११ फेब्रु, २०१३

आपली मायबोली.... एक अभिजात भाषा.....




आपल्या मायबोली "मराठी" ला अभिजात भाषा म्हणुन मान्यता मिळावी या करीता  महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत केल्याची माहिती मी माझ्या या पुर्वीच्या लेखात दिली होती.जेष्ठ साहित्यीक श्री.रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षते खालील या समितीने त्यांचा संशोधनपर अहवाल तयार केला असुन तो माननीय मुख्यमंत्राकडे पुढील महिन्यात सादर केला जाणार आहे.
समितीने हा अहवाल तयार करताना सुमारे हजाराहुन अधिक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. या अभ्यासपुर्ण अहवालातले निष्कर्ष सप्रमाण सिद्ध करतात की.....
·       मराठी भाषा ही संस्कृतपासुन नव्हे तर वैदीकपुर्ण बोली भाषांपासुन निर्माण झाली आहे.
·       ती सातशे-आठशे वर्षे जुनी नव्हे तर २ हजार वर्षापासुनची भाषा आहे.
·       जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा असलेल्या मराठीच्या ५२ बोलीभाषा आहेत.
·       मराठी भाषा ७२ देशांमध्ये बोलली जाते.
·       सर्वसामान्यपणे ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र,विवेकसिंधु हे मराठीतले आद्यग्रंथ मानले जात असलेतरी ते आद्यग्रंथ नाहीत. ते मराठी भाषा समृद्ध करणारे श्रेष्ठ ग्रंथ आहेत.
·       पैठण येथील हाल या सातवाहन राजाने संपादीत केलेला गाथा सप्तशती हा मराठीतला आद्यग्रंथ असुन तो २ हजार वर्षांपुर्वीचा लिहीलेला आहे.
·       विनयपिटक या अडीच हजार वर्षापुर्वी उत्तर भारतात लिहिलेल्या बौद्ध धर्मग्रंथामध्ये महाराष्ट्र हा प्रदेशवाचक उल्लेख आहे.
·       श्रीलंकेत दिपवंश आणि महावंश हे दोन ग्रंथ सिंहली भाषेत २ हजार वर्षापुर्वी लिहीले गेले त्यात मराठी भाषकांचा उल्लेख आढळतो.
·        जुन्नरच्या नाणेघाटात प्राचिन शिलालेख आढळलेला आहे. तो ब्राम्ही लिपीत आणि महाराष्ट्री पाकृत मध्ये असुन, २२०० वर्षापुर्वीच्या या शिलालेखात मराठी बोलणार्‍यांचा उल्लेख ,’महारठीनो’ असा केलेला आहे.
·       विदर्भातील वाशिमच्या असलेल्या गुणाढ्य यांनी पंजाबमध्ये मध्ये जाउन २ हजार वर्षापुर्वी बृहत्कथा ग्रंथ लिहिला. पैशाची या प्राकृतभाषेत लिहीलेल्या या ग्रंथातील अनेक प्रकरणे ही मराठीत आहेत.
·       प्राकृत मराठी,महारठी,मरहट्टी, देशी,महाराष्ट्री आणि मराठी असे मराठी भाषेचे वेगवेगळे नामोल्लेख केले जात असले तरी ती एकच भाषा आहे.
      तेव्हा या अभ्यासपुर्ण अहवालातुन सिध्द होणारे निष्कर्ष पाहाता मायबोली मराठीला केन्द्र सरकारकडुन ’अभिजात भाषा’ म्हणुन निश्चितच मान्यता मिळेल अशी खात्री वाटते. या पुर्वीच अभिजात भाषा म्हणुन मान्यता मिळालेल्या भाषा फक्त चारच असुन त्या तमिळ,तेलगु, कन्नड आणि संस्कृत या आहेत. त्या मध्ये आपल्या मायबोलीचा समावेश होणार आहे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
      तरी या पुढे प्रत्येक मराठी भाषीकाने मायबोलीचा अभिमान बाळगणे आणि मराठी भाषिक म्हणुन जन्मास आलो हे अत्यंत भाग्याचे मानणे यात काहीच गैर नाही हे निश्चित....
जय महाराष्ट्र जय मराठी.  

*** आधार: लोकमत शनिवार दि. ९ फेब्रुवारी २०१३ मधिल बातमी.