२२ नोव्हें, २०१०

रविवार सकाळ

                             रविवार सकाळ

नेहमीचीच रविवार सकाळ......... आळसावलेली. अजुन थोडा वेळ झोपल पाहीजे अस वाटत होत पण पहिल्यांदा आलेला बायकोचा प्रत्यक्ष व नंतरचे मुलांमार्फत आलेले निर्वाणीचे निरोप लक्षात घेता अधिक काळ झोपण आरोग्यास हानीकारक ठरल असत.उठलो एकदाचा बापडा. मुलांची बाहेर हॉलमध्ये आईकडे संडे स्पेशल करण्याची लाडीगोडी सुरु होती.पण तिकडचा सुर काहीसा चढा असल्याच जाणवल. तेव्हा मी म्हणालो," चला, आज कोंबडी बनवूया.". चिकन येवजी कोंबडी कानाला जरा विचित्र वाटत नाही का? .पण काय करणार मनसे फ़ॅक्टरचा परीणाम ................ .यावर दोन्ही मुल एकदम खुष झाली. तिने मात्र माझ्या या वाक्यावर सुसंवादालाच सुरुवात केली. अश्या संवादाचा शेवट ,ज्या प्रमाणे तुमच्याही घरी होतॊ तसाच झाला. त्रिपुरी पौर्णीमेला घरात कोंबडी करण म्हणजे अब्रम्हण्यम हे मला मनोमनी पटलच.
थोड्या वेळाने तिच्याच बरोबर प्रभात फेरी करायला बाहेर पडलो.आम्ही राहातो तिथुन थोड्याच अंतरावर रेल्वे कॉलनी आहे.कॉलनीतली बैठी घर व त्याच बरोबर आवर्जुन जपलेली अनेक झाड-झुडप यामुळे शहराच्या मध्यभागात असुनही परिसर काहीसा निवांत असा आहे. कर्दळ,आळु,कोरफड, केळी, पपई या सारखी शहरात न दिसणारी पण गावातल्या घरच्या परसात हमखास आढळणारी झाड तिथे राहाणार्‍या लोकांनी लावलेली आहेत. एकंदरीत काय आजुबाजुला मोकळी जमिन मिळाली की माणसं घराच्या परसात आपल गाव रुजवायचा प्रयत्न करतात हेच खर...............
रविवारचा महत्वाचा एक कार्यक्रम म्हणजे निवांतपणे आलेली वर्तमानपत्र वाचण जे इतर दिवशी शक्य होत नाही.पहिल्याच पानावरची बातमी वाचुन स्वत:ला चिमटाच काढला.राज्याचे नविन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या वार्ताहर परिषदेत संपुर्णपणे मराठीतुनच बातचीत केली. एव्हडच नव्हेतर या पुढेही होणार्‍या वार्ताहार परिषदांत ते हिंदी व इंग्रजी प्रश्नांवरही फक्त मराठीतुनच उत्तर देतील अस ठणकाहुन सांगीतल. बापरे हा कॉंग्रेसचा मुख्यमंत्री आहे की मनसेचा............ थोडक्यात काय या पुढे मराठीच्या संबंधातील भावनीक मुद्द्यांवर आंदोलन करण्या ऎवजी मराठी तरुणांचे हृद्यसम्राट मा. राज ठाकरे यांना त्यांच्या पवित्र्यात बदल करावा लागणार आहे. अस केल नाहीतर शिवसेने सारखच मुख्यमंत्र्यांनी आमचे मुद्दे हायजॅक केले असे म्हणण्याची वेळ मनसेवर लवकरच आल्या शिवाय राहाणार नाही.
सगळ्यांना माहीत आहेच की, डिसेंबर मध्ये ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या ही संमेलना बाबत सुरुवाती पासुन वादविवाद झाले आहेत - पुढे ही करवले जाणार आहेत. त्या मुळे मराठी भाषेचा करमणुकपर उत्सव थाटामाटात पार पडेल यात शंका नसावी. भाषा ही फक्त व्यक्ती व्यक्तीं मधील संवादाच माध्यम नसुन ते ती भाषा बोलणार्‍या समाजाच्या राजकीय, सामाजीक व भाषीक मानसिकतेच्या अभिव्यक्तीच प्रगटीकरण आहे. पण हे लक्षात कोण घेतो. त्या मुळे मग मराठीच्या साहित्य दरबारात मा.अमिताब बच्चन हिंदीत बोलतात ,हिंदीत कविता म्हणतात आणि त्यालाच सगळ्यात जास्त दाद मिळते. याची ना खंत साहित्यीकांना ना दरबारात भक्तीभावाने उपस्थित असलेल्या तुम्हा-आम्हा साहित्य प्रेमींना......................
कालच्या वर्तमानपत्रात महाराष्ट्राच्या नविन मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाची माहीती आली आहे. किती समर्पक शब्द आहे खाते.....वाटप नाही का ?. असो. मा.श्री. राजेंद्र मुळक या मा. मुख्यमंत्रांच्या विश्वासातील राज्यमंत्रांकडे अनेक महत्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. ती अशी- वित्त व नियोजन व उर्जा (संबधीत कॅबिनेट मंत्री- मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार ), जलसंपदा ( संबधीत कॅबिनेट मंत्री- मा. श्री.सुनिल तटकरे ), उत्पादन शुल्क (संबधीत कॅबिनेट मंत्री- मा.श्री. गणेश नाईक). हा योगायोग म्हणायचा की चेकमेट ......................................
श्रेष्ठ रशियन कादंबरीकर व थोर तत्वचिंतक लियो टॉलस्टॉय यांच्यावर आजच्याच लोकसत्तात एक छान लेख आला आहे.वॉर अ‍ॅन्ड पीस या कादंबरीच नाव घेतल की आपसुकच टॉलस्टॉय यांची आठवण होतेच.अश्या या महान लेखकाची आठवण आणि त्याच्या बद्दलची माहीती या लेखामुळे मिळाली. याच निमित्याने थोड्याच दिवसान पुर्वी वाचलेल्या गॉन विथ द विंड ( अनुवाद - मोनिका गजेंद्रगडकर) या कादंबरीची आठवण झाली. अमेरिकेतल्या राज्या-राज्यां मधिल झालेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी आपल्याला कितीशी आवडॆल अश्या साशंकतेनेच मी ती वाचायला सुरुवात केली. पण खरच सांगतो ती कादंबरी वाचून भारावुन गेलॊ. स्कार्लेट ओ हारा ही म्हटली तर कादंबरीची नायिका. तिच्या आयुष्यातील घटनां भोवती ही कादंबरी रचली आहे. नायिकेच्या आयुष्यात तिच्यावर येणार्‍या संकटांना ती धाडसाने समोरी जाते.पण ज्याच्यावर ती मनापासुन प्रेम करते त्याच प्रेम शेवटपणे तिला मिळत तर नाहीच पण तिच्यावर जो प्रेम करत असतो त्यालाही ती शेवटी गमावुन बसते. त्या कादंबरीत एक वाक्य आहे. स्कार्लेटची आई तिला सांगते " पुरुषांवर आपण कितीही प्रेम केल तरी त्यांच प्रेम असत ते जमिनीवर.तिच्या साठी ते लढतात आणि वेळ प्रसंगी सर्वस्व गमावतात.".कादंबरीतल हे वाक्य माझ्या मनात एक विचार निर्माण करुन गेल.महाभारतातल्या कौरव-पांडवा मधिल युध्दासाठी अनेक कारणं होती त्या पैकी सर्वात महत्वाच म्हणजे भर दरबारात द्रौपदीचा द्युतानंतर कौरवांनी केलेला अपमान.हे जर महत्वाच कारण होत तर फक्त पाच गाव स्विकारुन युध्द टाळण्याचा प्रस्ताव कौरवां पुढे ठेवताना त्या मध्ये द्रौपदीची पण क्षमा मागण्याची अट का बर पांडवांनी टाकली नव्हती.जर दुर्योधनाने पांडवांचा तो प्रस्ताव मान्य केला असता तर ..................
येत्या १४ जानेवारी २०११ ला मराठे व अब्दाली यांच्यात दि.१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे झालेल्या संग्रामाला २५० वर्षे पुर्ण होत आहेत.या युध्दात धारातिर्थी पडलेल्या लाखो मराठी विरांच स्मरण सगळ्यांनाच असायलाच हव. हा फक्त दोन सत्तांमधिल संघर्ष नव्हता. अब्दाली हा मोगलांच्या दरबारातील मुसलमान सरदारांच्या ,विषेशत: नजीबखान रोहिल्याच्या विनंतीवरुन भारतात आला होता. तर मराठे हे हिंदुस्थानचे रक्षणकर्ते म्हणुन लढणार होते थोडक्यात एक पक्ष धर्मासाठी तर दुसरा देशासाठी लढ्णार होता.वास्तवीक पाहाता मराठ्यांचे हे ध्येय लक्षात घेता सर्व जनतेने सहकार्य करायला हवे होते. पण तसे घडले नाही. पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांनी दिलेल्या झुंजीचे शत्रुने - प्रत्यक्ष अब्दालीने-केलेले कौतुक पाहाता समस्त मराठी माणसांनी या लढाईचा अत्यंत अभिमान बाळगायला पाहिजे.पण लढाईतल्या अपयशावर आपण आपल्या पुर्वजांनी हिंदुस्थानच्या रक्षणासाठी पानिपतावर केलेल्या बलीदानाची किंमत करतो हे बरोबर नाही. जय-पराजय महत्वाचे नाहीत तर ज्या कारणांसाठी लढा दिला गेला ते कारण जास्त महत्वाच.पानिपतवर एकुण महत्वाच्या लढाया तिन झाल्या.पहिल्या दोन लढायातील विजयी पक्षाने दिल्लीवर राज्य केल तर तिसर्‍या लढाईत विजयी झालेला पक्ष-अब्दाली- मराठ्यांच्या शौर्याने दिपुन परत माघारी निघुन गेला. तेव्हा ध्येय उदात्त असेल तर हरणारी लढाई पण वेळप्रसंगी लढलीच पाहीजे. ............
तुमच्यापैकी बहुतेकांनी सिंदाबादच्या सफरी हे पुस्तक वाचल असेल.त्यातील एका सफरी मध्ये त्याला एक माणुस त्याच्या खांद्यावर एका म्हातार्‍याला घेवून चाललेला असलेला भेटतो.युक्तीने तो माणुस त्याच्या कडील म्हातार्‍याच ओझ सिंदाबादच्या खांद्यावर टाकतो आणि पळुन जातॊ. पळता पळता तो सिंदाबादला सांगतो या म्हातार्‍याच्या ओझ्या पासुन सुटका करुन घेण्याचा मार्ग एकच तो म्हणजे दुसर्‍या माणसाच्या खांद्यावर हे ओझ देण. तेव्हा मी ही तेच करायचा प्रयत्न करत आहे . तेच म्हणजे माझ्या मनात दिवसभरात घोळत असलेल्या विचारांच ओझ तुमच्या खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न. कळुद्या मला यात मी यशस्वी झालो आहे का नाही ते.‘

६ टिप्पण्या:

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

खाते.....वाटप नाही
खा-ते वाटप मला वाटत जास्त चांगल वाटल असत
खूपच छान विचार आहेत धन्यवाद आपण सारे
असे एकमताचे जवळ आलो तर दिल्ली दूर नाही
पूर्णतः मराठी माणसाच राज्य लवकरच महाराष्ट्रावर येईल .

भानस म्हणाले...

कितीही प्रयत्न केला, युक्त्या-क्लुप्त्या लढवल्या तरीही काही ओझी ज्याची त्यालाच वहावी लागतात. मात्र तुझ्या सुटीची सुरवात अन शेवट (?) यामधल्या विचारप्रवाहांनी भन्नाट प्रवास केलाय. :) आवडलं मला.
शेवटी संडे स्पेशलची तोडपानी कशावर झाली??? :D

ashley म्हणाले...

द्रौपदीचा द्युतानंतर कौरवांनी केलेला अपमान, हे जर महत्वाच कारण होत तर फक्त पाच गाव स्विकारुन युध्द टाळण्याचा प्रस्ताव कौरवां पुढे ठेवताना त्या मध्ये द्रौपदीची पण क्षमा मागण्याची अट का बर पांडवांनी टाकली नव्हती.
+1

बरेच वेगवेगळे विषय घेतले आहेस ..आता यातल्या एकेक विषयावर सविस्तर होऊन जाऊ दे[:)]

Devendra म्हणाले...

प्रिय रामप्रहर,मराठी भाषा ही विश्वभाषा व्हावी अस स्वप्न आहे . नक्कीच होईल असा विश्वासही आहे

Devendra म्हणाले...

प्रिय भानस, मी थोडा वेगळा प्रयत्न केला आणि तो लक्षात आला त्याने बर वाटल.

Devendra म्हणाले...

प्रिय अ‍ॅश, माझ्या नविन विचाराची आवर्जुन नोंद घेतल्याने बर वाटल. अश्या दखल घेण्याने लिहीण्यास नक्कीच हुरुप येतो.