रविवारचा काहीसा निवांत वेळ होता. गणपती बाप्पा पण लवकरच येणार आहेत. तेव्हा विचार केला घरात थोडीशी आवराआवर -साफसफाई करुन टाकुया.पण कुठुन सुरुवात करावी तेच उमजत नव्हत. माझी आवराआवर सुरु झाली की घरातल्या सगळ्यांचा कल्लोळ सुरु होतो. हे टाकु नकोस, त्याला मुळीच हात लावु नकोस या आणि अश्या बर्याच सुचनांचा माझ्यावर भडीमार सुरु होतो.म्युन्सिपाल्टीचे लोक दिसल्यावर ज्या प्रमाणे फेरीवाल्यांची धावपळ सुरु होते तसच घरातल वातावरण तंग होत.ईतर वेळा कितीही सांगीतल तरी आवराआवर न करणारी मुल सुध्दा त्यांना हव्या असणार्या त्यांच्या वस्तु पटापट आवरतात.त्यांना माहीत आहे की माझी साफसफाई मोहीम सुरु झाली की त्यांच्या बर्याच गोष्टी काही न विचारता अडगळ म्हणुन टाकल्या जावु शकतात.अर्थात त्याचा दुसराही फायदा घरातल्यांना होतोच तो म्हणजे पुढचा किमान एक महिना घरात कुठलीही गोष्ट सापडली नाही की त्याच श्रेय(?) मलाच दिल जात.
त्यामुळे मी घरातल्या सगळ्यांना दोन तासात त्यांच्या वस्तु आवरायला दोन तासांचा अल्टीमेटम दिला आणि तो पर्यंत माझाच कप्पा पहिल्यांदा आवरायला घेतला.कप्पा आवरताना अनेक गोष्टी माझ्या नजरेस पडल्या,ज्या शोधण्यासाठी मी माझा आणि घरातल्यांचा रक्तदाब कितीतरी वेळा वाढवला होता.तेव्हा मनाशीच खजील होवून ठरवल की आपला कप्पा आज काही केल्या संपुर्ण लावायचाच.
कप्पा आवरता आवरता हाताला लागल्या पार जुन्या पुराण्या छोट्या पॉकेट डायर्यांचा एकत्र बांधुन ठेवलेला गठ्ठा.आताशा अश्या डायर्या फारश्या कोणी वापरत नाहीत पण या डायर्यांमध्ये छोट्या छोट्या नोंदीतर चटकन करता यायच्याच पण शेवटच्या काही पानांवर फोन नंबर लिहीण्याची सोय असायची.अर्थातच २७-२८ वर्षांपुर्वी टेलीफोन हे फ़ारच कमी जणांकडे असल्याने ती शेवटची काही पान पण पुर्ण भरायची नाहीत.आता मोबाईलच्या जमान्यात डायरी हा प्रकारच आऊटडेटॆ्ड झाला आहे. कारण मोबाईल मध्ये सर्व काही सेव्ह करता येत.अगदी पत्ते, मिटींगच्या वेळा पासुन ते अगदी वाढदिवसच्या नोंदी पर्यंत.....
तेव्हा इतकी वर्ष आवर्जुन जपुन ठेवलेल्या या डायर्यांन मध्ये आपण काय काय लिहिल होत ते मी वाचायच ठरवल.या डायर्या साधारणपणे तारुण्यपिटीका येणे व गध्देपंचविशी पार करणे या दरम्यानच्या काळातील होत्या.साध्या सरळ शब्दात माझ्या वयाची १७-१८ ते २५ वर्षे या काळातील होत्या.
तो काळ आठवला की परत येकदा तारुण्यात गेल्याची गोड शिरशिरी मनात येतेच.पावलो पावली प्रेमात पडणे -हो पडणेच -आणि त्या पडण्याच्या जखमा पुरत्या भरण्या पुर्वीच परत परत प्रेमात पडणे असा रोमांचकारी व साहसपुर्ण असा तो काळ होता.मग अश्या घटनांच्या काही नोंदी या डायर्यां मध्ये नक्कीच असणार होत्या नाही का?
पहीलीच डायरी चाळताना जुन महिन्यात एक नोंद आढळली.ते कॉलेजच पहिलच वर्ष आणि जुनचा दुसराच आठवडा."आषाढ्यस्य प्रथम दिवसे"ला असाव असच पावसाळी व कुंद वातावरण. कॉलेजचा असा स्पॉट निवडला होता भिडु की गेट के अंदर आने वाली हर एक बाला ईस हिरोकी नजरसे बच नही पाये.गेटसे हसिना तो बहुत सारी आ रही थी मगर दीलके अंदरका तार छेडे ऎसी कोई नजर नही आ रही थी.बस पल गुजरते जा रहे थे इतक्यात ती आली.ती आली, तिने पाहील आणि दुसर-तिसर काही न होता मी परत येकदा प्रेमात पडलो.ती ऎतिहासीक नोंद मग डायरीत करण सहाजीकच होत नाही का ?
मग नेहमीचेच हातखंडे वापरुन ओळख करुन घेणे वैगरे प्रकार झाले.मग डायरीत अजुन एक नोंद होती तिच्या वाढदिवसाची..... सॉरी बर्थडेची. मुलींची बरेच वर्ष वाढ होत नसल्याने त्यांचा बर्थडे साजरा होत असतो,वाढदिवस नाही.प्रेमात अजुनही पडु पाहाणार्या सर्वांना माझ्या तर्फे महत्वाची टीप देत आहे.तेव्हा हे जरुर लक्षात असुद्या.मी सुरुवातीलाच कबुल करुन टाकल्या प्रमाणे या प्रेमातही मी पडलोच.पण हे पडण जरा जास्तच जोराच असल्याने त्या वर्षी असल्या दुसर्या नोंदी डायरीत नाहीत.
मला एक दुसरी सवय होती ती म्हणजे मित्रांचे पत्ते त्यांचा वाढदिवस ज्या दिवशी असेल त्या तारखेलाच नोंदवून ठेवायचे.म्हणजे पत्ता ही राहातो आणि ते पान न विसरता त्या दिवशी मित्राच्या वाढदिवसाची आपसुन आठवण करुन देत असे.त्याचे फायदे काय हे हॉस्टेल लाईफ अनुभवलेल्यांना सांगायला हवच का ?.मित्राचा वाढदिवस साजरा करण म्हणजे त्याचा खिसा चांगलाच हलका करण हीच तर मोठी चैन करायची संधी असायची.ईतर वेळला पैसे द्यायला टाळाटाळ करणारे मित्र सुध्दा या वेळी आवर्जून पैसे खर्च करत असत.घरापासुन दुर असणारे आम्ही त्या दिवशी फारच सेंटी होत असल्याने किमान त्या दिवशी कोणालाच नाराज करु नये अशीच भावना सर्वांची असायची.
मग प्रत्येक डायरी चाळत गेलो.त्या वेळी अस लक्षात आल की फार कमी पत्ते पुढच्या वर्षीच्या डायर्यांमध्ये रिपीट झाले आहेत.याचाच दुसरा अर्थ असा की बरेचसे मित्र हे त्या त्या वर्षां नंतर दुरावले किंवा काही इतर कारणाने दुर निघुन गेले.
या सात ते आठ वर्षांच्या डायर्या चाळल्या नंतर अस लक्षात आल की फक्त चार मित्रांचेच पत्ते शेवटच्या डायरीत रिपीट झाले आहेत.आयुष्यातील त्या मोलाच्या वर्षांत माझ्या मैत्रीच्या अॅसेट बाजुला होते फक्त चार मित्र.आणि त्या वर्षांतील लॉस होता तो मोजण्या पलीकडचा. याच काळात प्रेमात वारंवार पडत होतो आणि बरेचदा भयंकर दुखावलेला देखील होतो त्या वेळी सावरले ते माझ्या या अॅसेट बाजुनेच.आज आम्ही मित्र एकमेकां पासुन अंतराच्या दृष्टीने फार दुर गेलेलो आहोत. मोबाईलच्या सोईमुळे क्वचित कधिकाळी बोलण-एसएमएस होत नाही असं नाही .पण भेटी जवळपास दुरापास्त झाल्या आहेत.पण तरीही मनात पुर्ण खात्री आहे आजही आमच्यातली ती आपुलकी डायरीच्याच पानांवर नव्हे तर मनामनात कायम आहे.पण या धावपळीच्या आणि यशस्वी होण्याच्या जिवघेण्या स्पर्धेत तिची आठवण जपायला वेळ तो कोणाला.
तेव्हा मला तर अस वाटत की आपण जसा कपाटातला कप्पा जसा मधुन मधुन आवरतो अगदी तसच आधुन मधुन वेळ काढुन मनाचा कप्पा जरा आवरला पाहीजे.न जाणो त्यातुनही काही अॅसेट्स जरुर सापडतील.तुम्हाला काय वाटत ?
त्यामुळे मी तरी वेळात वेळ काढुन मनाचा कप्पा आवरुन बघण्याचा जरुर प्रयत्न करणार आहे कारण त्यातुन मनाच्या अडगळीत लपलेले काही अॅसेट्स माझ्या हाती लागतील याची मला खात्री आहे.आशा करतो तुम्हीहि जरुर असाच प्रयत्न कराल आणि तुम्हालाही लक्षात येईल की वाढत्या वयासोबत गमावलेल खुपच आहे पण जे कमावलेल आहे ते पण कमी नक्कीच नाही.