सिडनी कसोटीमध्ये काय चाललय हे पाहण्यासाठी सकाळी उठल्यावर टि.व्ही. लावला. पाहतो तर काय आपली बॅटींग सुरु होती. २ विकेट्स अगोदरच गेलेल्या होत्या आणि सेहवाग- सचिन खेळत होते. हे पाहिल्यावर पुढच्या दुर्दैवाची कल्पना यायला हवी होती पण आशा सुटत नाही हे खरंच.
त्या दोघांची बॅटींग बघताना लवकर कोण आऊट होईल हे ह्याचा विचार करत होतो. तेव्हड्यात सेहवाग बाद झाला. मग पाठोपाठ लक्ष्मण. त्या नंतर मात्र थोड्यावेळ सचिन- कोहलीच्या जोडीने काही काळ वेळ घेतला. मग कोहली आउट झाला. अर्थात त्या नंतर आशा टिकवुन ठेवणं फारच अशक्य झाल्यानं टि.व्ही बंद केला आणि हताश होवुन निमुट्पणे ऑफीसला जाण्याची तयारी केली. घरातुन बाहेर पडताना मात्र माझेच खांदे श्रीनाथ सारखे पडलेले होते.
आज लोकल १०-१५ मिनीट उशिरा होत्या त्यामुळे प्लॅट्फॉर्मवर चांगलीच गर्दी होती. त्यामुळे लोकलध्ये चढताना चांगलच अंगमर्दन झाल. अंग चोरत चोरत आत ग्रुपपाशी पोहचाव लागल्याने एक मात्र झालं ते म्हणजे पडलेले खांदे परत एकदा सरळ झाले. एव्हाना लोकलने वेग पकडलेला असल्याने गच्च भरलेल्या बरणीमध्ये हालवुन हालवुन शेंगदाणे भरतात तशी डब्यातली गर्दी सेटल झाली होती. त्या मुळे माझ्या एका मित्राला घरी फोन करुन स्कोर विचारण्याची अवदसा सुचली. अवदसाच म्हणायची नाहीतर काय?. कारण त्याच्या वडिलांनी स्कोर सांगितल्यावर तो असा काही ओरडला की आजुबाजुचे सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. मी मात्र शांतपणे विचारलं, सचिनने ५० तरी केल्या का रे?.मग मात्र मित्र माझ्यावर भडकलाच. खरतर तो स्वत:वर चिडला होता कारण त्याने स्कोर विचारला नसता तर ऑफीस मध्ये जाई पर्यंत सचिन अजुन खेळतोय या भ्रमात त्याचा प्रवासाचा वेळ चांगला गेला असता. सचिन गेला म्हटल्यावर खरतर पुर्वी आमच्या चर्चा रंगायच्या पण आज सगळे गप्पच होते. ना कोणाला सचिनच शंभराव शतक न झाल्याची हळहळ वाटली ना तो कसा आऊट झाला ते जाणुन घेण्याची ईच्छा.
नंतरचा दिवस नेहमी सारखाच गेला. घरी आल्यावर आजचे ’हायलाईट्स’ सॉरी आपल्या टीमचे लो-लाईट्स शांतपणे पाहीले. काय नविन होतं त्यात?. लाल चेरीला खेळपट्टीवर जरा जास्त उसळी मिळाली आणि हवेत तो जरा स्वींग व्हायला लागला की विकेटच्या मागे असलेल्या क्षेत्ररक्षकांना झेलचा सराव देण हा उपचार नेहमी प्रमाणे या वेळीही यथासांग पार पडला. सिडनीची आजची खेळपट्टी सकाळी काही प्रमाणात बॉलरना साथ देत होती हे मान्य केलं तरी त्या वर आपल्या तथाकथित बलाढ्य फलंदाजीला तोंड देणं अवघड होतं अस काही दिसलं नाही. आपले पहिले सहाही फलंदाज आऊट झाले ते त्यांच्या कर्माने आणि त्यातले सेहवाग-सचिन थोडेफार टीकले ते दैवाची साथ असल्याने. आपल्या कोणाही फलंदाजांच्या देहबोलीत त्याला टिचुन फलंदाजी करायची आहे असा आत्मविश्वास दिसुन आला नाही. याचाच अर्थ मागच्या मेलबोर्न कसोटीतल्या अनुभवातुन आपल्या महान फलंदाजांनी काहीही धडा घेतलेला नाही.
मॅग्रा आणि वॉर्न यांच्या सारख्या महान बॉलरना सामना करताना राहुल,लक्ष्मण आणि सचिन या त्रईने या पुर्वी सातत्याने दाखवलेलं टेंपरामेंट त्यांच्या दोनही कसोट्यां मधल्या खेळींत अजुन तरी जाणवलं नाही. अर्थात अजुनही सचिनच्या बॅटची मधली तार जेव्हा छेडली जाते तेव्हा येणारा मधुर आवाज आणि त्या पाठोपाठ सिमारेषे धाव घेणारा बॉल पाहाताना तितकीच मजा येते. राहुल द्रविड्च्या बॅटवर डोक आपटुन-आपटुन निराश होणारी रेड चेरी आणि दमले भागलेले बॉलर पाहाताना कसोटी क्रिकेट्चा खरा चार्म आजही कळतो. लक्ष्मणची सहज सोपी शैलीदार फलंदाजी बघताना एखादा चित्रकार ब्रशचे सपासप फटकारे मारुन जस चित्र साकारतो तशी त्याची खेळी वाटते. पण......
आता सचिनच्या खेळीत रागाची झलक दिसते पण संपुर्ण राग काही रंगत नाही. आता द्रविडच्या बॅटला सहजपणे चकवुन बॉल स्टंप विखरुन टाकतात. आता चित्र संपुर्ण साकार होण्यापुर्वीच लक्ष्मणची खेळी अचानक संपुन जाते.
या महान फलंदाजांच अपयश सहनही होत नाही ना पाहावतं नाही. त्यातच टी २० च्या अतिरेकामुळे गुणवत्ता असलेली दुसरी फळी एकतर दुखापतीमुळे संघात आत बाहेर असते किंवा त्यांच्या तंत्रात त्यामुळे मुलभुत दोष निर्माण होतात. याचाच परिणाम म्हणुन परदेशात झालेले सलग ५ पराभव आणि ६ व्या पराजयाच्या उंबरठ्यावर आज उभ्या असलेल्या भारतीय संघाला पाहुन कसोटी क्रिकेटवर मनापासुन प्रेम करणार्यांना फार वेदना होतात.
आज आपल्या टिमने उणीपुरी ६० षटकं सुद्धा खेळुन काढलेली नाहीत. तर झहिरच्या अप्रतिम ’डोकेबाज’ बॉलींग मुळे पहिल्या ३ विकेट्स पटापट गमावुनही, आजी-माजी कर्णधारांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसा अखेर भक्कम स्थितीत आहे. खेळपट्टीच एकंदर स्वरुप बघता ऑस्ट्रेलियाला भरपुर धावसंख्या उभारायला काहीच अडचण येउ नये.
तेव्हा भारताला ही कसोटी आता वाचवायची असेल तर सचिनच्या १०० व्या शतकाची जेव्हडी आवश्यकता आहे तितकीच द्रविड आणि लक्ष्मणच्या मॅरेथॉन भागिदारीची. ऐकताय ना रे बाबांनो.