१५ ऑक्टो, २०१०

अधर्मयुद्ध

अधर्मयुद्ध

लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पहिली आवृत्ती : मार्च २००९

                    दुसर्‍या महायुध्दाच्या समाप्तीला प्रमुख कारण झाले ते अणुबॉम्ब,ज्यांनी हिरोशीमा आणि नागासकी ही दोन शहर पार उध्वस्त करून टाकल्याने जपानने शरणागती पत्करली. त्यामुळे आजही अणुबॉम्ब, हैड्रोजनबॉम्ब सारख्या संहारक अस्त्रांची चर्चा होत असते.पण त्या व्यतिरीक्त एक छुपा बॉम्ब असा आहे की ज्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे इतका संहार केला आहे की त्या पुढे अणुबॉम्ब,हैड्रोजन बॉम्ब म्हणजे किस झाड की पत्ती.कारण या दोनही बॉम्बच्या साखळी प्रक्रीयेला ( Chain Reaction) काही मर्यादा आहेत. पण या छुप्या बॉम्बच काय ?.हा छुपा बॉम्ब आहे " तेल बॉम्ब ".  दुसर्‍या महायुध्दाच्या समाप्ती नंतर इंग्रजांच्या साम्राज्याला घरघर लागली आणि त्या साम्राज्याची पोकळी भरुन काढण्या साठी ’अमेरिका’ नावाचा देश जगाच्या क्षितीजावर उद्यमान झाला. याच महायुध्दातुन एक गोष्ट नक्की लक्षात आली ती म्हणजे भविष्यात ज्याच्या हाती तेलाची विहीर तोच या पुढे जगाला नाचवी.त्या मुळे सुरुवातीला इंग्लंड आणि त्या नंतर अमेरिका यांनी पश्चिम आशिया- ज्या भागात तेल उत्पादक अरब देश आहेत - मध्ये वर्चस्व ठेवण्यासाठी जे जे काही केल त्याचा श्री.गिरीश कुबेर यांनी त्यांच्या अभ्यासातुन मांडलेला लेखाजोखा म्हणजेच " अधर्मयुद्ध " हे पुस्तक. या पुर्वी श्री.गिरीश कुबेर यांनी " तेल" हा विषय मध्यवर्ती ठेवून "हा तेल नावाचा इतिहास आहे" आणि "एका तेलियाने " ही दोन पुस्तक लिहीली आहेत ती वाचली असतील तर हे पुस्तक निश्चतच जास्त चांगल उमजेल.

                          दुसर्‍या महायुध्दाच्या समाप्ती नंतर मानवाच्या जीवनाला भोवंडुन टाकणारी गती प्राप्त झाली आहे त्या मध्ये तेलाचा मोठा वाटा आहे.त्यामुळे चाकाचा शोध ही मानवाच्या उत्कांतीतील एक टप्पा असेल तर दुसरा टप्पा हा तेलाचा शोध अस नक्कीच म्हणता येईल.विसाव्या शतकात जे अनेक शोध लागले त्याने तेल हे सर्वच देशांची अपरिहार्य गरज झाले आहे. तेल उत्पादीत करणारे देश फार थोडे असुन उर्वरीत देशांच्या विकासाची व अर्थकारणाची प्रगति ही तेल उत्पादक देशांनी ठरवलेल्या तेलाच्या भावांवर अवलंबुन आहे.

                        तेलाच हे महत्व लक्षात घेवून व आपल्या वाढीसाठी भविष्यात लागणारे उर्जास्त्रोत (तेल) पश्चिम आशियातुन मिळणार असल्याचे नक्की झाल्यावर अमेरिकेची वाटचाल ठरली. ती म्हणजे, या प्रदेशातल्या तेलावर जास्तीच जास्त मालकी मिळवायची, अशी मालकी मिळवु शकणार्‍या स्पर्धक देशांना ऎनकेन प्रकारे रोखायच.आपल्या राष्ट्राच हित कशात आहे हे लक्षात घेवुन घोरण आखण यात चुक आहे अस म्हणता येणार नाही पण ते करताना आपण भविष्यात कशाला खतपाणी घालत आहोत याचा सारासार विचार अमेरिकेने केलेला नाही. त्याचाच परिणाम अतिरेकी धर्मवादी दहशतवाद फोफावण्यात झाला असुन त्याची दाहकता सर्व जग, अगदी अमेरिका सुध्दा , आज अनुभवत आहे. तेल उत्पादक अरब देशांवर आपल वर्चस्व राहाव म्हणुन त्या देशांच्या राजकारणात आणि त्या पेक्षाही जास्त धर्मकारणात सुरुवातीला इंग्लंड आणि नंतर अमेरिका यांनी केलेली विधिशुन्य ढवळाढवळ यातुनच धर्माधारित ’जिहादी’ दहशतवाद निर्माण झालेला आहे. या दहशतवादातुन झालेल्या प्रचंड खुनखराबा याची झळ सर्वच जगाने छोट्या-मोठ्या प्रमाणात अनुभवली आहेच.हा दहशतवाद मोठ्या प्रमाणात अमेरिकेनेच कसा पोसला व वाढवला हे या पुस्तकातुन श्री.कुबेर यांनी सप्रमाण दाखवुन दिलेल आहे.हा दहशतवाद आता भस्मासुरा सारखा अमेरिकेवरच उलटला आहे.वर्ड ट्रेड सेंटरचे ते जगप्रसिध्द मनोरे उध्वस्त झाल्या नंतर आपण केलेल्या चुकांची जाणिव काही प्रमाणात अमेरिकेला निश्चितच झाली आहे पण अद्याप तरी ती स्वहितापुर्तीच मर्यादीत असल्या सारखी आहे.

                              अश्या या तेलाच्या इतिहासाचे व त्या मागच्या राजकारणाचे अभ्यासक असलेल्या श्री.कुबेर यांचे हे पुस्तक सर्वांनीच जरुर वाचलेच पाहीले.ते वाचल्यावर आजुबाजुच्या जगाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची जाणिव निर्माण होते. जगाच्या कोपर्‍यात घडण्यार्‍या गोष्टींकडे मला काय त्याच या नजरेन पाहाण्याची सवय किति घातक ठरु शकते याची जाणिव आपल्या सगळ्यांनाच असायला हवीच कारण तेलाच्या हव्यासातुन निर्माण झालेला अमेरिका पुरस्कृत दहशतवाद आपल्याही घराच्या उंबरठ्यावर आता येवू घातला आहे हे या पुस्तकाद्वारे लक्षात येत.पुस्तकातल शेवटच प्रकरण " ते,आपण आणि अधर्मयुध्द " हे तर खास आपणा भारतीयांसाठीच आहे. आपला शेजारी पाकिस्तान हाच तमाम दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाचा जणु विश्वविद्यालयच झालेला आहे.अश्या या पाकिस्तान बरोबर देशातील तथाकथीत विचारवंत आणि प्रसिध्द माध्यम ( विषेश करून इंग्रजी ) हे " अमन की आशा "ची भाषा करीत आहेत. त्या सर्वांनी जर हे पुस्तक वाचल तर त्यांचे डोळे उघडतील आणि त्यांच्या मनात " अमन की निराशा" निर्माण झाल्या शिवाय राहाणार नाही. तेव्हा सर्वांनीच जात, पात, धर्म बाजुला ठेवुन दहशतवादाला अत्यंत डोळस पणे समोर जाण्याची गरज आहे.

                      या पुस्तकाच्या समर्पक प्रस्तावनेच्या शेवटी श्री.कुबेर म्हणतात," वाचकहो,तुम्हाला जर अधर्मयुध्द भावलं, त्यान तुम्ही अस्वस्थ झालात तर श्रेय प्रस्तावनेत वर उल्लेख केलेल्या सर्वांच. त्यात जर कमी पडलो असेन, तर ते न्युन मात्र माझच.". या पुस्तकाच श्रेय नक्की कोणाच हे ठरवण्याचा अधिकार श्री.कुबेर यांचाच असला तरी वाचकांना अस्वस्थ करण्याच श्रेय मात्र त्यांचच हे मात्र निश्चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: