१५ ऑग, २०१२

कथा एका सरसेनापतीची


सेवानिवृत्त जनरल के.व्ही. कृष्णराव यांच्या "इन द सर्व्हीस ऑफ नेशन-रेमिनीसेन्सेस" या आत्मचरित्राचा सौ.विदुला कुलकर्णी यांनी केलेला "कथा एका सरसेनापतीची" हा मराठी अनुवाद नुकताच वाचण्यात आला. ईंग्रजी मधले मुळ पुस्तक पेंग्वीन बुक्स ने प्रकाशीत केले असुन मराठी अनुवाद चिनार पब्लिशर्स,पुणे यांनी प्रकाशीत केला आहे. अनुवादीका सौ.कुलकर्णी आणि प्रकाशक चिनार पब्लिशर्स यांचे हे सुंदर पुस्तक मराठीत अनुवादीत करुन प्रकाशीत केल्या बद्दल निश्चितच आभार मानायला हवेत.
हे पुस्तक वाचुन झाल्यावर अनुवादीका सौ.कुलकर्णी त्यांच्या मनोगतात म्हणतात ते पटतं. त्या म्हणतात,सेवानिवृत्त जनरल के.व्ही. कृष्णराव यांचे, "इन द सर्व्हीस ऑफ नेशन-रेमिनीसेन्सेस" हे निव्वळ आत्मचरित्र नसुन भारतीय लष्कराचा इतिहास आहे. श्री.कृष्णराव हे ४१ वर्ष लष्करात विविध पदांवर सेवा करुन शेवटी लष्कर प्रमुख म्हणुन निवृत्त झाले. त्या नंतर त्यांनी ईशान्येकडील नागालॅंड, मणिपुर आणि त्रिपुरा व वायव्येकडील सतत अशांत असलेल्या जम्मु-काश्मिर या राज्यांचे राज्यपाल म्ह्णुन एकंदरीत १० वर्षे काम केले आहे. याच भागांमध्ये प्रथमत: लष्करी सेवा व सेवानिवृत्ती नंतर राज्यपाल म्हणुन प्रशासकीय सेवा करताना आलेल्या अनुभवांचा त्यांनी मांडलेला लेखाजोखा म्हणजेच हे पुस्तक. या पुस्तकातुन भारताच्या स्वातंत्रोत्तर काळात लष्करा समोर आलेल्या व भविष्यात येणार्‍या आव्हानांची कल्पना येते. तसेच या आव्हानांना समर्थपणे सामोरे जावुन देश रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करुन करणार्‍या जवानां विषयी कृतज्ञतेची भावना निर्माण होते.
अश्या या पुस्तकाचा आवाका थोडक्यात मांडणे शक्य नाही कारण मुळातच श्री.कृष्णराव यांनी त्यांचे ५१ वर्षांचे अनुभव मांडताना कुठेही अनावश्यक माहिती देण्याचा वा स्वसमर्थानाचा मुळीच प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे या पुस्तकाच्या परिचयातुन एका सरसेनापतीचा अनुभव संपन्न दृष्टिकोन कळुन यावा इतकाच भाग मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
पुस्तकाची सुरुवात होते ती सन १९७१ मधिल ढाका येथील पाकीस्तानी सैन्याच्या शरणागतीच्या प्रसंगाने. या प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी जनरल श्री. कृष्णराव यांना मिळाली होती. त्या प्रसंगा बद्दल निवृत्त सरसेनापती म्हणतात," माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय प्रसंग कोणता?अशी विचारणा नेहमी केली जाते. लष्करप्रमुख म्ह्णुन बढती मिळाली तो क्षण? की राज्यपाल म्ह्णुन नियुक्ती झाली तो क्षण? की........". आणि त्याला माझे उत्तर एकच आहे, ते म्हणजे," ढाका येथील पाकीस्तानी सैन्याच्या शरणागतीच्या प्रसंगातील माझी उपस्थिती." त्यांच्या या विचारा वरुन एका सच्च्या देशभक्ताचा व सरसेनापतीचा दृष्टिकोन व पीळ कसा असतो याची कल्पना येते. यातुन वैयक्तीक प्रगती वा आनंद याला देशाच्या हितापुढे किंमत नसते हे सहजपणे आपल्याही मनाला कुठेतरी जाणवुन जातं.
अश्या सेवानिवृत्त सरसेनापतीचे, ज्या लष्करात त्यांनी ४१ वर्षे सेवा केली त्या लष्करा विषयीचे विचार आजही तेव्हढेच महत्वाचे आहेत. ते म्हणतात:
जो देश सामर्थवान असतो त्याच देशा विषयी इतर देशातील लोकांच्या मनात, मग ते लष्करीतील असोत वा सर्वसामान्य नागरिक, आदर असतो. हे सामर्थ्य प्रथम देशाच्या आण्विक ( अर्थातच लष्करी) क्षमतेवरुन नंतर आर्थिक ताकदी वरुन आणि त्या नंतर ईतर गुणवत्तेवरुन ओळखले जाते. आपल्या देशाचे लष्कर हे प्रामुख्याने बचावासाठी ठेवलेले आहे. तथापि युध्द लादले गेलेच तर ते जिंकण्याचे लष्कराचे ध्येय असले पाहीजे आणि लष्कराच्या सर्व कामांचे उद्दीष्ट हेच असायला हवे. तसेच लष्कराने दिलेल्या वेळेत कमितकमी हानी होईल अश्या रितीने त्याचे उद्दिष्ट साध्य करायला हवे.त्यासाठी उत्तम दर्जाची युध्दसज्जता. सतर्कता, कठोर आणि व्यावहारीक प्रशिक्षण, सक्षम प्रशासन आणि अतुलनीय मनोबल याचा अंगिकार लष्कराने करायला हवा.केवळ बचाव करण्याने युध्द जिंकली जात नाहीत, त्यासाठी आवश्यक आक्रमक क्षमताही लागते. त्यामुळे लष्करी अधिकार्‍यांच्या व्यवस्थापनात महत्वाचा मुद्दा असायला तो युद्धात विजय मिळवुन देईल असे नेतृत्व विकसीत करण्याचा. लष्कराची गरजच अशी आहे की कमांडमध्ये अथवा प्रशासकीय विभागात महत्वाच्या निर्णयक्षम नेमणुका करताना त्या अधिकार्‍याचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष युध्दात भाग घेतल्याचा अनुभव लक्षात घ्यावा लागतो.
युद्धात विजय मिळवुन देईल असे नेतृत्व गुण भारतीय लष्करातील अधिकार्‍यांनी कश्या प्रकारे बाळगले पाहीजेत या विषयी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय लष्कर अकादमीतील पासिंग आऊट परेडच्या वेळी सरसेनापती म्हणुन मार्गदर्शन करताना श्री, कृष्णराव म्हणाले होते," अत्यंत कठीण प्रदेशात पुर्णपणे बिघडलेल्या हवामानात तुम्हाला युध्द करण्याची वेळ येईल. त्यावेळी कदाचित शत्रु तुम्हाला भारी पडला असेल.तुमच्या सैन्याची जीवीत आणि इतर हानी झाली असेल, तुमच्याकडे साधनांची कमतरता असेल.अगदी तुमच्या मुख्यालयाशी तुमचा संपर्क तुटला असेल आणि तुम्हाला कुठूनही मार्गदर्शन आणि पाठींबा मिळण्याची शक्यता नसेल आणि सगळीकडुन तुमच्यावर संकटांचे पहाड कोसळत असतील . अश्या आकस्मीक परिस्थितीतच एक लष्करी नेता म्हणून उभे राहुन आपल्या कमांडचे योग्य नेतृत्व करण्याची क्षमता तुम्ही मिळवायला हावी. आपल्या सैनिकांनी कठीणातल्या कठीण परिस्थितीत आपले कौशल्य सिध्द केले आहे..आपले अधिकारीही अशा परिस्थितीत नेतृत्वाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. याच साठी तुम्ही उच्च प्रतीची क्षमता अंगी बाळगली पाहीजे.स्वच्छ चरित्र, धैर्यशिलता,पुढाकार आणि निश्चयीपणा, नि:पक्षपातीपणा हे गुण तुमच्यात विकसीत व्हायला हवेत,ज्या योगे तुम्ही एक आदर्श निर्माण करु शकाल.". या विचारांवरुन लष्करात कोणत्या दर्जाच्या नेतृत्व गुणांची आवश्यकता असते आणि आपल्या लष्कराचा दर्जा एव्हडा चांगला का याची कल्पना येते.
बर्‍याच वेळा आपले राजकीय नेते अनावश्यक व बेजाबदार सल्ले लष्कराला देत असतात. त्या विषयी ते म्हणतात," राजकीय नेते विसरतात की. सैनिक आपले कर्तव्य बजावत असताना त्याच्या वरिष्ठांच्या आदेशांचे तंतोतंत पालन करत असतो. तेव्हा दिलेला आदेश वैध की अवैध हे तो सैनिक कसे ठरवु शकेल याचा विचार राजकीय नेत्यांनी करायला हवा. जवानाला मिळालेल्या आदेशाचे त्याने तंतोतंत पालन करणे अपेक्षित असते. तेव्हा लष्कराची शिस्त आणि निष्ठा या बाबत हस्तक्षेप करताना राजकीय नेत्यांनी अतिशय सावधगीरि बाळगायला हवी, अन्यथा राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येवु शकते."
राजकीय नेत्यां सारखेच देशातील तथाकथीत विचारवंत व बुध्दीवंत भारताच्या परराष्ट्र विषयक आणि अंतर्गत समस्यां (परराष्ट्रांच्या मदतीने- विशेषत: पाकिस्तान व चिन- होणार्‍या अतिरेक्य़ांच्या कारवाया ईत्यादी ) विषयी देशात अनाठाई चर्चा करत असतात. या बाबत श्री. कृष्णराव म्हणतात," या बाबत होणार्‍या चर्चेने आम्ही चकीत खरे तर निराश होत असु. देशातील हे काही घटक भारत युध्दासाठी हपापलेला आहे आहे पाकिस्तानला खर्‍या अर्थाने शांतता हवी आहे असा उलटा प्रचार करत. त्यांच्या मते झिया-उल-हक भारता बरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, पण भारत त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत नाही.सध्याच्या नियंत्रण रेषेला सिमा मानुन किंवा काही भाग सोडुन काश्मिर प्रश्न निकालात काढावा . भारताने पाकिस्तानला विश्वास देण्यासाठी आपले सैन्य कमी करावे, भारताने थोरल्या भावाच्या भुमिकेतुन पाकिस्तानला अनेक सवलती द्याव्यात वैगरे वैगरे त्यांचे विचार होते.आपल्या घटनेत जम्मु-काश्मिरचे स्थान , राज्याच्या विधानसभेने भारतात सामिल होवुन आपण देशाचा अविभाज्य घटक आहोत असे जाहीर करणारा केलेला ठराव,आम्हाला करावी लागलेली ३ युध्दे, काश्मिरची सुरक्षितता राखताना आमच्या जवानांनी ,हजारो लोकांनी केलेले बलिदान, विविध करारांचा पाकिस्तानने केलेला भंग .याशिवाय त्याचा सातत्याचा संघर्षाचा पवित्रा,लष्कराची उभारणी आणि भारताच्या अंतर्गत कारभारातील ढवळाढवळ या सर्व बाबींकडे हे घटक कोणत्या भावनेने दुर्लक्ष करत होते कोण जाणे!.त्याचप्रमाणे चीन संदर्भातही या घटकांचा उलटा प्रसार सुरु होता. १९६२ मधिल सीमेबद्दल झालेले युध्द चीनने नव्हे तर भारताने सुरु केले होते असा जावई शोध या लोकांनी लावला.ज्या भागांवर चीनने ताबा मिळवला आहे,ते भाग भारताचे नव्हतेच मुळी.भारत कधिही चीनच्या सामर्थ्याची बरोबरी करु शकणार नाही आणि त्या भागांचे रक्षणही करु शकणार नाही. चीनने ताब्यात घेतलेले भाग परत घेणे तर सोडाच पण भारताने त्या भागांवर दावा देखिल करु नये आणि चीन बरोबर मुकाट्याने संबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, वाढवलेले संरक्षण विषयक अंदाजपत्रक कमी करावे आणि लष्करावर होणारा खर्च विकास कामांवर खर्च करावा असे या मंडळींचे म्हणणे होते.ईथेही या लोकांना काही गोष्टींची जाणिव नव्हती. ती म्हणजे, दोन्ही बाजुंच्या अधिकृत अहवालातुन स्पष्ट झाले होते की वादग्रस्त प्रदेश भारताचेच होते. चीननेच भारतावर हल्ला केला होता.आपल्या प्रदेशांचे रक्षण करण्यासाठीच भारतीय लष्कर पुढे गेले होते. या साठी आपल्या अनेक जवानांनी जीव गमावले.भारताने चीन बरोवर संबंध सुधारण्याचा नेहमीच प्रयत्न केला पण चीनच्या ताठरपणा मुळे हे शक्य झाले नाही. भारताच्या संसदेने " भारताच्या पवित्र भुमिवरुन हल्लेखोर्‍यास परतावुन लावा." असा ठराव मंजुर केला होता ज्यास अनुसरुन सैन्य लढले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्यासाठी संरक्षण व्यवस्था जतन केली नसती, विकसीत केली नसती तर बचत केलेल्या पैशातुन विकास करण्याजोगे देशात काही शिल्लक उरले नसते हे त्यांनी लक्षातच घेतले नव्हते. समाजातील अश्या जबाबदार व्यक्तींनी केलेल्या अश्या प्रकारच्या बेजाबदार विधानांमुळे लष्करात गोंधळ उडु शकतो आणि त्याचा विपरीत परीणाम जवानांच्या लढाऊ वृत्तीवर होऊ शकतो. विशेषत: ज्या भुमीच्या मालकी विषयी आपलेच लोक शंका उपस्थित करत असतील त्या बाबतीत जवानांचा आत्मविश्वास डळमळणारच."
माजी सरसेनापतींचे हे विचार आजच्या परिस्थितही गैरलागु झालेले नाहीत. आजही काही जण पाकिस्तान बाबत, ज्या राष्ट्राने भारताविरुध्द दोनदा उघड युध्द छेडले आणि अतिरेक्यांना छुपी मदत करुन देशात बॉंबस्फोट घडवुन आणले त्याचा बाबत, " अमन की आशा" या प्रकारच्या मोहिमा हाती घेत आहेत.
काश्मिर प्रश्नाबाबतचे त्यांचे विचार कोणाही देशप्रेमी माणसाला पटण्या सारखे आहेत. ते म्हणतात, " जागतिक स्तरावर आपण काश्मिरबाबत ठाम धोरण जाहीर करायला हवे. काश्मिर संदर्भात पाकिस्तानचा संबंध केवळ त्याच्या अनधिकृत ताब्यात असलेल्या काश्मिरी भूभागाविषयीच येतो आणि तो भुभाग परत मिळवण्यासाठी भारताने पाकशी चर्चा करावी.भारतिय काश्मिरमध्ये लुडबुड करण्याचे त्या देशाला काही कारण नाही अशी आपली भुमिका असायला हवी. याशिवाय पाकच्या ताब्यात असलेला प्रदेश हा जम्मु-काश्मिरच्या घटनेनुसार राज्याचाच भाग आहे आणि भारत तो भाग सोडुन देणार नाही याची खात्री राज्याच्या लोकांना पटवायला हवी. याच बाबत अतिरेक्यां बरोबर चर्चा करावी असा सुर अनेकदा उमटत असतो. काश्मिरातल्या अतिरेक्यांचा संबंध राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही. त्यांच्या सगळ्या नाड्या पाकिस्तानच्या हातात आहेत. पाकिस्तान कडुन नियंत्रीत असलेया अतिरेक्यांशी कसली चर्चा करणार?. घटनेच्या चौकटीबाहेर राहून केलेली कोणतीही तडजोड देशाच्या ऎक्याला बाधक ठरेल. शिवाय अतिरेकी जेव्हा मजबुत स्थितीत असतात त्या वेळी त्यांच्या बरोबर चर्चाच होवु शकत नाही असाच आजवरचा अनुभव आहे."
देशाच्या अंतर्गत असलेली अस्वस्थता व असंतोष दुर करण्या विषयी ते म्हणतात, " विकासासाठी शांततेची गरज आहे आणि शांतता प्रस्थापीत करायची तर स्थैर्य आवश्यक आहे. देशांतर्गत असंतोष व बंडखोरी समुळ नष्ट करण्यासाठी केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजीक आघाड्यांवर तोडगा काढणे निकडीचे असते. या बाबतचे निर्णय घेतल्या नंतर त्याची अंमलबजावणी होण्यात दिरंगाईमुळे असंतोषाचा, दहशतवादाचा वारंवार भडका उडतो. त्याच प्रमाणे सर्वच असंतुष्ट गटांना चर्चेमध्ये सगभागी करुन घेतले नाही तर चर्चेचे गुर्‍हाळ कधी संपणार नाही.या बाबत गरज असते ते ती उदारमतवादी दृष्टिकोनाची, कराराची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होण्याची आणि परिस्थिती सुरळीत करणार्‍या योजनांची आणि त्या परिसराच्या विकासाला चालना देण्याची."
एका निवृत्त सरसेनापतींचे वर मांडलेले हे सर्व विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. आपण आपला स्वातंत्रदिन आज साजरा करीत आहोत. अश्या वेळी निवृत्त सरसेनापती श्री. कृष्णराव यांच्या सारखा विचार करणार्‍यांची आज देशाला गरज आहे असे वाटल्यानेच या पुस्तकाचा परिचय करुन देण्याचा हा अल्प प्रयत्न. खरतर हे पुस्तक सगळ्यांनी वाचाव अशी माझी विनंती आहे कारण या पुस्तकात मांडलेले अनुभव संपन्न विचार आजच्या परिस्थितीत अंमलात आणण्या सारखे आहेत.
या पुस्तकामध्ये युध्दभुमीवर वीरमरण आलेल्या सैनिकांच मनोगत व्यक्त करणार्‍या काही ओळी दिलेल्या आहेत.कोहीमा आणि इम्फाळमध्ये युध्दात वीरमरण आलेल्या जवानांच्या दफनभुमी आहेत. कोहीमात दोस्त राष्ट्रांनी जपानचा पराभव केल्यानं संपुर्ण युध्दाचं चित्रच पालटलं. या युध्दात अनेक भारतीय जवान कामात आले. कोहीमातल्या दफनभुमीतील एका कबरीवर कोरलेल्या काव्यपंक्ती सार्‍या जगाचे लक्ष वेधुन घेतात........
जेव्हा जाल परतुनी घरा
आणि सांगा त्यांना आमच्याबद्दल
आणि सांगा,
तुमच्या उद्यासाठी
त्यांनी त्यागिला त्यांचा आज......
किती समर्पक आहेत या काव्यपंक्ती. पण ही वस्तुस्थिती आहे की, भारताच्या ज्या अनेक सैनिकांनी देशासाठी प्राण दिले वा जे सैनिक आजही देशाच्या सिमेच अहोरात्र रक्षण करीत आहेत अश्या सैनिकांची आठवण फक्त युध्दाच्या वेळीच होते. सैनिकांच्या त्यागामुळेच आपण आपले सर्वसामान्य जिवन शांततेने जगत आहोत. तेव्हा अश्या सैनिकां बद्द्ल शांततेच्या काळात असलेल्या राजकीय व सामाजीक उदासिनतेची खंत एका सेनापतीला नसेल तर कोणाला असेल. हीच खंत निवृत्त सरसेनापती श्री.कृष्णराव यांनी फ्रान्सीस क्वारल्सच्या खालील चार ओळीं मधुन व्यक्त केली आहे :
आमचा ईश्वर आणि सैनिक दोघांवरही आमची भक्ती आहे
मात्र धोक्याच्या जागी कड्यावर असताना,आधी नाही.
सुटका झाल्यानंतर दोघांची परतफेड सारखीच होते,
परमेश्वराचे विस्मरण होते आणि सैनिक तुच्छ होतात!
खर आहे ना?