढले आहेत ते असे:
" मी १९५७चे स्वातंत्रसमर हे पुस्तक इंग्लंड्मध्ये लिहिले. परंतू ते लिहीताना इतिहासाची सर्वच साधन उपलब्ध नव्हती. परंतू ते लिहीताना एकच उद्देश होता तो म्हणजे भारताचे स्वातंत्र मिळण्या करीता सर्व देशबांधवांच्या मनात स्वातंत्रतेची ज्योत पेटवावी.त्यामुळे त्या पुस्तकातले सर्वच प्रसंग इतिहासाला धरुन असतील असे नाही. खर्‍या इतिहासाशी प्रामाणीक राहून जर कोणी या विषयावर लिहीले असेल तर ते प्रा. नारायणराव बेहरे यांनी. तेव्हा त्यांचा सन आठराशे सत्तावन्न हा ग्रंथ त्या दृष्टीने पाहावा."
हे पुस्तक म्हणजे अभ्यासू ग्रंथ असल्याने सर्वच इतिहास प्रेमी लोकांनी जरुर वाचावा जेणेकरुन आपल्या इतिहासा कडे त्रयस्थ नजरेने पाहाण्याची दृष्टी निश्चितच तयार होईल.पुस्तकातले निकर्ष हे काहीसे कटु वाटले तरी अभ्यासाअंती काढलेले असल्याने मान्य करायलाच हवेत. ते खालीलप्रमाणे आहेत:
(१) श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या मराठी माणसांच्या राजसत्तेच्या रो्पट्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले ते रणधुरंदर थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात. त्याचीच परिणीती मराठी सैन्याच्या अटकेपार जाण्यात झाली.त्यावेळी मराठी माणसांच्या शौर्याचा इतका दबदबा समस्त हिंदुस्थानात होता की अटकेपार जाताना मराठी सैन्याला सबंध हिंदुस्थानात कोठेही प्रतिकार झाला नाही.मोगल आणि राजपुतांनी मराठ्यांचे वर्चस्व जणू मनोमनी मान्यच केले होते.एकंदरीत काय मराठी माणसांचे शौर्य आणि राजकीय वर्चस्व समस्त हिंदुस्थानाने मान्यच केले होते.मोगल सत्ता इतकी दुबळी झाली हॊती की, मोगल बादशाहाच्या अंमलाखालील प्रांतातून चौथ व सरदेशमुखी मराठे सरदार वसुल करत असत.त्यामुळे इंग्रजांचा युनियन जॅक ज्या क्षणी शनिवार वाड्यावर फ़डकला त्याच क्षणी इंग्रजांचे साम्राज्य हिंदुस्तानावर स्थापीत झाले असे समजण्यात येते. त्या मुळे मुसलमानां पासून हिंदुस्तानची सत्ता इंग्रजांनी मिळवली हा अपसमज हिंदुस्तानी माणसांनी , विशेष करुन मराठी माणसांनी मनातून पार काढुन टाकला पाहीजे.इंग्रजांनी हिंदुस्तानची सत्ता ही मराठ्यांचा पराभव करुनच मिळवली हे सत्य नाकारताच येत नाही.
(२)इंग्रजांचे साम्राज्य हे इस्ट इंडीया कंपनीच्या रुपाने सुरुवातीला प्रस्थापीत झाले होते. व्यापार करण्याच्या हेतुने चंचुप्रवेश केलेल्या कंपनीने युक्ती प्रवॄत्तीने इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत केले.कंपनीचा हिंदुस्तानातील गव्हर्नर जनरल हा कंपनीच्या वतीने कार्यभार पाहात असे. एका अर्थी गव्हर्नरच्या हाती निरंकुश सत्ता होती.या कंपनीचे धोरण हे सुरुवातीला तरी व्यापारी म्हणुन नफ़ा कमवण्याचेच होते आणी त्या बद्दल दोष देण्यासारखे असे काही नाही. तथापि नंतर मात्र कंपनीने या देशाच्या राजकारणात ढवळा ढवळ करण्यास सुरुवात केली. त्या साठी तैनाती फ़ौजेच्या रुपाने कंपनीने स्वत:चे सैन्य उभारले. या फौजेचा खर्च तैनाती खर्च बाळगणारा राजा अथवा संस्थानीक करीत असला तरी ही फौज कंपनीच्या अधिकार्‍यांचेच हुकुम मानत असे.त्यामुळे कोणताही खर्च न करता कंपनीला सैन्याची उभारणी करता येणे शक्य झाले.इंग्रजांच्या या बुध्दी कौशल्याची तारीफच करायला हवी नाही का?
(३) सन १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन आला.त्या वेळी इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्य्क्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानीक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत. या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली.त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानीक निपुत्रीक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदु धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती ( नीती कसली अनीती ) होती. या मुळे हिंदुस्तानातील राजे अथवा संस्थानीक यांच्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभुमीवर १८५७ च्या बंडाची बीजे रोवली गेली होती.
(३) त्यातच बंदुकीच्या काडतुसांना गाईच चरबी लावलेली असायची या धार्मिक कारणाची भर पडली.
(४) या बंडामागे हिंदुस्तान हे एक राष्ट्र आहे ही भावना कोठेच नव्हती. बंडात भाग घेणारे अथवा त्यास खतपाणी घालणारे हे राज्य गमावलेले भुतपुर्व राजे अथवा संस्थानिक होते.या बंडात भाग घेणारे बहुतांश लोक लुटालुट करीत ज्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये या बंडाविषयी उदासिनता निर्माण झाली.सर्वसामान्य जनतेचा पाठींबा नसेल तर क्रांती यशस्वी होत नाही . त्यामुळे इंग्रजी सैन्य संख्येने कमी असुनही हे बंड मोडणे त्यांना शक्य झाले.
(५) बंडाचा प्रभाव हा उत्तर हिंदुस्थानातील मर्यादीत भागात होता. बादशाहाच्या नावाने सत्ता स्थापीत झाली तर मुसलमान परत शिरजोर होवुन अत्याचार करतील या साधार भितीने उत्तर हिंदुस्तानातील शिख, गुरखे यांनी इंग्रजांना बंड मोडण्यास मदत केली.
(६) दक्षिणेचा बहुतांश भागात शांतता होती. बराचश्या मद्राशी पलटणींनी तर बंड मोडण्यात भाग घेतला. या बंडात नानासाहेब पेशवे, तात्या टोपे , राणी लक्ष्मीबाई आदी मराठी रणधुरंदरांनी बंडवाल्यांचे नेतृत्व केले असले तरी महाराष्ट्रातुन त्यांना कुठलाही पाठींबा मिळाला नाही हे सत्य आहे. किंबहुना या धामधुमीत मराठी मुलखात शांततात होती.
ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतली तर हे बंड का अयशस्वी झाले ते कळुन येते. असे असले तरी या बंडामुळे काही गोष्टी निश्चितच घडुन आल्या. त्या म्हणजे-
(अ) हिंदुस्थानी जनतेतील असंतोष लक्षात घेवून इंग्लंडच्या राणीने इस्ट इंडीया कंपनीच्या हातुन हिंदुस्थानचा कार्यभार काढुन घेतला.
(ब) राणीने कार्यभार स्वत:कडे घेतल्यावर येथील जनतेसाठी जाहीरनामा जाहीर केला.
(क) त्यात राणीने दिलेली आश्वासने लक्षात घेतली तर अप्रत्यक्षरीत्या कंपनीचे हिंदुस्थानातील धोरण अन्यायकारक होते याचीच कबुली मिळते.
(ड) हा जाहीरनामा या पुस्तकाच्या शेवटी दिलेला आहे. तो मुळापासुन वाचण्या सारखा आहे. त्यातील अनेक बाबी या आपल्या घटनेच्या मुलतत्वांचा आधार आहेत असे लक्षात येते.
एकंदरीत काय अभ्यासातुन लिहिलेला इतिहास आणि अभिनिवेशातुन लिहिलेला इतिहास या पैकी कोणातुन किती व काय घ्यायच याची कल्पना हे पुस्तक वाचल्यावर तर येतेच पण त्याच बरोबर एखाद्या विशिष्ठ कालखंडातील घटनाक्रम इतिहासात काय निर्माण करु शकतो याची जाणिव होते.