२४ सप्टें, २०१२

सत्त्याचा ‘बाप’ – भाग ५


बोलता बोलता त्या आठवणीत तो शुन्यातच गेला. मी ही शांत बसलो. थोड्या वेळाने स्व:ताच भानावर आला.आता मात्र त्याच्या चेहर्‍यावर काहीसं दडपण  दिसत होत. त्यानं पुढ्यातला पेग संपवला अन नविन भरला. बट नाऊ आय डिसाईड लेट्स आलावु हिम टु ओपन हिज इमोशन्स. यु नो ,आय अल्सो थिंक इन इंग्लिश व्हेरी वेल. पण नालायक मित्र म्हणतात," आय ओन्ली ड्रींक्स इंग्लिश व्हेरी वेल." दे नेहमीच जलींग ऑन मी.........
पुढे त्याला जे सांगायच होतं ते खुपच महत्वाच असावं. कारण काही न बोलताच भरलेला पेग एकाच झटक्यात पिवून नविन पेग त्यानं भरला. माझा दुसरा पेग अजुनही संपला नव्हता तरी त्याचं हे पिणं पाहुन मात्र मलाच किक बसायला लागली होती.
" हं.मी काय सांगत होतो बच्चन."
" तु ऑपरेशन थेटरच्या बाहेर...."
माझ वाक्य पुर्ण होवु न देताच तो म्हणाला," थांब आठवलं आता. मी बाहेर जातोय हे येकल्यावर सत्त्या माझा हात पकडुन म्हणाला, बाबा थांब ना. बाहेर जावु नकोस ना . बहुदा ऑपरेशन थेटर मधल्या वातावरणातला वेगळेपणा लहान वयातही त्याला जाणवला असावा . अस असल तरी मला ऑपरेशन थेटर मध्ये थांबता येणार नव्हतं हे नक्कीच. तेव्हा मी काही बोलणार तोच डॉक्टरच म्हणाले, थांबतील हं बाबा तुझ्या जवळ. हे ऎकल्यावर मी आश्चर्याने करुन त्यांच्याकडे पाहीलं. त्यांनी मला डोळ्यांनीच चुप बसायला सांगीतलं."
येव्हडं बोलुन त्यानं ...... काय केलं परत परत सांगायलाच हवं का?. समोरचा पेग संपवला आणि नविन भरला. कितवां... ते मोजायच मी आता बंद केलयं. च्यायला मी मोजत बसु की माझी पिवु. नाहीतरी तो त्याच्या खंब्यातली पितोय मग आपण का मोजत बसायच. तेव्हा आपण आपली क्वार्टर पित ऎकुया................
"मग त्याला डॉक्टरच म्हणाले, बाळा हे दुसरे डॉक्टर काका आहेत ना ते तुला हळुच एक इंजेक्शन देतील, घाबरणार नाहिस ना?. मग माझ्या लक्षात आलं दुसरे डॉक्टर म्हणजे अ‍ॅनास्थेटीक होते. त्या डॉक्टरांनी इंजेक्शन द्यायला सुरुवात केल्या बरोबर सत्त्याने माझा हात अजुनच घट्ट पकडला. एव्हडा घट्ट की ईतक्या छोट्या मुलाच्या अंगात देखिल वेळ पसंगी किती ताकद येते हे मला जाणवलं. इंजेक्शन देवुन झाल्या नंतर डॉक्टरांनी सत्त्या बरोबर इकड तिकडच्या गप्पा करत त्याच बी.पी. वैगरे चेक करायला सुरुवात केली. सत्त्याच्या बोलण्यावरुन इंजेक्शनचा इफेक्ट किती झालाय ते डॉक्टरांना कळुन येत होतं. आणि मला....... सत्त्याच्या माझ्या हातावरच्या पकडी वरुन."
येव्हडं बोलुन त्यानं ...... तेच ते . लगे रहो मुन्नाभाई और गिनते रहो सर्किटभाई.
" हं. तर माझ छोटस बाळ लवकरच गुंगीच्या अधिन झालं आणि त्याची माझ्या हातावरची पकड पुर्णपणे सुटली. माझ नव्हतं पण डॉक्टरांच तिकडे लक्ष होतचं. त्यांनी मला लगेचच  ऑपरेशन थेटर मधुन बाहेर जायला सांगितलं. मी बाहेर आलो. ही आणि सत्त्याचे आबा मला ऑपरेशन थेटर मधुन बाहेर यायला वेळ लागला म्हणुन काळजीतच होते. त्यांना मी जास्त काही न बोलता सगळं व्यवस्थीत आहे एव्हडचं सांगीतलं"
येव्हडं बोलुन त्यानं ......
"खरं सांगु बच्चु, मी बदललो तो त्या क्षणा पासुन. बेदरकार आणि बिनधास्त स्वभाव माझा. दुसर्‍यांना मदत करायची वृत्ती असली तरी स्व:ताच्या बाबतीत कधी जबाबदारीने वागलो नव्हतो. त्या मुळे जरा बॉस बरोबर पटलं नाही की सोड नोकरी अन बस घरी हे नेहमीचच. तुम्हा मित्रांना त्या मुळे माझ भारी कौतुक. पण खरं सांगु माझ्या पेक्षा माझ्या बायकोच खर कौतुक. माझ्या सारख्या वृत्तीच्या माणसांच समाज कौतुक करतो. पण खर कौतुक करायला पाहीजे ते माझ्या सारख्या माणसांना सांभाळुन घेवुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या घरातल्यांच. कारण कौतुक करणारा समाज जेवायला घालत नाही की जखमांवर औषध लावत नाही. समाजकार्याच्या धुंदीत असलेल्या माणसांच्या पाठीमागं असतातं ती फक्त त्याच्या घरातली माणस. खरे चटके तर ती सहन करत असतात मौनपणे आणि कुठलाही गाजावाजा न करता."
येव्हडं बोलुन त्यानं ......
याची ही बाजु मला नविनच होती.”त्या’च्या मनातला हा कोपरा मी त्याचा सगळ्यात जवळचा मित्र असुनही मला दिसलाच नव्हता. या सगळ्यामुळे मी ही मनात कुठेतरी हललोच. जवळची म्हंणतो त्या माणसांच्या मनापर्यत आपंण खरच पोहोचतो का?. किमान पोहोचण्याचा प्रयत्न तरी करतो का?. आयला मी का सेंटी होतोय बर........
सत्त्याला सोडुन बाहेर आलो तरी मनान मी थियटर मध्येच होतो. अस वाटत होत की सत्त्याच्या जागी मीच आहे. मनात सल होता, माझ्या सत्त्याला मी त्याच्या बरोबर थांबेन अस खोट सांगीतल्याचा.शेवटी येकदाच ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आणि आम्ही घरी आलो.  पण अजूनही सत्त्याची हातावरची पकड जाणवत होती.”
“होता हई यार यैसा फिलिंगं कभी कभी”
“नाही तस नव्हतं. कारण त्यानंतर मी सत्त्याला परत एकट कधीच सोडणार नाही असा जणू पणच केला.”
“अरेच्चा हे कारण होत का ?”
“मग माझा जास्तीत जास्त वेळ मी सत्त्यासाठी आवर्जून राखुन ठेऊ लागलो. तुमच्या पार्ट्यन मध्ये  बसायचं पण त्यासाठीच कमी केलं. माझ्यातला हा बदल माझ्यासाठी देखील अनाकलनिय होता.”
“हो ना ,तुझ्या शिवाय पार्ट्या मध्ये आम्हालाही मजा वाटायची नाही.”
“सत्त्या विषयाच्या अतिरेकी प्रेमाचं हीला देखील आश्चर्य वाटायचं. तिन मला बर्‍याच वेळा या अतिरेकी प्रेमाबद्दल सावध केलही होत. पण मी मात्र माझ्याच धुंदीत होतो.”
येव्हडं बोलुन त्यानं ......
“माझ्या अतिरेकी प्रेमानच बहुदा त्याचा स्वभाव असा हळवा झाला असावा. मुलांनी खेळल पाहिजे ,धडपडल पाहिजे अन स्व;ताच स्व;ताच्या जखमा कुरवाळल्या पाहिजेत हे मी पार विसरूनच गेलो होतो. सत्त्यान पडूच नये ,धडपडुच नये याच्या काळजीपोटी त्याच्यावर मी खूपच बंधन आणली. मी स्व:ता माझ्या लहानपणी किती मस्तीखोर होतो आणि तरुणपणी वांड होतो हे सगळ्यांनाच माहीत आहे.पण सत्त्याला मात्र मी आदर्श मुलगा बनवायचा प्रयत्न करत होतो......वेळप्रसंगी दोन द्यायचे असतात ,दोन घ्यायचे असतात हे माझंच तत्वज्ञान होत ना रे?”
तुझा हाच स्वभाव तर आम्हाला आवडायचा. आमचा संकटमोचन होतास तू. तू बरोबर असलास की कोणालाही भिडायची हिम्मत यायची.”
“गेले रे ते दिवस. तुम्हा लोकांना माहीत असलेला मी आता फार बदललोय.” 
येव्हडं बोलुन त्यानं ......
 “जाऊ दे यार. आता सगळं ठीक होईल. सत्त्याला त्याची चुक कळली आहे. चांगला मुलगा आहे तो. हुशार, शांत आणि समंजस.”
“समंजस ... “
“येखादी चूक चांगल्या माणसानं कडून पण होते. हा तर अजून फार लहान आहे.”
“त्यान चूक केली असती तर चाललं असत. जगाच्या विरुध्द जाऊन मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो असतो. पण तो पळपुटा निघाला याच वाईट वाटताय.”
“माफ कर यार सत्त्याला.
“तुम्ही अनुभवलं आहे ,चुका मी ही खूप केल्या आयुष्यात पण कधी भ्यालो नाही. चुक केली आणि त्याची किमत पण चुकवली.”
आता मला काय बोलावं ते सुचेना. हा बाप माणूस आतून किती दुखवला गेलाय ते उमजत होत. सालं त्यातच माझ्या डोळ्यात आज सारखं पाणी येत होतं....आज भुस्काट जरा जास्तच तिखट केलेलं असावं म्हणून तर नसेल ना?.
“मी आयुष्यात कधीही पळपुटेपणा केला नाही. समोरचा भिडला की दोन हात करायचेच. अश्या वेळी समोर कोण आहे ते बघायचं नाही हा माझा फंडा. त्यालाच तर तुम्ही रिस्पेक्ट द्यायचात ना?”
“अरे म्हणून काय आम्ही तुझ्या सारखे वागू शकतो का?. आम्ही पळपुटेच. तु बरोबर  असलास की आम्ही भाई इतर वेळी मात्र पळापळी. हाच तर तुंझ्यातला आमच्यातला फरक आहे बॉस.”
“हीच गोष्ट माझ्या मुलाला कळली नाही रे.एका पोरीन नकार दिला तर जीव द्यायला गेला पळपुटा.”
सांभाल यार खुदको. तुच असा खचलास तर वहिनींनी आणि आबांनी कोणाकडे पाहायचं?”
“अरे ती दोघही माझ्या पेक्षा खंबीर आहेत. त्यांची काळजी ते घेतीलच कारण त्यांना माहीत आहे की आता दोघांना सांभाळायच आहे. मला आणि त्या पळपुट्याला.”
सालं माझ्या डोळ्यातलं पाणी कमीच होत नाही आहे. फुकट देतोस म्हणून भुस्कट येव्हड तिखट बनवायच का रे शेट्ट्या. अर्थात ते सगळं मनात चालू होतं. आमची कुठली हिम्मत याच्या सारखी तोंडावर बोलण्याची.
“ह्या पळपुट्यान जीव देताना आमचा कोणाचाच विचार नाही केला. म्हातार्‍या आबांचा , सगळे हट्ट पुरवणार्‍या आईचा ,त्याची सतत काळजी करणार्‍या या बापाचा.”
“असा वेडा विचार का करतोस रे, भाई.”
पण माझ्या बोलण्याकडे त्याच लक्षच नव्हता. स्व:तशीच बोलत असल्यासारखे त्याच्या चेहर्‍यावर भाव होते.....
“एका पोरीच प्रेम मिळालं नाही म्हणून आमच्या सगळ्यांच्या प्रेमाची किम्मत शून्य करून टाकली यान एका क्षणात.आमच्या प्रेमाचा असा अपमान करण्याचा हक्क कोणी दिला ह्याला. या वरून आता माझ्या लक्षात आलंय की, त्यान ऑपरेशन वेळी सोडलेला माझा हात परत कधीच घट्ट पकडला नव्हता.मी मात्र त्याच त्या वेळच हाताला घट्ट पकडण आजही कवटाळून बसलो होतो. चलता है.चूक झाली माझ्याकडन.आता मात्र माझ आयुष्य मी जगणार आहे. ज्याच्या साठी स्व:ताला बांधून घेतलं त्यालाच माझी किम्मत नाही हे कळून चुकल आहे मला. जी मुलगी त्याची झाली नाही तिच्यासाठी जीव देतो तो आमचा नाहीच. आमच्यासाठी तो सर्वस्व होता पण  त्याच्या दृष्टीने आम्ही कोणीच नाही याच दुख: मात्र आयुष्यभर सलत राहील..... ”
त्यानंतर ही तो बरच काही  बोलला. पण काय ते माझ्या लक्षात नाही. कदाचित माझ्या आदर्शाला असा  खचलेला पाहताना मनाला खूप वेदना होत होत्या म्हणून असेल.त्यातच ते तिखट भुस्कट आणि त्यामुळे सारखे भरून येणारे माझे डोळे.....
त्यान एकदा विचारलं देखील,” तु कारे रडतोस बच्चू.”
“अरे मी कशाला रडू. शेट्ट्यान आज भुस्कट जास्तच तिखट केलं म्हणून जरा डोळ्यात पाणी आल. बस.”
त्यावर तो काहीच बोलला नाही. फक्त त्याचे लालसर झालेले डोळे माझ्याकडेच पाहत होते. मी नजर खाली झुकवली आणि सिप घेतला. पण माझा ग्लास तर चक्क रिकामा होता. का कोण जाणे परत ग्लास भरावासा वाटेनाच. माझ्याच मनावरच दडपण वाढत चालल होतं. त्यातच त्या दिवशीचा त्याचा मूड पाहून माझी मात्र बोलतीच बंद झाली होती. त्याला येव्हडा दुखावलेला या पूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे ज्याचा मला नेहमीच आधार वाटायचा, त्याला कस काय समजावं हेच कळत नव्हतं. असाच किती वेळ गेला कोण जाणे कारण शेवटी शेवटी तर तो ही गप्प होता. अश्या मनस्थितीत त्या रात्री अखेर किती वाजता आम्ही बार मधून बाहेर पडलो ते मात्र आजही मला आठवतं नाही.

***********

आणि हो सगळ्यात महत्वाच सांगायचं म्हणजे , त्या दिवशी म्हणे झिंगालेल्या अवस्थेत मला त्यांनच घरी सोडलं अस ही नेहमी सांगत असते.पण तुम्हाला अन मलाच तर सत्य माहीत आहे, त्या दिवशी खंबा कोणी प्यायला होता ते ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: