६ नोव्हें, २०१०

दीपावली २०१०

                                                दीपावली २०१०


प्रिय मायबोलीकरांनो,

आपण जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही असलात तरी आपले लक्ष महाराष्ट्रात घडणार्‍या छोट्या-मोठ्या, बर्‍या-वाईट घटनांकडे निश्चीतच असते. कोणाच अन्न कुठे वाढलेल असत ते सांगता येत नाही पण तरीही घरची ओढ मात्र सर्वांनाच असते. त्यामुळे तुम्ही कोठेही असलात तरी तुमच मन या महाराष्ट्राकडे असतच यात शंका नाही.त्याच प्रेमापोटी महाराष्ट्रात वेळोवेळी घडणार्‍या घटनांबाबतचा कानोसा वेगवेगळ्या दुरचित्रवाहिन्या , युनिकोडच्या प्रसारामुळे इंटरनेटवर उपलब्ध होत असलेली मराठी वर्तमानपत्रे आणि तुमच्या-माझ्यासारखे सारखे ब्लॉगवर लिहीणारे हौशी मायबोलीकर यांच्या मत-मतांतरावरुन आपण घेत असता. आपणास त्या वरुन सध्या महाराष्ट्रदेशी सर्वच काही आलबेल नाही हे देखिल ध्यानात नक्कीच ध्यानात आले असेल. त्या मुळे माझ्या प्रमाणेच आपणही काहीसे व्यथीत झाला असाल नाही का ?

उद्यॊगधंद्यात, शैक्षणीक क्षेत्रात आघाडीवर असलेला व तसेच सामाजीक दृष्टया पुरोगामी विचारसरणी असलेल्या आपल्या महाराष्ट्राची आजची अवस्था इकडे काहीसे वेगळे वातावरण असल्याची विदारक जाणिव करुन देते. आरक्षण मिळावे यासाठी सर्वच जातींमध्ये चाललेली चढाओढ , चालु असलेले उद्योग बंद करुन त्यांच्या मोक्याच्या जागी गर्भश्रीमंतासाठी बांधले जाणारे टोलेजंग टॉवर्स , गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्य़ा साठी करावा लागणारा दीर्घकालीन संघर्ष , धंदेवाईक दृष्टीकोन ठेवुन चालवल्या जाणार्‍या शिक्षणसंस्था व राजकारणासाठी या सर्व गोष्टींना खतपाणी घालणारे राजकारणी या सर्वांचा एकत्रीतपणे विचार केला तर आजचा महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे असा दावा कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी करता येत नाही.

मायबोली मराठी भाषेची अवहेलना महाराष्ट्रात जेव्हढी होते तेव्हडी परदेशातील माझ्या मायबोलीकरां कडुन अनवधानाने देखिल होत नसावी. त्यातच मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरातील परभाषीकांची वाढती संख्या आणि त्यांची सर्वच क्षेत्रातली जाणावणारी दादागिरी - पैशाची असो ,सांस्कॄतीक असो, वा संख्याबळाच्या ताकदीची - याचा विचार केला तर महाराष्ट्रचे राजकीय नेतृत्व अमराठी माणसाकडे जाण्याचा दिवस फ़ार दुर नाही हे जाणवत. महाराष्ट्र हे सर्वात जास्त वेगाने शहरीकरण होणार राज्य आहे. या बेलगाम वाढीसाठी मुख्यत: जबाबदार आहेत ते बाहेरुन येणार्‍या परभाषीकांचे लोंढे. ज्यामुळे फक्त शहरातील पायाभुत सुविधांवरच ताण पडतो अस नाही तर अप्रत्यक्षरीत्या त्याचा प्रतिकुल परिणाम छोट्या-मोठ्या गावांमधुन राहाणार्‍या सर्वसामान्य मराठी जनतेवर होत आहे. उदाहरणच द्यायच झाल तर मुंबईला अखंड २४ तास वीज मिळावी या करीता महाराष्ट्रातील अनेक खेडी १२ ते १५ तासांचे लोडशेडींग विनातक्रार सहन करीत आहेत किंवा मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या आसपासची जनता त्यांची मुल्यवान जमिन देवून वर पाणीटंचाईला तोंड देत आहे ही वस्तुस्थीती आहे. या निरपेक्ष त्यागाची जाणिव असण तर सोडाच पण पोटापाण्यासाठी आलेल्या उपर्‍यांनी म्हणे महाराष्ट्राचा विकास केला असे तारे तोडले जात आहेत. त्यामुळे अश्या प्रवृत्तींना सडेतोडपणे प्रत्युतर देण्यार्‍या राजकीय नेतृत्वाची आज प्रकर्षाने गरज आहे. पण पुरोगामी विचारांचा व नवनवीन संकल्पनांचा तत्परतेने स्विकार करणारा हा समाज गटातटात विभागुन गेला असल्यामुळेच येथे समर्थ राजकीय नेतृत्व उभ राहु शकत नाही हे लक्षात घेण आवश्यक आहे. परिणाम: ज्या समाजाने कधिकाळी देशाच राजकीय व तसेच सामाजीक नेतृत्व केल त्या मराठी भाषीक समाजाची स्वत:च्या राज्यातील आजची अवस्था विश्वास बसणार नाही इतकी वाइट झालेली आहे.

असे हे नकारात्मक व निराशेचे विचार दिपावलीच्या मंगल प्रसंगी व्यक्त करण काहीस अप्रस्तुत आहे याची मला जाणिव नक्कीच आहे. पण आपण आपल्या माणसां समोरच मन मोकळ करतो ना? माझा ब्लॉग लिहायला सुरुवात करताना मी नक्की अस काहीच ठरवलेल नव्हत आणि आजही ते तसच आहे. पण तरीही माझ्या ब्लॉगवर सहज म्हणुन डोकावून जाणारी व माझ्या विषयीच्या आपुलकीने नियमीत पणे भेट देणारी काही मंडळी या सर्व मायबोलीकरांना मी आपलच समजतो. त्याचच दृष्य प्रगटन म्हणजे माझ वेडबागड पण मनातल हे लिहीण. आवडल तर कौतुक करा पण काही आवडल नाही किंवा काही मत पटली नाहीत तर मात्र तुमच मत जरुर जरुर व्यक्त करा हीच विनंती.असो.

आपण सारे उत्सव प्रिय माणस आहोत. श्री गणरायाच्या आगमना पासुन ते दीपावली पर्यंत अनेक सण आपण साजरे करत असतो. या ऊत्सव जत्रेची सांगता दीपावली साजरी करुन होते. हा सण धार्मिक कमी तर उत्सवी जास्त आहे. याच सुमारास आपल्या उष्णकटीबंधातील देशातल्या वातावरणात काहीसा गारवा जाणवु लागलेला असतो. परिक्षा संपल्यामुळे घरा-घरातील लहान मुले नेहमी पेक्षा जरा जास्तच आनंदात असतात. त्याचा परिणाम आपल्यावर सुध्दा झाल्या शिवाय राहात नाहीच.तेव्हा आजुबाजुची परिस्थिती कितीही बिकट असली तरी आशेचा गारवा मनाला उत्साहीत करतोच. अस म्हणतात की कुठल्याही नाटकाचा शेवट हा आशादायी असावा जेणेकरुन प्रेक्षकाला सगळच काही संपलेल नाही व जगण्यासाठी बरच काही शिल्लक आहे अस विश्वास वाटतो. तेव्हा मी सुध्दा या संवादाचा शेवट शुभेच्छा देवुन करतो.


तेव्हा ही दीपावली आपणा सर्वांच्या जिवनात सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य घेवुन येवो याच माझ्या आपणास शुभेच्छा

जय महाराष्ट्र, जय मराठी

मैत्रेय१९६४








१५ ऑक्टो, २०१०

अधर्मयुद्ध

अधर्मयुद्ध

लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पहिली आवृत्ती : मार्च २००९

                    दुसर्‍या महायुध्दाच्या समाप्तीला प्रमुख कारण झाले ते अणुबॉम्ब,ज्यांनी हिरोशीमा आणि नागासकी ही दोन शहर पार उध्वस्त करून टाकल्याने जपानने शरणागती पत्करली. त्यामुळे आजही अणुबॉम्ब, हैड्रोजनबॉम्ब सारख्या संहारक अस्त्रांची चर्चा होत असते.पण त्या व्यतिरीक्त एक छुपा बॉम्ब असा आहे की ज्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे इतका संहार केला आहे की त्या पुढे अणुबॉम्ब,हैड्रोजन बॉम्ब म्हणजे किस झाड की पत्ती.कारण या दोनही बॉम्बच्या साखळी प्रक्रीयेला ( Chain Reaction) काही मर्यादा आहेत. पण या छुप्या बॉम्बच काय ?.हा छुपा बॉम्ब आहे " तेल बॉम्ब ".  दुसर्‍या महायुध्दाच्या समाप्ती नंतर इंग्रजांच्या साम्राज्याला घरघर लागली आणि त्या साम्राज्याची पोकळी भरुन काढण्या साठी ’अमेरिका’ नावाचा देश जगाच्या क्षितीजावर उद्यमान झाला. याच महायुध्दातुन एक गोष्ट नक्की लक्षात आली ती म्हणजे भविष्यात ज्याच्या हाती तेलाची विहीर तोच या पुढे जगाला नाचवी.त्या मुळे सुरुवातीला इंग्लंड आणि त्या नंतर अमेरिका यांनी पश्चिम आशिया- ज्या भागात तेल उत्पादक अरब देश आहेत - मध्ये वर्चस्व ठेवण्यासाठी जे जे काही केल त्याचा श्री.गिरीश कुबेर यांनी त्यांच्या अभ्यासातुन मांडलेला लेखाजोखा म्हणजेच " अधर्मयुद्ध " हे पुस्तक. या पुर्वी श्री.गिरीश कुबेर यांनी " तेल" हा विषय मध्यवर्ती ठेवून "हा तेल नावाचा इतिहास आहे" आणि "एका तेलियाने " ही दोन पुस्तक लिहीली आहेत ती वाचली असतील तर हे पुस्तक निश्चतच जास्त चांगल उमजेल.

                          दुसर्‍या महायुध्दाच्या समाप्ती नंतर मानवाच्या जीवनाला भोवंडुन टाकणारी गती प्राप्त झाली आहे त्या मध्ये तेलाचा मोठा वाटा आहे.त्यामुळे चाकाचा शोध ही मानवाच्या उत्कांतीतील एक टप्पा असेल तर दुसरा टप्पा हा तेलाचा शोध अस नक्कीच म्हणता येईल.विसाव्या शतकात जे अनेक शोध लागले त्याने तेल हे सर्वच देशांची अपरिहार्य गरज झाले आहे. तेल उत्पादीत करणारे देश फार थोडे असुन उर्वरीत देशांच्या विकासाची व अर्थकारणाची प्रगति ही तेल उत्पादक देशांनी ठरवलेल्या तेलाच्या भावांवर अवलंबुन आहे.

                        तेलाच हे महत्व लक्षात घेवून व आपल्या वाढीसाठी भविष्यात लागणारे उर्जास्त्रोत (तेल) पश्चिम आशियातुन मिळणार असल्याचे नक्की झाल्यावर अमेरिकेची वाटचाल ठरली. ती म्हणजे, या प्रदेशातल्या तेलावर जास्तीच जास्त मालकी मिळवायची, अशी मालकी मिळवु शकणार्‍या स्पर्धक देशांना ऎनकेन प्रकारे रोखायच.आपल्या राष्ट्राच हित कशात आहे हे लक्षात घेवुन घोरण आखण यात चुक आहे अस म्हणता येणार नाही पण ते करताना आपण भविष्यात कशाला खतपाणी घालत आहोत याचा सारासार विचार अमेरिकेने केलेला नाही. त्याचाच परिणाम अतिरेकी धर्मवादी दहशतवाद फोफावण्यात झाला असुन त्याची दाहकता सर्व जग, अगदी अमेरिका सुध्दा , आज अनुभवत आहे. तेल उत्पादक अरब देशांवर आपल वर्चस्व राहाव म्हणुन त्या देशांच्या राजकारणात आणि त्या पेक्षाही जास्त धर्मकारणात सुरुवातीला इंग्लंड आणि नंतर अमेरिका यांनी केलेली विधिशुन्य ढवळाढवळ यातुनच धर्माधारित ’जिहादी’ दहशतवाद निर्माण झालेला आहे. या दहशतवादातुन झालेल्या प्रचंड खुनखराबा याची झळ सर्वच जगाने छोट्या-मोठ्या प्रमाणात अनुभवली आहेच.हा दहशतवाद मोठ्या प्रमाणात अमेरिकेनेच कसा पोसला व वाढवला हे या पुस्तकातुन श्री.कुबेर यांनी सप्रमाण दाखवुन दिलेल आहे.हा दहशतवाद आता भस्मासुरा सारखा अमेरिकेवरच उलटला आहे.वर्ड ट्रेड सेंटरचे ते जगप्रसिध्द मनोरे उध्वस्त झाल्या नंतर आपण केलेल्या चुकांची जाणिव काही प्रमाणात अमेरिकेला निश्चितच झाली आहे पण अद्याप तरी ती स्वहितापुर्तीच मर्यादीत असल्या सारखी आहे.

                              अश्या या तेलाच्या इतिहासाचे व त्या मागच्या राजकारणाचे अभ्यासक असलेल्या श्री.कुबेर यांचे हे पुस्तक सर्वांनीच जरुर वाचलेच पाहीले.ते वाचल्यावर आजुबाजुच्या जगाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची जाणिव निर्माण होते. जगाच्या कोपर्‍यात घडण्यार्‍या गोष्टींकडे मला काय त्याच या नजरेन पाहाण्याची सवय किति घातक ठरु शकते याची जाणिव आपल्या सगळ्यांनाच असायला हवीच कारण तेलाच्या हव्यासातुन निर्माण झालेला अमेरिका पुरस्कृत दहशतवाद आपल्याही घराच्या उंबरठ्यावर आता येवू घातला आहे हे या पुस्तकाद्वारे लक्षात येत.पुस्तकातल शेवटच प्रकरण " ते,आपण आणि अधर्मयुध्द " हे तर खास आपणा भारतीयांसाठीच आहे. आपला शेजारी पाकिस्तान हाच तमाम दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाचा जणु विश्वविद्यालयच झालेला आहे.अश्या या पाकिस्तान बरोबर देशातील तथाकथीत विचारवंत आणि प्रसिध्द माध्यम ( विषेश करून इंग्रजी ) हे " अमन की आशा "ची भाषा करीत आहेत. त्या सर्वांनी जर हे पुस्तक वाचल तर त्यांचे डोळे उघडतील आणि त्यांच्या मनात " अमन की निराशा" निर्माण झाल्या शिवाय राहाणार नाही. तेव्हा सर्वांनीच जात, पात, धर्म बाजुला ठेवुन दहशतवादाला अत्यंत डोळस पणे समोर जाण्याची गरज आहे.

                      या पुस्तकाच्या समर्पक प्रस्तावनेच्या शेवटी श्री.कुबेर म्हणतात," वाचकहो,तुम्हाला जर अधर्मयुध्द भावलं, त्यान तुम्ही अस्वस्थ झालात तर श्रेय प्रस्तावनेत वर उल्लेख केलेल्या सर्वांच. त्यात जर कमी पडलो असेन, तर ते न्युन मात्र माझच.". या पुस्तकाच श्रेय नक्की कोणाच हे ठरवण्याचा अधिकार श्री.कुबेर यांचाच असला तरी वाचकांना अस्वस्थ करण्याच श्रेय मात्र त्यांचच हे मात्र निश्चित.

८ सप्टें, २०१०

डायरीच्या पानांमधुन

                                                                डायरीच्या पानांमधुन

रविवारचा काहीसा निवांत वेळ होता. गणपती बाप्पा पण लवकरच येणार आहेत. तेव्हा विचार केला घरात थोडीशी आवराआवर -साफसफाई करुन टाकुया.पण कुठुन सुरुवात करावी तेच उमजत नव्हत. माझी आवराआवर सुरु झाली की घरातल्या सगळ्यांचा कल्लोळ सुरु होतो. हे टाकु नकोस, त्याला मुळीच हात लावु नकोस या आणि अश्या बर्‍याच सुचनांचा माझ्यावर भडीमार सुरु होतो.म्युन्सिपाल्टीचे लोक दिसल्यावर ज्या प्रमाणे फेरीवाल्यांची धावपळ सुरु होते तसच घरातल वातावरण तंग होत.ईतर वेळा कितीही सांगीतल तरी आवराआवर न करणारी मुल सुध्दा त्यांना हव्या असणार्‍या त्यांच्या वस्तु पटापट आवरतात.त्यांना माहीत आहे की माझी साफसफाई मोहीम सुरु झाली की त्यांच्या बर्‍याच गोष्टी काही न विचारता अडगळ म्हणुन टाकल्या जावु शकतात.अर्थात त्याचा दुसराही फायदा घरातल्यांना होतोच तो म्हणजे पुढचा किमान एक महिना घरात कुठलीही गोष्ट सापडली नाही की त्याच श्रेय(?) मलाच दिल जात.
त्यामुळे मी घरातल्या सगळ्यांना दोन तासात त्यांच्या वस्तु आवरायला दोन तासांचा अल्टीमेटम दिला आणि तो पर्यंत माझाच कप्पा पहिल्यांदा आवरायला घेतला.कप्पा आवरताना अनेक गोष्टी माझ्या नजरेस पडल्या,ज्या शोधण्यासाठी मी माझा आणि घरातल्यांचा रक्तदाब कितीतरी वेळा वाढवला होता.तेव्हा मनाशीच खजील होवून ठरवल की आपला कप्पा आज काही केल्या संपुर्ण लावायचाच.
कप्पा आवरता आवरता हाताला लागल्या पार जुन्या पुराण्या छोट्या पॉकेट डायर्‍यांचा एकत्र बांधुन ठेवलेला गठ्ठा.आताशा अश्या डायर्‍या फारश्या कोणी वापरत नाहीत पण या डायर्‍यांमध्ये छोट्या छोट्या नोंदीतर चटकन करता यायच्याच पण शेवटच्या काही पानांवर फोन नंबर लिहीण्याची सोय असायची.अर्थातच २७-२८ वर्षांपुर्वी टेलीफोन हे फ़ारच कमी जणांकडे असल्याने ती शेवटची काही पान पण पुर्ण भरायची नाहीत.आता मोबाईलच्या जमान्यात डायरी हा प्रकारच आऊटडेटॆ्ड झाला आहे. कारण मोबाईल मध्ये सर्व काही सेव्ह करता येत.अगदी पत्ते, मिटींगच्या वेळा पासुन ते अगदी वाढदिवसच्या नोंदी पर्यंत.....
तेव्हा इतकी वर्ष आवर्जुन जपुन ठेवलेल्या या डायर्‍यांन मध्ये आपण काय काय लिहिल होत ते मी वाचायच ठरवल.या डायर्‍या साधारणपणे तारुण्यपिटीका येणे व गध्देपंचविशी पार करणे या दरम्यानच्या काळातील होत्या.साध्या सरळ शब्दात माझ्या वयाची १७-१८ ते २५ वर्षे या काळातील होत्या.
तो काळ आठवला की परत येकदा तारुण्यात गेल्याची गोड शिरशिरी मनात येतेच.पावलो पावली प्रेमात पडणे -हो पडणेच -आणि त्या पडण्याच्या जखमा पुरत्या भरण्या पुर्वीच परत परत प्रेमात पडणे असा रोमांचकारी व साहसपुर्ण असा तो काळ होता.मग अश्या घटनांच्या काही नोंदी या डायर्‍यां मध्ये नक्कीच असणार होत्या नाही का?
पहीलीच डायरी चाळताना जुन महिन्यात एक नोंद आढळली.ते कॉलेजच पहिलच वर्ष आणि जुनचा दुसराच आठवडा."आषाढ्यस्य प्रथम दिवसे"ला असाव असच पावसाळी व कुंद वातावरण. कॉलेजचा असा स्पॉट निवडला होता भिडु की गेट के अंदर आने वाली हर एक बाला ईस हिरोकी नजरसे बच नही पाये.गेटसे हसिना तो बहुत सारी आ रही थी मगर दीलके अंदरका तार छेडे ऎसी कोई नजर नही आ रही थी.बस पल गुजरते जा रहे थे इतक्यात ती आली.ती आली, तिने पाहील आणि दुसर-तिसर काही न होता मी परत येकदा प्रेमात पडलो.ती ऎतिहासीक नोंद मग डायरीत करण सहाजीकच होत नाही का ?
मग नेहमीचेच हातखंडे वापरुन ओळख करुन घेणे वैगरे प्रकार झाले.मग डायरीत अजुन एक नोंद होती तिच्या वाढदिवसाची..... सॉरी बर्थडेची. मुलींची बरेच वर्ष वाढ होत नसल्याने त्यांचा बर्थडे साजरा होत असतो,वाढदिवस नाही.प्रेमात अजुनही पडु पाहाणार्‍या सर्वांना माझ्या तर्फे महत्वाची टीप देत आहे.तेव्हा हे जरुर लक्षात असुद्या.मी सुरुवातीलाच कबुल करुन टाकल्या प्रमाणे या प्रेमातही मी पडलोच.पण हे पडण जरा जास्तच जोराच असल्याने त्या वर्षी असल्या दुसर्‍या नोंदी डायरीत नाहीत.
मला एक दुसरी सवय होती ती म्हणजे मित्रांचे पत्ते त्यांचा वाढदिवस ज्या दिवशी असेल त्या तारखेलाच नोंदवून ठेवायचे.म्हणजे पत्ता ही राहातो आणि ते पान न विसरता त्या दिवशी मित्राच्या वाढदिवसाची आपसुन आठवण करुन देत असे.त्याचे फायदे काय हे हॉस्टेल लाईफ अनुभवलेल्यांना सांगायला हवच का ?.मित्राचा वाढदिवस साजरा करण म्हणजे त्याचा खिसा चांगलाच हलका करण हीच तर मोठी चैन करायची संधी असायची.ईतर वेळला पैसे द्यायला टाळाटाळ करणारे मित्र सुध्दा या वेळी आवर्जून पैसे खर्च करत असत.घरापासुन दुर असणारे आम्ही त्या दिवशी फारच सेंटी होत असल्याने किमान त्या दिवशी कोणालाच नाराज करु नये अशीच भावना सर्वांची असायची.
मग प्रत्येक डायरी चाळत गेलो.त्या वेळी अस लक्षात आल की फार कमी पत्ते पुढच्या वर्षीच्या डायर्‍यांमध्ये रिपीट झाले आहेत.याचाच दुसरा अर्थ असा की बरेचसे मित्र हे त्या त्या वर्षां नंतर दुरावले किंवा काही इतर कारणाने दुर निघुन गेले.
या सात ते आठ वर्षांच्या डायर्‍या चाळल्या नंतर अस लक्षात आल की फक्त चार मित्रांचेच पत्ते शेवटच्या डायरीत रिपीट झाले आहेत.आयुष्यातील त्या मोलाच्या वर्षांत माझ्या मैत्रीच्या अ‍ॅसेट बाजुला होते फक्त चार मित्र.आणि त्या वर्षांतील लॉस होता तो मोजण्या पलीकडचा. याच काळात प्रेमात वारंवार पडत होतो आणि बरेचदा भयंकर दुखावलेला देखील होतो त्या वेळी सावरले ते माझ्या या अ‍ॅसेट बाजुनेच.आज आम्ही मित्र एकमेकां पासुन अंतराच्या दृष्टीने फार दुर गेलेलो आहोत. मोबाईलच्या सोईमुळे क्वचित कधिकाळी बोलण-एसएमएस होत नाही असं नाही .पण भेटी जवळपास दुरापास्त झाल्या आहेत.पण तरीही मनात पुर्ण खात्री आहे आजही आमच्यातली ती आपुलकी डायरीच्याच पानांवर नव्हे तर मनामनात कायम आहे.पण या धावपळीच्या आणि यशस्वी होण्याच्या जिवघेण्या स्पर्धेत तिची आठवण जपायला वेळ तो कोणाला.
तेव्हा मला तर अस वाटत की आपण जसा कपाटातला कप्पा जसा मधुन मधुन आवरतो अगदी तसच आधुन मधुन वेळ काढुन मनाचा कप्पा जरा आवरला पाहीजे.न जाणो त्यातुनही काही अ‍ॅसेट्स जरुर सापडतील.तुम्हाला काय वाटत ?
त्यामुळे मी तरी वेळात वेळ काढुन मनाचा कप्पा आवरुन बघण्याचा जरुर प्रयत्न करणार आहे कारण त्यातुन मनाच्या अडगळीत लपलेले काही अ‍ॅसेट्स माझ्या हाती लागतील याची मला खात्री आहे.आशा करतो तुम्हीहि जरुर असाच प्रयत्न कराल आणि तुम्हालाही लक्षात येईल की वाढत्या वयासोबत गमावलेल खुपच आहे पण जे कमावलेल आहे ते पण कमी नक्कीच नाही.

६ सप्टें, २०१०

एका गोड मुलीची गोष्ट

               एका गोड मुलीची गोष्ट

परवा परवाचीच गोष्ट. माझी मुलगी टी.व्ही. वर एक चित्रपट पाहात होती. एक जागरुक बाप (?) म्हणुन ती नक्की काय पाहात आहे हे मी उत्सुकतेने डोकावून बघीतलं. आणि बघता बघता मी पण त्या चित्रपटात गुंगून गेलो.चित्रपटाची गोष्ट साधी सोपी होती.चित्रपटाची नायिका आहे एक लहान मुलगी जी एक प्रसि्ध्द गायिका आहे. लहानपणीच आई गेलेल्या या मुलीच् स्वत:च एक भावविश्व आहे ज्यात आहेत , तिचे बाबा, भाउ एक जीवलग मैत्रीण आणि भाबडा मित्र.तिच्या बिनमुखवट्याच्या जगातले हे सर्व तिच्यावर तिच्या गुण दोषांसकट प्रेम करत असतात आणि ती पण ........
तरीही लहान वयातल्या प्रसिध्दी मुळे तिच बालपण कुठेतरी हरवून गेल असल्याने तिच्यातल निरागस मन कंटाळून गेल आहे.त्या मुळे ही मुलगी तिच्या शहरापासुन दुर जायच ठरवते. त्यानुसार ती तिच्या आपल्या माणसां सोबत तिच्या दिवंगत आईच्या माहेरी जाते. तिच्या आजीच या आईविना मुलीवर अतिशय प्रेम आहे. ती आजी आपल्या अकाली देवाघरी गेलेल्या मुलीच प्रतिबिंबच जणु या नाती मध्ये पाहात असावी.त्या मुळे आजी कडुन कॊडकौतुक करुन घेण्यात या मुलीचा वेळ मजेत चालला आहे.पण अचानक काही घटना अश्या घडत जातात की ज्या मुळे ह्या मुलीच गुपीत उघड होत.सगळ्या गावाला कळत की ही लहान मुलगी एक प्रसिध्द गायिका आहे.आपले गुपीत सगळ्या गावाला कळल आहे हे लक्षात आल्यावर ती मुलगी परत एकदा आपल्या मुळ शहरी जीवनाकडे नाईलाजाने परत येते.
पाहा ना ही गोष्ट किती साधी सरळ आहे.पण त्या मध्ये दाखवलेल्या काही गोष्टी बरच काही सांगून जातात.प्रसिध्दी मुळे अकाली बालपण हरवून बसलेली ती मुलगी,वडीलांचे व त्या मुलीचे आपसातील भावबंध ,आजीची निरपेक्ष प्रेमळ माया,त्या मुलीचे एखाद्या सर्वसामान्य मुली सारखे आपल्या मैत्रीणी बरॊबर होणारे रुसवेफूगवे हे सर्व अतिशय सहज व सुंदर पणॆ त्या सिनेमात मांडले आहे.
हे सगळ वाचल्यावर तुम्हाला आपल्या देशात वर्षाला शेकडोवारी निर्माण होणार्‍या एखाद्या कौटुंबीक सिनेमाची कथा मी सांगत आहे अस वाटल असेल नाही का ?पण ही कथा आहे हॅना मोंटानाच्या एका चित्रपटाची. हॅना मोंटानाचा चित्रपट असो वा टीव्हीवर नियमित पणे सादर होणारी सिरीयल त्या मध्ये जी जीवनमुल्ये दाखवली आहेत ती पाहीली की अमेरीका असो वा आपला देश दोन्ही कडे आदर्श मानली गेलेली जीवनमुल्ये यातील साम्य प्रकर्षाने जाणवत.यातुन हेच सिध्द होत की माणूस कुठलाही असो मुलभुत भावना सारख्याच असतात.
हॅना मोंटानाच्या सिरीयलच्या एका भागात तिच्या वडीलांच्या आईच एक पात्र दाखवल आहे.त्या भागात अस दाखवल आहे की सारखी सारखी बंद पडणारी या आजीची जुनी पुराणी खटारा मोटार भंगारात देवून मायली व तिचे वडिल नविन गाडी तिला भेट देतात........... त्यांना अस वाटत की नविन गाडी पाहुन आजी खुष होईल. पण होत भलतचं. या आजीच आपल्या जुन्या पुराण्या खटारा मोटार गाडीवर खुप प्रेम आहे कारण त्या गाडी सोबत जुळल्या आहेत तिच्या तरुण पणातल्या गॊड आठवणी.त्यामुळे आजी जेव्हा तिच्या जुन्या गाडी बाबतच्या भावना जेव्हा व्यक्त करते तेव्हा मायली व तिच्या वडिलांना आपली चुक उमजते. वापरा आणि फेका ( Use & throw ) या असल्या जमान्यातील ही अमेरीकन आजी आपल्याला पण आपल्या आजीची आठवण करुन देत नाही का?.मग आठवते ती आपल्या आजीने तिच्या जुन्या पान्या नऊवारी पातळ्यां पासुन बनललेल्या गोधड्यांची उब. आज ती मायेची उब कोठेतरी हरवली आहे.
हॅना मोंटाना ही भुमिका करणारी मायली सायरस आणि हॅना हे पात्र यांना वेगळ करताच येत नाही.ही भुमिका मायली जणु जगतेच आहे असच वाटत कारण मायलीने हॅनाची भुमिका तिच्यातली निरपेक्ष प्रेमाला असुसलेली छोटी मुलगी जाणुन घेवून साकारली आहे. आणि महणूनच हया लहान गोड मुलीची गोष्ट मला पाहाताना खुप आनंद वाटतो.

३० ऑग, २०१०

दहीहंडी- एक दुसरी बाजु

                                         दहीहंडी- एक दुसरी बाजु


         गेल्याच आठवड्यात २-४ दिवसांच्या अंतराने "दहीहंडी" बाबत दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी अशी होती की मुंबईतल्या जुन्या व नामवंत दहीहंडी मंडळांनी या वर्षी थर लावण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.तर दुसरी बातमी अशी होती की,उपनगरातल्या दहीहंडी मंडळांच्या संख्येत वाढ झाली असुन त्यातील एक मंडळ या वर्षी थरांचा नविन विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे.एकीकडे शहरातली जुनी नामांकीत दहीहंडी मंडळे थरांच्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेत असताना नव्याने तयार झालेली दहीहंडी मंडळे अधिक अधिक थर लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत हा विरोधाभास दिसुन येत आहे.दहीहंडी मध्ये भाग घेणारी बहुतांश कार्यकर्ते मंडळी मराठीच मग शहरातल्या व उपनगरातल्या मंडळांच्या दृष्टीकोनात व विचारात विरोधाभास का बर दिसुन येत असावा?
              मुंबईतला दहीहंडी उत्सव अनेक वर्षां पासून साजरा होत आहे. तथापी गेल्या ८-१० वर्षात तो साजरा करण्याच्या पध्दती मध्ये जाणवण्याजोगा फ़रक झालेला आहे.८-१० वर्षांपुर्वी दहीहंडीत भाग घेणे यात निव्वळ हौस व रग होती तर आता मात्र यात स्पर्धा व व्यवसायीकपणा आला आहे.जुन्या काळी ४-५ थर रचणे यात गंमत होती तर आता ७-८-९ थर लावण्यात एक थरार निश्चित तर आहेच पण त्याही पेक्षा मंडळा मंडळा मधिल जाणवणारी सुप्त स्पर्धा आहे.पाण्याच्या टंचाईमुळॆ म्हणा किंवा चाळीचाळीतुन राहाणारा मराठी कामगार वर्ग व पांढरपेशा समाज आता शहरामधुन उपनगरांमध्ये स्थलांतरीत झालेला आहे म्हणुन म्हणा,दहीहंडीतल्या गोपाळांवर पाणी टाकणॆ किंवा गॅलरीत सहकुटुंब उभे राहुन थर रचणार्‍यांच कौतुक करण हे आताशा दिसत नाही. एकंदरीतच काय हा उत्सव सामान्यांचा राहीलेला नाही.आता दहीहंडी उत्सव म्हणजे राजकीय पक्षांनी व नेत्यांनी प्रायोजीत केलेला उत्सव ( इव्हेंट) झालेला आहे. एखाद्या क्षेत्रात राजकीय मंडळी आली की जे काही बरेवाईट त्याच्या बरोबर येत ते सर्व या उत्सवात आलेल आहे.सर्वसामान्यांचा हा उत्सव हा आता पुर्णत: व्यावसायीक झाला आहे. दोन वर्षापुर्वी मंडळा मंडळातील याच स्पर्धेतुन ठाण्या मध्ये दोन मंडळांच्या तरुणांमध्ये मारामारी झाली होती.अर्थात या मागे स्पर्धे बरोबरच पारितोषीकाची भरभक्कम रक्कम हेही एक कारण होतच. असे प्रकार घडण म्हणजे दहीहंडी उत्सवाला गालबोट लावण्या सारखच आहे.
वास्तवीक पाहाता दहीहंडी असो वा गणेशोत्सव या मधुन सर्वांनी एकत्र याव आणि एकमेकांच्या सहकार्याने काही विधायक कार्यक्रम हाती घ्यावेत ही अपेक्षा आहे.पण आज होत काय आहे की या मधुन मराठी माणुस एक होण्याऎवजी एकमेकांचीच डोकी फ़ोडू लागला आहे.
त्यातच गिरणी कामगारांच्या संपा नंतर संपुर्ण कामगार वर्गच शहरातुन पार नाहीसा झालेला आहे तर पांढरपेशा मराठी समाज परिस्थीतीच्या रेट्यापुढे हतबल होवुन प्रथमत: उपनगरां मध्ये आणि हळूहळू बोरीवली-ठाण्या पलीकडे फ़ेकला जात आहे.हे सर्व असच चालू राहील तर अजुन ८-१० वर्षांनी पालघर-बदलापुर किंबहूना त्या पेक्षाही पुढेच दहीहंडी साजरी होईल अशीच बिकट परिस्थीती दिसते आहे.मोठ्या प्रमाणात मुंबईतुन बाहेर फ़ेकल्या जाणार्‍या मराठी माणसांच वास्तव हे कटू असल तरी नाकारता येणार नाही.जशी जशी ही मराठी माणस दुरदुर फेकली जातील तस तस दहीहंडी-गणेशोत्सव हे मराठमोळे सण मुंबईत साजरे हॊण कमी कमी होत जाणार आहे.त्या मुळे शहरातली जुनी नामांकीत दहीहंडी मंडळे जेव्हा थरांच्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतात त्यावेळी तो त्यांनी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेपोटी घेतलेला निर्णय नसुन कार्यकर्त्यांच्या अभावी घेतला गेलेला आहे की काय अशी रास्त शंका मनात उभी राहाते.
हे सगळ पाहील की भविष्या मध्ये मुंबई शहरात मराठी माणसांना भवितव्य व जागा राहील की नाही याच काहुर मनात उमटत.तेव्हा देव न करो अन मराठी माणसांच्या अभावी दहीहंडी व गणेशोत्सव हे उत्सव मुंबईत बंद न पडोत अशी येत्या गणेशोत्सवात श्री गणराया पुढे मन:पुर्वक प्रार्थना करण्या शिवाय दुसर आपल्या हाती तरी काय़?

                                                    जय महाराष्ट्र जय मराठी