२७ जाने, २०११

अस्वस्थ करणारे प्रश्न


काल २६ जानेवारीला माझ्या एका मित्राचा मला एसएमएस आलाय.
एसएमएस असा आहे की :

- मायक्रोसॉफ़्टच्या एकुण कर्मचार्‍या पैकी ३४% भारतीय आहेत.
- इंटेलच्या एकुण कर्मचार्‍या पैकी १७% भारतीय आहेत.
- यु.एस.ए मधिल डॉक्टरां पैकी ३८% भारतीय आहेत.
- यु.एस.ए मधिल शास्त्रज्ञां पैकी १२% भारतीय आहेत.
- नासा मधिल शास्त्रज्ञां पैकी ३६% भारतीय आहेत.

याचाच अर्थ भारतीय महान आहेत पण भारत नाही ..............
कारण या बुद्धीवान भारतीयांनी केलेल्या मुर्खपणा मुळेच.
जर या बुद्धीवान भारतीयांनी भारतासाठी आपली बुद्धी वापरली असती तर आपला भारत पण महान झाला असता.

या एसएमएसच्या शेवटी भारतीय तरुणांना या वर विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पण हा एसएमएस वाचल्यावर मनात अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थीत होतात..................

भारत सोडुन परदेशात गेलेल्या आपल्याच माणसांना दोष देण खरच योग्य आहे का?
ते ईथेच राहीले असते तर त्यांच्या बुद्धीमत्तेला खरच वाव मिळाला असता का?
या देशात आपली प्रगती होणार नाही अशी भावना निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे?
भारतीय तरुणांना या वर विचार करण्याचे आवाहन करणार्‍यां पैकी किती जण संधी मिळाली तरी परदेशात, विशेषत: यु.एस.ए ला जाणार नाहीत?
जात पात धर्म या पलीकडे जाऊन विचार करणारे नेतृत्व आणि समाज ख्ररच या देशात आहे?

असे एक ना अनेक प्रश्न मनात उभे राहीले आहेत.
मला आज तरी या विषयी मत व्यक्त करावसे वाटत नाही. पण तरीही यावर विचार व्हायला हवा या विषयी दुमत नसाव.

काय वाटत तुम्हाला?






१५ जाने, २०११

हेडहंटर

पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयात गेलो असताना "हेडहंटर" हे पुस्तक नजरेस पडल.पुस्तकाच्या नावातच काहीस वेगळेपण जाणवल्याने मनात उत्सुकता जागी झाली व ते पुस्तक घेवुन घरी आलो. जस जस हे पुस्तक वाचत गेलो तशी तशी चढत्या श्रेणीने ती उत्सुकता वाढतच गेली आणि पुस्तक वाचुन होईपर्यंत ती तशीच कायम होती. राजहंस प्रकाशन, पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशीत केल आहे. या पुस्तकाचे नायक आहेत श्री.गिरिश टिळक जे हेडहंटींगच काम करतात.त्यांच्या या कामामधिल अनुभवांच श्री. सुमेध वडवाला (रिसबुड) यांनी या पुस्तकात शैलीदार शब्दांकन केलेल आहे.
माझ्या सारखीच आपल्या पैकी अनेकांना हेडहंटर म्हणजे काय याची पुस्तकाच्या नावावरुन कल्पना नसेल.पण उमेदीच्या काळात चांगल्या नोकरीच्या शोधात असताना किंवा अधिक चांगल्या नविन संधीच्या अपेक्षेने आपल्या पैकी अनेकांनी कुठल्या ना कुठल्या प्लेसमेंट कन्सल्टन्सी मध्ये नक्कीच नाव नोंदवल असेलच. त्याच प्रमाणे आपले ’रिझ्युमे’ सुध्दा बर्‍याच ठिकाणी पाठवलेले असतील. त्या पैकी काही प्लेसमेंट कन्सल्टन्सी मधुन चांगल्या संधीही तुम्हाला उपलब्ध झाल्या असतील.
अश्या प्रकारच्या बहुतांश प्लेसमेंट कन्सल्टन्सीज काम करतात ते कंपनांना त्यांच्या गरजे नुसार मनुष्यबळ शोधुन देण्याच. पण हेडहंटरच काम हे त्याहुन फार वेगळ असत. कारण कंपन्याना मुळातच माणस लागतात ती दोन प्रकारची.एक दिलेल्या आज्ञेनुसार काम करणारी आणि दुसरी म्ह्णजे पहिल्या प्रकारच्या माणसांन करुन काम करवुन घेणारी.ही दुसर्‍या प्रकारची माणस कंपन्यांच्या दृष्टीने फारच महत्वाची असतात. कारण ही माणस असतात त्या त्या क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ व विचारपुर्वक काम करणारी मंडळी ज्यांना कंपनीतले टॉप बॉसेस किंवा डिसीजन मेकर्स अस संबोधल जात. ते जर अचानक कंपनी सोडुन गेले किंवा त्यांनी घेतलेले निर्णय चुकले तर कंपनीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहु शकतो. त्या मुळे कंपनी अश्या महत्वाच्या जागांवर तिच्या कार्यक्षेत्रातील अनुभवी किंवा तज्ञ व्यक्ती नेमण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते.कंपन्यांना त्यांना हव्या असणार्‍या योग्य व्यक्ती शोधुन देण्याच काम जे करतात त्यांना हेडहंटर अस म्हणतात.
अश्याच एका प्लेसमेंट कन्सल्टन्सी मधुन काम करता करता श्री. गिरिश टिळक यांच्यातील यशस्वी हेडहंटर कसा घडत गेला याच प्रवाही शब्दांकन म्हणजे हे पुस्तक. पुस्तक वाचल्यावर एक लक्षात येत ते म्हणजे हाती घेतलेल्या कामात झोकुन देण , त्याचा अभ्यास करण आणि त्याहुन महत्वाच म्हणजे जगात वावरताना वेगवेगळ्या व्यक्तींशी आलेले संबंध टिकवुन ठेवण ही श्री.गिरिश टिळक यांची वृत्ती अंगी बाळगण हा साधा सरळमार्गही आजच्या गळेकापु जगात यशाचा महामंत्र ठरु शकतो.
तेव्हा हेडहंटर म्हणजे काय व तो कसा घडतो हे मुळापासुन समजुन घ्यायच असेल तर हे पुस्तक संपुर्णपणे वाचण्या शिवाय दुसरा शॉर्टकट नाही.



















१३ जाने, २०११

शौर्यस्मरण अर्थात पानिपत दि. १४ जानेवारी १७६१


महाराष्ट्राचा इतिहास हा पानिपतचा रणसंग्राम वगळुन लिहीताच येणार नाही. किंबहुना जास्त योग्य शब्दात म्हणायच तर समजुन घेताच येणार नाही.येत्या १४ जानेवारीला या रणसंग्रामाला २५० वर्षे पुर्ण होत आहेत पण त्याचे सुप्त परिणाम मराठी मनात व सामाजीक वर्तणुकीत आजही दिसतात. मग ते म्हणींमध्ये असो की दिल्लीच्या राजकारणात न्युनगंडाने वावरायची राजकीय मनोवृत्ती असो या मध्ये पानिपतच्या यशापशयाच प्रतिबिंब दिसुन येत अस मला वाटत. अश्या महत्वाच्या घटनेची पाहीजे तशी नोंद मराठी समाजाने घेतलेली दिसत नाही.पानिपतचे स्मरण म्हणजे जणु काही एखाद्या अप्रिय घटनेचे स्मरण अशीच काहीशी मनोभावना असल्याने हे होत असेल ही शक्यता असु शकते. त्या मुळेच या लढाईला २५० वर्षे पुर्ण होत असताना महाराष्ट्रात येत्या १४ जानेवारीला काहीच समारंभ वैगरे होताना दिसत नाहीत.पण याची दखल पानिपत ज्या राज्यात आहे त्या हरियाणा राज्याने मात्र आवर्जुन घेतलेली आहे.आणि त्याच श्रेय जात ते श्री.अजित जोशी,जिल्हाधिकारी, सोनपत ( हरियाणा) यांना. पानिपतच्या लढाईत तात्कालीन मराठी समाजाने दाखवलेल्या शौर्याचे , केलेल्या पराक्रमाचे व दिलेल्या हौतात्माचे स्मरण व्हावे या करीता त्यांनी " पानिपत प्रतिष्ठान " ची स्थापना केली. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन युद्धामध्ये शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. शुरांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्याची ही स्तुत्य पध्दत म्हणायला हवी. पानिपतच्या लढाईत अब्दालीशी लढलेल्या हिंदुस्तानातील एकमेव समाजाला,आपल्या मराठी समाजाला या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन आदरांजली वाहाण्याचा प्रयत्न हरियाणा राज्य करते त्या बद्दल त्या राज्याचे आपण सर्वांनी आभार मानायला हवेत.
अश्या पानीपतच्या लढाईच आणि तीच्या प्रयोजनाच विश्लेषण कराव असा माझा अभ्यास नाही. पण मराठ्यांच्या इतिहासाचा पराकोटीचा अभिमान असलेला एक इतिहास प्रेमी म्हणुन या संदर्भात जे जे काही आवर्जुन वाचल त्यावरुन माझी खात्री झाली की,"पानिपतचा रणसंग्राम हे मराठयांच्या गौरवशाली इतिहासातल सोनेरी पान आहे."
या लढाईच्या बाबत अत्यंत अभ्यासपुर्ण पुस्तक आहे ते श्री.त्रं.शं.शेजवलकर यांच "पानिपत १७६१" .तेव्हा प्रत्येक मराठी माणसाने मनातील पुर्वग्रह नाहीशे व्हावेत या साठी श्री.त्रं.शं. शेजवलकर यांच "पानिपत १७६१" (प्रकाशक - राजहंस प्रकाशन) जरुर जरुर वाचाव.त्या शिवाय साप्ताहीक विवेकचा १२ डिसेंबरचा २०१० चा " पानिपत रणसंग्राम- महाराष्ट्राची शौर्यगाथा" हा पानिपत विषेषांक  तसेच  लोकसत्ता रविवार दि. ९ जानेवारी २०११ ची लोकरंग पुरवणी या मध्ये या घटने बद्दल अत्यंत अभ्यासपुर्ण माहिती आलेली आहे. ती देखिल शक्य असल्यास मिळवुन जरुर वाचावी. 
"पानिपत १७६१" मध्ये श्री.त्रं.शं. शेजवलकर लिहितात," पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेली महत्वाच गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुन दुसर्‍या लुटारुंशी लढले नाहीत.हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पण हे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,या तत्वासाठी मराठे पानीपतास लढले."
मला वाटत हीच गोष्ट प्रत्येक मराठी माणसाने पानिपतच्या लढाईचे स्मरण करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे न की लढाईत झालेला पराभव. आपल्या पुर्वजांचा हा उद्दात दृष्टिकोन एकदा जर का कळला की मराठी माणसांच पानिपत होत नाही तर पानिपत करणारी आपण माणस आहोत ही मराठी अस्मिता निर्माण झाल्याशिवाय राहाणार नाही.
तेव्हा २५० वर्षांपुर्वी,१४ जानेवारी १७६१ या दिवशी हिंदुस्तानचे राज्यकर्ते व रक्षणकर्ते म्हणुन धारातिर्थी पडलेल्या शुरविरांना वंदन करत असतानाच मराठी रणरागीणींनी आपल्या सौभाग्याच दान पानिपतच्या रणसंग्रामात संक्रातीच वाण म्हणुन हसत हसत लुटल होत याची देखिल आठवण १४ जानेवारी २०११ रोजी ठेवुन आपल्या पुर्वजांना त्यांनी केलेल्या बलिदाना बद्दल आदरांजली वाहुया.

जय महाराष्ट्र, जय मराठी.



३१ डिसें, २०१०

नववर्ष २०११



प्रिय मायबोलीकर,


काही क्षणात आपल्या हिंदुस्तानात ईंग्रजी कॅलेंडर नुसार नववर्षाची सुरुवात होणार आहे.हे कॅलेंडर आपल्या ईतके अंगवळणी पडले आहे की आपल्या नविन वर्षाची सुरुवात चैत्र महीन्यातील गुढीपाडव्याला होत असते याची जाणिवच नसते.आपली पुढची पिढी तर जागतीकीकरणाच्या झंझावाटात आपली संस्कृती व आपली मायबोली या पासुन तुटत चालली आहे.वास्तव जगापेक्षा भासमय जगात ही पिढी जास्त रमते. संवादांपेक्षा एसएमएस , पत्रांपेक्षा ई-पत्र, मत व्यक्त करण्यासाठी फेसबुक,ऑर्कुट या सारख्या कम्युनिटी साईट्स आणि मन व्यक्त करण्यासाठी याहू सारखे निरॊपे ( Messengers) यांचा वापर सहजकत्या करणार्‍या या पिढीला पत्रातील ह्स्ताक्षरावरुन भावना समजुन घेण्यातली संवेदनशिलता व गंम्मत कशी बर कळणार. अर्थात सर्वच दोष त्यांचा नाही तर आपल्या पिढीचा आहे जी आज पंचेचाळीस ते पन्नास दरम्यानच्या वयोगटात आहे. आपल्या मुलांपर्यंत आपली संस्कृती पोहचवण्यात आपण कमी पडलो आहोत.कॉस्पॊपॉलीटीन संस्कृतीची भलावण करण म्हणजेच पुरोगामीपणा अशी आपण आपलीच समजुत घेउन घेतली आहे. मॅकडोनाल्ड मध्ये आपल्या मुलांना घेवुन जाण आणि बिसलेरीची पाण्याची बाटली देवुन आपल्या आजुबाजुच्या सर्वसामान्य माणसां पेक्षा आपण उच्च आहोत अशी त्यांची समजुत होण्यात आपलाही वाटा आहेच ना?
आपला देश हा आज तरुणाईचा देश म्हणुन ओळखला जातो.ही तरुणाई या ना त्या कारणाने घरापासुन दुरावत चालली आहे.अनेक घरात आई-वडिल एकटे तर कर्ती मुले परदेशात किंवा परगावात आहेत. अशी अनेक घरटी डोळे उघडे असतील तर आजुबाजुला सहज नजरेला पडतील. या ताटातुटीला नातेसंबधातला दुरावा हे कारण नसुन व्यवहारीक अगतीकता जास्त आहे हे ही मान्यच करायला हवं. मुल दुर गेलेल्या अश्या एकाकी वृध्द मंडळीना पैशाची गरज कमी तर सोबतीची गरज जास्त आहे.मनात असुनही किंवा शक्य असुनही अश्या मंडळींना मदत करणे अनेक कारणास्तव शक्य होत नाही. कारण काहीही असोत पण जग जवळ येत आहे अस म्हणताना जगा पासुन तुटत चाललेल्या माणसांची संख्या वाढतच चालली आहे.अश्या वेळी समुहने एकत्र येवून काही करण्याची गरज भासते.त्या दॄष्टीने काही संस्था प्रयत्न करीत आहेत ही आशेचीच किनार म्हणायला हवी. नुकताच पुण्याला काही कारणाने गेलो असता अश्याच एका संस्थाची माहिती मिळाली.ती संस्था म्हणजे " NRI Parent's Organisation, Pune ". या संस्थेच वैशिष्ट म्हणजे ज्या पालकांची मुल परदेशात आहेत अशी मंडळी या संस्थेची सदस्य आहेत.एकटे पणा कसा असतो ते प्रत्यक्षात अनुभवणारी माणसच दुसर्‍या समदु:खी माणसांना जास्त चांगल्या प्रकारे समजुन घेवु शकतात नाही का?या संस्थेतील व या प्रकारचे काम करणार्‍या प्रत्यकाच ..मग ती संस्था असो की व्यक्ती यांच कौतुक करायला हवच.
समाजा पासुन तुटत जाणारी दुसरी माणस म्हणजे आजुबाजुला काय चालल आहे त्याच भान नसलेली माणसं. समाजातील वाईट प्रवृत्ती विरुध्द प्रत्यक्ष काम करण ही सहज शक्य गोष्ट नाही हे मला देखिल स्वानुभवातुन कळतच की. पण आजुबाजुच सगळच आलबेल नाही किंवा खर सांगायच तर दिसत त्याहुन फारच फारच वाईट आहे हे कळुन न घेण म्हणजे असंवेदशीलताच नाही का?. नुकत्याच ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे म्हणतात "समाजा पुढचे प्रश्न मांडण्या साठी साहित्यीकांनी समाजातल्या प्रश्नांसंबंधी निश्चीत भुमिका घेण्याची गरज आहे". तेव्हा फक्त साहित्यीकांनी नव्हे तर आपल्या पैकी प्रत्येकानेच निश्चीत अशी भुमिका घेण्याची वेळ आता नक्कीच आली आहे.
टाटा हे आपल्या देशात आदराने घेतल जाणार नाव आहे.हे नाव फक्त एका उद्योग संस्थेचच प्रतिनिधित्व करत नाही तर संस्कृतीच प्रतिक आहे. पण निता राडीया टेप प्रकरणातुन आलेल सत्य या संस्कृतीची काळी बाजु दाखवत तेव्हा आपल्या पुढचे आदर्श अधिक डोळस पणे पारखुन घेण आवश्यक आहे हेच अधोरेखीत करत. अर्थात आदर्श या शब्दाचा अर्थ आता आपल्या महाराष्ट्रात फार वेगळा झालेला आहे.त्यामुळे शब्दकोशाच्या पुढील आवृत्यांमध्ये आदर्श या शब्दा समोर हे नविन संदर्भ देण्यात आले तर आश्चर्य वाटायच कारण नसाव.
अश्या परिस्थितीत भांबाहुन गेल्या सारख सर्व सामान्य माणसांना झाल आहे.आशेन पहाव असे समोर काही दिसत नसताना उमेद टिकवुन ठेवण्याची कसरत करण्याची वेळ नविन वर्षाला सामोरे जाताना आली आहे.अंधार असला तरि प्रकाशाची तिरीप नक्कीच दिसणार आहे हा दरवर्षीचा आशावादच आपल्याला या वर्षाला अलविदा करताना मनात नक्कीच असणार आहे.
आपल्या मनातील या आशावादाच सर्वांच समर्पक शब्दरुप खालील गझलेतुन व्यक्त होत .....चित्रा सिंग यांनी ही गझल गायली आहे.


इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये
सुबह होने को है माहौल बनाके रखिये
जीनके हाथोंसे हमे जख्मे नीहॉं पहुंचे है
वो भी कहते है के जखमोंको छुपाये रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये...........
कौन जाने के वो किस राह गुजर से गुजरे
हर गुजर गाह को फुलोंसे सजांये रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये ..........
दामने यार की झीनत ना बने आंसु
अपनी पलकॊं के लिये कुछ तो बचाकें रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये .......
तेव्हा नविन वर्ष आपल्या सर्वांच्या मनोकामना पुर्ण करणार आणि आपल्या देशातील सर्व माणसांच जीवन समाधानाच करणार असु दे या माझ्या मनपुर्वक शुभेच्छा.

 
जय महाराष्ट्र जय मराठी


आपला

मैत्रेय१९६४

२८ डिसें, २०१०

नव्या इतिहासाचा शोध

                                                    लेखक- डॉक्टर सुनिल भुमकर


पुण्यातील लाल महालातुन दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवल्याने पुणे महानगर पालीकेत झालेल्या सव पक्षीय खेळोमेळीच्या (?) चर्चेची सविस्तर माहिती आजच्या मराठी वर्तमानपत्रात आलेली आहे. या चर्चेत शिवसेना-भाजप आणि मनसे एका बाजुला तर दुसर्‍या बाजुला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसर्‍या बाजुला होती.तर चर्चेचे परिक्षक म्हणुन श्री.मोहनसिंग राजपाल,सन्माननीय़ महापौर,पुणे महानगरपालीका यांनी काम पाहीले .महानगर पालिकेतील तमाम मराठी नगरसेवकांची आपसाआपसात झालेली ही खेळोमेळीची चर्चा पाहाताना व अनुभवताना "मराठा तितुका मेळवावा" याची याच देही याच डोळा प्रचिती परिक्षकांना आली आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रुच आले असही काहीसे वाचनात आल आहे.
या घटनेतुन तसेच इतिहास संशोधक संभाजी ब्रिगेड संस्था यांच्या इतिहास संशोधनातुन उघडकीस आलेल्या काही नव्या शोधांमुळे आणि सर्व धर्म समभाव या संकल्पनेने माझे परम मित्र डॉक्टर सुनिल भुमकर हे फारच प्रेरीत झालेले दिसतात. त्यामुळे डॉ. भुमकर यांनी,त्यांना त्यांच्या प्रदिर्घ इतिहास संशोधनाच्या अभ्यासातुन नव्याने गावलेल्या मराठी साम्राज्याचा इतिहा्सातील काही भाग त्यांच्या ब्लॉगवर काहीश्या घाईघाईने प्रकाशीत केलेला आहे.डॉ.भुमकर यांनी प्रकाशीत केलेल्या भागातील मौत्तिके खालील प्रमाणे:
१. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले.
२. शिवाजीमहाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जिजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी (हिंदवी नव्हे) स्वराज्याची’ स्थापना केली.
३.शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते व त्यांनी त्याची प्रेरणा महात्मा गांधीं कडून घेतली होती.
४.आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले. कारण अफझल खान आणि शिवाजी महाराज खूप जुने दोस्त होते.
५.अफझल खान आणि शिवाजी महाराज या दोघा मित्रांच्या भेटीत अफझल खानला छातीत हार्टअटॅक’ ची अचानक जोरात कळ येवुन तो मेला. त्या वेळी महाराजांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले.
माझ्या मित्राने या शिवाय बरच काही नव महत्वाचे संशोधन मांडल आहे ते त्याच्याच प्रेमळ शब्दात वाचणेच योग्य ठरेल.
हे सर्व लिहिताना महाराष्ट्रातील जातीय सलोखा टीकुन राहावा म्हणुन माझ्या मित्राने अफझल खान आणि शिवाजी महाराज या दोघा मित्रांच्या भेटीच्या प्रसंगातील एक सत्य नमुद केलेले नाही.ते म्हणजे महाराजांचे डॉक्टर हे ब्राम्हण असल्याने खानाच्या औषध उपचारा साठी जाणुनबुजुन वेळेवर पोहोचले नाहीत हे ते सत्य.पण एकवेळ जातिय सलोखा तुटला तरी चालेल पण त्यांनी हे सत्य लपवुन ठेवु नये व पुढील भाग लिहीताना हा ब्राम्हणी कावा जरुर उघडकीस आणावा.
तेव्हा माझ्या मित्राने अभ्यासातुन परिश्रम पुर्वक संशोधीत केलेला इतिहास आपण जरुर वाचावा व त्याच्या अभ्यासास दाद द्यावी जेणेकरुन पुढील भाग लवकारात प्रकाशीत करण्याची त्याला प्रेरणा मिळेल हे नम्र आवाहन.

डॉ.भुमकर यांच्या ब्लॉगचा दुवा http://raamprahar.blogspot.com/2010/12/blog-post_27.html

आपला
मैत्रेय१९६४