१८ मे, २०१०

वन फ़ॉर सॉरो

                                                     लेखिका : अनुराधा कुलकर्णी
                                                     प्रकाशक : ग्रंथाली

                    श्रीमती अनुराधा कुलकर्णी यांनी लिहीलेल हे पुस्तक मनाला अस्वस्थ करुन सोडत. कॅप्टन अभय कुलकर्णी यांच्या सारख्या सैनिकी पेशातील उमद्या तरुणाशी लेखिकेने समजुन उमजुन लग्न केल. लेखिकेच हे सर्वसामान्य तरुणींपेक्षा असलेल वेगळेपण त्यांच्या लिखाणामधुन पण दिसुन येत. सैनिकी पेशाबद्दल आपल्या सारख्या नागरी जिवनातील लोकांमध्ये किती अज्ञान आहे याची जाणिव त्यांच्या लिखाणा मधुन आपल्याला प्रकर्षाने होते.सैनिकांना अनेक वस्तु सवलतीच्या दरात मिळतात याचा जरुरीपेक्षा जास्त उहापोह केला जातो या बद्दलच्या लेखिकेच्या मनातील विषादाशी सहमत होण्यापेक्षा दुसरा पर्याय हे पुस्तक वाचल्यावर आपल्या मनात येवूच शकणार नाही.आपल्या सारखे नागरी जीवनातले सारे स्थौर्य व सुख अनुभवणारे लोक शांततेच्या काळात सैनिकांना पारच विसरुन जातो याची जाणीव आपल्याला नसतेच हे लेखिकेच स्वानुभवाने झालेल मत कटू वाटले तरी त्यातील सत्यता नाकारता येईल का?. शांततेच्या काळात सुद्धा देशाच्या सिमेवर आघोषीत युध्द सुरुच असल्याने त्या काळात देखिल सैनिकांच जिवन जोखमीच आणि तणावग्रस्त असत याची जाणीवच आपल्याला नसते.

                  तिनही युध्दांमधुन सुखरुप परत आलेल्या कॅप्टन अभय कुलकर्णी यांच निधन मिलिटरी हॉस्पीटल मध्ये योग्य वेळी उपचार न मिळाल्याने होते याची हळहळ आपल्याला देखिल वाटल्या शिवाय राहात नाही.त्यांच्या पश्चात लेखिकेने केवळ आपल्या पतीच्या आठवणींच्या जोरावर कश्या प्रकारे जीवन व्यथीत केल आणि मुलांच संगोपन केल हे वाचल की सैनिकांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती समाज किती असंवेदनशील आहे याची बोचरी जाणीव मनाला होते.लेखिकेने उण्यापुर्‍रा दहा-अकरा वर्षाच्या पतीसोबत घालवलेल्या सहवासाच्या स्मृतींमधुन सैनिकांच जगणे व त्यांची जिवना कडे बघण्याची दॄष्टी कशी असतॆ याचा यथार्थ परिचय करुन दिला आहे.त्या वरुन जिवनातील छोट्या छोट्या अडचणीचा आपण उगाचच बाऊ करतॊ हे लक्षात येत.

                     थोडक्यात काय, सैनिक हे सदैव मातृभुमीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मरणाला सामोरे जातच असतात व अश्या सैनिकां प्रती नागरी समाजाचा दृष्टीकॊन कसा असंवेदशील असतो याची जाणिव सरळ सोप्या भाषेत करुन देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. त्या मुळे लेखिका जणू वाचकांशी संवाद साधते आहे असच वाटत.

मैत्रेय१९६४

१२ मे, २०१०

सोन्याच्या धुराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)

                      ग्रंथाली प्रकाशनाने नुकतेच जानेवारी २०१० मध्ये डॉ. उज्वला दळवी यांचे "सोन्याच्या धुराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)" हे पुस्तक प्रकाशीत केलं आहे.या पुस्तकाला डॉ. स्नेहलता देशमुख यांची सर्मपक प्रस्तावना लाभली आहे.त्याच प्रमाणे स्वत: लेखिकेने " गुज मनीचे "या मनोगतात हे पुस्तक लिहीण्या मागचे गुज मांडले आहे.डॉ. स्नेहलता देशमुख यांची प्रस्तावना आणि लेखिकेचे " गुज मनीचे "हे मनोगत वाचल्या नंतर या पुस्तकाबद्दल वेगळ्या शब्दात काही लिहाव अस काही शिल्लकच राहात नाही.

                     मॊकळे पणाने व सोप्या शब्दात डॉ. उज्वला दळवी यांनी त्यांचे सौदी अरेबितातील मांडले आहेत की त्या मुळे हे पुस्तक वाचनीय झाल आहे. मराठी माणसाची, विशेषत: मध्यमवर्गीय मराठी माणसाची एक वेगळीच मानसीकता आहे. अतिशय संवेदनशील आणि चांगल्या गोष्टींचा तत्परतेने स्विकार असा खुल्या मनाचा हा समाज आहे.जात्याच संवेदनशील असणारी ही माणसे आजुबाजूच्या घडण्यार्‍या घटनांकडे अलिप्तपणे पाहूच शकत नसल्याने चटकन दुखावली जातात.डॉ. दळवी या देखिल मध्यमवर्गीय मराठी समाजातील असल्याने सौदी अरेबिया सारख्या कर्मठ मुस्लीम राष्ट्रातील अनेक अनुभवांनी त्यांना वेळोवेळी ठसके आले. महत्वाच म्हणजे ते सर्व अनुभव त्यांनी प्रामाणीकपणे व्यक्त केले आहेत. मध्यमवर्गीय मराठी समाजातील अनेक सुशिक्षित तरुण गेली अनेक वर्ष विविध देशात गेले आहेत व आजही जात आहेत.त्या पैकी अनेक जणांनी त्यांचे परदेशातील अनुभव पुस्तकां मधुन मांडलेले देखिल आहेत. पण बहुतेकांचे अनुभव हे त्यांनी परदेशात कसे कष्ट केले व ते यशस्वी कसे झाले या बद्दलच लिहीलेले आहेत. डॉ. दळवी यांच्या प्रमाणेच १५ ते २० वर्षापुर्वी परदेशात गेलेल्यांपैकी अनेकांना कटु अनुभव आलेही असतील पण ते त्यांनी तितकेसे मांडलेले नाहीत. कदाचीत " मान सांगावा जनात , अपमान ठेवावा मनात" हे संस्कार असल्याने तसे झाले असावे.

                      याच पार्श्वभुमीवर डॉ. उज्वला दळवी यांचे पुस्तक वेगळे ठरते. त्यांच्या लिखाणामधुन परदेशात कामासाठी गेलेल्या लोकांना कसे वाइट अनुभव येवू शक्तत याची कल्पना येते.हे अनुभव बर्‍या वाईट प्रमाणात परदेशी गेलेल्यांच्या पहिल्या पिढीला आले असल्यानेच त्यांच्या मनात " ने मजसी ने परत मातृभुमीला" ही भावना आढळून येत असावी अस मला वाटत. आता पुस्तका बद्द्ल जास्त काही लिहीत नाही कारण हे पुस्तक मुळापासून वाचाव असच आहे.

                     शेवटी डॉ. दळवी यांनी पुस्तकात नमुद केलेला एक प्रसंग त्यांच्याच शब्दात मांडत आहे. त्या लिहीतात-

                     मध्यम वयाची एक बाई आठवड्यातून एकदा तरी येउन मला कडाकडा शिव्याशाप देवून जाई. एक दिवस यथेच्छ शिव्या घालून झाल्यावर म्हणाली," मला घरी वैताग आला ना की तुझ्याकडे येते बघ. एकदा तुझ्याकडे अस मन मोकळ करुन टाकल की मी घरी आनंदात नांदते.माझ्याकडे दागदागीने, कपडेलत्ते पुष्कळ आहेत. घरात माणसांनाही तोटा नाही. पण अस माझ बोलण ऎकून घेणार मला तुझ्या खेरीज दुसर कोणीही नाही."

                  हा प्रसंग वाचल्यावर सौदी अरेबियातील मुस्लीम त्रीच्या मनाचा होणारा कोंडमारा तर जाणवतोच पण त्याच बरोबर नोकरी निमित्याने आलेल्या परदेशी माणसांकडॆ तुच्छतापुर्वक बघण्याचा त्या देशातील माणसांचा बेमुर्वतखोर दृष्टीकोन आपल्याही मनाला ठेच पोहचवतो.

                   पुस्तक वाचता वाचता डॉ. उज्वला दळवी यांना लागलेल्या ठेचा व आलेले ठसके यांच्याशी कसे समरस होतो हेच कळत नाही. मला वाटत हेच या पुस्तकाचे वैशिष्ट आहे

१ मे, २०१०

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

                 आज १ मे २०१० रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस ५० वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्त्याने महाराष्ट्र शासन तसेच राजकीय पक्ष आणि विविध संघटना यांनी कार्यक्रम आयोजीत केले आहेत. तसेच गेल्या आठवडाभर दुरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रामधुन राजकीय नेते आणि विचारवंत यांनी महाराष्ट्राच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा मांडला आहे.या सर्वांनी मांडलेली मते आणि आपल्या राज्याची सांप्रत स्थीती या बद्दल निरक्षिरवृत्तीने विचार करण्यास आपण सगळे सक्षम आहातच.
                  तेव्हा ५० वर्षाच्या वाटचाली नंतर अपेक्षित असलेल महाराष्ट्र राज्याच चित्र आणि वास्तविकता याचा विचार आजच न करता अत्यंत आनंदाने आणि गौरवाने आपल्या राज्याचा ५० वा वाढदिवस घराघरात साजरा करुया.
                   माझ्यावतीने जगभरातील सर्व मराठी माणसांना महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.


                                                                                         आपला
                                                                                      मैत्रेय१९६४.