२६ ऑक्टो, २०१६

शुभ दीपावली


 

शुभ दीपावली
शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते
 
आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना ही दीपावली मंगलमय आणि आनंददायी जावो तसेच आपणास सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो ह्या मन:पुर्वक शुभेच्छा.
दीपावली हा दिव्यांचा सण. आजपासून या दीपोत्सवाची सुरुवात होते ती घरातील पशुधनाची पूजा करून . वसुबारस हा दिवस शहरात नसेल पण ग्रामीण भागात महत्वाचा मानला जातो. आपला देश हा कृषिप्रधान संस्कृती असलेला देश असून आपले सगळेच सण हे निसर्ग नियम आणि त्यावर आधारित ऋतूचक्राशी निगडीत आहेत. त्या मुळेच ज्यांच्या मदती शिवाय शेती करता येत नाही व जे पशुधन हे शेती प्रधान कुटुंबातील महत्वाचा  घटक आहे अश्या पशुधनाची दीपावलीच्या आनंदोत्सवात पूजा करून त्यांच्या प्रतीची कृतज्ञता ग्रामीण भागात आवर्जून व्यक्त केली जाते . तेव्हा आपण शहरात राहत असलो तरी आपल्या दारी आज पणती  लावताना आपल्या कृषिप्रधान संकृतीचे  व आपण जे अन्न खातो त्या साठी शेतात राबलेल्या पशुंचे स्मरण करायला काहीच हरकत नाही.
अश्या या सध्या सध्या गोष्टीतून आपले पूर्वजांनी अत्यंत जाणीवपूर्वक पाळलेल्या या परंपरा आजही अनुकरणीय आहेत हे देखील आपल्या लक्षात येत असत . त्यामुळेच आपल्या पुढच्या पिढीने देखील आपले सण व कुळाचार पाळावेत या साठी आपल्या परंपरा व त्या मागची आपल्या जाणत्या पूर्वजांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची आज गरज आहे. आपले सण आणि आपल्या परंपरा एकदा जाणून घेतल्या की आपली संस्कृती अत्यंत समृद्ध असल्याचा अभिमान आपल्या पुढच्या पिढीला देखील निश्चितच वाटेल यात शंका नाही.
तेव्हा या दीपोत्सवाच्या निमित्त्याने आपली कृषी प्रधान संस्कृती , आपला इतिहास ,आपल्या परंपरा यांच जाणीवपूर्वक जतन करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात करुया .
जय महाराष्ट्र जय मराठी
 

 

 

२ मे, २०१५

गझलकार निदा फाजली


आजच्या शनिवार दिनांक २ मे २०१५ च्या लोकसत्ता-चतुरंग पुरवणीत डॉ राम पंडीत यांनी ’सहर होने तक’ या त्यांच्या सदरात या वेळी गझलकार निदा फाजली यांच्या गझलांचा समर्पक परिचय करुन दिला आहे. http://www.loksatta.com/chaturang-news/urdu-poet-nida-fazli-1098198/?nopagi=1 या लिंकवर क्लिक केल्यास तो संपुर्णलेख वाचता येईल.
डॉ पंडीत यांचा लेख कितका सुंदर आणि समर्पक आहे की गझलकार निदा फाजली यांच्या प्रतिभेचा संपुर्ण परिचय होतो. मग या लेखाचा ब्लॉगवर विषेश करुन उल्लेख करण्याच प्रयोजन काय.
प्रयोजन इतकच आहे कि डॉ पंडीत यांनी फाजली यांच्या गझल थॊडक्यात दिल्य़ा आहेत. तेव्हा डॉ पंडीत यांच्या लेखाचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल आणि शायर निदा फाजली यांच्या शब्द प्रतिभेची ओळख करुन घ्यायची असेल तर त्यांच्या गझला पुर्णपणे समजुन घ्यायला ह्व्यात .......
तेव्हा माझ्या कडे असलेल्या निदा फाजली यांच्या ३ गझला मी इथे देत आहे. याच गझला द्यायच कारण म्हणजे त्या गझला माझे सर्वात आवडते गझल गायक जगजीतसिंग यांनी त्या गायल्या आहेत...
१- दुनिया जिसे कहते है जादु का खिलौना है
मिल जाये तो मिट्टि है खो जाये तो सोना है
अच्छा सा कोई मौसम तनहाई का कोई आलम
हर वक्त का रोना तो बेकार का रोना है.......
बरसात का बादल तो दिवाना है क्या जाने
किस राह से बचना है किस छत को भिगोना है......
गम हो के खुशी दोनो कुछ देर के साथी है
फिर रस्ता हि रस्ता है हसना है या रोना है...........
२- हर तरफ हर जगह बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयों का शिकार आदमी...
सुबह से शाम तक बोझं ढोता हुआं
अपनी ही लाश का खुद मजार आदमी...
हर तरफ भागते दौडते रास्ते
हर तरफ आदमी का शिकार आदमी ...
रोज जीता हुवां रोज मरता हुवां
हर नये दिन नया इंतजार आदमी...
जिंदगी का मुक्कदर सफर दर सफर
आखरीं सांस तक बेकरार आदमी....
३- होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चिज है
इश्क कीजे फिर समझीये जिंदगी क्या चिज है .....
उनसे नजरे क्या मिली रोशन फिजांये हो गई
आज जाना प्यार की जादुगरी क्या चिज है .....
खुलती झुल्फों ने सिखादी मौसमो को शायरी
झुकती आंखों ने बताया मैकशी क्या चिझ है ....
हम लबोंसे कह ना पाये उनसे हालें दिल कभी
और वो समझे नही ये खामोशी क्या चिज है
मला वाटत शायर निदा फाजली यांच्या शब्द प्रतिभेचा परिचय करुन द्यायला वरच्या तीन गझला पुरेश्या आहेत.

आणि हो डॉ पंडीत यांच्या सुंदर लेखाचा अधिक चांगला आस्वाद घ्यायलाही.

 
 

१ मे, २०१५

महाराष्ट्र दिन -१ मे २०१५

आज आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. ५५ वर्षांपुर्वी हे राष्ट्र, होय राष्ट्रचं, स्वकीय राज्यकर्त्यांशी सनदशीर संघर्ष करुन व १०६ हुतात्मांच बलीदान देवुन या लढवय्या मराठी माणसांनी मिळवलं आहे.अर्थात मराठी माणसांना संघर्ष काही नविन नाही. पण या लढ्याची फारशी जाणिव आत्ताच्या मराठी समाजाला आहे असे जाणवत नाही. एखाद्या माणसाला अचानक वडीलार्जीत संपत्ती मिळाल्या वर तो जशी बेजबाबदार पणे ऊधळपट्टी करेल तसच काहीसं आपण आपल्या राज्या प्रती वागत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडेश्वरा समोर स्वतंत्र राजसत्तेची शपथ घेतल्या नंतर मराठी समाज या ना त्या कारणाने देश रक्षणासाठी लढतच होता. महाराजांनी रोहिडेश्वरा पुढे स्वतंत्र राजकीय सत्तेचा जो संकल्प सोडला होता तो फक्त आत्ताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिमेपुरताच मर्यादीत नक्कीच नव्हता. महाराजांनी स्वप्न पाहीले होते ते एका साम्राज्याचे, मराठी साम्राज्याचे. मराठी साम्राज्याचे स्वप्न मनात असल्यानेच महाराजांनी राज्याभिषेक झाल्या नंतर मराठी भाषेतील राज्य व्यवहार कोष तयार करण्याचे काम हाती घेतले. त्या मुळे महाराजांच्या राजधर्माचा मुळस्त्रोत हा जरी सहिष्णु हिंदु परंपरेचा असला तरी या राज्याच्या प्रशासनाची भाषा मराठीच असली पाहीजे हे त्यांच्या मनात नक्की होते.महाराजां बद्दल बरेच काही लिहीले गेले आहे आणि पुढेही लिहीले जाणार आहे यात शंकाच नाही. पण आज आपण ज्या महाराष्ट्र धर्मा बद्द्ल बोलतो ती संकल्पना त्या महापुरुषाचीच होती हे कोणालाही नाकारता येणार नाही.त्यामुळे महाराजांनी ज्या क्षणी रोहिडेश्वरा समोर स्वतंत्र राजकीय सत्तेची शपथ घेतली तो क्षण म्हणजेच महाराष्ट्रया राष्ट्राची स्थापना असे मी मानतो. महाराजांनी लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार झाला तो थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात.त्याचीच परिणीती म्ह्णजे दिल्लीच्या मुघल बादशहाने मराठ्यांना त्याच्या प्रदेशातुन चौथाई वसुल करण्याची सनद देण्यात झाली. थोडक्यात काय मराठ्यांचे राजकीय व सामरीक प्रभुत्व बादशहाने कबुल तर केलेच पण त्याच्या स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी पण त्याने मराठ्यांवरच टाकली. ही गोष्ट सिद्ध करते मराठ्यांच शौर्य व प्रभुत्व संपुर्ण हिंदुस्तानने जणू काही मान्यच केले होते.

मग प्रश्न पडतो की, आजचा महाराष्ट्र हा महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र आहे का? ज्या महाराष्ट्र धर्माची स्थापना महाराजांनी केली तो आज अस्तित्वात आहे का? आपल्या राज्याची राजभाषा मराठी असावी असे जे स्वप्न महाराजांनी पाहीले ते आज पुर्ण झाले आहे का?. महाराज हे सर्व सामान्यांना आपले वाटत होते त्या मुळे महाराजांच्या मराठी साम्राज्याच्या स्वप्नासाठी मराठी समाजाने आपल्या पिढ्यान पिढ्या रणांगणावर खर्ची घातल्या आहेत. महाराजांनी मराठी समाजाला स्वप्न तर दाखवलेच पण त्यांच्या समोर ध्येय ठेवले ते त्यांच्या आपल्या साम्राज्याचं. आपला इतिहास साक्षी आहे की हे ध्येय साध्य करण्यासाठी सगळ्या मराठी समाजाने अविरत संघर्ष केलेला आहे. कुठलीही अपेक्षा न बाळगता मराठी समाज हे ध्येय साध्य करण्या साठी लढत राहीला त्या बद्दल आपण आपल्या पुर्वजांचे ऋणी असलेचं पाहीजे.

मराठी समाजाच्या शौर्याचा परमोच्च बिंदु म्हणजे पानिपतची तिसरी लढाई ( सन १७६१, दिवस १४ जानेवारी) असे मी मानतो. या लढाईतल्या मराठ्यांच्या पराक्रमाच कौतुक शत्रुने, प्रत्यक्ष अहमदशाह अब्दालीने केलं आहे. जगाच्या इतिहासात एकाच दिवशी लाखो सैनिक प्रत्यक्ष लढताना मृत्युमुखी पडल्याच दुसरं उदाहरण नाही. हे युध्द मराठे लढले ते हिंदुस्तानचे रक्षणकर्ते म्ह्णुन. त्याच बरोबर या देशाच्या सिमा कोणत्या असाव्यात हे या युद्धाने नक्कि केले. हे युध्द मराठे जर जिंकले असते तर हिंदुस्तानचाच नव्हे तर जगाचा इतिहास बदलला असता. मराठी साम्राज्याचे स्वप्न पुर्ण होण्याचा तो क्षण लढाईतल्या काही घटनांनी उधळला गेला. मराठे जिंकले असते तर इंग्रजांना या देशावर राज्य करताच आलं नसतं. काहीश्या फरकान आपण युध्द हारलो पण पानिपताच्या तिसर्‍या लढाईच वैशिष्ठ हेच की विजयी पक्षाला दिल्लीवर राज्य करता आल नाही. या लढाईत अब्दालीच एव्हड नुकसान झाल की तो परत तर गेलाच पण त्या नंतर खैबरखिंडीतुन या देशावर हल्ला करण्याच धाडस कोणीच दाखवलं नाही. इतका गौरवशाली इतिहास असलेलं राज्य / राष्ट्र किंवा समाज आपल्या हिंदुस्तानात दुसरा कोणताही नाही.पण तरीही आपल्याच महाराष्ट्रात मराठी समाज, मराठी भाषा व मराठीमोळी संस्कृती यांची पदोपदी अवहेलना करण्याची मग्रुरी का दिसुन येते?

व्यापार-धंदा गुजराथी-मारवाड्यांच्या हाती, बिल्डर्स परप्रांतीय, हॉटेल्सवाले दाक्षिणात्य(बहुतांश शेट्टी), काहि अपवाद सोडले तर मराठी व्यक्तिरेखा सिनेमात दिसते ती कामवाली बाई किंवा शिपायाच्या भुमिकेत, शेयर मार्केट मध्ये मराठी माणुस असलाच तर सर्वसामान्य गुंतवणीदार म्हणुन मग आपल्या समाजाचं अस्तित्व जाणाव असे आपण आहोत तरी कोठे? एक सरकारी नोकरी आणि दुसरं राजकारण. पण खाजगीकरणाचे वारे वाहात असताना व परप्रांतीयांचे लोंढे सातत्याने येत असताना भविष्यात या दोन क्षेत्रात,सरकारी नोकरी आणि राजकारण, तरी मराठी माणुस शिल्लक असेल का याची साधार शंका मनात उभी राहाते. शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र व महाराष्ट्र धर्म आज थोड्याफार प्रमाणात शिल्लक असेल तर खेड्यापाड्यात."अमृतातेही पैजा जिंकी" असं जीचं सार्थ वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे अशी आपली मराठी भाषा महाराष्ट्राच्या राजधानीत व सरकारी खात्यांमध्ये स्वत:चा शोध घेत वणवण फिरत आहे.

आजचाच TIMES OF INDIA पाहा. पहिल्या पानावर महाराष्ट्र दिना बद्दल येका ओळीचाहि उल्लेख नाही. इथे प्रकाशित होणार्‍या इंग्रजी वर्तमानपत्रात शिवजयंतीचा , महाराष्ट्र दिनाचा उल्लेख देखिल न करण्याचा उपमर्द कसा होवु शकतो. मराठी माणुस इंग्रजी वर्तमानपत्रांचा ग्राहक नाही का?. हे होत कारण मराठी माणुस, मराठी संस्क्रुती यांच्या खिसगणतीतच नाही.

मध्यंतरी माझा एक मित्र कोकणात फिरण्या साठी गेला होता. त्याला असं दिसुन आलं की समुद्रकाठच्या गावां मधिल जमिन विकत घेण्याचा सपाटाच परप्रांतीयांनी लावला आहे. मला वाटतं हेच चित्र महाराष्ट्राच्या सर्वच भागात असेल. जमिन विकण्याची मराठी माणसांची निकड खरी की त्या जमिनी विकत घेण्यातली परप्रांतीयांची दुरदृष्टी खरी याचा सारासार विचार मनाशी केला तर जे उत्तर येतं हे मनात खंत निर्माण केल्या शिवाय राहाणार नाही. शहरातील जागांचे भाव न परवडल्याने दुरदुरच्या खेड्यांमध्ये ( वसई, विरार, डोंबिवलि ,टिटवाळा, बदलापुर ही काही वर्षां पुर्वी खेडीच होती ना?) फेकला जाणारा पांढरपेशा नोकरदार मराठी माणुस एक-एक इंच मागे-मागे सरत जेव्हा आपल्या मुळच्या गावापर्यंत रेटला जाईल त्या वेळी त्याला विदारक जाणिव होईल की आपल्या मुळ गावात देखिल आपल्या मालकीचं असं काहीच शिल्लक उरलेलं नाही. तेव्हा कुठे पळणार आहोत आपण..... . ही वस्तुस्थिती फार भयानक आहे पण दुर्दैवाने ती सत्यच आहे. आज आपल्याला गरज आहे ती शेलारमामां सारख्या जागृत नेतृवाची. आपले पळतीचे सर्व मार्ग नाहीसे झाले तर आणि तरच आपल्या पुढीला काही शिल्लक राहाण्याची शक्यता आहे.

राजकीय किंवा युध्दजन्य कारणाने एखाद्या समाजाच टप्प्याटप्प्याने माघार घेत जाणं समजुन घेता येतं. पण आपल्याच राज्यात आपलचं राजकीय नेतृत्व अद्याप शिल्लक असताना असं होणं हे अनाकलनीय व सुन्न करुन टाकणारं आहे. हिटलराच्या काळात ज्यु समाजाला नियोजन बध्द रितीने हद्दपार केलं गेलं. त्याला एक्झोड्स (Exodus) असा इंग्रजी भाषेत शब्द आहे. एक्झोड्स या शब्दाचा अर्थ आहे," A journey by large group to escape from hostile environment.The departure of the Israelies out of slavary in Egypt led by Moses.".

तेव्हा मराठी माणसांच पण एक्झोड्स होतयं की काय? आणि होत असल्यास त्याला जबाबदार कोण? याचा विचार आत्ताच व्हायला हवा. नाहीतर एक उत्सव म्हणुन अजुन २५ वर्षांनी देखिल " महाराष्ट्र दिन " ," मराठी भाषा दिवस" साजरा होईल पण अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणुन कोणी सिंग असेल आणि आपले लाडके बाबु मोशाय अमिताब बोलबच्चन त्यात मराठी माणसांना हिंदीत २ मिनिटं श्रध्दांजली वाहुन हिंदी कविता सादर करतील.....

असो. या प्रश्नांची उत्तरं साधी -सरळ नाहीत .कारण याचं जे उत्तर असेल ते पहिल्यांदा आपल्या प्रत्येकाकडेच बोट दाखवणार आहे. त्या मुळे यावर उपाय शोधायचा कोणी असेल तर तो आपणचं. तेव्हा मग परत शिवचरीत्र आठवायला सुरुवात करायची आणि म्हणायच,

" छत्रपती शिवाजी महाराज की ...... जय".

हा महामंत्र उच्चारला की आपल्या मनगटांना त्यांच्या पोलादी असण्याची परत एकदा जाणिव होईल.

तेव्हा महाराष्ट्र दिन साजरा करताना...

महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती साठी बलीदान केलेल्या हुतात्म्यांच स्मरण करुया, बेळगाव-कारवार- निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याच भान ठेवुया, माय मराठी विश्वभाषा व ज्ञानभाषा होईल या साठी यथाशक्ती प्रयत्न करुय़ा अन जातीपातीच्या पलीकडे विचार करणारा मराठी समाज निर्माण करुया ....

हे केल तर अन तरच छ्त्रपति शिवाजी महाराजांचा समर्थ महाराष्ट्र अस्तित्वात येईल.

आणि हेच महाराष्ट्र दिन साजरा करण्याच प्रयोजन अन उद्देश असावा अस मला वाटत.

जय महाराष्ट्र जय मराठी

२२ एप्रि, २०१५

माझी आभासी विपश्यना


या सर्वाला नक्की कधी सुरुवात झाली हे सांगता येणार नाही. पण दोन वर्षा पेक्षा जास्त काळ नक्कीच झाला असावा.सुरूवातीला हे सर्व करण्याची इच्छा वारंवार होत नव्हती तो पर्यन्त जाणवल नाही. पण पाहता पाहाता या सर्वांची इतकी सवय झाली की दारू नियमितपणे पिण्यार्‍या माणसाला वेळेवर दारू मिळाली नाही की तो जसा बैचेन होतो तस व्हायला लागलं.
त्यातच मार्च एंड झाला अन कामाच्या ताणातून काहीसा relief मिळाला.  तेव्हा  तर  या सगळ्यांची जास्तच जास्त आठवण व्हायला लागली. रिकाम मन सैतानाच घर म्हणतात ते खरच आहे. सकाळी उठल्यावर, ट्रेनची वाट पाहताना , गाडीत बसायला मिळाल्यावर , ऑफिस मध्ये सकाळचा चहा घेताना, लंच टाइम मध्ये , ऑफिस मधून बाहेर पडण्या पूर्वी , परत परतीच्या ट्रेनची वाट पाहताना, ट्रेन मध्ये उभ असताना , सुदैवाने बसायला मिळालच तर बसल्यावर, घरी पोहचल्यावर , जेवताना , मालिका पाहताना अन झोपण्या पूर्वी अगदी शेवटचं अस ठरवून परत ऐकदा  असा एकच चाळा तो म्हणजे ............
WhatsApp वरचे मेसेज पाहणं अन त्यावर comments करण.....
अन त्यातही अजून वेळ मिळाला तर Facebook, yahoo अन google सोबतीला होतच की..............
आजूबाजूला पाहिल अन थोड घरात लक्ष देवून पाहिलं तर माझ्या सारखीच बहुतेक सर्वांची अवस्था..
    पूर्वी ही   yahoo , Hotmail इत्यादि messengers वा email चा वापर होत नव्हता अस नाही. पण त्या साठी cyber cafe वा घरी internet connection आवश्यक असल्याने या सगळ्या गोष्टी वापरण्यावर काहीश्या मर्यादा होत्या.
    पण android phone आल्या नंतर आभासी ( Virtual) जगाशी  सहजतेने connect होण जास्त सोप होऊन गेल आहे.
    WhatsApp ने तर कहरच झाला आहे. अत्यंत सुलभतेने message forward करता येवू लागले आहेच. नवीन फोन च्या touch screen मुळे एका वेळी एका पेक्षा अधिक जणांना तसेच अनेक message एकाच  वेळी forward म्हणजे ऐका “टिचकीचा” खेळ झाला आहे.
    त्यातच WhatsApp वरचे group म्हणजे सहन होत नाही अन सांगता येत नाही ही अवस्था. एखादा group create करताना काही चांगला हेतु ठेवून ते केले जातात. त्या मध्ये  समान परिस्थितीतल्या वा  विचारांच्या लोकांनी एकत्र येवून “मनकी बाते” share करावी ही रास्त अपेक्षा असते. पण forwarded message forward करणे या पेक्षा अधिक काही होत नाही हा माझ्या सारखाच अनेकांचा अनुभव असेल .  त्यातही बहुतेक message  इतके repeated असतात की ते वाचण्याची तसदी घेण्याचा प्रश्नच नसतो.
    Group create होतो. Admin अर्थात group स्थापक मोठ्या उत्साहाने members add करत जातो. त्यामुळे काही कारणास्तव संपर्कात नसलेले नातलग, जुने मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांच्याशी संवाद साधायला एक व्यासपीठ उपलब्ध होत . सुरुवातीच्या उत्साहात संवाद सुरू होतोही पण नंतर नंतर बरेच members inactive होत जातात. वाद झाला म्हणून तस होत असेल तर समजू शकतो. पण तस नसल तरीही 100 जणांच्या group मधले फक्त 10 ते 12 members active अन  दोन तीन hyper active असतात असाच माझा अनुभव आहे .. कोणाचा वेगळा अनुभव असेल तर आश्चर्यच म्हणावं लागेल. हे Hyper active members इतका forwarded messages चा भडिमार करतात की त्यांना सांगवस वाटत की “जानी, हम भी बहोत सारे WhatsApp group मे रहते है”.
    Members inactive होतात याच महत्वाच कारण म्हणजे संपर्कात नसलेले नातलग, जुने मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांच्या priorities बदललेल्या असतात आणि interest देखील बदललेले असतात हेच असाव. पण आपल्या मनात मात्र त्यांच्या बद्दल प्रत्यक्षाहून मनातली प्रतिमा उत्कट अशीच काहीशी चुकीची कल्पना असते. जुन्या मित्र-मैत्रिणी यांच्या बाबतीत हे प्रकर्षाने होत .
    या सर्वांची मला गेले काही काळ जाणीव होत होती तस जाणवलं की मादक पदार्थांची सवय लागावी तशीच WhatsApp सारख्या आभासी जगाची मला सवय लागली आहे. Addiction म्हणजे दुसर काय असत. मग रविवारि रात्री विचार केला की किमान दोन या आभासी जगा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करूया.
    आज बुधवार आहे .ठरवल्या प्रमाणे दोन दिवस मी आभासी जगापासून पूर्ण दूर आहे. प्रामाणिक पणे सांगतो हे दोन दिवस मला फार कठीण गेले. सारखा फोन कडे हात जायचा अन net pack open करून WhatsApp वरचे messages वाचायची प्रबळ इच्छा व्हायची. दारू पिणार्‍याची दारू न मिळाल्याने होणारी तगमग  अन आभासी जगा पासून दूर राहिल्याने  माझी झालेली  तगमग यात काहीच फरक नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली................
    तेव्हा सत्या पासून दूर पाळण्यासाठी मादक पदार्थांचा वापर करण अन आभासी जगात रमण यात फरक तो काय?. हा या दोन दिवसांच्या आभासी विपश्यनेतून  मिळालेला हा आत्मबोधच म्हणायला हवा.
    असो ....विपश्यना संपली.... परत एकदा net pack open करणार आहे या सुखद कल्पनेनेच हाताला कंप सुटला आहे. हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.
    आहा....झाला झाला net pack open झाला.
   सुविचारांचे messages वाचून मला स्वत:ला परत charge करणार आहे.......
    राजकारणावर, धर्मावर अन अर्थकारणावर आपली मौलिक ? अन अभ्यासू ???? मत हिरारीन अन त्वेषान मांडणार आहे
    कविता , वैचारिक लेख अन बरच काही  forward करून माझ्या अस्तित्वाची परत एकदा जाणीव करून देणार आहे.
    अन तिने forward केलेले प्रेम संदेश वाचून परत एकदा बेदुंध होणार आहे.
    
        ……………………………………

    अरे हो आत्मबोधाच काही तरी म्हणताय तुम्ही……..
    कुठला आत्मबोध
    अरे खड्ड्यात गेला तो आत्मबोध ........
   
**** कोणीतरी म्हटलच आहे की .......
खरे ते  एकची message कर्म
Messages forward करत राहावे
Message तोच  फिरून आल्यास
न चुकता forward च करावा
ऐसा जो पाळील आभासी धर्म
तोच WhatsApp वर नेहमी लोकप्रिय





४ मार्च, २०१३

असमानतेचं जागतिकीकरण- श्री. गिरीश कुबेर.



एक शनिवार आड असे पंधरा दिवसांनी एकदा  "बुक-अप" हे सदर लोकसत्ता या दैनिकात प्रकाशित होते. या मध्ये इंग्रजी भाषेतील उत्तम आणि वैचारिक दृष्टिकोन असलेल्या पुस्तकांचा परिचय श्री. गिरीश कुबेर हे करुन देतात. या वेळच्या २ मार्च २०१३ च्या शनिवारच्या ’लोकसत्ता’ मध्ये श्री. गिरीश कुबेर यांनी "GLOBALIZATION AND ITS DISCONTENTS" आणि "THE PRICE OF INEQUALITY" या दोन पुस्तकांचा परिचय करुन दिला आहे. या पुस्तकांचे लेखक आहेत "Joseph E. Stiglitz".
श्री. गिरीश कुबेर यांना याच दोन पुस्तकांचा आवर्जुन परिचय करुन देण्यासाठी  कारण ठरले ते आपले अर्थमंत्री चिदंबरम. अर्थमंत्र्यांनी त्यांचे या वर्षीचे अंदाजपत्रक (Budget) मांडताना," विकास सातत्यपुर्ण आणि सर्वसमावेशक हवा असेल तर समानतेचा आग्रह धरले जाणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही देशासाठी सर्वाधिक मोलाची साधनसंपत्ती असते ती त्या देशातील मनुष्यबळ." हे वाक्य़ उद्‌धृत केले होते. हे खरेतर श्री. जोसेफ स्टिगलिटस यांच जागतीकीकरणामुळे होणार्‍या विपरीत परीणामाच्या अनुषंगाने केलेले भाष्य आहे. श्री. जोसेफ कोणी सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाही. ते अर्थतज्ञ असुन त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे प्रमुख सल्लागार म्हणुन आणि त्या नंतर जागतिक बॅंकेत मोठ्या पदावर काम केलेले आहे.
याच श्री. जोसेफ स्टिगलिटस यांनी आपल्या सरकारच्या किराणा क्षेत्रातील परदेशी  (FDI) धार्जिण्या धोरणावर टीका केली होती. भारताने किराणा क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीस अजिबात परवानगी देवू नये हे त्यांच मत लक्षात घेता आपल्या अर्थमंत्रांनी वरील वाक्य़ उच्चारणे यातील विरोधाभास सहजच ध्यानी येतो.
दुसरं महायुद्ध संपता संपता बड्या देशांनी दोन महत्वाच्या संस्था जन्माला घातल्या. जागतीक बँक  आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. श्री. स्टिगलिटस हे या दोन्ही संस्थांच्या विरॊधातील कडवे टीकाकार आहेत. या दोन्ही संस्था आणि अमेरिका हे तिघेही बंधमुक्त जागतिकीकरणाच्या बाजुने आहेत. त्यातच जागतीक बँक ही अमेरिकेच्या हातातील बाहुली आहे हे लक्षात घेतल तर आपल्या देशात बंधमुक्त जागतिकीकरणाचे समर्थन करणारे तथाकथित विचारवंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कोणाच्या बाजुने ढोल पिटत आहेत हे लक्षात येत.
श्री. जोसेफ स्टिगलिटस हे म्हणतात," कोणत्याही बाजारच्या धोरणांमध्ये फायदा अनुस्युत असतो. जागतिकीकरण्याच्या बाजारपेठेत देखिल फायदा गृहीत आहे. या फायद्यामध्ये काही मुठभर लोकांचेच हितसंबंध असतात. एका अर्थाने या धोरणांतुन मागच्या दाराने मक्तेदारीचा शिरकाव होतो. त्यामुळे निर्माण होणार्‍या असमानतेमुळे विकासदर आणि कार्यक्षमता  या दोन्हीवर विपरीत परिणाम होतो. असमानतेमुळे अनेकांना संधी मिळत नाही आणि संधी नाकारणे म्हणजे राष्ट्रासाठी अमोल असलेल्या साधनसंपत्तीचा, म्हणजेच मनुष्यबळाचा अपव्यय."
श्री. जोसेफ स्टिगलिटस पुढे जे काही म्हणतात त्यावर आपल्या देशातील सर्वच संवेदनशील माणसांनी आणि बिगर राजकीय संघटनांनी मग त्या सामाजिक संघटना असोत वा कामगार संघटना असोत यांनी भविष्यातील धोके विचारात मनन केल पाहिजे अस मला वाटतं. ते म्हणतात," बंधमुक्त जागतिक बाजारपेठेत व्यवस्थेच्या उतरंडित असलेल्यांना संधिच मिळत नाही. कारण सार्वजनिक व्यवस्थेवर अवलंबुन नसलेले  मध्यमवर्गीय  आणि त्यावरचे श्रीमंत हे सरकारवर एकत्त्रितपणे दबाव आणतात आणि स्वत:च्या पोटाला चिमटा बसणार नाही अशीच कररचना ,अर्थधोरणे आणतात. त्यामुळे सरकारचा सार्वजनिक , सामाजिक सेवांवरील खर्च कमी होतो. परिणामी शिक्षण , दळणवळणाची  साधने अशी गरिबांसाठी  अत्यावश्यक असलेल्या बाबींसाठी पैसाच उपलब्ध होत नाही."
श्री. कुबेर या संदर्भात आपले मत मांडताना म्हणतात,"  या जागतिकरणामुळे निर्माण होणार्‍या आर्थिक समस्येला कोणतही एक उत्तर असु नये. चीन, मलेशिया,दक्षिण कोरिय़ा आदी देशांनी नव्या आर्थिक धोरणांच्या आधारे प्रगती करताना सब घोडे बारा टक्के या प्रमाणे नवा आर्थिक विचार स्विकारला नाही. तो आपल्यासाठी खास बेतुन घेतला. बाजारपेठेतील मनमुराद मॊकळेपणा कोणीही दिला नाही... अगदी अमेरिकेने देखिल नाही. तेव्हा श्री. जोसेफ स्टिगलिटस म्हणतात त्या प्रमाणे बाजारपेठीय मुक्त व्यवस्थेचा  पुरस्कार करणार्‍यांवर देखिल राजसत्तेच नियंत्रण हवं. अन्यथा या असमानतेच ही जागतिकीकरण होवु लागतं."
      तेव्हा या वेळच्या २ मार्चच्या सदरामध्ये , श्री. जोसेफ स्टिगलिटस यांनी त्यांच्या २ पुस्तकां मधुन मांडलेल्या अभ्यासपुर्ण विचारांचा परिचय करुन देण्याच्या निमित्याने श्री. कुबेर हे आपल्या देशातील सर्वसामान्य व असंघटीत जनतेस भविष्यात असलेल्या धोक्यांची सहजपणे जाणिव करुन देतात हेच त्यांच यश आहे हे निश्चित......

***आधार आणि श्रेय  : श्री. गिरीश कुबेर यांचं लोकसत्ता शनिवार दि. 2 मार्च 2013 मधील "बुक-अप" हे माहितीपूर्ण सदर.
*** मुळ लेखाचा दुवा (Link) : http://www.loksatta.com/sampadkiya-news/globalization-of-inequality-72442/