६ सप्टें, २०१२

सत्त्याचा ’बाप’ - भाग २



भाग २

या निशब्द शांततेत माझ मन पाहाता पाहाता १८  -२० वर्ष मागे गेल. त्या वेळी आम्ही नुकतेच या बिल्डींगमध्ये राहायला आलो होतो. आजुबाजुच्या सर्वांशी हळुहळु ओळखी होत होत्या. माझी नोकरी नविन असल्याने संध्याकाळी येण्यास उशिर मला होत होत असे. असाच एके दिवशी उशिरा घरी येत असताना एका पोराने मला सायकलने धडक दिल्याने आमची बाचाबाची झाली. तो पोरगा त्या गल्लीतलाच असल्याने लगेचच त्याचे चार-पाच मित्र तिथे जमा झाले.त्यामुळॆ त्या मुलाची चुक असुनही मलाच तडी पडण्याचे ब्राईट चान्सेस होते. तेवढ्यात ’तो’ आला. त्याने मला विचारलं, "काय रे,काय झाल." 
मी वैतागुन त्या अगंतुकाकडे बघितल . तो हसला आणि म्हणाला,"काय रे माझ्या बिल्डींग मध्ये राहातोस आणि मला ओळखत नाहीस." दुसरी कुठची वेळ असती तर मी ह्या टिकोजीरावाला पण उलटा बोललो असतो पण मारामारीच्या विषम परिस्थीतीत त्याने दाखवलेल्या या ओळखीचा मोठाच आधार वाटला . मग मी त्याला जे घडल ते सर्व सांगीतलं. त्याने सर्व ऎकुन घेतलं आणि म्हणाला," निघ तु,मी बघतो काय ते."
मग काय मी सरळ कन्नी कापली . घरी आल्यावर मात्र त्याला एकट सोडुन निघुन आल्याची रुखरुख मनात रात्रभर राहीली. दोन दिवसांनी रविवार उजाडला. सुट्टीचा दिवस असल्याने मी चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो तर माझ्या पेक्षा ८-९ वर्षांनी मोठा असेलला एकजण बिल्डींगच्या मेनगेट्वर पाठमोरा बसलेला दिसला. गेटच्या बाहेर पडता पडता एक ओझरती नजर त्याच्यावर टाकली.’त्या’ची उंची साधारण पावणॆ सहा फुट आणि बिल्ट एखाद्या बॉडीबिल्डर सारखी हॊती. दिसायला स्मार्ट जास्त नाही पण तरीही एकंदर व्यक्तीमत्व लक्षात राहाण्या सारखं. तेव्हड्यात त्याचच लक्ष माझ्याकडे गेलं. तो माझ्याकडे पाहुन हसला आणि म्हणाला, " काय भाई, आम्हाला विसरलात वाटत."
हे वाक्य ऐकल्यावर मात्र मी चमकुन त्याच्याकडे नीट पाहीलं .  मग लक्षात आलं अरे हा तोच की,परवा माझी मार खाण्या पासुन सुटका करणारा. काहीसं ओशाळुन मी त्या संकटमोचनला म्हणालो," सॉरी.पटकन तुम्हाला ओळखलच नाही."
" साल्या तुम्हाला म्हणून शिव्या कशाला घालतोस.तुला म्हण मित्रा" 
मग त्यानेच हात पुढे केला .त्याच्याशी हात मिळवल्यावर त्याच्या अंगातली ताकद मलाही जाणवली. त्यानेच स्वत:ची आणि माझी ओळख करुन घेतली. त्या पहिल्याच भेटीत आमच्या आवडीनिवडी बर्‍याचश्या समान असल्याचं कळलं. त्याच्याशी बोलता बोलता दोन-अडीच तास कसे गेले तेच कळल नाही. त्या अडीच तासात त्याने बिल्डींग मधल्या जाणार्‍या प्रत्येक मुलाशी माझी ओळख करुन दिली. त्यातुन जाणवलं की बिल्डींग मधला प्रत्येक मुलगा त्याला किती रिस्पेक्ट देतो ते.जसे जसे दिवस गेले तसे तसे माझ्याही मनातला त्याच्या बद्दलचा रिस्पेक्ट वाढतच गेला. खरंतर त्याच्या माझ्या वयात चांगल ८-९ वर्षांच अंतर होत पण काही दिवसातच आम्हा दोघांमधली मैत्री इतरांपेक्षा जास्तच वाढत गेली. त्याच्या सगळ्यांना मदत करायच्या वृत्तीमुळे बिल्डींग मधल्या मोठया माणसांना सुध्दा त्याचं कौतुक असायच.असा हा आमचा हा ’संकटमोचन’ मित्र, सत्त्याच्या जन्मानंतर मात्र फारच बदलला होता.त्याच्या तोंडात आता सारख सत्त्याचंच नाव असायचं......
मी असा जुन्या आठवणीत रमलो असतानाच सत्त्याचे आबा तिथे आले .वहिनी पण नोकरी करत असल्याने सत्त्याची लहानपणीची देखभाल त्यांनीच केली होती.आबा आणि सत्त्या ही जोडगोळी आमच्या परिसरातल्या सगळ्यांनाच परिचीत होती. आबा देखिल मला त्यांच्या घरचाच मानत असल्याने माझ्याच जवळ येवुन बसले. त्यांचा बापुडवाणा चेहरा पाहुन माझ टेन्शन जास्तच वाढलं. त्यांच्या कडुन पुढे जे कळलं त्यानं मला धक्काच बसला.
" अरे,सत्त्याने विषारी औषध प्यायल असं सगळे म्हणतात रे."
त्यांचा स्वर रडका आणि त्या पेक्षाही जास्त दुखावलेला वाटला.
"नाही आबा, सत्त्या असं कसं करेल. किती शांत आणि मनमिळावू स्वभाव आहे त्याचा."
"होना. मला तेच वाटतं.चुकुन काहीतरी बाहेरचं खाण्यातं आलं असेल रे पोराच्या."
"होना फुड पॉयझनच असेल. दुसरं काय?"
"अरे हळवं आहे पोर.कधी कोणाशी वाद नाही की भांडण."
"जावु दे ना आबा, लोक काहीही बोलतातं झालं."
"त्यात सुनबाई आणि ’हा’ काहीही स्पष्ट सांगत नाहीत."
मी यावर काही बोलणार तोच आबा म्हणाल," किती जपलं या पोराला लहानपणा पासुन. पण शेवटी व्हायच ते झालचं."
या पुढे त्यांच्याशी काय बोलावं ते मला सुचेनाच . त्यात संध्याकाळी घरी आल्या पासुन एका पाठोपाठ बसलेल्या या धक्क्यांनी मी सुन्नच झालं होतो. त्यात ’हा’ अबोल तर वहिनी धावपळीत त्यामुळे नक्की काही कळायला मार्गच नव्हता.
तेव्हड्यात वहिनी मला म्हणाल्या ," अरे आबांना आता घरी घेवुन जा. तुमच्या कडेच ते जेवतील. मिनाला मी सांगितल आहे."
"आणि तुमच्या जेवायचं काय?"
"तुझी बायको मघाशीच बजावुन गेली आहे डबा पाठवते म्हणुन..."
"ठीक आहे. मी आठ पर्यंत डबा घेवुन येतो." 
"तु सावकाश साडे नऊ पर्यंत ये. तुला याच्या बरोबर आज रात्री थांबाव लागेल त्या मुळे त्या तयारीनं ये."
"आता..."
"निघ. कारण आता माणसं आहेत. रात्रीच तुझी गरज आहे."
पण आबा निघायला तयारच नव्हते.मी आणि वहिनींनी कस बसं त्यांना समजावल आणि त्यांना घेवुन घरी आलो.




 


 


 


 




 

 

 
 

४ सप्टें, २०१२

सत्त्याचा ’बाप’

 

भाग-१

नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात -सव्वासात वाजता ऑफ़ीस मधुन घरी आलो. बेल वाजवली तर समोर कुटुंब. मला पहाताच कुटुंब म्हणालं, " बर झाल. आज लवकर घरी आलास."
हे वाक्य कानी पडल आणि मी जरा सावध झालो  .कारण या वाक्याचे त्याच्या सुरांवरुन बरेच अर्थ काढता येतात याचा मला चांगलाच अनुभव आहे. उदारणार्थ, तिला मला काही काम सांगायच असेल तर सुर काहीसा नरमाईचा असतो. सुर आश्चर्याचा असेल तर टवाळ मित्रांबरोबर कुटाळक्या करत कसा बसला नाहीस अस तिला म्हणायच असतं. आणि सुर चढा असेल तर कालच्या सारखी मित्रांबरोबर ढोसत बसला नाहीस वाटत अस तिला म्हणायच असत. पण आजचा सुर काळजीचा वाटला. पण तरीही फार विचार करत न बसता बुट काढायला सुरुवात केली.
तेव्हड्यात कुटुंब म्हणालं, " थांब जरा.बुट एव्हड्यात काढु नकोस.चहा केलाय तो घे". 
मी जरा आश्चर्यच वाटलं. कारण संध्याकाळी घरी आल्यावर मी चहा वैगरे दुसरं काही न घेता सरळ जेवायलाच बसतो हे कुटुंबला चांगलच ठावुन आहे तेव्हा मी यावर काही बोलणार त्याच्या अगोदर चहा समोर आलाच. मग मुकाट्याने चहा प्यायला सुरुवात केली. चहा पिता पिता मी तिच्या कडे प्रश्नार्थक नजरेने बघितल.
ती म्हणाली ," सांगते. पण चहा तर पी."
अस कोणी कोड्यात बोलल की माझ लक्ष हातातल्या कामाकडे लागत नाही .पण समोर साक्षात कुटुंब असल्याने चहा मुकाट्याने संपवण्या शिवाय पर्यायच नव्हता.चहा संपताच तिच म्हणाली, "आता मी जे काय सांगतेय ते जरा शांतपणे ऐकुन घे."
आता मात्र हद्द झाली . मी तिरसटलोच.
" ईतक्या वेळ शांतच बसलो आहे ना? की नाचत बसलोय."
माझ्या असल्या चिडण्याला किती किंमत द्यायची हे तिला अनुभवाने माहित असल्याने ती परत म्हणाली,
" शांतपणे ऐकुन घेणार असशील तर सांगते."
हे वाक्य परत एकदा ऐकल्यावर माझा तिळपापड झाला . पण वांझोट्या चिडण्या मध्ये अर्थच नसल्याने मुग गिळुन बसलो.
" अरे,सत्त्याला सिद्धीविनायक हॉस्पीटल मध्ये अ‍ॅडमीट केलय. सिरीयस आहे."
" काय म्हणतेस. डोक ठिकाणावर आहे ना तुझं?"
" मी दोन तास तिकडेच दवाखान्यातच होते. तुझी ऑफ़ीस मधुन येण्याची वेळ झाली होती म्हणुन १०-१५ मिनीटांन पुर्वीच घरी आलेय."
"काय झाल अचानक."
बातमीचा धक्काच ऐव्हडा होता की मला जास्त बोलताच आलं नाही.
" ते नंतर सावकाश सांगीन. पहीले लवकर हॉस्पीटल मध्ये जा. भाऊजी तुमचीच आठवण काढत होते."
खर तर हे सांगण्याची आवश्यकता नव्हती पण बातमी ऐकुन माझ्याच पायातल बळ नाहीस झाल होत
. कस बस स्वत:ला सावरलं आणि हॉस्पीटलला पोहोचलो.आमच्या बिल्डींग मधली ४-५ रिटायर्ड मंडळी तिथे हॉस्पीटलच्या खाली उभी होती पण धावपळ करायची वेळ आलीच तर त्यांचा काही उपयोग नव्हता........
त्यांनाच विचारल
," कितवा मजला."
" अरे आयसीयु ,तिसरा मजला , माहित नाही का?"
खर म्हणजे सत्त्या सिरीयस आहे हे कळल्यावर तो आयसीयुतच असणार हे मलाही कळत होत पण मनाला वळत नव्हत. हॉस्पीटल ५ मजली असल्याने लिफ्ट आहे. पण स्व:ताला धीर यावा म्हणुन चालत चालत तिसर्‍या मजल्यावर पोहोचलो. तिसर्‍या मजल्यावर पोहोचताच दरवाज्यात पहिल्यांदा वहिनीच भेटल्या. त्याने बर वाटल कारण ’त्या’च्या पेक्षा त्याच जास्त धीराच्या आहेत. मला पाहाताच त्या म्हणाल्या, " जा बाबा, तो तुझीच वाट पाहातोय."
" चला वहिनी ,बरोबरच जाऊया"
" अरे तु जा आत. मी जरा डॉक्टरांना भेटुन येते."
शेवटी ’त्या’ला एकट्यानेच मला समोर जाव लागणार होत हे नक्की झाल. तिसर्‍या मजल्यावर डाव्या बाजुला वळुन आयसीयु समोर पोहोचलॊ. पाहातो तर काय ’तो’ आयसीयु च्या दरवाज्याच्या छोट्या काचेतुन आत बघत उभा होता. खर तर त्या काचेतुन आतल काहीच दिसत नाही. पण तरीही त्या काचेतुन आत बघण्याचा प्रयत्न बहुतेक पेशंटची नातेवाईक मंडळी का करतात याच मला नेहमीच आश्चर्य वाटत. ’त्या’ ला मात्र तिथुन आत बघताना पाहुन मी सुटकेचा निश्वास सोडला . कारण ’त्या’च्या डोळ्याला डोळा देण्या पेक्षा ’त्या’ला पाठमोरा पाहण जास्त सोप वाटत होत. मी सोडलेला सुटकेचा निश्वास ’त्या’च्या पर्यंत पोहोचला की काय कोण जाणे कारण त्याने पटकन मागे वळुन माझ्याकडे पाहीलं. पण ’त्या’ची ती नजर जणु माझ्या पलीकडच आरपार पाहत असल्या सारखी होती. मग मीच त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या खांद्यावर थोपटलं.
" कसा आहे रे सत्त्या"
" ठीक आहे, पण अजुन ४८ तास क्रिटीकल आहेत अस डॉक्टर म्हणाले."
हे वाक्य ’तो’ ईतक्या कोरडेपणान म्हणाला की सत्त्याचा आणि त्याचा जणु काही संबधच नाही. ’तो’ सत्त्या बद्दल खरच एव्हड्या कोरडेपणाने बोलला की मलाच तसं जाणवलं कोण जाणे.त्याचा कोरडॆपणा पाहुन आता मात्र मला पुढे काय म्हणायच तेच सुचेना. कारण ज्याला धीर द्यायला मी आलो होतो ’तो’ तर या सर्वांशी ’त्या"चा काही एक संबंधच नाही असा निर्वीकार चेहरा करुन बसला होता. अशीच पुढची ४-५ मिनीटं असाह्य शांततेत गेली. मग त्यातुन कोंडी फुटावी म्हणुन मीच विचारलं,
" काही आणायच वैगरे आहे का ?"
" काही नाही.डॉक्टर आणि ही सगळ बघत आहेत.तु ऑफीस मधुन येवुन दमला असशील ना?.बस आराम कर."
काहीतरी खटकत होत ’त्या’च्या वागण्यातल, पण नक्की काय तेच समजत नव्हत.आणि सालं आयसीयुच्या बाहेरची बाकडी काय आराम करत बसण्या साठी असतात. पण बोलण्यात जास्त अर्थ नव्हता.बसलो बाकड्यावर. ’तो’ स्वत: मात्र परत आयसीयुच्या काचेतुन आत बघत उभा राहीला.यातुन माझी सुटका करण्यासाठीच की काय जणु, वहिनी तेव्हड्यात तिथे आल्या.
" काय रे. तुझ्याशी तरी हा बाबा बोलला का?"
" बोलला ना. आराम कर म्हणाला."
" चिडु नकोस. ’त्या’ला आत्ता काय वाटत असेल याची कल्पना आहे ना?"
" नाही ग वहिनी. कसा चिडेन त्याच्यावर. तो ही सत्त्या ...... "
वहिनी सत्त्याची आई आहे हे का लक्षात आल्याने पुढचे शब्द गिळुन टाकले.
" मला वाटल होत तुझ्याशी तरी बोलेल"
म्हणजे ’हा’ माझी आठवण काढत होता ही आमच्या कुटूंबाचीच थाप वाटत.माझ्या मनातले विचार जाणुन वहिनीच बोलल्या,
" अरे मीच तिला तुला तस सांगायला सांगीतल. हा बाबा तर दगडच होवुन बसलाय म्हटल तुझ्याशी बोलुन मोकळा होईल"
" नक्कीच होईल वहिनी. ’त्या’च्या कडे मी बघतो तु सत्त्याकडे बघ."
" मला ही खात्री होतीच."
वहिनी अश्या वेळी सुध्दा किती ठामपणे वागतेय.खर तर वहिनीच अस वागण हा माझ्या बायकोचा कौतुकाचा विषय तर माझा आदर्श हा ........
 
 
 


 


 

 

 

 


 


 
 
 

 





 

 










 


 
 

 



 


 


 

१५ ऑग, २०१२

कथा एका सरसेनापतीची


सेवानिवृत्त जनरल के.व्ही. कृष्णराव यांच्या "इन द सर्व्हीस ऑफ नेशन-रेमिनीसेन्सेस" या आत्मचरित्राचा सौ.विदुला कुलकर्णी यांनी केलेला "कथा एका सरसेनापतीची" हा मराठी अनुवाद नुकताच वाचण्यात आला. ईंग्रजी मधले मुळ पुस्तक पेंग्वीन बुक्स ने प्रकाशीत केले असुन मराठी अनुवाद चिनार पब्लिशर्स,पुणे यांनी प्रकाशीत केला आहे. अनुवादीका सौ.कुलकर्णी आणि प्रकाशक चिनार पब्लिशर्स यांचे हे सुंदर पुस्तक मराठीत अनुवादीत करुन प्रकाशीत केल्या बद्दल निश्चितच आभार मानायला हवेत.
हे पुस्तक वाचुन झाल्यावर अनुवादीका सौ.कुलकर्णी त्यांच्या मनोगतात म्हणतात ते पटतं. त्या म्हणतात,सेवानिवृत्त जनरल के.व्ही. कृष्णराव यांचे, "इन द सर्व्हीस ऑफ नेशन-रेमिनीसेन्सेस" हे निव्वळ आत्मचरित्र नसुन भारतीय लष्कराचा इतिहास आहे. श्री.कृष्णराव हे ४१ वर्ष लष्करात विविध पदांवर सेवा करुन शेवटी लष्कर प्रमुख म्हणुन निवृत्त झाले. त्या नंतर त्यांनी ईशान्येकडील नागालॅंड, मणिपुर आणि त्रिपुरा व वायव्येकडील सतत अशांत असलेल्या जम्मु-काश्मिर या राज्यांचे राज्यपाल म्ह्णुन एकंदरीत १० वर्षे काम केले आहे. याच भागांमध्ये प्रथमत: लष्करी सेवा व सेवानिवृत्ती नंतर राज्यपाल म्हणुन प्रशासकीय सेवा करताना आलेल्या अनुभवांचा त्यांनी मांडलेला लेखाजोखा म्हणजेच हे पुस्तक. या पुस्तकातुन भारताच्या स्वातंत्रोत्तर काळात लष्करा समोर आलेल्या व भविष्यात येणार्‍या आव्हानांची कल्पना येते. तसेच या आव्हानांना समर्थपणे सामोरे जावुन देश रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करुन करणार्‍या जवानां विषयी कृतज्ञतेची भावना निर्माण होते.
अश्या या पुस्तकाचा आवाका थोडक्यात मांडणे शक्य नाही कारण मुळातच श्री.कृष्णराव यांनी त्यांचे ५१ वर्षांचे अनुभव मांडताना कुठेही अनावश्यक माहिती देण्याचा वा स्वसमर्थानाचा मुळीच प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे या पुस्तकाच्या परिचयातुन एका सरसेनापतीचा अनुभव संपन्न दृष्टिकोन कळुन यावा इतकाच भाग मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
पुस्तकाची सुरुवात होते ती सन १९७१ मधिल ढाका येथील पाकीस्तानी सैन्याच्या शरणागतीच्या प्रसंगाने. या प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी जनरल श्री. कृष्णराव यांना मिळाली होती. त्या प्रसंगा बद्दल निवृत्त सरसेनापती म्हणतात," माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय प्रसंग कोणता?अशी विचारणा नेहमी केली जाते. लष्करप्रमुख म्ह्णुन बढती मिळाली तो क्षण? की राज्यपाल म्ह्णुन नियुक्ती झाली तो क्षण? की........". आणि त्याला माझे उत्तर एकच आहे, ते म्हणजे," ढाका येथील पाकीस्तानी सैन्याच्या शरणागतीच्या प्रसंगातील माझी उपस्थिती." त्यांच्या या विचारा वरुन एका सच्च्या देशभक्ताचा व सरसेनापतीचा दृष्टिकोन व पीळ कसा असतो याची कल्पना येते. यातुन वैयक्तीक प्रगती वा आनंद याला देशाच्या हितापुढे किंमत नसते हे सहजपणे आपल्याही मनाला कुठेतरी जाणवुन जातं.
अश्या सेवानिवृत्त सरसेनापतीचे, ज्या लष्करात त्यांनी ४१ वर्षे सेवा केली त्या लष्करा विषयीचे विचार आजही तेव्हढेच महत्वाचे आहेत. ते म्हणतात:
जो देश सामर्थवान असतो त्याच देशा विषयी इतर देशातील लोकांच्या मनात, मग ते लष्करीतील असोत वा सर्वसामान्य नागरिक, आदर असतो. हे सामर्थ्य प्रथम देशाच्या आण्विक ( अर्थातच लष्करी) क्षमतेवरुन नंतर आर्थिक ताकदी वरुन आणि त्या नंतर ईतर गुणवत्तेवरुन ओळखले जाते. आपल्या देशाचे लष्कर हे प्रामुख्याने बचावासाठी ठेवलेले आहे. तथापि युध्द लादले गेलेच तर ते जिंकण्याचे लष्कराचे ध्येय असले पाहीजे आणि लष्कराच्या सर्व कामांचे उद्दीष्ट हेच असायला हवे. तसेच लष्कराने दिलेल्या वेळेत कमितकमी हानी होईल अश्या रितीने त्याचे उद्दिष्ट साध्य करायला हवे.त्यासाठी उत्तम दर्जाची युध्दसज्जता. सतर्कता, कठोर आणि व्यावहारीक प्रशिक्षण, सक्षम प्रशासन आणि अतुलनीय मनोबल याचा अंगिकार लष्कराने करायला हवा.केवळ बचाव करण्याने युध्द जिंकली जात नाहीत, त्यासाठी आवश्यक आक्रमक क्षमताही लागते. त्यामुळे लष्करी अधिकार्‍यांच्या व्यवस्थापनात महत्वाचा मुद्दा असायला तो युद्धात विजय मिळवुन देईल असे नेतृत्व विकसीत करण्याचा. लष्कराची गरजच अशी आहे की कमांडमध्ये अथवा प्रशासकीय विभागात महत्वाच्या निर्णयक्षम नेमणुका करताना त्या अधिकार्‍याचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष युध्दात भाग घेतल्याचा अनुभव लक्षात घ्यावा लागतो.
युद्धात विजय मिळवुन देईल असे नेतृत्व गुण भारतीय लष्करातील अधिकार्‍यांनी कश्या प्रकारे बाळगले पाहीजेत या विषयी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय लष्कर अकादमीतील पासिंग आऊट परेडच्या वेळी सरसेनापती म्हणुन मार्गदर्शन करताना श्री, कृष्णराव म्हणाले होते," अत्यंत कठीण प्रदेशात पुर्णपणे बिघडलेल्या हवामानात तुम्हाला युध्द करण्याची वेळ येईल. त्यावेळी कदाचित शत्रु तुम्हाला भारी पडला असेल.तुमच्या सैन्याची जीवीत आणि इतर हानी झाली असेल, तुमच्याकडे साधनांची कमतरता असेल.अगदी तुमच्या मुख्यालयाशी तुमचा संपर्क तुटला असेल आणि तुम्हाला कुठूनही मार्गदर्शन आणि पाठींबा मिळण्याची शक्यता नसेल आणि सगळीकडुन तुमच्यावर संकटांचे पहाड कोसळत असतील . अश्या आकस्मीक परिस्थितीतच एक लष्करी नेता म्हणून उभे राहुन आपल्या कमांडचे योग्य नेतृत्व करण्याची क्षमता तुम्ही मिळवायला हावी. आपल्या सैनिकांनी कठीणातल्या कठीण परिस्थितीत आपले कौशल्य सिध्द केले आहे..आपले अधिकारीही अशा परिस्थितीत नेतृत्वाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. याच साठी तुम्ही उच्च प्रतीची क्षमता अंगी बाळगली पाहीजे.स्वच्छ चरित्र, धैर्यशिलता,पुढाकार आणि निश्चयीपणा, नि:पक्षपातीपणा हे गुण तुमच्यात विकसीत व्हायला हवेत,ज्या योगे तुम्ही एक आदर्श निर्माण करु शकाल.". या विचारांवरुन लष्करात कोणत्या दर्जाच्या नेतृत्व गुणांची आवश्यकता असते आणि आपल्या लष्कराचा दर्जा एव्हडा चांगला का याची कल्पना येते.
बर्‍याच वेळा आपले राजकीय नेते अनावश्यक व बेजाबदार सल्ले लष्कराला देत असतात. त्या विषयी ते म्हणतात," राजकीय नेते विसरतात की. सैनिक आपले कर्तव्य बजावत असताना त्याच्या वरिष्ठांच्या आदेशांचे तंतोतंत पालन करत असतो. तेव्हा दिलेला आदेश वैध की अवैध हे तो सैनिक कसे ठरवु शकेल याचा विचार राजकीय नेत्यांनी करायला हवा. जवानाला मिळालेल्या आदेशाचे त्याने तंतोतंत पालन करणे अपेक्षित असते. तेव्हा लष्कराची शिस्त आणि निष्ठा या बाबत हस्तक्षेप करताना राजकीय नेत्यांनी अतिशय सावधगीरि बाळगायला हवी, अन्यथा राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येवु शकते."
राजकीय नेत्यां सारखेच देशातील तथाकथीत विचारवंत व बुध्दीवंत भारताच्या परराष्ट्र विषयक आणि अंतर्गत समस्यां (परराष्ट्रांच्या मदतीने- विशेषत: पाकिस्तान व चिन- होणार्‍या अतिरेक्य़ांच्या कारवाया ईत्यादी ) विषयी देशात अनाठाई चर्चा करत असतात. या बाबत श्री. कृष्णराव म्हणतात," या बाबत होणार्‍या चर्चेने आम्ही चकीत खरे तर निराश होत असु. देशातील हे काही घटक भारत युध्दासाठी हपापलेला आहे आहे पाकिस्तानला खर्‍या अर्थाने शांतता हवी आहे असा उलटा प्रचार करत. त्यांच्या मते झिया-उल-हक भारता बरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, पण भारत त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत नाही.सध्याच्या नियंत्रण रेषेला सिमा मानुन किंवा काही भाग सोडुन काश्मिर प्रश्न निकालात काढावा . भारताने पाकिस्तानला विश्वास देण्यासाठी आपले सैन्य कमी करावे, भारताने थोरल्या भावाच्या भुमिकेतुन पाकिस्तानला अनेक सवलती द्याव्यात वैगरे वैगरे त्यांचे विचार होते.आपल्या घटनेत जम्मु-काश्मिरचे स्थान , राज्याच्या विधानसभेने भारतात सामिल होवुन आपण देशाचा अविभाज्य घटक आहोत असे जाहीर करणारा केलेला ठराव,आम्हाला करावी लागलेली ३ युध्दे, काश्मिरची सुरक्षितता राखताना आमच्या जवानांनी ,हजारो लोकांनी केलेले बलिदान, विविध करारांचा पाकिस्तानने केलेला भंग .याशिवाय त्याचा सातत्याचा संघर्षाचा पवित्रा,लष्कराची उभारणी आणि भारताच्या अंतर्गत कारभारातील ढवळाढवळ या सर्व बाबींकडे हे घटक कोणत्या भावनेने दुर्लक्ष करत होते कोण जाणे!.त्याचप्रमाणे चीन संदर्भातही या घटकांचा उलटा प्रसार सुरु होता. १९६२ मधिल सीमेबद्दल झालेले युध्द चीनने नव्हे तर भारताने सुरु केले होते असा जावई शोध या लोकांनी लावला.ज्या भागांवर चीनने ताबा मिळवला आहे,ते भाग भारताचे नव्हतेच मुळी.भारत कधिही चीनच्या सामर्थ्याची बरोबरी करु शकणार नाही आणि त्या भागांचे रक्षणही करु शकणार नाही. चीनने ताब्यात घेतलेले भाग परत घेणे तर सोडाच पण भारताने त्या भागांवर दावा देखिल करु नये आणि चीन बरोबर मुकाट्याने संबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, वाढवलेले संरक्षण विषयक अंदाजपत्रक कमी करावे आणि लष्करावर होणारा खर्च विकास कामांवर खर्च करावा असे या मंडळींचे म्हणणे होते.ईथेही या लोकांना काही गोष्टींची जाणिव नव्हती. ती म्हणजे, दोन्ही बाजुंच्या अधिकृत अहवालातुन स्पष्ट झाले होते की वादग्रस्त प्रदेश भारताचेच होते. चीननेच भारतावर हल्ला केला होता.आपल्या प्रदेशांचे रक्षण करण्यासाठीच भारतीय लष्कर पुढे गेले होते. या साठी आपल्या अनेक जवानांनी जीव गमावले.भारताने चीन बरोवर संबंध सुधारण्याचा नेहमीच प्रयत्न केला पण चीनच्या ताठरपणा मुळे हे शक्य झाले नाही. भारताच्या संसदेने " भारताच्या पवित्र भुमिवरुन हल्लेखोर्‍यास परतावुन लावा." असा ठराव मंजुर केला होता ज्यास अनुसरुन सैन्य लढले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्यासाठी संरक्षण व्यवस्था जतन केली नसती, विकसीत केली नसती तर बचत केलेल्या पैशातुन विकास करण्याजोगे देशात काही शिल्लक उरले नसते हे त्यांनी लक्षातच घेतले नव्हते. समाजातील अश्या जबाबदार व्यक्तींनी केलेल्या अश्या प्रकारच्या बेजाबदार विधानांमुळे लष्करात गोंधळ उडु शकतो आणि त्याचा विपरीत परीणाम जवानांच्या लढाऊ वृत्तीवर होऊ शकतो. विशेषत: ज्या भुमीच्या मालकी विषयी आपलेच लोक शंका उपस्थित करत असतील त्या बाबतीत जवानांचा आत्मविश्वास डळमळणारच."
माजी सरसेनापतींचे हे विचार आजच्या परिस्थितही गैरलागु झालेले नाहीत. आजही काही जण पाकिस्तान बाबत, ज्या राष्ट्राने भारताविरुध्द दोनदा उघड युध्द छेडले आणि अतिरेक्यांना छुपी मदत करुन देशात बॉंबस्फोट घडवुन आणले त्याचा बाबत, " अमन की आशा" या प्रकारच्या मोहिमा हाती घेत आहेत.
काश्मिर प्रश्नाबाबतचे त्यांचे विचार कोणाही देशप्रेमी माणसाला पटण्या सारखे आहेत. ते म्हणतात, " जागतिक स्तरावर आपण काश्मिरबाबत ठाम धोरण जाहीर करायला हवे. काश्मिर संदर्भात पाकिस्तानचा संबंध केवळ त्याच्या अनधिकृत ताब्यात असलेल्या काश्मिरी भूभागाविषयीच येतो आणि तो भुभाग परत मिळवण्यासाठी भारताने पाकशी चर्चा करावी.भारतिय काश्मिरमध्ये लुडबुड करण्याचे त्या देशाला काही कारण नाही अशी आपली भुमिका असायला हवी. याशिवाय पाकच्या ताब्यात असलेला प्रदेश हा जम्मु-काश्मिरच्या घटनेनुसार राज्याचाच भाग आहे आणि भारत तो भाग सोडुन देणार नाही याची खात्री राज्याच्या लोकांना पटवायला हवी. याच बाबत अतिरेक्यां बरोबर चर्चा करावी असा सुर अनेकदा उमटत असतो. काश्मिरातल्या अतिरेक्यांचा संबंध राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही. त्यांच्या सगळ्या नाड्या पाकिस्तानच्या हातात आहेत. पाकिस्तान कडुन नियंत्रीत असलेया अतिरेक्यांशी कसली चर्चा करणार?. घटनेच्या चौकटीबाहेर राहून केलेली कोणतीही तडजोड देशाच्या ऎक्याला बाधक ठरेल. शिवाय अतिरेकी जेव्हा मजबुत स्थितीत असतात त्या वेळी त्यांच्या बरोबर चर्चाच होवु शकत नाही असाच आजवरचा अनुभव आहे."
देशाच्या अंतर्गत असलेली अस्वस्थता व असंतोष दुर करण्या विषयी ते म्हणतात, " विकासासाठी शांततेची गरज आहे आणि शांतता प्रस्थापीत करायची तर स्थैर्य आवश्यक आहे. देशांतर्गत असंतोष व बंडखोरी समुळ नष्ट करण्यासाठी केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजीक आघाड्यांवर तोडगा काढणे निकडीचे असते. या बाबतचे निर्णय घेतल्या नंतर त्याची अंमलबजावणी होण्यात दिरंगाईमुळे असंतोषाचा, दहशतवादाचा वारंवार भडका उडतो. त्याच प्रमाणे सर्वच असंतुष्ट गटांना चर्चेमध्ये सगभागी करुन घेतले नाही तर चर्चेचे गुर्‍हाळ कधी संपणार नाही.या बाबत गरज असते ते ती उदारमतवादी दृष्टिकोनाची, कराराची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होण्याची आणि परिस्थिती सुरळीत करणार्‍या योजनांची आणि त्या परिसराच्या विकासाला चालना देण्याची."
एका निवृत्त सरसेनापतींचे वर मांडलेले हे सर्व विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. आपण आपला स्वातंत्रदिन आज साजरा करीत आहोत. अश्या वेळी निवृत्त सरसेनापती श्री. कृष्णराव यांच्या सारखा विचार करणार्‍यांची आज देशाला गरज आहे असे वाटल्यानेच या पुस्तकाचा परिचय करुन देण्याचा हा अल्प प्रयत्न. खरतर हे पुस्तक सगळ्यांनी वाचाव अशी माझी विनंती आहे कारण या पुस्तकात मांडलेले अनुभव संपन्न विचार आजच्या परिस्थितीत अंमलात आणण्या सारखे आहेत.
या पुस्तकामध्ये युध्दभुमीवर वीरमरण आलेल्या सैनिकांच मनोगत व्यक्त करणार्‍या काही ओळी दिलेल्या आहेत.कोहीमा आणि इम्फाळमध्ये युध्दात वीरमरण आलेल्या जवानांच्या दफनभुमी आहेत. कोहीमात दोस्त राष्ट्रांनी जपानचा पराभव केल्यानं संपुर्ण युध्दाचं चित्रच पालटलं. या युध्दात अनेक भारतीय जवान कामात आले. कोहीमातल्या दफनभुमीतील एका कबरीवर कोरलेल्या काव्यपंक्ती सार्‍या जगाचे लक्ष वेधुन घेतात........
जेव्हा जाल परतुनी घरा
आणि सांगा त्यांना आमच्याबद्दल
आणि सांगा,
तुमच्या उद्यासाठी
त्यांनी त्यागिला त्यांचा आज......
किती समर्पक आहेत या काव्यपंक्ती. पण ही वस्तुस्थिती आहे की, भारताच्या ज्या अनेक सैनिकांनी देशासाठी प्राण दिले वा जे सैनिक आजही देशाच्या सिमेच अहोरात्र रक्षण करीत आहेत अश्या सैनिकांची आठवण फक्त युध्दाच्या वेळीच होते. सैनिकांच्या त्यागामुळेच आपण आपले सर्वसामान्य जिवन शांततेने जगत आहोत. तेव्हा अश्या सैनिकां बद्द्ल शांततेच्या काळात असलेल्या राजकीय व सामाजीक उदासिनतेची खंत एका सेनापतीला नसेल तर कोणाला असेल. हीच खंत निवृत्त सरसेनापती श्री.कृष्णराव यांनी फ्रान्सीस क्वारल्सच्या खालील चार ओळीं मधुन व्यक्त केली आहे :
आमचा ईश्वर आणि सैनिक दोघांवरही आमची भक्ती आहे
मात्र धोक्याच्या जागी कड्यावर असताना,आधी नाही.
सुटका झाल्यानंतर दोघांची परतफेड सारखीच होते,
परमेश्वराचे विस्मरण होते आणि सैनिक तुच्छ होतात!
खर आहे ना?
 

२९ जाने, २०१२

(३)समिरा

गाडी ड्राईव्ह करताना मी शक्यतोवर फोन उचलत नाही. पण जयचा फोन ,अन तो ही सकाळी सकाळी आल्याने उचललां. खर म्हणजे मी गेला आठवडाभर जयला आज फ़ोन करु उद्या करु असा विचार करत होते. पण ते राहुनच गेलं होतं...
"हॅलो "
"हॅलो, मी बोलतोय".
मी कार ड्राईव्ह करत असल्याने त्याच्याशी जास्त बोलू शकले नाही.पण जय खुप डिस्टर्ब होता हे मला नक्कीच जाणवल होतं. मी बोलण थोडक्यात आवरल्याने जय रागावलेला दिसला. पण आत्त्ता या क्षणि काहीच करता येंण मला शक्य नव्हत. नाईलाज होता. खुप विचार करुन मग श्यामलला फ़ोन लावला. तिने जयला फ़ोन करायच कबुल केल्यान थोड बर वाटल.
ऑफ़ीसला पोहोचल्यावर जयला फ़ोन करण्याचा खुप प्रयत्न केला पण फ़ोन त्याने उचलला नाहीच.नंतर मात्र कामाच्या गडबडीत जयचा फ़ोन आला होता हे मी पार विसरुनच गेले. लंच मध्ये श्यामलचा फ़ोन आला आणि जय तिला संध्याकाळी भेटणार आहे असे तिने सांगीतलं. तेव्हा आपण जयला फ़ोन करायला विसरलो याची प्रकषाने पुन्हा एकदा जाणीव झाली.पण आत्ता एव्हड्या उशीरा फ़ोन केला तर तो जास्तच उखडला असता कारण त्याचा हळवा स्वभाव.मला त्याच्या या हळवेपणाच नेहमीच खुप आश्चर्य वाटायच. एखादा पुरुष खरचं इतका हळवा असु शकतो ?.
जयचा विचार करता करता मन एकदम ६ वर्ष मागे गेलं.कॉलेजचे मस्तीचे दिवस आठवले.कित्ती छान दिवस होते ते. कॉलेज मधला आमचा ग्रुप फ़ेमस होता. ग्रुप मधल्या आम्हा सगळ्यांचे स्वभाव इतके वेगवेगळे असुनही आम्ही नेहमीच एकत्र असायचो. मी आणि सनी कॉन्वेंट पासूनच एकत्र असलो तरी श्यामल , अवि, सिनीयर आणि जय यांची ओळख कॉलेज मध्ये आल्यानंतर झाली. त्यातचं माझ्या व सनीचे घरचे हायफ़ाय वातावरण व कॉन्वेंट मधले शिक्षण या मुळे इतर मुलांना आम्ही वेगळेच वाटत होतो. ग्रुप मधले अवि, सिनीयर आणि जय, आम्हा तिघा - मी, सनी आणि श्यामल- पेक्षा - एक वर्षाने पुढे होते. आजच्या सारख्या त्या वेळी इंजिनीयरींला मुली जास्त येत नसत.त्यामुळे असलेल्या थोड्या मुलींच्या मागे सर्वच मुलं आसण सहजीकच होत. पण माझ्या व श्यामलच्या मागे लागायच धाड्स इतर मुलांना होत नव्हत कारण सगळीच मुलं सिनीयरला टरकुन हॊती. सिनीयर अगदी रफ़ टफ़ तर जय मनस्वी व हळवा. दोघांचे स्वभाव अगदीच विरुध्द टोकाचे असुनही सिनीयर आणि जय यांची जिवलग मैत्री होती. त्यामुळॆ त्या दोघांच्या दोस्तीची आश्चर्य सगळ्यानाच, अगदी मलाही, वाटायचं. आमच्या ग्रुप मधला अवि हा बड्या बापाचा बेटा, तर श्यामल ही टीपीकल मध्यमवर्गीय घरातली. त्यामुळे आमचा ग्रुप म्हणजे इतरांना कोडच होत.
कॉलेजचा पहिला दिवस मला आजही चांगलाच आठवतोय .मी आणि सनी बरोबरच गेलॊ हॊतो. माझ्यावर खिळलेल्या मुलांच्या नजरा मला जाणवत होत्या. पण त्यांचा त्रास होण्या ऎवजी गंमतच वाटत होती. माझ्यावर खिळलेल्या नजरांन मुळे सनी मात्र जरा अस्वस्थच होता.कदाचीत येव्हड्या सर्व नजरां पासून आपल्या बाल मैत्रीणीचा कसा बचाव कराव याच त्याला दडपण आल असाव.
मी मात्र नजरांचा कुर्नीसात झेलत झेलत शांतपणे राणी सारख चालत होते.अचानक पणे माझी नजर कॅन्टीन मधे बसलेल्या एकाकडे गेली. तो माझ्याकडेच पाहात होता पण ती नजर काहीशी वेगळी होती. डोळ्यां मधे आरपार डोकवू पाहाणारी ती नजर ............
कशीबशी त्याच्या नजरेतून माझी नजर वेगळी करतच होते.... तेव्हड्यात
" अरे ए जय, कडक बघीतलीस का?".
त्याच्याच समोरचा दाढीवाला तरुण माझ्याकडे बघत म्हणाला.कोणी रोखुन बघीतल तरी मला संताप येत नसे पण कॉमेन्ट्स केलेल्या मात्र मुळीच आवडत नव्हतं.त्यामुळे माझ अस कड्कडीत स्वागत कोण करतय ते तरी बघुया म्हणुन मी त्या दोघांकडे कडे माझी पाउले वळवली.
"जावू दे समिरा, सिनीयर्स आहेत ते "
सनी माझ्या मागुन येत म्हणाला.मी मात्र तशीच पुढे गेले. 
"सिनीयर्स आहेत म्हणुन काय झालं. हु केयर्स?".
त्यांच्या जवळ जावून मी रागान काहीतरी बोलणार तेव्हड्यात माझी नजर परत त्याच्या कडे गेली.त्या नजरेत काय होत काय जाणे पण जे बोलायच मनात होत ते जमलच नाही. कसाबसा संताप आवरत मी दाढीवाल्याला विचारलं.
"काही म्हणालात का आपण?".
त्या दोघांनाही मी अस काही सरळच विचारेन याची कल्पना नव्हती.त्यामुळे दोघही प्रचंड गोंधळले होते. त्यांच्या चेहय्रावरचे ते भाव पाहुन मला हसुच आल. त्यांना अजुन एक धक्का द्यावा म्हणुन त्या दाढीवाल्या समोर हात पुढे करत मी म्हणाले," हाय सिनीयर, मी समिरा."
"मी सिनीयर ,सॉरी सत्यजित". स्व:ताला कसाबसा सावरत दाढीवाला म्हणाला.
त्याला तसच सोडुन मी ’त्या’च्याकडे वळले आणि म्हणाले," हाय हॅण्ड्सम".
धक्का तर त्या दोघांनाही बसलाच पण मलाही बसला होताच की.एखाद्या मुलाला पहिल्याच भेटीत ’हॅण्ड्सम’ म्हणण माझ्या साठी पण टु मच होत.
स्वत:ला कसबस सावरत तो म्हणाला," हाय.मी अजय,पण मला तु जय म्हणालीस तर जास्त आवडेल."
त्यानंतर प्रसंगा नंतर मात्र आश्चर्यकारक गतीने आमची मैत्री वाढतच गेली..........
खरतर या जुन्या आठवणीत मी पार गुंतुनच गेले होते पण फोनच्या रींगने परत भानावर आले. क्लायंटचा फोन असल्याने त्याच्याशी बोलण्यात बाकी मग सर्व विसरुन गेले.