२० एप्रि, २०११

झलक पुस्तकाची- झुळुक अमेरिकन तोर्‍याची

लेखक :शरद वर्दे (मॅजेस्टिक प्रकाशन)
           ह्यांच ( म्हणजे अमेरिकन लोकांच) भौगोलीक अज्ञान हा तर संपुर्ण जगाचा थट्टेचा विषय झालाय. परवाच वाचलं,की युनोने एक जागतीक सर्व्हे करायचा प्रयत्न केला आणि प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन ड्रॉप केला. सर्व्हेत फक्त एकच आयटेम होता.तो म्हणजे,"उर्वरीत जगातील अन्न-तुटवडा संपुष्टात आणण्यासाठी कोणता तोडगा अमलात आणावा ह्याबद्दलचं तुमचं प्रामाणीक मत कृपया सांगा." हा सर्व्हे फिसकटला, कारण आफ्रिकनांना "अन्न" म्हणजे काय तेच ठाऊक नव्हतं, युरोपीयांना "तुटवडा" हा शब्द माहित नव्हता. मध्यपुर्वेतल्या लोकांना "तोडगा", भारतीयांना "प्रामाणिकपणा", चिन्यांना "मत", दक्षिण अमेरिकेतल्यांला "कृपया" म्हणजे काय हेच माहित नव्हतं. आणि अमेरिकेतुन प्रतिसाद मिळाला नाही, कारण "उर्वरित जग"  म्हणजे काय हेच त्यांना ठाऊक नव्हतं.

१६ एप्रि, २०११

अल्‌मोस्ट सिंगल

मेनका प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेलं "अल्‌मोस्ट सिंगल" हे अनुवादीत पुस्तक नुकतच वाचण्यात आलं. पुस्तकाची लेखिका आहे अव्दैता कला तर पुस्तकाचा सुंदर अनुवाद केला आहे आषुतोश उकिडवे यांनी. जागतिकरणाच्या तथाकथीत लाटेत जगण्याची आणि संस्कृतीची एकंदरीतच परिभाषा अमुलाग्र बदलत असताना व्यक्तीं व्यक्तीं मधले संबंध देखिल बदलत जात आहेत. माहितीच्या व तंत्रज्ञानाच्या युगात स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे.त्यामुळे स्त्री असो की पुरुष, दोघांवरही आपापल्या क्षेत्रात टीकुन राहाण्याच आणि यशस्वी होण्याच दडपण आहे.पुढचं युग हे सेवाक्षेत्राच आहे.या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होणार असुन या क्षेत्रात आज स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने अग्रेसर आहेत.काही सेवाक्षेत्र तर अशी आहेत की त्यात स्त्रियांचा वरचष्मा आहे. त्यापैकी हॉटेल इंडस्ट्री ही सेवाक्षेत्रातली एक मोठी इंडस्ट्री आहे.या इंड्स्ट्रीला आपल्या ग्राहकांना परत परत येण्यास भाग पाडण्यास जाहिरातींपेक्षा मिळणारी सेवा हा महत्वाचा घटक आहे याची पुर्ण कल्पना आहे. त्या मुळे पंचतारांकीत हॉटेल मध्ये " गेस्ट रिलेशन मॅनेजर" या पदावर काम करताना आलेले अनुभव आणि त्यातील आव्हाने यावर लिहीलेले "अल्‌मोस्ट सिंगल" पुस्तक वाचायला घेतलं त्यावेळी मन जरा साशंकच होत. पण पुस्तक जस जस वाचत गेलो तस तस मन प्रसन्न होत गेलं. अत्यंत सहजतेने केलेला खुसखुशित संवाद आणि त्यातुन वाचकांना नकळत अंतर्मुख करण्यातलं लेखिकेच कौशल्य याला दाद द्यायलाच हवी.पंचतारांकीत हॉटेलच्या विश्वाचा मध्यमवर्गीय मराठी मानसिकतेतुन प्रिया तेंडुलकर यांनी घेतलेल्या धुंडोळा आपण वाचला असेलच पण त्याहुन सर्वस्वी वेगळा अनुभव नविन पिढीच्या या लेखिकेच्या मानसिकतेतुन दिसुन येतो.मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्या या दोन लेखिका पण त्यांचा जगण्याकडे बघण्यातला बदललेला दृष्टीकॊन एकाच वातावरणातील अनुभव संपुर्ण वेगळेपणाने व्यक्त करतो यालाच तर दोन पिढयातील अंतर म्हणायच का?
पुस्तकाची नायिका आहे आयेशा भाटीया ,जी एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये गेस्ट रिलेशन मॅनेजर या पदावर काम करित आहे. या पदावर काम करताना अनेक तर्‍हेवाईक बड्या ग्राहकांना आणि त्यांच्या नखर्‍यांना तिला समोर जाव लागत. याचा ताण अर्थातच तिच्या मनावर आहे. नायिकेच्या मनावरील मध्यमवर्गीय संस्कार आणि कॉस्मॉपॉलिटन जीवनशैली यातील विसंगतीला दैनंदिन जीवनात समोरे जाताना ती मात्र तिचा तोल सांभाळुन आहे. आपल्या बेधुंद वागण्याचे समर्थन करताना आपण आपले कौमार्य जपले आहे असं ती आवर्जुन सांगते. असं असलं तरी पार्ट्या, मद्य, आणि मैत्रिणीं बरोबर बेधुंद आयुष्य जगत असतानाच आपण अजुनही अविवाहीत आहोत याची खंत तिच्या मनात आहे. करियरच्या मागे धावताना अश्या प्रकारची ओढाताण होण हे आजच्या पिढीचं भागदेय आहे.अस असल तरी हे सर्व ज्या प्रकारे या पुस्तकात व्यक्त झालेल आहे त्या वरुन आजची पिढी दिसते तशी पुर्णच बेफिकीर नसुन त्यांचा जगण्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन त्यांच्याच नजरेनं पाहाण्याची गरज आहे याची पुस्तक वाचल्यावर जाणिव होते. या पुस्तकातील एक प्रसंग जरुर सांगावासा वाटतो.
आयेशाच्या दोन जिवलग मैत्रिणी आहेत.त्यातील एक तिच्या सारखीच अविवाहीत असुन चांगल्या जीवनसाथीच्या शोधात आहे तर दुसर्‍या मैत्रिणीचा नुकताच घटस्फोट झालेला आहे.एके दिवशी या तिघी मैत्रिणी मौजमजा करण्यासाठी पब जातात.तिथे तिच्या घटस्फोटीत मैत्रिणीला तिच्या एक्स नवरा भेटतो. त्यानंतर ती दोघ अचानक पबमधुन गायब होतात. काळजीने आयेशा रात्रभर तिच्याशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.पण त्या मैत्रिणीचा मोबाईल बंद असतो.सकाळी त्या मैत्रिणीचाच आयेशाला फोन येतो.आयेशा त्या मैत्रिणीला काल रात्री तिच्यात आणि तिच्या एक्स नवर्‍यात काय झाल ते विचारते. मैत्रिण शांतपणे ती आणि तिच्या एक्स नवर्‍यामध्ये शारिरीक संबंध आल्याचे सांगते.त्याला ती ब्रेक-अप सेक्स अस म्हणते.हे ऐकल्यावर आयेशाला धक्काच बसतो. मैत्रिण मात्र शांतपणे तिला समजावते.ती म्हणते," काल आमच्यात जे घडलं तो निव्वळ सेक्स होता. केवळ वासनाशमन.पुरुषाला जशी गरज लागल्यावर तो भागवतो तसच बाईनं केल तर त्यात चुक काय?मी तुला खरचं सांगते आता आमच्यात कसलेही बंध उरलेले नाहीत.".थोडा विचार केल्यावर नायिकेला आपली मैत्रिण अंत:करणा पासुन आणि गांभिर्यान हे सांगत असल्याच जाणवतं.नायिका म्हणते," माझ्या मैत्रिणीच ते पोटतिडकेच म्हणणं मला पटलं.आयुष्य म्हणजे एक पुस्तकच असतं.एखाद्या उत्कंठावर्धक पुस्तकाचा शेवट जाणुन घेण्यासाठी आपण शेवटची पानं पुर्ण न वाचताच भरभर पान उलटतो. पण शेवट वाचल्यावर तुमच कुतुहल परत जागृत होत. मधली पान निट न वाचल्यानं शेवट नीट उमजला नाही अशी काहीशी भावना तुमची होते.मग शेवट निट कळण्यासाठी ती पानं परत एकदा वाचण्याचा निर्णय तुम्ही घेता.तसच माझ्या मैत्रिणीन आपल्या आयुष्याच्या या पुस्तकाची शेवटची पान परत येकदा निट वाचली आणि आयुष्यातील ते पुस्तक कायमच बंद केलं."
या प्रसंगावरुन नायिकेच्या अर्थातच लेखिकेच्या परिपक्व मनाची जाणिव आपल्याला होते आणि खुषखुशीत शैलीत लिहिलेल्या या पुस्तकाकडे जरासं गांभिर्यान पाहाव अस वाटायला लागतं.

 

१० एप्रि, २०११

वॉल्ड डिस्ने - द अल्टीमेट फॅण्टसी

"वॉल्ड डिस्ने - द अल्टीमेट फॅण्टसी" हे श्री. यशवंत रांजणकर यांनी राजहंस प्रकाशन यांच्यावतीने लिहीलेले पुस्तक नुकतेच वाचण्यात आले.वॉल्ड डिस्ने या नावाशी आपल्या सगळ्यांची अप्रत्यक्ष ओळख होते ती त्याने निर्मिती केलेल्या विविध कार्टुनपटांमुळे.डिस्नेच्या मिकी माऊस,डोनाल्ड डक,गुफी,प्लुटो यांची कार्टुन्स बघताना लहान मुलचं नव्हे तर त्यांचे आई-बाबा सुद्धा रंगुन जातात हे जगभरात दिसणारं आणि अनुभवायला येणारं सार्वत्रीक चित्र आहे.भाषा,प्रांत,देश यांच्या मध्ये जाणावणारे भेद आणि तणाव लक्षात घेता या कार्टुन्सनी घातलेली जागतीक मोहिनी हा आश्चर्याचा आणि त्याहुन अधिक म्हणजे अभ्यासाचा विषय आहे.अस असलं तरी या कार्टुन्समुळे माझ्या सारख्या सर्वसामान्य रसिकाला मिळणारा आनंद त्याचे दैनंदिन जीवनातले ताणतणाव विसरुन जाण्यास मदत करतो हे सर्वात अधिक महत्वाच अस मला वाटतं.
डिस्नेच्या या सगळ्या कार्टुन्स मध्ये मिकी माऊस हा माझ्या सगळ्यात आवडता. मिकीचे कार्टुनपट बघताना त्या मागच्या उच्च निर्मितीमुल्यांची जाणिव नक्कीच होते पण त्यातील सफाईदारपणा साधण्यासाठी त्याच्या निर्मात्याने आणि त्याच्या कार्टुनिस्ट सहकार्‍यांनी किती कष्ट केले असतील याची जाणिव मात्र होत नाही.आणि हीच महत्वाची जाणिव माझ्या सारख्या रसिकाच्या मनात निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं. या साठी श्री. रांजणकर यांनी अभ्यासलेल्या संदर्भग्रंथांची यादी त्यांनी या पुस्तकासाठी केलेले चिंतन-मनन दर्शवते तर हे पुस्तक त्यांच्या कडुन मराठी भाषेत जाणिव पुर्वक लिहुन घेण्यामागचा राजह्ंस प्रकाशन यांचा हेतु स्पष्ट होतो.
अश्या अभ्यासपुर्वक लिहिलेल्या पुस्तकांबद्दल अभिप्राय देण्यापेक्षा किंवा त्यांचा थोडक्यात परिचय करुन देण्यापेक्षा ती मुळातुनच वाचणे अधिक योग्य अस माझ मत आहे. कारण "वॉल्ड डिस्ने - द अल्टीमेट फॅण्टसी"हे पुस्तक संपुर्ण वाचल्या नंतर मला कळलेला वॉल्ड डिस्ने आणि तुम्हाला हे पुस्तक वाचल्या नंतर कळणारा डिस्ने खुपसा वेगळा असु शकतो.पण त्याची कार्टुन्स पाहुन मला मिळणारा आनंद आणि तुम्हाला मिळणारा आनंद यात मात्र फार फरक नक्कीच नसेल.
कुठल्याही कार्टुनच्या निर्मितीच्या पुर्वी डिस्नेच्या मनात त्या कार्टुनची संकल्पना तयार असे आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याच काम त्याच्या स्टुडीओतल्या ईतर सहकार्‍यांच असे.डिस्ने स्व:त सफाईदार कार्टुनिस्ट नव्हता पण त्याची कल्पनाशक्ती मात्र असामान्य होती. एखादा कार्टुनपट तयार होण्या पुर्विच तो कसा व्हायला हवा याच मानसचित्र डिस्नेच्या समोर असे.त्यामुळे आपल्या सहकार्‍यां कडुन आपल्याला काय अपेक्षित आहे व ते त्यांच्या कडुन कस करवुन घेता येईल याची निर्माता म्हणुन त्याला पुर्ण कल्पना असे.असं असलं तरी सहकार्‍यांच्या सुचना योग्य वाटल्या तर त्या मनमोकळेपणाने स्विकारण्याच्या लवचिकपणा त्याच्या कडे होता.त्याचप्रमाणे त्याच्या अपेक्षे प्रमाणे एखाद्या सहकार्‍याने काम केले नाही तर तो आपल्या सहकार्‍यांवर रागवत असला तरी त्याच सहकार्‍याने एखादे काम चांगले केले तर त्याचं कौतुक करण्यात देखिल तो अवमान करत नव्हता. खर्चाची तमा न बाळगता जास्तीत जास्त उच्च दर्जाची निर्मिती करण त्याचा ध्यास असे. त्याच्या या स्वभावामुळे तो व त्याची कंपनी बर्‍याच वेळा कर्जाच्या विळख्यात सापडत असे. तरी देखिल या सर्व संकटामधुन एखाद्या फिनीक्स पक्षाप्रमाणे पुन्हा पुन्हा यशस्वी होवुन डिस्नेलॅंड सारख अव्दितिय पार्क उभ करण्याच स्वप्न त्याने पुर्ण केल ते त्याच्या निर्मितीमुल्यांशी तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळेच. त्याने आयुष्यभर बांधिलकी मानली ती फक्त प्रेक्षकांची आणि त्याच्यावर तितकच भरभरुन प्रेम केल ते ही प्रेक्षकांनीच.आज डिस्ने आपल्यात नाही पण त्याने निर्मिती केलेली कार्टुन्स ही कालातीत असल्याने त्याची आठवण कालच्या,आजच्या आणि उद्याच्याही पिढीला नेह्मीच होत राहील यात शंकाच नाही.

****************************************************
                                             कनवाळु डिस्ने
एके दिवशी वॉल्डचा माळी त्याच्या कडे खारींच्या वाढत्या उपद्रवाची तक्रार घेवुन आला. त्याने खुप मेहनत घेवुन चांगली चांगली फळझाडं लावुन त्यांची मनापासुन जोपासना केली होती.परंतु खारी काही त्या झाडांवर एक फळ टिकु देत नव्हत्या. त्या मुळे तो माळी फार वैतागला होता. त्याने शेवटी चिडुन त्या खारींचा विषारी गोळ्यांनी बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला.त्याचा हा निर्णय वॉल्डच्या कानी पडताच तो शहारला आणि माळ्याला म्हणाला,"तु असं काही करु नकोस बाबा.हे करण्या पेक्षा तु अजुन जास्त झाड का लावत नाहीस? अस बघ.आपण बाजारात जाऊन फळं विकत आणु शकतो. पण बिचार्‍या खारींनी काय बरं करावं?"

****************************************************
                                                       भविष्यवेधी डिस्ने
ईतर चित्रपट निर्मात्यांपेक्षा डिस्नेनं दुरचित्रवाणीचं सुप्त सामर्थ्य आणि सुरुवातीच्या काळात असलेल्या त्याच्या मर्यादा जास्त चांगल्या प्रकार ओळखल्या होत्या.त्यामुळेच आपल्या स्टुडिओच्या व चित्रपटांच्या जाहिरातीं साठी या माध्यमाचा स्विकार करणारा तो पहिला निर्माता होता. टीव्हीवर त्याने पहिलीच मालीका सादर केली ती डिस्नेलॅंड या त्याच्या पार्क मधिल आकर्षणांची झलक आणि वर्णन करणारी.त्या वेळी रंगित टेलिव्हीजन अस्तित्वात देखिल नव्हता पण तरी देखिल या मालिकेच व त्या नंतर टीव्हीसाठी निर्माण केलेल्या ईतर सर्वच मालिकांच संपुर्ण चित्रीकरण रंगित करण्याचा निर्णय त्याने घेतला. या मुळेच ज्या लक्षावधी प्रेक्षकांनी टीव्हीवरुन "डेव्ही क्रॉकेट" ही त्याची मालिका फुकट पाहिली होती त्याच प्रेक्षकांनी या मालिकेच्या तिन्ही भागाच संकलन करुन तयार केलेला चित्रपट पैसे देवुन परत परत पाहीला.कारण एकच,छोट्या पडद्यावरचा कार्यक्र्म कृष्णधवल होता तर मोठ्या पडद्यावरचा चित्रपट हा परिपुर्ण रंगित होता.डिस्नेच्या या भविष्यवेधी वृत्तीमुळेच त्या वेळी टीव्हीवरुन कृष्णधवल सादर झालेल्या डिस्नेच्या मालिका आपण आजही रंगित स्वरुपात पाहात आहोत.

****************************************************

६ एप्रि, २०११

॥ गंगा ॥

ज्युलीयन क्रॅंडॉल हॉलिक या भारताशी जिव्हाळ्याच नात जडलेल्या अभ्यासु पत्रकाराच ’गंगा’ हे पुस्तक श्री प्रकाश अकोलकर यांनी अमेय प्रकाशन, पुणे यांच्यावतीने मराठीत अनुवादीत केलेलं आहे. ज्युलीयन क्रॅंडॉल हॉलिक यांनी केलेल्या गंगेच्या परिक्रमेतुन त्यांना जी गंगा गोमुख ते पार समुद्राला मिळेपर्यंत ठाईठाई दिसली याचच प्रवास वर्णन फक्त या पुस्तकात नसुन गंगेच्या बाबत सध्या जाणावणार्‍या व भविष्यात उपस्थित होणार्‍या समस्यांचा अभ्यासपुर्ण मागोवा या पुस्तकात घेतला आहे असं म्हटल तर ते वावग ठरणार नाही.
’गंगा’ हा शब्द आपल्या प्रत्येकाच्या मनावर कोरला जातो ते आजीच्या-आईच्या तोंडुन ऎकलेल्या विविध पौराणीक कथांमधुन. या सर्व कथांमधुन ’गंगा’ ही नदी आहे या पेक्षाही तिच दैवीपण मनावर अधिक ठसतं. तमाम भारतीयांच्या, विशेष करुन हिंदुंच्या, मनातील गंगेच हे देवतारुप भाषा-प्रांत यांच्यातील दिवसेन दिवस तिव्र व ठळक होत जाणार्‍या भेद-रेषांच्याही पलिकडचं आहे.दक्षिणेतला मद्रासी असो की उत्तरेतला भैया, पश्चिमेतला मरहट्टा असो की पुर्वेतला बाबु मोशाय या सगळ्यांच्याच मनात आहे वरदायिनी गंगेच पवित्र व पापनाशिनी देवतारुप.त्या मुळेच जीवनाच्या अंतिम क्षणी आपल्या मुखात गंगाजल पडाव या साठी घराघरात ठेवला जातो,पुजला जातो तो गंगेचा चिमुकला घडा.जीवनातील अनेक मोहांचा पाठलाग करताना व त्यांचा उपभोग घेताना माता गंगेची आठवण कदाचित होत नसेलही पण आत्म्याच्या अंतिम यात्रेला सुरुवात करताना प्रत्येक हिंदुला गंगेच हे दैवी पावित्र आपल्या सगळ्या पापांचा नाश होवून आपण परमेश्वराला सामोर जाणार आहोत याच आत्मिक समाधान मिळवुन देतं.
अश्या मनामनात रुजलेल्या गंगेची परिक्रमा करण्याची इच्छा अनेकांच्या मनात असली तरी ती करण्याच भाग्य फार थोड्या लोकांना साध्य होत.अर्थात या भाग्यवान लोकांनी जरी परिक्रमा केली तरी त्यांचा त्या मागचा एकमेव हेतु हा धार्मिक असल्याने गंगेच्या सद्यस्थिती विषयी परखड विचार करण्याची अपेक्षा त्यांच्या कडुन पुर्ण होत नाही.अश्या वेळी ज्युलीयन हॉलिक यांच्या सारख्या अभ्यासु पत्रकाराने त्रयस्थ व निरक्षिर बुद्धीने गंगेच्या विविध रुपांचा व अवस्थांचा केलेला अभ्यास आपल्या डोळ्यांमध्ये अंजन घातल्या शिवाय राहात नाही.त्या मुळेच ज्युलीयन हॉलिक यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेले भाष्य आपल्या भारतीय लोकांच्या मनोवृत्तीवर टिका करणारे वाटले तरी त्यातील सत्यता नाकारता येत नाही. ते म्हणतात,
" गंगा नदीला देवता मानुन तिची उपासना करणारे भारतीय ,तिच नदी इतकी प्रदुषीत कशी काय करु शकतात?आपल्या पापा पासुन मुक्ति मिळावी म्हणुन दररोज सकाळी या नदीत पवित्र स्नान करणारे लक्षावधी लोक याच नदीत मोठ्या प्रमाणावर मैला आणि औद्योगिक कचरा कसा काय टाकु धजतात?या विरोधाभासाच स्पष्टीकरण कस्म देता येईल?"
या हॉलिक यांना जाणवलेल्या या विरोधाभासाचा स्वत: पुरता शोध घेण्यासाठी त्यांनी गंगेची परिक्रमा करण्याच ठरवलं.या परिक्रमेत त्यांना गंगेची चांगली-वाईट अशी दोन्ही रुप वेगवेगळ्या ठिकाणी दिसुन आली.भुमीला सुजलाम-सुफलाम करणारी गंगा कधि कधि तांडव करत विनाश करत असलीतरी लोकांच्या मनात असलेल्या तिच्या दैवी प्रतिमेला मात्र कुठेच तडा जात नाही याच या परदेशी अभ्यासकाला मोठं आश्चर्य व कौतुक वाटतं.गंगेवर बांधलेल्या मोठ्या मोठ्या धरणांमुळे गंगेचा सातत्याने वाहाणारा जलौघ बर्‍याच ठिकाणी तिच एखाद्या नाल्यात रुपांतर करत आहे.त्यातच गंगेच्या काठावर वसलेल्या शहरांतील वाढत्या लोकसंख्ये मुळे,शेतीसाठी सतत वाढत चाललेल्या तिच्या पाण्याच्या उपश्या मुळे , औद्योगिक कारणां मुळे मोठ्या प्रमाणात तिच्यात सोडल्या जाणार्‍या रसायनां मुळे पवित्र अश्या गंगेच पावित्र नष्ट होत आहे हे त्यांना परिक्रमेतुन दिसुन आलं. तेव्हा या व अश्या अनेक प्रकारच्या उपस्थित झालेल्या समस्यांवर उपाययोजना करताना केवळ वैद्यानिक दृष्टीकोनातुन विचार न करता गंगेच्या विषयीच्या लोकांच्या भावनांचा देखिल विचार करायलाच पाहिजे कारण गंगेतील प्रदुषण दुर करण्याचे खरे उपाय भारतीय संस्कृतीतच दडले आहेत अस हॉलिक यांनी अनुभवांती मत मांडल आहे.त्यातच ’ग्लोबल वार्मिंग’मुळे गंगेसारख्या हिमनद्यांवर होणारे भविष्यातील परिणाम हे पुढील अनेक पिढ्यांचा विचार करता अधिक चिंताजनक आहेत ज्यामुळे पाण्याचा मुळ स्त्रोत आटु शकतो याची जाणिव हॉलिक करुन देतात तेव्हा माता गंगा नष्ट होणार की काय या कल्पनेनं मन विषण्ण होतं. गंगा ही फक्त नदी नसुन ती त्याहुनही अधिक देवी आहे अशी भारतीयांची पिढ्यान पिढ्या श्रद्धा आहे. त्यामुळे तिच तिचं अस्तित्व कायम राखण्या साठी निश्चीतच काहीतरी प्रयत्न करेल या श्रद्धेने गंगेच्या अस्तित्वावर परिणाम करणार्‍या या सर्व घटनांकडे सर्व भारतीय अत्यंत उदासीन दृष्टीकोनातुन बघत आहेत असं हॉलिक यांच निरिक्षण आहे. आणि इथेच ज्युलीयन क्रॅंडॉल हॉलिक आणि आपण भारतीय यांचा गंगेकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनातील फरक स्पष्ट होतो.असं असलं तरी गंगे विषयीचा त्यांचा अभ्यास आणि त्यातुन जाणावणारा त्यांचा गंगे विषयीचा जिव्हाळा आपल्यालाही विचार करायला प्रवृत्त करतो. या जिव्हाळ्या पोटीच त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे.ते म्हणतात,"गंगामातेला तिच अस्तित्व कायम ठेवण शक्यच झाल नाही किंवा तिनच तस न करण्याचा निर्णय घेतला तर काय?"
आहे का या प्रश्नाच उत्तर आपल्याकडे?.या प्रश्नाद्वारे प्रत्येक समस्या निव्वळ दैवाधिन ठेवुन चालणार नाही तर आपल्या संस्कृतीशी पिढ्यान पिढ्या निगडित असलेल्या माता गंगेच अस्तित्व निर्मळ आणि पवित्र राहाण्या साठी संपुर्ण समाज उभा राहीला पाहीजे याची जाणिव अप्रत्यक्ष्रपणे जुलियन हॉलिक आपल्याला करुन देतात. तेव्हा गंगा असो की इतर नद्या, त्या सर्वांवर मोठी मोठी धरण बांधुन आणि त्यांच्या काठी औद्योगिक विकास करुन आपण आपले पाण्याचे जलौघ कुंठीत व प्रदुषीत करत तर नाही आहोत ना ?याच्या बाबत विचार करण्याची वेळ आता आली आहे याची जाणिब करुन देणार हे पुस्तक वाचाव अशी माझी शिफारस आहे.

मैत्रेय १९६४