२२ एप्रि, २०१०

म मराठीचा ,आपल्या मायबोलीचा

                                               
                    छत्रपति शिवाजी महाराज यांची १९ फ़ेब्रुवारीची जन्मतारखे नुसारची जयंती तर दुसरी ३ मार्चची तिथीनुसार साजरी केलेली जयंती अश्या साजर्‍या केलेल्या दोन शिवजयंत्या,१६ मार्चचा गुढीपाडवा-नविन मराठी वर्ष , २७ फ़ेब्रुवारीचा मराठी भाषा दिन, दुबईत झालेल मराठी विश्व साहित्य संमेलन आणि नुकतच पुणे येथे झालेल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे वेगवेगळे दिवस आपण एका पाठोपाठ उत्साहाने साजरे केले आहेत. लवकरच १ मेला येणारा महाराष्ट्र राज्याचा ५० वा वर्धापन दिन सुध्दा आपण असाच उत्साहाने साजरा करणार आहोत.असे एकंदरीत उत्सवी वातावरण असताना मराठी माणसांची मने कश्याने तरी धास्तावलेली आणि त्याहुन जास्त म्हणजे दुखावलेली आहेत अस चित्र दिसत आहे.

                 मराठी मनामनांमध्ये सध्या इत्र तित्र सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे मराठी संस्क्रुतीच आणि भाषेच भवितव्य काय ?. त्या मुळे मराठीच्या प्रश्नावर राजकारणी व सर्वसामान्य मराठी माणसे एकतर वाद घालताना किंवा हमरातुमरीवर येताना दिसत आहेत.तेव्हा अचानक मराठी भाषे बद्दल हळव होण्यासारख काय घडल असाव याचा शोध तथाकथित विचारवंतानी गांभिर्यपुर्वक घ्यायला होता नाही का?.पण ते तर मराठी माणसांना संकुचितपणाचं लेबल लावून एकत्रीतपणे तुटून पडताना दिसत आहेत.याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसांना ते अजुनच दुखावत आहेत.विचारवंत असले तरी ते पण या मराठी समाजाचा एक भाग आहेत हे ते विसरलेले दिसत आहेत.लेखक, कवि,कलावंत आदी मंडळी जी मराठी भाषेच्या जिवावर प्रसिद्धी व पैसा मिळवत आहेत ती तर आपला याच्याशी जणू काही सबंध नाही अश्या प्रकारे मुग गिळून बसली आहेत.

                   राजकारणी मंडळींच सोडुन द्या पण सर्वसामान्य मराठी माणूस त्याचा कसलाही फ़ायदा नसताना मराठीच्या प्रश्नावर आज इतका हळवा आणि संतप्त का झाला आहे याच विचारवंत,लेखक, कवि,कलावंत आदींना काहीच पडलेल दिसत नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.स्व:ताला संवेदनशील म्हणवणारी ही मंडळी समाजातल्या सर्वसामान्य मराठी माणसां पासून मनाने व विचाराने फ़ारच दुर गेलेली आहेत.

                  मध्यंतरी काही मराठी कलावंतानी त्यांचा एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये ते मराठी असल्याने अपमान झाला अशी ओरड केली हॊती.त्यावेळी त्या हॉटेलवर मोर्चा काढून राजकारणी आणि त्या कलावंतानी प्रसिद्धी मिळवली खरी पण त्यातून मुळ प्रश्न सुटला का?.त्या नंतर त्या हॉटेल मध्ये कांदेपोहे, मिसळपाव आणि मराठी बर्गर ( वडापाव ) असे मराठमोळे पदार्थ मिळू लागले आहेत का?.त्या हॉटेल मध्ये मराठीत मेन्यु कार्ड ठेवल गेल का?तिथे किती मराठी माणसांना रोजगार मिळालेला आहे ?.याचा कोणी विचार केला का?.तुम्ही म्हणाल याचा त्या मराठी कलावंताच्या झालेल्या अपमानाशी कसा काय सबंध येतो.पण जरा शांतपणे विचार केलात तर या सर्वाचा एकमेकांशी असलेला सबंध आहे हे तुमच्याही लक्षात येइल.कारण त्या मराठी कलावंतांचा हॉटेल मध्ये अपमान झालाच असेलच तर तो ते मराठी असल्याने म्हणून नव्हे तर मराठी संस्क्रुती म्हणजे काय आहे याची जाणीवच मराठी माणसांच्या राजधानीत व्यवसाय करणार्‍या त्या हॉटेलला मुळात नव्हती म्हणून.

                  त्या मुळे मराठी माणसाला मराठी भाषीक म्हणून महाराष्ट्रात तसच देशात व जगात सन्मानाने व स्वाभिमानाने जगायच असेल तर त्याच्या आचारातून आणि विचारातून मराठी संस्क्रूती सर्वांना जाणवली पाहीजे. त्या साठी मराठी माणसांनी एकमेकांशी बोलताना तरी कटाक्षाने मराठीतूनच बोलल पाहीजे. किमान महाराष्ट्रातल्या सार्वजनीक ठिकाणी उदा. रेल्वेस्टेशन, चित्रपटगृह, हॉटेल (मग ते पंचतारांकीत असले तरी) येथे मराठीतूनच बोलल पाहीजे. ईथे महाराष्ट्रात व्यवसाय अथवा नोकरी करु इच्छीणार्‍या इतर भाषीक व्यक्तींच्या कानावर सतत मराठी कसे पडेल याची काळजी आपण मराठी माणसांनी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची.

                     या सर्व पार्श्वभुमीवर आपण शांतपणे आजुबाजुला नजर टाकली की लक्षात येईल,भाषेच्या व संस्क्रूतीच्या बाबतीत इतर भाषीक समुह जेवढे जागृक व आग्रही आहेत तसे आपण नाही.आपल्या मराठी भाषेला व संस्क्रुतीला मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा व सहिष्णू संतपरंपरेचा वारसा असतानाही आपल्याला आपल्या भाषेचा व संस्क्रुतीचा उदघोष करायला न्युनगंड का बरं वाटतो?.

                      आपल्याला असही वाटत की इंग्रजी आल की जगात आपल काही आडणार नाही.माझा एक मित्र असाच विश्वास मनात ठेवुन फ़्रान्सला गेला. त्याने पॅरीस आंतरराष्टीय विमानतळावर सर्वच पाट्या फ़्रेंच मध्ये असल्याच पाहील. त्याने विचार केला आपल्याला इंग्रजी येतय ना मग पाट्या फ़्रेंच मध्ये असेल तर काय अडेल.त्याने तिथल्या आजु बाजुच्या कर्मचार्‍यांशी व लोकांशी इंग्रजी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही.फ़्रेंच आणि ब्रिटन यांच पारंपारीक वैर असल्याने फ़्रेंच माणूस त्याला इंग्रजी समजत असल तरी इंग्रजीमध्ये बोलण्यास नाखुश असतो असा त्या मित्राचा अनुभव आहे.तो तर असेही गमतीने म्हणतो की फ़्रेंच माणूस एकवेळ हिंदीत बोलेल पण इंग्रजीत..................................

                       दुसरा अनुभव तर माझाच आहे. एकदा ऑफ़ीसच्या कामासाठी मद्रासला.. सॉरी चेन्नईला गेलो होतो. रात्री करमणूक म्हणुन हॉटेल पासून काहीश्या अंतरावर असलेल्या थेटरमध्ये हिंदी पिच्यर पाहायला गेलो. सकाळ पासून भेटलेले सर्वच जण हिंदी समजत नसलेले होते. मग तो हॉटेल मधला रुमबॉय असॊ की रिक्क्षावाला.त्यामुळे हिंदी पिच्यर पाहायला फ़ारशी गर्दी नसेल अशी आमची समजूत.पण पाहातो तर काय पिच्यर पाहायला ही तुडुंब गर्दी.बहुतेक जण संर्पुंण कुटंबासह आले होते.त्यामुळे बाल्कनीच तिकीट मिळाल नाही.तेव्हा अप्पर स्टॉलच तिकीट काढल. आमच्या आजुबाजुच पब्लीक हे कष्टकरी वर्गातल असल्याच दिसत होत. मनात आल , या लोकांना हिंदी समजत नाही मग पिच्यर पाहायला का बर आले आहेत?थोड्याच वेळात पिच्यर सुरु झाला.पाहातो तर काय आजुबाजुच्या लोकांना त्या पिच्यरचे जवळ्पास सर्व संवाद पाठ. संर्पुण पिच्यर त्या लोकांच्या तोंडचे संवाद ऎकतच आम्ही पाहीला.पिच्यर संपला. इतक्या लोकांना हिंदी छान कळतय व बोलता येतय हे पाहुन आम्हाला बर वाटल. विचार केला हॉटेल जवळच आहे.तर विचारत विचारत चालतच जाउ.म्हणुन त्यातला एकाला हॉटेलला कस जायच ते हिंदीत विचारल.तर त्याने काहीतरी अगम्य भाषा कानावर पडल्या सारखा चेहरा केला.अजून दोघा तिघांना विचारल तर तेच.शेवटी हॉटेलला चालत जायचा विचार सोडून दिला रिक्क्षा केली.रिक्क्षावाल्याला समजेल अश्या तोडक्या मोडक्या इंग्लीश मध्ये पत्ता सांगून हॉटेलला पोहोचलो.

                     या वरुन कळून येत की, फ़्रेंच भाषिक असो की तामीळ भाषिक असो, ते आपल्या भाषेच्या बाबतीत सतत जागृक व आग्रही असतात.जगातल्या बहुतेक सर्व भाषिक समुहांच्या बाबतीत हेच आढळून येईल.गुजराथी व मारवाडी हे तर अमेरिकेच्या अध्यक्षां बरोबर सुध्दा त्यांच्या मातृभाषेत बोलायला कमी करणार नाहीत अशी मला खात्री आहे.हे भाषिक समुह आपल्या भाषेच्या बाबतीत सतत जागृक व आग्रही असतात याचं मला तरी कौतुकच वाटत.त्यांना माहित आहे की स्व:ताची संस्क्रुती टिकवायची असेल तर स्वभाषा जपलीच पाहिजे. तर मग आपल्यालाच मराठी भाषेचा आग्रह धरायला न्युनगंड का बरं वाटतो?

                       आपण सर्व जण हॉटेलमध्ये जात असतो.हॉटेलच्या मेन्यु मध्ये जैन पद्धतीने पदार्थ बनवून मिळतील अस आवर्जुन नमुद केलेल असत.गुजराथी,मारवाडी लोकांसाठी विमान कंपन्या शाकाहारी पदार्थ ठेवतात.अहमदाबाद येथुन विमानाने परत येताना विमानात मासांहारी पदार्थांचा पर्याय उपलब्ध नव्हता असा माझा अनुभव आहे.हे सगळ होत कारण ही सर्व माणस त्यांच्या खाद्यसंस्कॄतिच्या बाबतीत आग्रही आहेत म्हणूनच ना?.हॉटेलमध्ये ते पैसे देतात तर आपण काय चिंचोके देतो का?.मराठी पदार्थ हॉटेलमध्ये किंवा विमानात मिळत नाहीत याच कारण ते पोषण मुल्यात कमी आहेत हे नसुन त्यांची मागणी कोणी करतच नाही हेच आहे.

                        सरकारी पातळीवर देखील मराठी भाषेची किती अवहेलना सुरु आहे याचे प्रत्यंतर तर ठाई ठाई मिळेल.शासनाची किती परिपत्रके,आदेश आणि देण्यात येणारी विविध प्रमाणपत्रे मराठी भाषेत दिली जातात किंवा शासनाच्या किती विभागांची संकेतस्थळे मराठी भाषेत याचा तर विचारच न केलेला बरा.कनिष्ठ न्यायालयात मराठीतून कामकाज व्हाव असा शासनाने स्तुत्य निर्णय घेतला आहे पण त्याची अंमलबजावणी अद्यापही होत नाही हे खेददायकच आहे.गुजराथ या शेजारच्या राज्यात बहुतांश शासकीय व्यवहार गुजराथीतूनच होतो.महाराष्ट्र आणि गुजराथ या दोन राज्यांची निर्मीती एकाच वेळी झाली हे लक्षात घेता हा विरोधाभास जास्तच जाणवतो.

                      या सारख्या प्रत्येक गोष्टींसाठी राजकारण्यांना दोष देण सोईच असेलही पण त्या मुळे आपली आपल्या भाषे बाबतची व संस्क्रुती बाबतची अनास्था नाकारता येईल का?.आपल्या मराठीत एक म्हण आहे " यथा राजा तथा प्रजा".लोकशाही मध्ये प्रजाच राजा निवडत असते. त्या मुळे जसे आपण तसेच आपले राज्यकर्ते.तेव्हा आपण आपल्या भाषेच्या व संस्क्रुतीच्या बाबतीत कितीशे जागृक व आग्रही आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची व काहीतरी कृती करण्याची आता वेळ आली आहे हे तुम्हालाही पटेल. हे सर्व लक्षात घेता , स्वभाषेचा व स्वसंस्क्रुतीचा अभिमान व आग्रह ठेवणे म्हणजे संकुचीतपणा हा न्युनगंड सर्वप्रथम मनातून काढुन टाकायला हवा. लक्षात ठेवून मराठीचा जास्तीत जास्त वापर दैनंदीन जिवनात करायलाच हवा.भाषा व संस्क्रूती पेक्षा कोणीही महत्वाच नाही. आपण ज्या मराठी अस्मितेचा सतत उदघोष करत असतो ती अस्मीता शिवरायांच्या राजनितीतून,जातीभेदाच्या पलीकडे जावून विचार करणा‍र्‍या संतपरंपरातून,मर्दानी रांगड्या मराठी भाषेतून, गौरवशाली संस्क्रूतीतून व शौर्याच्या इतिहासातून तयार झालेली आहे. त्यामुळे या अस्मीतेचा अभिमान आपल्याला असायलाच हवा. मराठी माणसांनी वैश्विक (Globle) होण्याची गरज आहे असे अनाहुत सल्ले बर्‍याच वेळी आपल्याला दिले जातात.अश्या वेळी वैश्विक होण म्हणजे आपल जे चांगल ,उदात्त आहे ते विसरुन जाण नव्हे. वैश्विक होताना इतरांच्या चांगल्या गोष्टी जरुर स्विकाराव्यात पण त्याच बरोबर आपल्या मधल्या चांगल्या गोष्टी सुध्दा जगासमोर विश्वासाने व ठामपणे मांडल्या पाहीजेत.तेव्हा आपण वैश्विक जरुर होवूया पण ते होताना आपण आपली संस्क्रुती विसरता कामा नये. .

                   येत्या १ मेला मराठी भाषीकांच्या आपल्या महाराष्ट्र राज्याला ५० वर्ष पुर्ण होत आहेत.तेव्हा आता आपले सगळे न्युनगंड टाकून मराठी भाषा व संस्क्रुती साठी एक होवूया.त्या दिवशी महाराष्ट्राचीच काय तर पुर्ण विश्वाची भाषा मराठी होइल असा सकारात्मक संकल्प करुया.सुवर्ण महोत्सवी वर्षात आपल्या या संकल्पा मुळे मराठी अस्मितेला तेजाची नविन झळाळी निश्चितच मिळेल या बद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही.

                                              जय महाराष्ट्र जय मराठी
आपला

मैत्रेय१९६४

१६ मार्च, २०१०

नूतन वर्षाच्या शुभेच्छा


प्रिय मायबोलीकर

चैत्र शुद्ध प्रतिपदा
मुहूर्त हा नामी
सुख समृध्दी आणि आरोग्य
येवो तुमच्या जीवनी
याच शुभेच्छा माझ्या
नववर्षाच्या शुभ दिनी

                                        मराठी नूतन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा


                                                        तुमचा
                                                          मैत्रेय1964

१५ फेब्रु, २०१०




छत्रपति शिवाजी महाराज

१४ फेब्रु, २०१०

गझल



गझल



माकड हसलं आणि त्या क्षणीच माणसात त्याच रुपांतर झाल अस म्हणतात.तसच काहीस मिशी फ़ुटली की ममाज बॉयच पुरुषात रुपांतर झाल अस समजायला हरकत नसावी.पुरुषांच्या बाबतीत मिशी फ़ुटण आणि "प्रेमात " पडण हे बहुतेक वेळा एकाच वेळी होत असतं. प्रेमात पडण यातच त्या पहिल्या वाहिल्या प्रेमाच पुढे काय होणार ते उमजुन येत असलं तरी त्या प्रेमाचा अनुभव न घेतलेला करंटाच म्हणायला हवा. पहिल्या प्रेमात आपण कधि पडलो ,कसे पडलो हे कदाचीत आठवणार नाही पण ते मनाच्या कोपर्यात शेवट पर्यंत जिवंत असतं

पहिल्या प्रेमाची एक गंमत असते ती म्हणजे जगाला जे दिसत असत त्याच्या एकदम उलट प्रेमात पडलेल्या त्या दोघांना दिसत असत.तिच साध्या साध्या गोष्टींवर उगाचच हसण इतरांना भलेही बालिश वाटो पण त्याला मात्र त्यातून तिचा हसरा स्वभाव दिसत असतो.तिचा सावळा खरंतर काळ्यापेक्षा थोडासाच उजवा असलेला रंग त्याच्या नजरेला मात्र गोर्यापान व पाढंर्या पालीसारख्या (?) असलेल्या मुलींपेक्षा तजेलदार दिसत असतो. तिची तिरकी नजर मित्रांना भलेही "चकणी" वाटत असेल पण त्याला तो प्रेमाचा हळुवार कटाक्ष वाटत असतो. तसचं त्याचा अतिरेकी फ़टकळ स्वभाव लोकांना भलेही उर्मट वाटत असला तरी ती मात्र त्याच्या स्पष्ट्वक्तेपणावर बेहद खुश असते.त्याच्या निरर्थक व अनावश्यक कॉमेंट्स लोकांना भलेही पाचकळ वाटू देत पण तिला मात्र त्यातून त्याचा हजरजबाबी स्वभाव दिसत असतो. तसच भर उन्हात वेड्या सारख फ़िरताना इतरांना जाणवणार ऊन त्या दोघांना मात्र चांदण्याची जाणीव करुन देत असत. गर्दीमध्ये त्या दोघांना एकमेकां शिवाय इतर जगाची जाणि्व सुद्धा होत नाही. खरचं पहिल्या प्रेमात किती गंमत असते नाही ?

असेच काहीसे दिवस माझ्या ही आयुष्यात कधिकाळी आले होते.कालपरवा पर्यंत शेजारच्या पाजारच्या मुलींनी आम्हा मित्रांच्या खेळामध्ये केलेली लुडबुड मला अजिबात आवडत नव्हती. पण अचानक पणे आमच्या खेळामध्ये तीने केलेली लुडबुड मला मात्र आताश्या खटकत नव्हती. तिच लहानपणा पासून गळणार शेंबड नाक अचानकपणे गळायच कस काय थांबल होत काय जाणे. पण तस झाल होत खरं. माझ्याशी कमरेवर हात ठेवून भांडणारी ती अचानक पणे माझ्याशी न भांडता माझी बाजू घ्यायला लागली होती. आणि मी .....................

माझ्या जिवन कंठ्श्य मित्र पश्याने तिला शेंबडी म्हटलेलं मला आताशा का कोण जाणे आवडत नव्हत .चिंचा पाडताना होणारी तिची त्रेधातिरपीट पाहून मी अनाहुत पणॆ तिला चिंचा पाडायला मदत करायला लागलो होतो. सुरुवाती सुरुवातीला जाणवल नाही पण लक्षात यायला लागल होत की लपाछपी खेळताना मी जिथे लपायचो तिथेच ती मागोमाग येउन लपायची.माझ्यावर राज्य असेल तर मला सहज दिसेल अश्या ठिकाणी ती मुद्दाहूनच लपायची .खोट कशाला सांगू मी पण माझ्यावर राज्य असेल तर ती समोर दिसली तरी न दिसल्य़ा सारख करुन दुसर्यालाच शोधायचो .खरचं पहिल्या प्रेमात किती गंमत असते नाही ?

असेच दिवस चालले होते आणि अचानकपणे मला शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागलं. आई-बाबा आणि घरापासून दुर अस पहिल्यांदाच राहात होतो.त्यामुळे सुरुवातीला सुरुवातीला एकटेपणा जाणवत असायचा. पण हळूहळू हॉस्टेलमध्ये मित्र मिळाले . मग मात्र धमाल सुरु झाली. पार्ट्या, पिकनिक्स आणि अचानक पणे मिळालेल्या स्वात्रंत्र्यामुळे अंगात जणु वारं संचारल होत. माझ घर रेल्वेने फ़क्त दोन -अडीच तासांच्या अंतरावर असल्यामुळे सुरुवाती सुरुवातीला आठवड्यात किमान एकदा आवर्जुन घरी जायचो. पण जशी जशी मित्रांची मैफ़ील जमत गेली तस तस आठवड्याला घरी जाणारा मी ,काही दिवसांनी महिन्याने-दीड महिन्याने जावू लागलो होतो. त्यामुळे आताश्या तिच्या भेटी पण क्वचीतच होऊ लागल्या होत्या. खर सांगायच म्हणजे हॉस्टेलच्या रंगीबेरंगी दिवसात मित्रां शिवाय दुसर कोणीच दिसत नव्हत.

असाच एकदा खुप दिवसांनी घरी गेलो होतो.नेहमीप्रमाणे बाहेरच्या अंगणात खूर्ची टाकून बसलो होतो. ती माझ्या घरी आली होती. बहुदा माझ्या आईने तिला बोलावल असाव. मला समोर पाहुन ती गोंधळली . मी भेटेन अशी तिला अपेक्षा नसावी. सारखी बडबडणारी आणि छोट्या छोट्या गोष्टींवर हसणारी ती खुप शांत वाटली. तिच्यातला हा बदल इतर कॊणाला नसेल पण मला फ़ारच जाणवला. ती काहीच बोलत नाही म्ह्टल्यावर मीच बोलत सुटलो. ती फ़क्त ऎकत होती. शेवटी ती हळूच इतकच म्हणाली, " जाऊऊऊ.. काकू वाट पाहात असतील ". सालं एव्हड बोलतोय याच काहीच वाटत नाही. मी वैतागलो,म्हटलं, "जा". ती जाता जाता फ़क्त हसली. नौटंकी साली.

दोन दिवसांनी नेहमीप्रमाणे मी हॉस्टेलला परत गेलो.त्याच दिवशी मित्रांनी कोजागरीची पार्टी ठरवली होती. कधी नव्हे तो सोमरसा ऎवजी चक्क दुध्द्पानाचा बेत होता. त्या मुळे काही केल्या पार्टीला रंग चढत नव्हता.त्यामुळे कधी एकदा बारा वाजतात आणि दुध पिवून झोपी जातो अस झाल होत . अचानक एका मित्राने कॅसेट लावली. कॅसेट तरी धमाल असेल अशी आम्हा सर्वांची अपेक्षा होती. पण त्या ऎवजी संथ सुरावटींनी कॅसेट्ची सुरुवात झाल्याने सर्वच त्या मित्रावर वैतागलो.सुरावट संपली न संपली तोच मखमली आवाज कानावर आला. या पुर्वी तो आवाज कधि ऎकला नव्हता . पण हळुहळु त्या गाण्यातले शब्द प्रथम कानात आणि नंतर मनात अलगत उतरत गेले.सगळेच मग बोलायचे बंद झाले. हॉस्टेलची गच्ची, वातारणातली रात्रीची निरव शांतता ,पोर्णिमेच्या चंद्राचा शांत प्रकाश या मुळे सैलावत गेलेलं मन .....

या सर्वामुळे घरापासून दुर असलेले आम्ही सर्व हळवे झालो होतो.शब्द आणि तो आवाज यानी आमच्या मनावर जणू गारुडच करुन टाकल होतं. कधी न ऎकलेल अस काही मनावर उमटत होत.

आणि अचानक मला तीची आठवण आली.सगळ आजुबाजुच जग जणू धुक्यातच हरवून गेल्यासारख झाल. तिच दिसण,तिची नजर, ..... तिच आणि तिचच अस्तीत्व या शिवाय दुसर काही नाही.

कॅसेट संपली तसे आम्ही सर्व भानावर आलो. कसली कॅसेट ,कुणाची कॅसेट वैगरे चौकशी सुरु झाली. तो मित्र म्हणाला" अरे ही जगजीतसिंगची गझलची कॅसेट आहे."

गझल.... गझलशी माझी ती पहिलीच ओळख होती. आणि गझलचीच का तीची पण मला अवचीत पटलेली पहिलीच ओळख होती.गझलनेच मला न कळलेली "ती " समजली होती.


म्हणुनच सांगतॊ, पहिल्या प्रेमात आपण नक्की कधी पडलो तो क्षण त सांगता येत नाही कारण ते प्रेम आहे तेच मुळी कळ्लेल नसत.पण त्या प्रेमाची ओळख ज्या क्षणी पटते तो क्षण काही केल्या विसरता येत नाही.

गझल आणि पहिल्या प्रेमचि पहिली ओळख एकाच वेळी मला झाली.त्यामुळे जस पहिल प्रेम मनात कायम राहाणार आहे तसच गझलच सुध्दा माझ्या जिवनात नेहमीच स्थान असणार आहे.

"गझल मुळेच मला अव्यक्त्ततेतून व्यक्त होणार्या तिच्या भावना समजल्या. आणि त्या नंतर माझ्या मनाला एकच चाळा लागला तो म्हणजे बोलल्या जाणार्या प्रत्येक शब्दांमधून व्यक्त होणार्या अर्थापेक्षा न बोलल्या गेलेल्या शब्दांमधून व्यक्त होणार्या भावना जाणुन घेण्याचा.ही सवय समोरच्याला अधिक उमजून घेण्यासाठी मला फ़ार उपयोगी पडली आहे. तुम्हीही असा प्रयत्न करुन पहा म्हणजे त्या मधुन तुम्हालाही अद्यापपावतो न कळलेली माणस कदाचीत कळतील.

१३ फेब्रु, २०१०

जाणीव


जाणीव

नेहमी प्रमाणे रेल्वे ब्रिजवरुन चाललो होतो .आज फ़रक इतकाच होता की ,सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी कमी होती. चालता चालता माझ लक्ष त्या दोघांकडे अचानकपणे गेलं. एक ८-९ वर्षाचा छोटासा गोड मुलगा त्याच्या आजोबांकडे काहीतरी हट्ट करत होता.आजोबांनी त्या छोट्याच्या हट्टापुढे बहुदा मान तुकवली असावी कारण तो छानस खुदकन हसला.त्याच्या निरागस चेहर्यावरच वरच ते हसु इतक लोभसवाणं होत की मला त्या आजोबा-नातवा मधली गंमत जाणून घेण्याची तीव्र ईच्छा झाली. सुट्टीचा दिवस असल्याने मलाही घाई नव्हतीच. त्यांना कळणार नाही अश्या रितीने त्यांच्या बाजूला जावून उभा राहीलो .
खर सांगायच तर लहान मुले आणि त्यांचे आजी - आजोबा यांच्या मधिल गोड नात्या बद्दल मला नेहमीच कौतुक आणि कुतूहल वाटत असत.एक धडपडणार बाल्य तर दुसरं थरथरणार व्रूद्धत्व.आजोबा आणि नातू यांना एकमेकांचे हात घट्ट धरुन रस्त्याने चालताना माझ्या प्रमाणे आपणही कित्येक वेळा पाहिल असेल. त्या वेळी नक्की कळत नाही की , कोण कोणाला आधार देतोय ते ?. चालताना बर्याच वेळा नातू पुढे पुढे पळण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आजोबा त्याला कसेबसे थोपवत असतात.हे सर्व पाहिल की असं वाटत की अतिरेकी उत्साहाला अनुभवान आलेल शहाणपण जणू थोपवत आहे. असो .
त्या आजोबांनी खिश्यातून हळूच एक नाण काढल आणि ते नातवाच्या हातावर ठेवल.नातवाने ते थोड्याच अंतरावर वजनकाटा घेवून बसलेल्या म्हातारबाबांना दिलं नंतर तो वजन करण्यासाठी काट्यावर उभा राहीला.तितक्यात त्या छोट्या मुलाचे आई-बाबा तिथे आले.त्यां छोट्याच्या आईच्या चेहर्या वरच्या आठ्यां वरुन आजोबांच आणि छोट्याच वागण तिला अजिबात पसंत पडलेल नाही हे स्पष्ट्च दिसून येत होत.बायकोची नाराजी पाहून मुलगा आजोबांना हळूच काहीतरी बोलला. त्या वर आजोबा ठामपणे म्हणाले " अरे, पण माझी या बाबतची जाणीव काही वेगळीच आहे."
हे वाक्य ऎकल आणि मी चमकलोच.नेहमी पेक्षा काहीतरी वेगळ असं ते आजोबा बोलले होते नक्कीच.मी अजूनच कान टवकारले.बायकॊच्या चेहर्यावरच्या आठ्या जास्तच आक्रसलेल्या पाहून ,मुलगा थोडा अस्वस्थ होत म्हणाला," ते सर्व ठिक आहे .पण ईथे आत्त्ताच वजन करायच काय़ अडल होत का?."
आजोबा : " जरा ऎकशीक का माझं ?"
मुलगा : " काय ऎकू. तुमच नेहमीच काहीतरी जगावेगळ असत"
आजोबा : " अरे, मनूचा छोटासा हट्ट पुरवायचा नाही का ?"
मुलगा : " म्हणून काय इथे रस्त्यावर........"
आजोबा : " मनूला त्याच काट्यावर वजन करायच होत. मग मी विचार केला की त्याचा हट्ट तर पुरवला जाईलच पण त्याच बरोबर त्या म्हातारबाबांना मदत देखिल होईल."
आजोबांचे हे विचार मुलाला आणि त्याच्या बायकोला हे पटलेले नाहीत हे कळत होतच.पण हे ऎकल्यावर मला मात्र जाणवला ,दोन विभिन्न वयातल्या व्यक्तींच्या द्रुष्टीकोनातील फ़रक.त्या छोट्याच्या आई-बाबांना त्यांच्या मुलाने असे रस्त्यावर वजन करणे कमी पणाचे वाटले होते. तर आजोबांना ...........
त्यांना १ रुपयामध्ये आपल्या नातवाच्या चेहर्यावरचा आनंद तर पाहायला मिळालाच होता पण त्यातून त्या म्हातारबाबांना त्यांचा स्वाभिमान न दुखावता केलेली मदत जास्त समाधान देवून गेली होती . ते म्हातारबाबा परिस्थीतीच्या अगतीकतेमुळे या वयात सुध्दा कमवायला मेहनत करत होते.हे करत असताना त्यांना कोणाच्या दयेची अपेक्षा नसल्याने भीक मागण्याचा सरळधोप मार्ग सोडून स्वाभिमान जपत वजनकाट्याव्दारे चार पैसे पोटा साठी कमवू पाहात होते.हे सगळं त्या आजोबांच्या जाणीवा जाग्रुत असल्याने त्यांना कळल पण त्या तरुण जोडप्याला ... ?
हा प्रसंग माझ्या मनाला वेगळीच जाणीव करुन देणारा ठरला.अश्या प्रकारचे आपल्या जाणीवा जाग्रुत करणारे असे अनेक प्रसंग आपल्या आजुबाजुला घडत असतात जे टीपण्या साठी हव असतं आजोबां सारख संवेदनशील मन .पण ते झापडबंद विचारांमुळे आपल्याला जाणवत नाहीत.
दुसरा एक प्रसंग माझ्याच बाबतीत घडलेला आहे.कधी नव्हे ते भाजी घेण्यासाठी एकदा मी बाजारात गेलो होतो .त्या मुळे भाव वैगरे करायची सवय असण्याचा प्रश्नच नव्हता.त्या ब्रीजवरच्या प्रसंगा पासून मी शक्यतोवर म्हातार्या माणसांन कडुनच खरेदी करायचो .तेव्हडिच त्यांना मदत.तिथे एक आजीबाई भाज्या घेऊन बसलेल्या दिसल्या .मी त्यांच्या कडुन दोन भाज्या भाव न करताच घेतल्या.पैसे देण्या पुर्वी आजूबाजूला सहजच लक्ष गेलं.पाहिल की सगळेच भाव करत होते.ते पाहून पैसे देण्यापुर्वी सहजच विचारायच म्हणुन आजी बाईना म्हणालो , " आजी, एकदम दोन भाज्या घेतोय तेव्हा २ रुपये तरी कमी करा ना ." आजींनी माझ्याकडे चमकून पाहील . हे भोट गिर्हाईक असे काही विचारेल अशी त्यांना अपेक्षित नसावं . त्या म्हणाल्या, " बाळा, येक ईचारु.तुले राग नाय ना येणार ?" माझ्या सारख्या पस्तीशीतील्या पुरुषाला बाळा म्हणणार्या आजींना मी काय बरं बोलणार. त्याच पुढे म्हणाल्या," हॉटेलीत जातू ना रं". मी म्हणालो " जातो ना कधितरी." त्यानी विचारल ," तीथ वेटरले बक्षिसी बी द्येतो का रं?" मी फ़ुशारुन म्हणालो,"देतो की" हे मी म्हटल्यावर त्या नंतर आजी जे म्हणाल्या त्याने माझ्या डोळ्यात अंजनच घातलं. त्या म्हणाल्या " हॉटेलीत जातोस. तिथ पैका मोजतोस अन वेटरले बक्शीशी बी देतोस.मग या आज्येशी भाव करतो का रं?.या उमरमधी ही आज्ये गरमीमधं इथं बसत्येत त्याच तुला काय बी वाटत नाय रे ?".हे ऎकल्यावर मीच काय पण ज्या्च्या मनात थोडीतरी संवेदना शिल्लक आहे असा माणूस काय बरं बोलणार.
मी त्या आजीला ईतकच बोललो की,"आजी,तुमचं म्हणण मला एकदम पटल बघा.एक नक्की सांगतो या पुढे भाजी घेताना तुमच्याशीच काय दुसर्या कोण्याही आजीं बरोबर भाव करणार नाही." माझं बोलणे ऎकल्यावर आजी हसल्या. ते हसण निर्व्याज्य होत खिजवणार नव्हत. त्याच पुढे म्हणाल्या,"बाळा,पिशवी पुढं कर की जरा".मी नकळतच पिशवी पुढे केली. आजीने छोटीशी कोथींबीरीची जुडी पिशवीत टाकली.मी म्हणालो,"हे कशाला आजी".त्या म्हणाल्या,"अरं बाळा,तुन माझ म्हातारीच गुमान ऎकलस मग मी बी तुझं थोडस ऎकू नगं का रं.माज्याच परसातली हाय म्हणुन ही जुडी तुले देत्येय .आजी म्हंण्लास मग माजं ऎक अन ठिव ही गुमान". आजीच म्हणणं किती समर्पक होत नाही ?.त्या मुळे तो प्रसंग सुध्दा माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. त्यानंतर मी भाजी घेताना आजतागायत भाव केलेला नाही.
या दोन पसंगातून मी नक्कीच खुप काही शिकलो .आजोबांनी शिकवलं की दुसर्याला मदत करताना त्याचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहीजे.तर आजींनी शिकवल की व्यवहार करताना समोरच्या माणसाचा देखिल विचार केला पाहीजे.त्यांनी असही शिकवल की आपल म्हणण पटवताना दुसर्याच्या भावना देखिल कश्या प्रकारे जपायच्या असतात. त्या दोघांच्या अनुभवातुन त्यांच्या मतांच जाणिवेत रुपांतर झालेल होत कारण त्यांना दुसर्याच्या मतांचा विचार करता येत होता.
आपल्याला आलेल्या अनुभवातून आपली देखिल मतं तयार होतात.त्या मतांना उराशी धरुन आपण समोरच्या्शी वागत असतो.हे करत असताना समोरच्या्ची पण त्याच्या अनुभवातून मत तयार झालेली असतात याचा विचार आपण करत नाही.त्या मुळे मत मांडताना आपण एकमेकांना अनाहुतपणे दुखवतो .पण त्या आजी -आजोबां सारख आपण जेव्हा दुसर्याच्या मताचा विचार करायला शिकू तेव्हा आपल्या मतं देखिल जाणिवेत बदलतील हे नक्कीच.
तेव्हा आजुबाजुला घडणार्या घटना काहीतरि देत असतात हे लक्षात असु द्या.