महाराष्ट्रात श्री पंढरीरायाच्या वारीची मोठी परंपरा आहे.ही वारी नित्यनेमाने दरवर्षी पंढरपुरला जाण्यासाठी निघत असते. अशीच एक दुसरी वारी महाराष्ट्रात आहे. पंढरीची वारी ही भक्तीची वारी आहे तर ही दुसरी वारी आनंदोत्सवाची आहे.या दुसर्या वारीत भक्ती नाही अस नाही पण भक्ती पेक्षाही जास्त आहे तो आनंदाचा जल्लोष. ही आनंदाची वारी आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री गणरायाची. ही वारी ’निघत’ नसुन ती ’येत’ असते. पंढरपुरच्या वारीत भक्तजन पंढरीरायाच्या दर्शनासाठी निघतात तर या वारीमध्ये साक्षात श्री गणराय आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येतात.परमेश्वराने भक्त्यांच्या भेटीसाठी येण्याच दुसर कुठल उदाहरण मला तरी आठवत नाही.
अश्या या श्री गणरायाच घराघरात व सार्वजनिक उत्सव मंडळ्यांच्या मंडपात आज आगमन झालेल आहे.घरातील व मंडपातील उत्साही मंडळी केलेल्या सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत.याच धामधुमीत आता पर्यंत सजावटीच्या कामात मदत करण्यासाठी अजीबात न फ़िरकलेली काही मंडळी या क्षणी त्यांच्या सुचनांचा भडिमार करायला उगवलेली आहेत. त्यांच्या या सुचनांचा त्रास गेले काही दिवस सतत सजावटिसाठी अहोरात्र मेहनत घेत असलेल्या मंडळींना होत असल्याने चिड तर आलेली आहे. पण तरीही या आनंदोत्सवाला भांडणाच गालबोट लागु नये म्हणून शक्य तितक्या सुचना स्विकारल्या जात आहेत.वैताग येव्हडाच आहे की ही सुचना देणारी अनाहुत मंडळी अंगाला तोषीश न लावता मुकादमगिरी करत आहेत.या सगळ्यात घरातल्या छोट्या मंडळींना कस बर विसरुन चालेल. यांच्या तर कल्पनेच्या भरार्या विचारायलाच नकॊ. त्यांच्या सुचनाही कधी नव्हे त्या गंभीरपणे स्विकारुन त्यांचा सजावटीत आवर्जुन समावेश केला जात आहे. पण ही मंडळी जरा जादाच हौशी असल्याने त्यांची सजावटीच्या कामात लुडबूड सुरु आहे. या लुडबुडीचा त्रास सहन होत नाही पण बोलायची तर अज्याबात सोय नाही असा आहे. घरातील मुलं सजावटीच्या कामात गुंगलेली असल्याने कधी नव्हे ते घरातील समस्त महिला वर्गाला त्यांची काम निवांत पणे पार पडण शक्य होत आहे. अश्या तर्हेने सगळीकडे एकच धांदल सुरु आहे पण तिचा ना क्षीण ना त्रास कारण हे सगळ चालल आहे ते भेटिसाठी आवर्जुन आलेल्या लाडक्या श्री गणराया स्वागतासाठी.
एकीकडे ही धांदल तर दुसरीकडे अजुनही घरा समोरच्या रस्त्यातुन ढोल-ताश्यांच्या गजरात जात असलेल्या श्री गणरायाच्या मिरवणुका.मिरवणुकीतील ताश्यांच्या जोषपुर्ण आवाज मनातल्या मनात पावलं थिरकवत आहे.अश्या या मिरवणुकां पाहाताना त्यामध्ये बेभान होवुन नाचणार्या तरूणाईची झिंग बघणार्यांच्या मनात पाहाता पाहाता कधी उतरते तेच कळत नाही.आणि त्याच जोषातुन मनामनात घुमतो एकच आवाज......
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
1 टिप्पणी:
" गणपती बाप्पा मोरया !!!"
टिप्पणी पोस्ट करा