१० एप्रि, २०११

वॉल्ड डिस्ने - द अल्टीमेट फॅण्टसी

"वॉल्ड डिस्ने - द अल्टीमेट फॅण्टसी" हे श्री. यशवंत रांजणकर यांनी राजहंस प्रकाशन यांच्यावतीने लिहीलेले पुस्तक नुकतेच वाचण्यात आले.वॉल्ड डिस्ने या नावाशी आपल्या सगळ्यांची अप्रत्यक्ष ओळख होते ती त्याने निर्मिती केलेल्या विविध कार्टुनपटांमुळे.डिस्नेच्या मिकी माऊस,डोनाल्ड डक,गुफी,प्लुटो यांची कार्टुन्स बघताना लहान मुलचं नव्हे तर त्यांचे आई-बाबा सुद्धा रंगुन जातात हे जगभरात दिसणारं आणि अनुभवायला येणारं सार्वत्रीक चित्र आहे.भाषा,प्रांत,देश यांच्या मध्ये जाणावणारे भेद आणि तणाव लक्षात घेता या कार्टुन्सनी घातलेली जागतीक मोहिनी हा आश्चर्याचा आणि त्याहुन अधिक म्हणजे अभ्यासाचा विषय आहे.अस असलं तरी या कार्टुन्समुळे माझ्या सारख्या सर्वसामान्य रसिकाला मिळणारा आनंद त्याचे दैनंदिन जीवनातले ताणतणाव विसरुन जाण्यास मदत करतो हे सर्वात अधिक महत्वाच अस मला वाटतं.
डिस्नेच्या या सगळ्या कार्टुन्स मध्ये मिकी माऊस हा माझ्या सगळ्यात आवडता. मिकीचे कार्टुनपट बघताना त्या मागच्या उच्च निर्मितीमुल्यांची जाणिव नक्कीच होते पण त्यातील सफाईदारपणा साधण्यासाठी त्याच्या निर्मात्याने आणि त्याच्या कार्टुनिस्ट सहकार्‍यांनी किती कष्ट केले असतील याची जाणिव मात्र होत नाही.आणि हीच महत्वाची जाणिव माझ्या सारख्या रसिकाच्या मनात निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं. या साठी श्री. रांजणकर यांनी अभ्यासलेल्या संदर्भग्रंथांची यादी त्यांनी या पुस्तकासाठी केलेले चिंतन-मनन दर्शवते तर हे पुस्तक त्यांच्या कडुन मराठी भाषेत जाणिव पुर्वक लिहुन घेण्यामागचा राजह्ंस प्रकाशन यांचा हेतु स्पष्ट होतो.
अश्या अभ्यासपुर्वक लिहिलेल्या पुस्तकांबद्दल अभिप्राय देण्यापेक्षा किंवा त्यांचा थोडक्यात परिचय करुन देण्यापेक्षा ती मुळातुनच वाचणे अधिक योग्य अस माझ मत आहे. कारण "वॉल्ड डिस्ने - द अल्टीमेट फॅण्टसी"हे पुस्तक संपुर्ण वाचल्या नंतर मला कळलेला वॉल्ड डिस्ने आणि तुम्हाला हे पुस्तक वाचल्या नंतर कळणारा डिस्ने खुपसा वेगळा असु शकतो.पण त्याची कार्टुन्स पाहुन मला मिळणारा आनंद आणि तुम्हाला मिळणारा आनंद यात मात्र फार फरक नक्कीच नसेल.
कुठल्याही कार्टुनच्या निर्मितीच्या पुर्वी डिस्नेच्या मनात त्या कार्टुनची संकल्पना तयार असे आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याच काम त्याच्या स्टुडीओतल्या ईतर सहकार्‍यांच असे.डिस्ने स्व:त सफाईदार कार्टुनिस्ट नव्हता पण त्याची कल्पनाशक्ती मात्र असामान्य होती. एखादा कार्टुनपट तयार होण्या पुर्विच तो कसा व्हायला हवा याच मानसचित्र डिस्नेच्या समोर असे.त्यामुळे आपल्या सहकार्‍यां कडुन आपल्याला काय अपेक्षित आहे व ते त्यांच्या कडुन कस करवुन घेता येईल याची निर्माता म्हणुन त्याला पुर्ण कल्पना असे.असं असलं तरी सहकार्‍यांच्या सुचना योग्य वाटल्या तर त्या मनमोकळेपणाने स्विकारण्याच्या लवचिकपणा त्याच्या कडे होता.त्याचप्रमाणे त्याच्या अपेक्षे प्रमाणे एखाद्या सहकार्‍याने काम केले नाही तर तो आपल्या सहकार्‍यांवर रागवत असला तरी त्याच सहकार्‍याने एखादे काम चांगले केले तर त्याचं कौतुक करण्यात देखिल तो अवमान करत नव्हता. खर्चाची तमा न बाळगता जास्तीत जास्त उच्च दर्जाची निर्मिती करण त्याचा ध्यास असे. त्याच्या या स्वभावामुळे तो व त्याची कंपनी बर्‍याच वेळा कर्जाच्या विळख्यात सापडत असे. तरी देखिल या सर्व संकटामधुन एखाद्या फिनीक्स पक्षाप्रमाणे पुन्हा पुन्हा यशस्वी होवुन डिस्नेलॅंड सारख अव्दितिय पार्क उभ करण्याच स्वप्न त्याने पुर्ण केल ते त्याच्या निर्मितीमुल्यांशी तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळेच. त्याने आयुष्यभर बांधिलकी मानली ती फक्त प्रेक्षकांची आणि त्याच्यावर तितकच भरभरुन प्रेम केल ते ही प्रेक्षकांनीच.आज डिस्ने आपल्यात नाही पण त्याने निर्मिती केलेली कार्टुन्स ही कालातीत असल्याने त्याची आठवण कालच्या,आजच्या आणि उद्याच्याही पिढीला नेह्मीच होत राहील यात शंकाच नाही.

****************************************************
                                             कनवाळु डिस्ने
एके दिवशी वॉल्डचा माळी त्याच्या कडे खारींच्या वाढत्या उपद्रवाची तक्रार घेवुन आला. त्याने खुप मेहनत घेवुन चांगली चांगली फळझाडं लावुन त्यांची मनापासुन जोपासना केली होती.परंतु खारी काही त्या झाडांवर एक फळ टिकु देत नव्हत्या. त्या मुळे तो माळी फार वैतागला होता. त्याने शेवटी चिडुन त्या खारींचा विषारी गोळ्यांनी बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला.त्याचा हा निर्णय वॉल्डच्या कानी पडताच तो शहारला आणि माळ्याला म्हणाला,"तु असं काही करु नकोस बाबा.हे करण्या पेक्षा तु अजुन जास्त झाड का लावत नाहीस? अस बघ.आपण बाजारात जाऊन फळं विकत आणु शकतो. पण बिचार्‍या खारींनी काय बरं करावं?"

****************************************************
                                                       भविष्यवेधी डिस्ने
ईतर चित्रपट निर्मात्यांपेक्षा डिस्नेनं दुरचित्रवाणीचं सुप्त सामर्थ्य आणि सुरुवातीच्या काळात असलेल्या त्याच्या मर्यादा जास्त चांगल्या प्रकार ओळखल्या होत्या.त्यामुळेच आपल्या स्टुडिओच्या व चित्रपटांच्या जाहिरातीं साठी या माध्यमाचा स्विकार करणारा तो पहिला निर्माता होता. टीव्हीवर त्याने पहिलीच मालीका सादर केली ती डिस्नेलॅंड या त्याच्या पार्क मधिल आकर्षणांची झलक आणि वर्णन करणारी.त्या वेळी रंगित टेलिव्हीजन अस्तित्वात देखिल नव्हता पण तरी देखिल या मालिकेच व त्या नंतर टीव्हीसाठी निर्माण केलेल्या ईतर सर्वच मालिकांच संपुर्ण चित्रीकरण रंगित करण्याचा निर्णय त्याने घेतला. या मुळेच ज्या लक्षावधी प्रेक्षकांनी टीव्हीवरुन "डेव्ही क्रॉकेट" ही त्याची मालिका फुकट पाहिली होती त्याच प्रेक्षकांनी या मालिकेच्या तिन्ही भागाच संकलन करुन तयार केलेला चित्रपट पैसे देवुन परत परत पाहीला.कारण एकच,छोट्या पडद्यावरचा कार्यक्र्म कृष्णधवल होता तर मोठ्या पडद्यावरचा चित्रपट हा परिपुर्ण रंगित होता.डिस्नेच्या या भविष्यवेधी वृत्तीमुळेच त्या वेळी टीव्हीवरुन कृष्णधवल सादर झालेल्या डिस्नेच्या मालिका आपण आजही रंगित स्वरुपात पाहात आहोत.

****************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: