३१ ऑग, २०११

आली वारी मोरयाची.....

महाराष्ट्रात श्री पंढरीरायाच्या वारीची मोठी परंपरा आहे.ही वारी नित्यनेमाने दरवर्षी पंढरपुरला जाण्यासाठी निघत असते. अशीच एक दुसरी वारी महाराष्ट्रात आहे. पंढरीची वारी ही भक्तीची वारी आहे तर ही दुसरी वारी आनंदोत्सवाची आहे.या दुसर्‍या वारीत भक्ती नाही अस नाही पण भक्ती पेक्षाही जास्त आहे तो आनंदाचा जल्लोष. ही आनंदाची वारी आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री गणरायाची. ही वारी ’निघत’ नसुन ती ’येत’ असते. पंढरपुरच्या वारीत भक्तजन पंढरीरायाच्या दर्शनासाठी निघतात तर या वारीमध्ये साक्षात श्री गणराय आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येतात.परमेश्वराने भक्त्यांच्या भेटीसाठी येण्याच दुसर कुठल उदाहरण मला तरी आठवत नाही.
अश्या या श्री गणरायाच घराघरात व सार्वजनिक उत्सव मंडळ्यांच्या मंडपात आज आगमन झालेल आहे.घरातील व मंडपातील उत्साही मंडळी केलेल्या सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत.याच धामधुमीत आता पर्यंत सजावटीच्या कामात मदत करण्यासाठी अजीबात न फ़िरकलेली काही मंडळी या क्षणी त्यांच्या सुचनांचा भडिमार करायला उगवलेली आहेत. त्यांच्या या सुचनांचा त्रास गेले काही दिवस सतत सजावटिसाठी अहोरात्र मेहनत घेत असलेल्या मंडळींना होत असल्याने चिड तर आलेली आहे. पण तरीही या आनंदोत्सवाला भांडणाच गालबोट लागु नये म्हणून शक्य तितक्या सुचना स्विकारल्या जात आहेत.वैताग येव्हडाच आहे की ही सुचना देणारी अनाहुत मंडळी अंगाला तोषीश न लावता मुकादमगिरी करत आहेत.या सगळ्यात घरातल्या छोट्या मंडळींना कस बर विसरुन चालेल. यांच्या तर कल्पनेच्या भरार्‍या विचारायलाच नकॊ. त्यांच्या सुचनाही कधी नव्हे त्या गंभीरपणे स्विकारुन त्यांचा सजावटीत आवर्जुन समावेश केला जात आहे. पण ही मंडळी जरा जादाच हौशी असल्याने त्यांची सजावटीच्या कामात लुडबूड सुरु आहे. या लुडबुडीचा त्रास सहन होत नाही पण बोलायची तर अज्याबात सोय नाही असा आहे. घरातील मुलं सजावटीच्या कामात गुंगलेली असल्याने कधी नव्हे ते घरातील समस्त महिला वर्गाला त्यांची काम निवांत पणे पार पडण शक्य होत आहे. अश्या तर्‍हेने सगळीकडे एकच धांदल सुरु आहे पण तिचा ना क्षीण ना त्रास कारण हे सगळ चालल आहे ते भेटिसाठी आवर्जुन आलेल्या लाडक्या श्री गणराया स्वागतासाठी.
एकीकडे ही धांदल तर दुसरीकडे अजुनही घरा समोरच्या रस्त्यातुन ढोल-ताश्यांच्या गजरात जात असलेल्या श्री गणरायाच्या मिरवणुका.मिरवणुकीतील ताश्यांच्या जोषपुर्ण आवाज मनातल्या मनात पावलं थिरकवत आहे.अश्या या मिरवणुकां पाहाताना त्यामध्ये  बेभान होवुन नाचणार्‍या तरूणाईची झिंग बघणार्‍यांच्या मनात पाहाता पाहाता कधी उतरते तेच कळत नाही.आणि त्याच जोषातुन मनामनात घुमतो एकच आवाज......

            बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे

५ जून, २०११

आज दि. ५ जुन २०११ (पर्यावरण दिन) रोजी मुंबईत होत असलेल्या मराठी ई-भाष्य कट्ट्येकर्‍यांच्या (Bloggers) स्नेह मेळाव्यास मन:पुर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय मराठी.


१४ मे, २०११

सांगावंसं वाटलं म्हणुन

काहीतरी पाहीलं की ...
काहीतरी वाचलं की ...
सांगावसं वाटतं ... वाटतं ना?
कुणाला तरी ... कधीतरी ...

आदिशक्ती देवीची साडेतिन शक्तिपिठं विख्यात आहेत.तद्‌वत मराठी सारस्वताची तिन जगमान्य संस्कृतीपिठं आहेत. ती म्हणजे पार्ले, डोंबिवली आणि तिसरं ... सांगायलाच हवं का, अहो पुणं. अश्या मराठी सारस्वताच्या पार्ले या संस्कृतीपिठातील काही मायबोलीकरांनी एक चांगला कार्यक्रम, खरतरं उपक्रम हाती घेतला आहे. ज्याच पहिल सादरीकरण दि. १५ एप्रिल २०११ रोजी त्यांनी डोंबिवलीत केल. या कार्यक्रमाच नाव आहे "सांगावंसं वाटलं म्हणुन" आणि निर्मिती आहे "चैत्र" यांची. हा कार्यक्रम आहे मराठी साहित्यातल्या दर्जेदार पुस्तकातील काही वेचक उतार्‍यांच अभिवाचन रसिकांपुढे सादर करण्याचा. हा कार्यक्रम सादर करणारी कोणी हौशीगवशी मंडळी नसु्न त्यातील बहुतेक जण मराठी नाट्यक्षेत्रातील तसेच दुरचित्रवाणीवरील नावाजलेली कलाकार मंडळी आहेत.ही सर्व मंडळी त्यांच्या व्यस्त व्यावसायीक दिनक्रमातुन मराठी साहित्याच्या निखळ प्रेमापोटी वेळ काढुन हा कार्यक्रम करणार आहेत.त्या मुळे हा कार्यक्रम म्हणजे फ़ावल्या वेळातला टाईमपास नसुन अतिशय गांभिर्याने व एक निश्चीत भुमिका घेवुन केलेला प्रयोग आहे हे आपण सर्वांनी आवर्जुन ध्यानात घ्यायला हवं.
"सांगावंसं वाटलं म्हणुन" हा कार्यक्रमाचा उद्देश आहे तो मराठी साहित्यावर प्रेम करणार्‍या तुमच्या आमच्या सारख्यांच वाचनवेड वाढव व त्याचबरोबर दर्जेदार पुस्तकांची आपल्याला ओळख व्हावी. त्या साठी मराठी भाषेतल्या दर्जेदार पुस्तकातल्या काही वेचक उतार्‍यांच अभिवाचन रसिकांपुढे सादर करुन मराठी साहीत्यातले काही अमृतकण मांडण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे.कलावंत हे जात्याच अधिक संवेदनाशिल असतात. त्या मुळे त्यांची उत्तम साहित्याची निवड व निकष जाणुन घेण्याची उत्सुकता तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात बर्‍याच वेळा असते.अन्‌ त्याच उत्सुकते पोटी हा कार्यक्रम पाहाण्यास खरतरं मी गेलो होतो. पण अभिवाचन ऎकल्या नंतर माझ्या जाणिवा तर बदलल्याच पण त्याच बरोबर मराठी साहित्यातल दर्जेदार अस बरच काही वाचायच राहुन गेलयं हे ही लक्षात आलं. या पहिल्याच कार्यक्रमात ज्या ८ पुस्तकातील वेधक उतार्‍यांच अभिवाचन सादर केलं गेलं ती पुस्तकं म्हणजे, ३२ हार्टबीट्‍स (लेखक- प्रकाश वेलणकर), आहे मनोहर तरी (लेखिका- सुनिता देशपांडे),भोगले जे दु:ख्ख त्याला ... (लेखिका- आशा आपराद) ,गार्गी अजुन जिवंत आहे (लेखिका- मंगला आठलेकर), हे सर्व कोठुन येते (लेखक- विजय तेंडुलकर) ,किरण पाणी (लेखक- महावीर जोंधळे), माणसं (लेखक- अनिल अवचट),ऋतुचक्र (लेखिका-दुर्गा भागवत). प्रामाणिकपणे सांगायचंच झाल तर या ८ पुस्तकांपैकी अनिल अवचट यांच " माणसं " हे पुस्तक वगळता इतर कोणतही पुस्तक मी अद्याप वाचलेल नाही. पण या ८ पुस्तकांतील वेचक उतार्‍यांचे अभिवाचन ऐकल्या नंतर निवडलेलं प्रत्येक पुस्तक किती आगळ-वेगळ आणि वैशिष्टपुर्ण आहे याची कल्पना आली.त्याचबरोबर खुप चांगल आणि मनाच्या जाणिवा बदलु शकणार बरंच काही अद्यापही वाचलेलं नाही याची खंतही निश्चितच वाटली.या पुस्तकांपैकी "गार्गी अजुन जिवंत आहे "हे पुस्तक आहे गंगा किनारी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या स्त्रीचं तर "३२ हार्टबीट्‍स" हे पुस्तक आहे अश्या माणसाच ज्याच्या हृद्याचे प्रती मिनीट फक्त ३२ ठोके पडतात.अस असुनही हा माणुस तुमच्या आमच्या सारखंच त्याच नित्य जीवन सहजपणे जगतो आहे...पुढच्या क्षणाची खात्री नसताना.या दोन पुस्तकांवरुन अभिवाचनाच्या निवडलेल्या पुस्तकांचा दर्जा लक्षात येईल.
तेव्हा या कार्यक्रमाद्वारे वाचनवेड्या रसिकांच्या अधिक जवळ जाण्याचा व मराठी भाषेतल्या दर्जेदार साहित्याची ओळख करुन देण्याचा प्रयत्न त्युस्त तर आहेच पण त्यातुनच उद्याचे चांगल्या कार्यक्रमांना व उपक्रमांना दाद देणारे रसिक घडणार आहेत हे ही लक्षात घ्यायला हवं. त्यामुळेच मराठी भाषेच्या निखळ प्रेमापोटी सकारात्मक विचारातुन सादर केलेल्या या कार्यक्रमाची ओळख जास्तीत जास्त मराठी माणसांना माहिती करुन देण्याचा माझा हा एक प्रामाणीक प्रयत्न.या व अश्याच प्रकारच्या इतर प्रयोगशिल कार्यक्रमांची-उपक्रमांची माहित करुन देण्याचा माझ्या सारखाच सर्व ई-भाष्य कट्ट्य़ावरील मायबोलीकरांचा प्रयत्न व हेतु असला पाहीजे अस मला वाटतं.
कारण, आपण ई-भाष्य कट्टेकरी देखिल आपापल्या ब्लॉगवर लिहीतो ते मनातल काहीतरी "सांगावंसं वाटलं म्हणुन".च ना?


२० एप्रि, २०११

झलक पुस्तकाची- झुळुक अमेरिकन तोर्‍याची

लेखक :शरद वर्दे (मॅजेस्टिक प्रकाशन)
           ह्यांच ( म्हणजे अमेरिकन लोकांच) भौगोलीक अज्ञान हा तर संपुर्ण जगाचा थट्टेचा विषय झालाय. परवाच वाचलं,की युनोने एक जागतीक सर्व्हे करायचा प्रयत्न केला आणि प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन ड्रॉप केला. सर्व्हेत फक्त एकच आयटेम होता.तो म्हणजे,"उर्वरीत जगातील अन्न-तुटवडा संपुष्टात आणण्यासाठी कोणता तोडगा अमलात आणावा ह्याबद्दलचं तुमचं प्रामाणीक मत कृपया सांगा." हा सर्व्हे फिसकटला, कारण आफ्रिकनांना "अन्न" म्हणजे काय तेच ठाऊक नव्हतं, युरोपीयांना "तुटवडा" हा शब्द माहित नव्हता. मध्यपुर्वेतल्या लोकांना "तोडगा", भारतीयांना "प्रामाणिकपणा", चिन्यांना "मत", दक्षिण अमेरिकेतल्यांला "कृपया" म्हणजे काय हेच माहित नव्हतं. आणि अमेरिकेतुन प्रतिसाद मिळाला नाही, कारण "उर्वरित जग"  म्हणजे काय हेच त्यांना ठाऊक नव्हतं.

१६ एप्रि, २०११

अल्‌मोस्ट सिंगल

मेनका प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेलं "अल्‌मोस्ट सिंगल" हे अनुवादीत पुस्तक नुकतच वाचण्यात आलं. पुस्तकाची लेखिका आहे अव्दैता कला तर पुस्तकाचा सुंदर अनुवाद केला आहे आषुतोश उकिडवे यांनी. जागतिकरणाच्या तथाकथीत लाटेत जगण्याची आणि संस्कृतीची एकंदरीतच परिभाषा अमुलाग्र बदलत असताना व्यक्तीं व्यक्तीं मधले संबंध देखिल बदलत जात आहेत. माहितीच्या व तंत्रज्ञानाच्या युगात स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे.त्यामुळे स्त्री असो की पुरुष, दोघांवरही आपापल्या क्षेत्रात टीकुन राहाण्याच आणि यशस्वी होण्याच दडपण आहे.पुढचं युग हे सेवाक्षेत्राच आहे.या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होणार असुन या क्षेत्रात आज स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने अग्रेसर आहेत.काही सेवाक्षेत्र तर अशी आहेत की त्यात स्त्रियांचा वरचष्मा आहे. त्यापैकी हॉटेल इंडस्ट्री ही सेवाक्षेत्रातली एक मोठी इंडस्ट्री आहे.या इंड्स्ट्रीला आपल्या ग्राहकांना परत परत येण्यास भाग पाडण्यास जाहिरातींपेक्षा मिळणारी सेवा हा महत्वाचा घटक आहे याची पुर्ण कल्पना आहे. त्या मुळे पंचतारांकीत हॉटेल मध्ये " गेस्ट रिलेशन मॅनेजर" या पदावर काम करताना आलेले अनुभव आणि त्यातील आव्हाने यावर लिहीलेले "अल्‌मोस्ट सिंगल" पुस्तक वाचायला घेतलं त्यावेळी मन जरा साशंकच होत. पण पुस्तक जस जस वाचत गेलो तस तस मन प्रसन्न होत गेलं. अत्यंत सहजतेने केलेला खुसखुशित संवाद आणि त्यातुन वाचकांना नकळत अंतर्मुख करण्यातलं लेखिकेच कौशल्य याला दाद द्यायलाच हवी.पंचतारांकीत हॉटेलच्या विश्वाचा मध्यमवर्गीय मराठी मानसिकतेतुन प्रिया तेंडुलकर यांनी घेतलेल्या धुंडोळा आपण वाचला असेलच पण त्याहुन सर्वस्वी वेगळा अनुभव नविन पिढीच्या या लेखिकेच्या मानसिकतेतुन दिसुन येतो.मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्या या दोन लेखिका पण त्यांचा जगण्याकडे बघण्यातला बदललेला दृष्टीकॊन एकाच वातावरणातील अनुभव संपुर्ण वेगळेपणाने व्यक्त करतो यालाच तर दोन पिढयातील अंतर म्हणायच का?
पुस्तकाची नायिका आहे आयेशा भाटीया ,जी एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये गेस्ट रिलेशन मॅनेजर या पदावर काम करित आहे. या पदावर काम करताना अनेक तर्‍हेवाईक बड्या ग्राहकांना आणि त्यांच्या नखर्‍यांना तिला समोर जाव लागत. याचा ताण अर्थातच तिच्या मनावर आहे. नायिकेच्या मनावरील मध्यमवर्गीय संस्कार आणि कॉस्मॉपॉलिटन जीवनशैली यातील विसंगतीला दैनंदिन जीवनात समोरे जाताना ती मात्र तिचा तोल सांभाळुन आहे. आपल्या बेधुंद वागण्याचे समर्थन करताना आपण आपले कौमार्य जपले आहे असं ती आवर्जुन सांगते. असं असलं तरी पार्ट्या, मद्य, आणि मैत्रिणीं बरोबर बेधुंद आयुष्य जगत असतानाच आपण अजुनही अविवाहीत आहोत याची खंत तिच्या मनात आहे. करियरच्या मागे धावताना अश्या प्रकारची ओढाताण होण हे आजच्या पिढीचं भागदेय आहे.अस असल तरी हे सर्व ज्या प्रकारे या पुस्तकात व्यक्त झालेल आहे त्या वरुन आजची पिढी दिसते तशी पुर्णच बेफिकीर नसुन त्यांचा जगण्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन त्यांच्याच नजरेनं पाहाण्याची गरज आहे याची पुस्तक वाचल्यावर जाणिव होते. या पुस्तकातील एक प्रसंग जरुर सांगावासा वाटतो.
आयेशाच्या दोन जिवलग मैत्रिणी आहेत.त्यातील एक तिच्या सारखीच अविवाहीत असुन चांगल्या जीवनसाथीच्या शोधात आहे तर दुसर्‍या मैत्रिणीचा नुकताच घटस्फोट झालेला आहे.एके दिवशी या तिघी मैत्रिणी मौजमजा करण्यासाठी पब जातात.तिथे तिच्या घटस्फोटीत मैत्रिणीला तिच्या एक्स नवरा भेटतो. त्यानंतर ती दोघ अचानक पबमधुन गायब होतात. काळजीने आयेशा रात्रभर तिच्याशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.पण त्या मैत्रिणीचा मोबाईल बंद असतो.सकाळी त्या मैत्रिणीचाच आयेशाला फोन येतो.आयेशा त्या मैत्रिणीला काल रात्री तिच्यात आणि तिच्या एक्स नवर्‍यात काय झाल ते विचारते. मैत्रिण शांतपणे ती आणि तिच्या एक्स नवर्‍यामध्ये शारिरीक संबंध आल्याचे सांगते.त्याला ती ब्रेक-अप सेक्स अस म्हणते.हे ऐकल्यावर आयेशाला धक्काच बसतो. मैत्रिण मात्र शांतपणे तिला समजावते.ती म्हणते," काल आमच्यात जे घडलं तो निव्वळ सेक्स होता. केवळ वासनाशमन.पुरुषाला जशी गरज लागल्यावर तो भागवतो तसच बाईनं केल तर त्यात चुक काय?मी तुला खरचं सांगते आता आमच्यात कसलेही बंध उरलेले नाहीत.".थोडा विचार केल्यावर नायिकेला आपली मैत्रिण अंत:करणा पासुन आणि गांभिर्यान हे सांगत असल्याच जाणवतं.नायिका म्हणते," माझ्या मैत्रिणीच ते पोटतिडकेच म्हणणं मला पटलं.आयुष्य म्हणजे एक पुस्तकच असतं.एखाद्या उत्कंठावर्धक पुस्तकाचा शेवट जाणुन घेण्यासाठी आपण शेवटची पानं पुर्ण न वाचताच भरभर पान उलटतो. पण शेवट वाचल्यावर तुमच कुतुहल परत जागृत होत. मधली पान निट न वाचल्यानं शेवट नीट उमजला नाही अशी काहीशी भावना तुमची होते.मग शेवट निट कळण्यासाठी ती पानं परत एकदा वाचण्याचा निर्णय तुम्ही घेता.तसच माझ्या मैत्रिणीन आपल्या आयुष्याच्या या पुस्तकाची शेवटची पान परत येकदा निट वाचली आणि आयुष्यातील ते पुस्तक कायमच बंद केलं."
या प्रसंगावरुन नायिकेच्या अर्थातच लेखिकेच्या परिपक्व मनाची जाणिव आपल्याला होते आणि खुषखुशीत शैलीत लिहिलेल्या या पुस्तकाकडे जरासं गांभिर्यान पाहाव अस वाटायला लागतं.