प्रिय मायबोलीकरांनो,
आपण जगाच्या कानाकोपर्यात कुठेही असलात तरी आपले लक्ष महाराष्ट्रात घडणार्या छोट्या-मोठ्या, बर्या-वाईट घटनांकडे निश्चीतच असते. कोणाच अन्न कुठे वाढलेल असत ते सांगता येत नाही पण तरीही घरची ओढ मात्र सर्वांनाच असते. त्यामुळे तुम्ही कोठेही असलात तरी तुमच मन या महाराष्ट्राकडे असतच यात शंका नाही.त्याच प्रेमापोटी महाराष्ट्रात वेळोवेळी घडणार्या घटनांबाबतचा कानोसा वेगवेगळ्या दुरचित्रवाहिन्या , युनिकोडच्या प्रसारामुळे इंटरनेटवर उपलब्ध होत असलेली मराठी वर्तमानपत्रे आणि तुमच्या-माझ्यासारखे सारखे ब्लॉगवर लिहीणारे हौशी मायबोलीकर यांच्या मत-मतांतरावरुन आपण घेत असता. आपणास त्या वरुन सध्या महाराष्ट्रदेशी सर्वच काही आलबेल नाही हे देखिल ध्यानात नक्कीच ध्यानात आले असेल. त्या मुळे माझ्या प्रमाणेच आपणही काहीसे व्यथीत झाला असाल नाही का ?
उद्यॊगधंद्यात, शैक्षणीक क्षेत्रात आघाडीवर असलेला व तसेच सामाजीक दृष्टया पुरोगामी विचारसरणी असलेल्या आपल्या महाराष्ट्राची आजची अवस्था इकडे काहीसे वेगळे वातावरण असल्याची विदारक जाणिव करुन देते. आरक्षण मिळावे यासाठी सर्वच जातींमध्ये चाललेली चढाओढ , चालु असलेले उद्योग बंद करुन त्यांच्या मोक्याच्या जागी गर्भश्रीमंतासाठी बांधले जाणारे टोलेजंग टॉवर्स , गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्य़ा साठी करावा लागणारा दीर्घकालीन संघर्ष , धंदेवाईक दृष्टीकोन ठेवुन चालवल्या जाणार्या शिक्षणसंस्था व राजकारणासाठी या सर्व गोष्टींना खतपाणी घालणारे राजकारणी या सर्वांचा एकत्रीतपणे विचार केला तर आजचा महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे असा दावा कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी करता येत नाही.
मायबोली मराठी भाषेची अवहेलना महाराष्ट्रात जेव्हढी होते तेव्हडी परदेशातील माझ्या मायबोलीकरां कडुन अनवधानाने देखिल होत नसावी. त्यातच मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरातील परभाषीकांची वाढती संख्या आणि त्यांची सर्वच क्षेत्रातली जाणावणारी दादागिरी - पैशाची असो ,सांस्कॄतीक असो, वा संख्याबळाच्या ताकदीची - याचा विचार केला तर महाराष्ट्रचे राजकीय नेतृत्व अमराठी माणसाकडे जाण्याचा दिवस फ़ार दुर नाही हे जाणवत. महाराष्ट्र हे सर्वात जास्त वेगाने शहरीकरण होणार राज्य आहे. या बेलगाम वाढीसाठी मुख्यत: जबाबदार आहेत ते बाहेरुन येणार्या परभाषीकांचे लोंढे. ज्यामुळे फक्त शहरातील पायाभुत सुविधांवरच ताण पडतो अस नाही तर अप्रत्यक्षरीत्या त्याचा प्रतिकुल परिणाम छोट्या-मोठ्या गावांमधुन राहाणार्या सर्वसामान्य मराठी जनतेवर होत आहे. उदाहरणच द्यायच झाल तर मुंबईला अखंड २४ तास वीज मिळावी या करीता महाराष्ट्रातील अनेक खेडी १२ ते १५ तासांचे लोडशेडींग विनातक्रार सहन करीत आहेत किंवा मुंबईला पाणीपुरवठा करणार्या धरणांच्या आसपासची जनता त्यांची मुल्यवान जमिन देवून वर पाणीटंचाईला तोंड देत आहे ही वस्तुस्थीती आहे. या निरपेक्ष त्यागाची जाणिव असण तर सोडाच पण पोटापाण्यासाठी आलेल्या उपर्यांनी म्हणे महाराष्ट्राचा विकास केला असे तारे तोडले जात आहेत. त्यामुळे अश्या प्रवृत्तींना सडेतोडपणे प्रत्युतर देण्यार्या राजकीय नेतृत्वाची आज प्रकर्षाने गरज आहे. पण पुरोगामी विचारांचा व नवनवीन संकल्पनांचा तत्परतेने स्विकार करणारा हा समाज गटातटात विभागुन गेला असल्यामुळेच येथे समर्थ राजकीय नेतृत्व उभ राहु शकत नाही हे लक्षात घेण आवश्यक आहे. परिणाम: ज्या समाजाने कधिकाळी देशाच राजकीय व तसेच सामाजीक नेतृत्व केल त्या मराठी भाषीक समाजाची स्वत:च्या राज्यातील आजची अवस्था विश्वास बसणार नाही इतकी वाइट झालेली आहे.
असे हे नकारात्मक व निराशेचे विचार दिपावलीच्या मंगल प्रसंगी व्यक्त करण काहीस अप्रस्तुत आहे याची मला जाणिव नक्कीच आहे. पण आपण आपल्या माणसां समोरच मन मोकळ करतो ना? माझा ब्लॉग लिहायला सुरुवात करताना मी नक्की अस काहीच ठरवलेल नव्हत आणि आजही ते तसच आहे. पण तरीही माझ्या ब्लॉगवर सहज म्हणुन डोकावून जाणारी व माझ्या विषयीच्या आपुलकीने नियमीत पणे भेट देणारी काही मंडळी या सर्व मायबोलीकरांना मी आपलच समजतो. त्याचच दृष्य प्रगटन म्हणजे माझ वेडबागड पण मनातल हे लिहीण. आवडल तर कौतुक करा पण काही आवडल नाही किंवा काही मत पटली नाहीत तर मात्र तुमच मत जरुर जरुर व्यक्त करा हीच विनंती.असो.
आपण सारे उत्सव प्रिय माणस आहोत. श्री गणरायाच्या आगमना पासुन ते दीपावली पर्यंत अनेक सण आपण साजरे करत असतो. या ऊत्सव जत्रेची सांगता दीपावली साजरी करुन होते. हा सण धार्मिक कमी तर उत्सवी जास्त आहे. याच सुमारास आपल्या उष्णकटीबंधातील देशातल्या वातावरणात काहीसा गारवा जाणवु लागलेला असतो. परिक्षा संपल्यामुळे घरा-घरातील लहान मुले नेहमी पेक्षा जरा जास्तच आनंदात असतात. त्याचा परिणाम आपल्यावर सुध्दा झाल्या शिवाय राहात नाहीच.तेव्हा आजुबाजुची परिस्थिती कितीही बिकट असली तरी आशेचा गारवा मनाला उत्साहीत करतोच. अस म्हणतात की कुठल्याही नाटकाचा शेवट हा आशादायी असावा जेणेकरुन प्रेक्षकाला सगळच काही संपलेल नाही व जगण्यासाठी बरच काही शिल्लक आहे अस विश्वास वाटतो. तेव्हा मी सुध्दा या संवादाचा शेवट शुभेच्छा देवुन करतो.
तेव्हा ही दीपावली आपणा सर्वांच्या जिवनात सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य घेवुन येवो याच माझ्या आपणास शुभेच्छा
जय महाराष्ट्र, जय मराठी
मैत्रेय१९६४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा