आज आपण सर्व मराठी भाषा दिवस साजरा करत आहोत.विविध कारणाने जगभरात विखुरलेले आपण सर्व मायबोलीकर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध माध्यमांचा उपयोग करुन सहजगत्या एकमेकांशी संपर्क साधत आहोत.असे असले तरी मायबोली मराठीत चार शब्द लिहीणे आणि ते आपल्या माणसां पर्यंत पोहचवणे हा आपल्या भावना अभिव्यक्त करण्याचा सर्वांत सुंदर मार्ग आहे असं माझं मत आहे. मराठीतले ई-भाष्य कट्टे (Blogs) देखिल हाच हेतु ठेवुन लिहीले जातात. त्या कट्ट्यांवर व्यक्त केलेल्या मनमोकळ्या भावना व विचारांना तशीच दिलखुलास दाद मिळते कारण आपल्यातला समान धागा आहे तो मराठी भाषेच्या अभिमानाचा.अश्या आपल्या मायबोली मराठी बद्दल संत ज्ञानेश्वर म्ह्णतात," माझा मराठाचि बोलु कौतुके।अमृतातेही पैजा जिंके।".ईतकं सर्मपक वर्णन आणि ते ही मोजक्या शब्दात त्यांच्या शिवाय दुसरं कोणालाही करता येणार नाही.
आपल्या वर आलेलं संकट दुर व्हावं किंवा आपल्या ईच्छा पुर्ण व्हाव्यात या साठी प्रत्येकानं देवाला काही ना काही मागणं घातलं आहे.देवाला घातलेलं आपलं मागणही आपल्या स्वत: पुरतच असतं. पण ज्ञानेश्वरांनी देवाला मागणं घातल ते सर्वांसाठी.त्या मुळेच ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागीतलेले ’पसायदान’ ही जगातली सर्वोत्कृष्ठ वैश्विक प्रार्थना ठरते आणि तिही आहे आपल्या मराठीत.तेव्हा तिच प्रार्थना आपण सर्वांनी आजच्या दिवशी म्हणणं उचित ठरेल नाही का?
पसायदान
आतां विश्वात्मकें देवें।
येणें वाग्यज्ञें तोषावें।
तोषोनी मज द्यावें।
पसायदान हें॥
जें खळांची व्यंकटी सांडो।
तया सत्कर्मीं रती वाढो।
भूतां परस्परें पडो।
मैत्र जीवाचें॥
दुरिताचें तिमिर जावो।
विश्व स्वधर्मसूर्यें पाहो।
जो जे वांछील तो तें लाहो।
प्राणिजात॥
वर्षत सकळमंडळी।
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।
अनवरत भूमंडळी।
भेटतु भूतां॥
चलां कल्पतरुंचे आरव।
चेतनाचिंतामणीचें गांव।
बोलते जे अर्णव।
पीयूषाचे॥
चंद्रमे जे अलांछान।
मार्तंड जे तापहीन।
ते सर्वाही सदा सज्जन।
सोयरे होतु॥
किंबहुना सर्वसुखीं।
पूर्ण होऊनि तिहीं लोकीं।
भजिजो आदिपुरुषीं।
अखंडित॥
आणि ग्रंथोपजीविये।
विशेषीं लोकीं इयें।
दृष्टादृष्ट्विजयें।
होआवें जी॥
येथ म्हणे श्रीविश्वेशरावो।
हा होईल दानपसावो।
येणें वरें ज्ञानदेवो।
सुखिया जाला॥
*** संत ज्ञानेश्वर महाराज***
२ टिप्पण्या:
येथ म्हणे श्रीविश्वेशरावो।
हा होईल दानपसावो।
येणें वरें ज्ञानदेवो।
सुखिया जाला॥
+100.
पसायदानाशी माझ्या अजूनही काही आठवणी निगडित आहेत. या निमित्ते सगळे पुन्हा डोळ्यासमोर आले. :)
टिप्पणी पोस्ट करा