आज अनंत चतुर्दशी, १० दिवसांचे घरगुती गणपति बाप्पा आणि त्याच बरोबर जवळपास सगळेच सार्वजनिक
गणपति बाप्पा यांचं आज विसर्जन होत आहे. हा संवाद लिहायला सुरवात केली त्यावेळी
सकाळचे ९.३० झाले होते व मुंबईचा एक मानाचा असलेला गणेश गल्लीचा सार्वजनिक गणपति
बाप्पा त्याच्या मंडपातून नुकताच बाहेर पडला होता. त्यामुळे मुंबईतल्या सार्वजनिक
गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीस आता अनौपचारिकरीत्या सुरुवात झाली आहे. तर मुंबईतल्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची अनौपचारिक सांगता
उद्या पहाटे लालबागच्या गणपति बाप्पाच गिरगावच्या चौपाटीवर विसर्जन झाल्यावर होणार
आहे.
लाडक्या बाप्पाला आज निरोप
द्यायचाय या कल्पनेनेच गेले दहा दिवस बाप्पाच्या आगमनामुळे आनंदमय झालेल्या भक्तजनांची
आजची मनस्थिती काहीशी हळवी झाली आहे. बाप्पा पाहुणा म्हणून आलेला असल्यानं तो आज न
उद्या जाणार याची कल्पना भक्तांना असली तरी जेव्हा तो क्षण प्रत्यक्षात येतो
त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. हिंदू धर्मात विविध
देवदेवता आहेत ज्यांची उपासना व भक्ति केली जाते. पण भक्तांना भेटायला त्यांच्या घरी
तसेच दारी स्व:त येणारा आणि त्यांच्या कडून आपल कोडकौतुक करवून घेणारा लाडका
बाप्पा आनंदाचे क्षण तर देतोच पण त्याच बरोबर कौटुंबिक स्नेह आणि सामाजिक उत्साहाची
सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.
अस असल तरी या वर्षाच्या गणेशोत्साहावर
महाराष्ट्रातील दुष्काळच अस्मानी संकट आणि त्याच बरोबर राज्यातील सिंचन घोटाळा, केंद्रातील कोळसा घोटाळा , परदेशी बड्या कंपन्यांना
भारतातील किरकोळ किराणा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास केंद्राने दिलेली परवानगी या मुळे
निर्माण झालेली राजकीय आणि सामाजिक अस्वस्थता याच सावट होतं. त्यातच डिझेलच्या किंमतीतील
वाढ आणि सर्वसामान्य कुटुंबासाठी गरजेच्या असलेल्या घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या दरात
केलेली अप्रत्यक्ष वाढ ( सवलतीत मिळणार्या सिलेंडरची मर्यादा ६ करून) यामुळे बिघडू
पहाणारे कौटुंबिक अंदाजपत्रक याचा विचार बाप्पाच्या भक्तांच्या मनात निश्चितच असणार होता.
पण गेले दहा दिवस ज्या उत्साहाने
संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा झाला ते पाहता बाप्पा विषयी भक्तांच्या मनात
किती आपुलकी आणि निरपेक्ष प्रेम आहे हे दिसून येत.
या सर्व प्रेमाचा भावपूर्ण
सार्वजनिक आविष्कार म्हणजे महाराष्ट्रभर पारंपरिक पध्दतीन वाजत गाजत निघालेल्या बाप्पाच्या
सार्वजनिक मिरवणूका. घरात बसून दूरदर्शनच्या सर्व चॅनलवर दाखवल्या जाणार्या सार्वजनिक
मिरवणूका व बाप्पाच्या मूर्त्यांच होणार विसर्जन पाहत असताना बाप्पाच्या वियोगाच्या
कल्पनेने जर तुमचे आमचे डोळे भरून येत असतील
तर या उत्सवात सक्रिय भाग घेणार्या कार्यकर्त्यांची व मिरवणुकीत प्रत्यक्ष भाग घेतलेल्या
भक्तांची मनस्थिती कशी असेल याची कल्पना येवू शकते.
कधी काळी मी देखील सार्वजनिक
गणेशोत्सवात सक्रिय भाग घेतला असल्याने नाचत-वाजत मिरवणुकीत सामील झालेल्या प्रत्येक
भक्ताचे बाप्पाच्या मूर्तीच विसर्जन करण्याच्या
क्षणाला डोळे किती पाणावलेले असतात हे पाहिलेले तर आहेच पण अनुभवलेले देखील आहे.
त्यामुळे आज मिरवणुकीत मी सामील
नसेनही पण तरीही कानावर पडणार्या ताशाच्या आवाजाने जागच्या जागी पाऊले थीरकायला लागतात
आणि मनात एकच घोष उमटतो ........
“ मोरया रे बाप्पा मोरया रे.
गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा