ज्युलीयन क्रॅंडॉल हॉलिक या भारताशी जिव्हाळ्याच नात जडलेल्या अभ्यासु पत्रकाराच ’गंगा’ हे पुस्तक श्री प्रकाश अकोलकर यांनी अमेय प्रकाशन, पुणे यांच्यावतीने मराठीत अनुवादीत केलेलं आहे. ज्युलीयन क्रॅंडॉल हॉलिक यांनी केलेल्या गंगेच्या परिक्रमेतुन त्यांना जी गंगा गोमुख ते पार समुद्राला मिळेपर्यंत ठाईठाई दिसली याचच प्रवास वर्णन फक्त या पुस्तकात नसुन गंगेच्या बाबत सध्या जाणावणार्या व भविष्यात उपस्थित होणार्या समस्यांचा अभ्यासपुर्ण मागोवा या पुस्तकात घेतला आहे असं म्हटल तर ते वावग ठरणार नाही.
’गंगा’ हा शब्द आपल्या प्रत्येकाच्या मनावर कोरला जातो ते आजीच्या-आईच्या तोंडुन ऎकलेल्या विविध पौराणीक कथांमधुन. या सर्व कथांमधुन ’गंगा’ ही नदी आहे या पेक्षाही तिच दैवीपण मनावर अधिक ठसतं. तमाम भारतीयांच्या, विशेष करुन हिंदुंच्या, मनातील गंगेच हे देवतारुप भाषा-प्रांत यांच्यातील दिवसेन दिवस तिव्र व ठळक होत जाणार्या भेद-रेषांच्याही पलिकडचं आहे.दक्षिणेतला मद्रासी असो की उत्तरेतला भैया, पश्चिमेतला मरहट्टा असो की पुर्वेतला बाबु मोशाय या सगळ्यांच्याच मनात आहे वरदायिनी गंगेच पवित्र व पापनाशिनी देवतारुप.त्या मुळेच जीवनाच्या अंतिम क्षणी आपल्या मुखात गंगाजल पडाव या साठी घराघरात ठेवला जातो,पुजला जातो तो गंगेचा चिमुकला घडा.जीवनातील अनेक मोहांचा पाठलाग करताना व त्यांचा उपभोग घेताना माता गंगेची आठवण कदाचित होत नसेलही पण आत्म्याच्या अंतिम यात्रेला सुरुवात करताना प्रत्येक हिंदुला गंगेच हे दैवी पावित्र आपल्या सगळ्या पापांचा नाश होवून आपण परमेश्वराला सामोर जाणार आहोत याच आत्मिक समाधान मिळवुन देतं.
अश्या मनामनात रुजलेल्या गंगेची परिक्रमा करण्याची इच्छा अनेकांच्या मनात असली तरी ती करण्याच भाग्य फार थोड्या लोकांना साध्य होत.अर्थात या भाग्यवान लोकांनी जरी परिक्रमा केली तरी त्यांचा त्या मागचा एकमेव हेतु हा धार्मिक असल्याने गंगेच्या सद्यस्थिती विषयी परखड विचार करण्याची अपेक्षा त्यांच्या कडुन पुर्ण होत नाही.अश्या वेळी ज्युलीयन हॉलिक यांच्या सारख्या अभ्यासु पत्रकाराने त्रयस्थ व निरक्षिर बुद्धीने गंगेच्या विविध रुपांचा व अवस्थांचा केलेला अभ्यास आपल्या डोळ्यांमध्ये अंजन घातल्या शिवाय राहात नाही.त्या मुळेच ज्युलीयन हॉलिक यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेले भाष्य आपल्या भारतीय लोकांच्या मनोवृत्तीवर टिका करणारे वाटले तरी त्यातील सत्यता नाकारता येत नाही. ते म्हणतात,
" गंगा नदीला देवता मानुन तिची उपासना करणारे भारतीय ,तिच नदी इतकी प्रदुषीत कशी काय करु शकतात?आपल्या पापा पासुन मुक्ति मिळावी म्हणुन दररोज सकाळी या नदीत पवित्र स्नान करणारे लक्षावधी लोक याच नदीत मोठ्या प्रमाणावर मैला आणि औद्योगिक कचरा कसा काय टाकु धजतात?या विरोधाभासाच स्पष्टीकरण कस्म देता येईल?"
या हॉलिक यांना जाणवलेल्या या विरोधाभासाचा स्वत: पुरता शोध घेण्यासाठी त्यांनी गंगेची परिक्रमा करण्याच ठरवलं.या परिक्रमेत त्यांना गंगेची चांगली-वाईट अशी दोन्ही रुप वेगवेगळ्या ठिकाणी दिसुन आली.भुमीला सुजलाम-सुफलाम करणारी गंगा कधि कधि तांडव करत विनाश करत असलीतरी लोकांच्या मनात असलेल्या तिच्या दैवी प्रतिमेला मात्र कुठेच तडा जात नाही याच या परदेशी अभ्यासकाला मोठं आश्चर्य व कौतुक वाटतं.गंगेवर बांधलेल्या मोठ्या मोठ्या धरणांमुळे गंगेचा सातत्याने वाहाणारा जलौघ बर्याच ठिकाणी तिच एखाद्या नाल्यात रुपांतर करत आहे.त्यातच गंगेच्या काठावर वसलेल्या शहरांतील वाढत्या लोकसंख्ये मुळे,शेतीसाठी सतत वाढत चाललेल्या तिच्या पाण्याच्या उपश्या मुळे , औद्योगिक कारणां मुळे मोठ्या प्रमाणात तिच्यात सोडल्या जाणार्या रसायनां मुळे पवित्र अश्या गंगेच पावित्र नष्ट होत आहे हे त्यांना परिक्रमेतुन दिसुन आलं. तेव्हा या व अश्या अनेक प्रकारच्या उपस्थित झालेल्या समस्यांवर उपाययोजना करताना केवळ वैद्यानिक दृष्टीकोनातुन विचार न करता गंगेच्या विषयीच्या लोकांच्या भावनांचा देखिल विचार करायलाच पाहिजे कारण गंगेतील प्रदुषण दुर करण्याचे खरे उपाय भारतीय संस्कृतीतच दडले आहेत अस हॉलिक यांनी अनुभवांती मत मांडल आहे.त्यातच ’ग्लोबल वार्मिंग’मुळे गंगेसारख्या हिमनद्यांवर होणारे भविष्यातील परिणाम हे पुढील अनेक पिढ्यांचा विचार करता अधिक चिंताजनक आहेत ज्यामुळे पाण्याचा मुळ स्त्रोत आटु शकतो याची जाणिव हॉलिक करुन देतात तेव्हा माता गंगा नष्ट होणार की काय या कल्पनेनं मन विषण्ण होतं. गंगा ही फक्त नदी नसुन ती त्याहुनही अधिक देवी आहे अशी भारतीयांची पिढ्यान पिढ्या श्रद्धा आहे. त्यामुळे तिच तिचं अस्तित्व कायम राखण्या साठी निश्चीतच काहीतरी प्रयत्न करेल या श्रद्धेने गंगेच्या अस्तित्वावर परिणाम करणार्या या सर्व घटनांकडे सर्व भारतीय अत्यंत उदासीन दृष्टीकोनातुन बघत आहेत असं हॉलिक यांच निरिक्षण आहे. आणि इथेच ज्युलीयन क्रॅंडॉल हॉलिक आणि आपण भारतीय यांचा गंगेकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनातील फरक स्पष्ट होतो.असं असलं तरी गंगे विषयीचा त्यांचा अभ्यास आणि त्यातुन जाणावणारा त्यांचा गंगे विषयीचा जिव्हाळा आपल्यालाही विचार करायला प्रवृत्त करतो. या जिव्हाळ्या पोटीच त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे.ते म्हणतात,"गंगामातेला तिच अस्तित्व कायम ठेवण शक्यच झाल नाही किंवा तिनच तस न करण्याचा निर्णय घेतला तर काय?"
आहे का या प्रश्नाच उत्तर आपल्याकडे?.या प्रश्नाद्वारे प्रत्येक समस्या निव्वळ दैवाधिन ठेवुन चालणार नाही तर आपल्या संस्कृतीशी पिढ्यान पिढ्या निगडित असलेल्या माता गंगेच अस्तित्व निर्मळ आणि पवित्र राहाण्या साठी संपुर्ण समाज उभा राहीला पाहीजे याची जाणिव अप्रत्यक्ष्रपणे जुलियन हॉलिक आपल्याला करुन देतात. तेव्हा गंगा असो की इतर नद्या, त्या सर्वांवर मोठी मोठी धरण बांधुन आणि त्यांच्या काठी औद्योगिक विकास करुन आपण आपले पाण्याचे जलौघ कुंठीत व प्रदुषीत करत तर नाही आहोत ना ?याच्या बाबत विचार करण्याची वेळ आता आली आहे याची जाणिब करुन देणार हे पुस्तक वाचाव अशी माझी शिफारस आहे.
मैत्रेय १९६४
२ टिप्पण्या:
या पत्रकाराने गंगेचा ओघाचे रूपांतर नाल्यात झाल्याचे सांगितले. पण आपण गंगा परिक्रमा कोणत्या हंगामात केली हे सांगितलेले नाही.
अभ्यासु प्रतिक्रिये बाबत आभार. परिक्रमेचा कालावधि साधारण: वर्ष- सव्वावर्षाचा होता. पावसाळ्यात गंगेच ओघाच नाल्यात रुपांतर होत नाही हे नक्कीच. त्यानंतरच्या काळात गंगेच्या ओघाच नाल्यात रुपांतर होण्याच महत्वाचं कारण त्यावर बांधलेल टीहरी धरण, शेतीसाठी काढलेले कालवे हे आहे. गंगेला अतिभव्य रुप परत मिळत ते यमुने सारख्या ईतर नद्यांचा तिच्या बरोबर संगम झाला नंतरच.
टिप्पणी पोस्ट करा