२९ जून, २०१०

आम्ही वीजग्रस्त

                                                                  आम्ही वीजग्रस्त
    नेमिच येतो पावसाळा त्या प्रमाणे एप्रील महिना येताच वर्तमानपत्रात वीज टंचाईच्या व अपुर्‍या पाणी साठयाच्या बातम्या येवू लागतात. या वर्षी देखिल वेगळ काही घडल नाही. बातम्या आल्या आणि त्या पाठोपाठ डोंबीवली मधल्या " लोडशेडींग"च टाईमटेबल जाहिर झाल. लोडशेडींग मुळे पाठोपाठ उपस्थीत होणारा पाण्याचा प्रश्न डोळ्या पुढे उभा राहीला आणि डोळ्यात पाणीच आलं. चष्मा काढला आणि डोळ्यातल पाणी पुसू लागलो.पाण्याने भरलेल्या माझ्या धुरकट डोळ्यांपुढे ते जुने दिवस उभे राहिले.
    मार्च १९८४ मध्ये आम्ही डोंबीवली मध्ये राहायला आलो. त्या पुर्वी  डोंबीवली बद्दल विषेश अशी माहिती नव्हती. खर सांगायच तर काहीच नव्हती कारण वडील त्यांच्या रेल्वेतल्या नोकरी निमित्याने सतत मुंबई बाहेरच होते. पण वडीलांच्या सेवानिवृत्तीची वर्षे जवळ येउ लागल्याने तसच  दोघा भावांचे भवितव्य लक्षात घेउन व आमचे सर्वच नातेवाईक मुंबईत स्थायीक असल्याने त्यांनी मुंबईत स्थायीक होण्याचा निर्णय घेतला.मग सुरु झाली जागा शोधण्याची धडपड.बाबांच्या बजेट मध्ये बसणारी व रेल्वे स्टेशन जवळ असलेली जागा डोंबीवलीत आहे अस त्यांना त्यांच्या डोंबीवलीत पुर्वी पासुन स्थायीक असलेल्या मित्राकडुन  कळालं.  जागा स्टेशन जवळ आहे हे समजल्यावर मनातुन ती घेण्याच निश्चित करुनच आम्ही जागा बघायला गेलो. आणि अश्या रितीने आम्ही डोंबीवलीकर झालो.  
    नविन जागा व शेजारी पाजारी दोघेही चांगले होते. आजुबाजुची सगळीच कुटुंब मध्यमवर्गीय असल्याने ब्लॉक असले तरी चाळीतल्या सारखे सगळ्यांचे दरवाजे सताड उघडे असायचे. त्या मुळे आम्ही लवकरच नविन जागेत रुळलो. पण म्हणतात ना काही गोष्टी राहायला आल्यावरच कळतात. जागा घेताना बिल्डरच्या माणसाने चोवीस तास नळाला पाणी असल्याच सांगीतल होत. नुसतच सांगीतलच होत नव्हे तर आम्ही ब्लॉक बघत असताना त्याने नळ सोडून त्याला पाणी येत असलेल दाखवलेल देखिल होत.नंतर कळल की जो ब्लॉक दाखवायचा असेल त्या विंगच पाणी बिल्डरचा माणुस अगोदरच जावुन सोडायचा जेणेकरुन खरेदी करणार्‍याला चोवीस तास नळाला पाणी असल्या्ची खात्री पटायची.
     डोंबिवलीला राहायला येवुन १०-१५ दिवस झाले होते. तोच वर्तमानपत्रात बातमी आली ती दर शुक्रवारच्या लोडशेडींगची. या लोडशेडींगच गांभिर्य सुरुवातीला लक्षात आल नाही. पण शहरांमध्ये इमारती बहूमजली असल्याने वरच्या टाक्यांमध्ये पाणी पोहचवण्या साठी पंप ही आवश्यक गोष्ट असते आणि त्या साठी वीज लागते.यथावकाश शुक्रवार आला, त्या दिवशी महानगर पालिकेतून पाणी येण्याच्या वेळेसच ५ ते ६ तास वीज नसल्याने पाणी येवुनही  वरच्या टाकीत  ते पंपाद्वारे चढवता आल नाही. शनिवारी सकाळी सकाळी सेक्रेटरी काकांनी ही आनंदाची बातमी बिल्डींग मधल्या सर्वांना सांगीतली आणि पाणी हवेच असेल तर तळमजल्या वरच्या टाकीत शिल्लक असलेल्या थोड्याश्या पाण्यातून  भराव लागेल याची कल्पना दिली.
    मग काय त्यानंतर आठवड्यातल्या प्रत्येक शनिवारी तळमजल्यातल्या टाकीतून बादलीमध्ये पाणी भरायच आणि ते दुसर्‍या मजल्या वरील आमच्या ब्लॉकमध्ये नेणं हा छान व्यायाम सुरु झाला. पाणी भरायच हे कष्टाच काम बहुतेक घ्ररातून तरुण मुलां-मुलींवर सोपवण्यात आल होत.त्यामुळे शनिवारची सकाळ म्हणजे बिल्डींग मधल्या तरुण मंडळींचा "पाणीकट्टा"च झाला होता. याचा परिणाम म्हणजे सुरुवातीला पाणी भरायला कुरकुर करणारी ही मंडळी हळूहळू शनिवार सकाळची आतुरतेने वाट पाहू लागली. का म्हणून काय विचारता?. अहो पाणी भरण्याच्या निमित्त्याने तरुणांना  बिल्डींग मधल्या तरुणींना भेटण्याच-बोलण्याच एक हक्काच ठिकाण मिळल होत ना .त्यातच पाणी भरता भरता एखादीचा  पडणारा प्रेमळ  तिरपा कटाक्ष पाणी भरण्याचे सगळे सगळे कष्ट विसरायला लावत होता. मग तिच्या छोट्या छोट्या बादलीत पाणी भरुन देण आणी सहज म्हणता म्हणता तिला घरा पर्यंत पाणी न्यायला मदत करण माझ्या काही मित्रांच्या इतक्या सहजपणे अंगवळणी पडल की ते त्यांच्याही लक्षात आल नाही. अर्थात त्यांच्या भले हे लक्षात आल नसेल पण इतरांच्या चांगलच लक्षात  आल होत. त्यातुन कोण कोणाला पाणी भराय़ला मदत करतोय हे शोधण्याचा  एक नविन छंद इतरांना लागला होता.
    बघा ना लोडशेडींगचा मुळ प्रश्न. त्यामुळे निर्माण पाण्याचा उपप्रश्न या मुळे अनेक चांगल्या गोष्टी कळत नकळत घडू लागल्य़ा होत्या.या मुळेच तर तरुण मंडळी चक्क सकाळी लवकर उठू लागली होती. इतर वेळी घरातल्यांना वेळ नाही अस सांगणारी हीच मंडळी पाणी भरण्या साठी मात्र त्यांचा महत्वाचा वेळ काढू लागली होती.यातुनच शेजार्‍यापाजार्‍यांना मदत करण्याची व त्यांच्यावर प्रेम करण्याची भावना निर्माण होऊ लागली होती .तसच समाजात घडणार्‍या घटनांकडे डोळस पणे पाहाण्याची शोधक दृष्टी देखिल निर्माण झाली होती. पाणी भरण्यातुन निर्माण झालेले हे नविन स्नेहसबंध अधिक वाढावेत या साठी बिल्डींग मध्ये नवरात्रोत्सव साजरा करुया अस सर्व तरुण मंडळींनी ठरवल. त्या प्रमाणे नवरात्रोत्सव साजरा होऊ लागला.त्यातुन तरुणां मध्ये धार्मिक भावना जागृत  झाली. तसच गरबा खेळण्यामूळे व्यायाम होऊन त्यांच्या अंगी लवचीकता आली. बघा बघा किती सकारात्मक गोष्टी या लोडशेडींग मुळे झाल्या होत्या. त्या मुळे या लोडशेडींगचे किमान तरुणांनी तरी आभार मानले पाहीजेत नाही का?
    आता परत एप्रील महिना आला आला आहे. लोडशेडींग नेहमी प्रमाणे सुरु झाले आहे. तसच पाण्याचाही प्रॉब्लेम सुरु झाला आहे. पण आता आम्ही तरुण राहीलेलो नाही. त्यामु्ळे पाणी भरण्यातली ती गंमत राहीलेली नाही. आताशा लाईट गेले की चिडचिड होते. परवाच रात्री १०.३० वाजता अचानक लाइट गेले होते. त्यामुळे वैतागलो होतो.तेव्हड्यात मोबाईलवर एक एसएमएस आला . काय एसएमएस आहे ते वाचण्यासाठी मेणबात्तीच्या प्रकाशात धडपडत जाऊन धापणी शोधली.एसएमएस वाचला आणि चक्क हसुच आल. तो एसएमएस असा होता:-
    जन्माला येताच बाळाने नर्सला विचारल" लाइट आहेत का?"
    नर्स म्हणाली " नाही.लोडशेडींग आहे अजुन दोन तासाने येतील"
    मग बाळाने विचारल " आज पाणी तरी आल आहे का?"
    नर्स म्हणाली " आज शुक्रवार. आज आणि उद्या अख्खा दिवस पाणी नसत"
    बाळ वैतागुन म्हणाल " च्यायला परत डोंबिवलीतच जन्म घेतला वाटल"
    मला डोंबिवली आवडते याच महत्वाच कारण म्हणजे डोंबिवलीकर कुठल्याही अडचणीं मधुन सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मार्ग काढत असतात.

२१ जून, २०१०

युनिकोड गीता

                 ॥ युनिकोड गीता ॥
                                                            अर्थात
 संगणकावरील मराठी,आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र )
                                               लेखक: श्री. माधव शिरवळकर

                  सन १९९६ सालची गोष्ट. महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकारी-कर्मचारी यांना संगणक शिकणे नुकतेच अनिवार्य केले होते.त्यामुळे मी देखिल संगणक प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. सुरुवातीचे ते दिवस आठवले की आज गंमत वाटते. त्या वेळी मी संगणक ऑन-ऑफ़ करायला सुध्दा घाबरत होतो. एखाद अ‍ॅप्लीकेशन चुकीने अचानक पणे बंद झाल तर संगणक बिघडणार तर नाही ना अशी कुशंका मनात यायची. यथावकाश प्रशिक्षण पुर्ण झाल. त्या नंतर सरावासाठी घरी संगणक घेतला. त्या मुळे हळूहळू भीड चेपत गेली. त्यातूनच पुढे मित्रांशी चॅट आणि ई-मेल सुरु झाल. इंग्रजीवर पुरेसे प्रभुत्व नसल्याने मी मिंग्लिश म्हणजे मराठी शब्द इंग्लीश मुळाक्षरांच्या आधारे लिहायचो. उदा. मला आनंद झाला हे वाक्य मी maala aanand jhala असं लिहायचो.अश्या कसरती कराव्या लागत असल्यातरी नव्याची नवलाई असल्याने मी बरेच मोठ मोठे मेल लिहीत असे. त्यामुळे माझ्या मित्रांना ते मेल वाचण्याचा आनंद होण्या ऎवजी कष्टच जास्त व्हायचे
                 दिवस जात राहीले, वर्षेही गेली. मिंग्लिश मधुन चॅट आणि ई-मेल सुरुच होते. दुर गेलेले जिवलग त्यातुन भेटत राहीले आणि तुटले असते असे संबंध टीकून राहीले. पण का कोण जाणे संगणका विषयी आपुलकी तरीही वाटत नव्हती.. आपल्या माणसांशी संवाद साधताना मराठीतून लिहीता येत नसल्याने मनाला समाधान वाटत नसे.त्यातून संगणकावर मराठीतून कसे लिहीता येईल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग मित्रांकडुन काही मराठी फ़ॉंट मिळवले. ते वापरुन ई-मेल पाठवले पण ते ज्याला पाठवले त्याला वाचताच आले नाहीत कारण तो मराठी फ़ॉंट त्याच्या संगणका मध्ये नव्हता. एकंदरीत संगणकावरून मराठीत संवाद साधता येण काहीस अशक्यच वाटत होत.
                     वर्षे ही उलटतच हॊती पण संगणक काही आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी भाषेला स्विकारायला तयार होत नव्हता आणि त्यामुळे माझ्या सारख्या अनेकांना तो आपलासा वाटत नहता. याच दरम्यान मधे मधे कधीतरी कोणा कडुन "युनिकोड" बद्द्ल कानावर पडत होत.पण युनिकोड बद्द्लची माहिती देणार अस कोणीच नव्हत. लिहीण्याची तिव्र इच्छा मराठीतूनच लिहाव अशीच असल्याने मनात रुखरुख सतत असायची. याच दरम्यान काही वर्तमानपत्रात ब्लॉग बद्दल वाचायला मिळालं. त्यातूनच अनेक लोक ब्लॉग लिहीताना मराठीचा वापर करतात अशी माहीती पण मिळाली.माझ्या एका मैत्रीणीने तिने मराठीतून ब्लॉग लिहायला सुरुवात केली असल्याच चॅट करताना सांगीतल. सुरुवातीला विश्वास वाटला नाही .पण नंतर ती खरोखरच मराठीतुन ब्लॉग लिहीत आहे अशी तिचा ब्लॉग पाहील्यावर खात्रीच पटली. त्यातुन मग मलाही मराठीतुन ब्लॉग लिहावा अस वाटायला लागल. मग तिच्या कडुनच काही टीप्स घेतल्या आणि ब्लॉग लिहायला मी पण सुरुवात केली.
               ब्लॉगवरचे माझे लेख मी बराहा मध्ये लिहुन ते कॉपी-पेस्ट द्वारे ब्लॉगवर टाकत असताना मला एक मेसेज नेहमी यायचा. त्या मध्ये माझा लेख UNICODE-UTF8 मध्ये रुपांतरीत करायचा का अशी विचारणा केली जायची..त्या मुळे माझ्या लक्षात यायला लागल की माझ्या लेखातील फ़ॉंट्स UNICODE मधे रुपांतरीत करण खुप गरजेच आहे. त्यातुन UNICODE बद्दलची उत्सुकता वाढतच गेली..आणि अचानक हाती आल "ते" पुस्तक. श्री. माधव शिरवळकर लिखीत " संगणकावरील मराठी,आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र )"
            महाभारताच्या रणांगणावरील अर्जुनाला पडलेल्या अनेक प्रश्नांच निरसन जस भगवान श्रीकॄष्णाने "भगवत गीता" सांगुन केल तसच या पुस्तकाने माझ्या मनातील युनिकोड विषयीच्या सर्व प्रश्नांच निरसन केल आहे. या पुस्तकात युनिकोड विषयीची माहिती ईतकी सविस्तर दिली आहे की, ती इतरांना सांगुन IMPRESS करता य़ेइल. या पुस्तकात आहे युनिकोडची चळवळ व इतिहास,तिची वाटचाल , भारतीय भाषा व देवनागरी लिपी यातील तिच योगदान, तिचा भविष्यकाळ आणि बरच काही. त्या मुळे हे पुस्तक म्हणजे माझ्या दॄष्टीने "युनिकोड गीता"च आहे. तेव्हा हे पुस्तक संगणकावर मराठीतून लिहु पाहाणार्‍या सर्वांनी जरुर वाचाव आणि आपल्या माय मराठीतून खुप खुप लिहुन मराठीचा झेंडा संगणका विश्वात फ़डकवावा असे सर्वांना मी अवाहन करतो.