३० सप्टें, २०१२

अभिजात भाषा – मायबोली मराठी

 

 

मराठी भाषेला ’अभिजात’ भाषा म्हणुन मान्यता मिळावी या करीता महाराष्ट्र शासनाने एका समितीची स्थापना केल्याची माहिती मराठी भाषेत ब्लॉग लिहीण्यार्‍या तसेच  मायबोली मराठी भाषेवर अत्यंत प्रेम करणार्‍या तुमच्या-माझ्या सारख्या अनेक मायबोलीकरांना नसण्याचीच शक्यता आहे.खरं सांगायच म्हणजे अशी समिती असल्याची व एखाद्या भाषेला ’अभिजात’ भाषा म्हणुन मान्यता मिळण्यासाठी कोणते निकष आहेत या विषयीची माहिती सर्वप्रथम मला श्री. अनिल गोरे (मराठीकाका) यांच्या कडुन आलेल्या ई-मेल मधुन मिळाली.ही माहिती ब्लॉगवर आज टाकु उद्या टाकु असे करता करता ४-६ महिने पाहाता पाहाता निघुन गेले.पण याच संदर्भात रविवार दि.२३ सप्टेंबर २०१२ च्या लोकसत्ता मधिल लोकरंग या पुरवणीतील ’पडसाद’ या सदरात प्रसिध्द झालेल्या श्री.प्रविण धोपट यांच्या पत्राने या विषयाची माहिती मायबोलीकरांना करुन देणे मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी व तिच्या प्रगतिसाठी अत्यंत गरजेचे असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.

मराठी भाषेला ’अभिजात’ भाषा म्हणुन केन्द्र सरकार कडुन मान्यता मिळण्यासाठी फक्त मराठी अस्मितेचे ढोल वाजवुन काम होणार नाही.एखाद्या भाषेला ’अभिजात’ भाषा म्हणुन मान्यता मिळवण्यासाठी ती भाषा सुमारे १५०० ते २००० वर्षांपासुन अस्तित्वात असल्याचे पुरावे सादर करावे लागतात. यात लिखित पुराव्यांना खुप महत्व आहे. लिखित पुरावे हे कागद, भूर्जपत्र, ताडपत्र,ताम्रपट,शिलालेख किंवा लाकडी खांब-तुळई या वरील कोरलेला मजकुर या स्वरुपात असतात.

काळाच्या ओघात बहुतांश लिखीत पुरावे नष्ट होण्याची शक्यता असते.त्यातच आपला महाराष्ट्र हा लढवय्यांचा प्रदेश. हिंदुस्तानाच्या रक्षणाच्या दृष्टीने सतत सज्ज असलेल्या या प्रदेशावर परकीय आक्रमकांचे वारंवार हल्ले झाले.औरंगजेब स्व;त २६ वर्षे या प्रदेशात मराठी सत्ता नष्ट करण्यासाठी तळ ठोकुन होता. अंतत: स्वत;च या मातीत नष्ट झाला पण त्याच्या वा एकंदरीत मुस्लिम आक्रमकांच्या देवळे ,शिल्प यांची तोडफोड करणे वा नालंदा-तक्षशीला या सारख्या विश्वविख्यात  विद्यापिठांना जाळुन नष्ट करणे या विघातक कृत्यांमुळे आपल्या देशातील लिखित अशी बहुमोल ज्ञानसंपदा मोठ्या प्रमाणात या पुर्वीच नष्ट झालेली आहे.

त्यामुळे भाषेचा बोलण्यासाठी वापर करताना वापरल्या जाणार्‍या शब्दांची इतर भाषां मधील शब्दांशी तुलना करून त्यापैकि कोणती भाषा अधिक जुनी या बाबत काही परिस्थितिजन्य पुरावे देता येतील का यावर अभ्यासकांनी विचार करावा असे आग्रही मत श्री गोरे यांनी मांडले आहे.

त्या अनुषंगाने श्री गोरे काका यांनी स्व:ताचे निरीक्षण खालील प्रमाणे मांडले आहे. ते म्हणतात,

स्वत;चे शरीर ,खाण्याचे पदार्थ,शेती,स्वत:चे घर,नातेवाईक या सबंधीचे शब्द कोणत्याही भाषेत प्रथम निर्माण झाले असणार. त्यानंतर कपडे, सण,देवदेवतांची नावे,विज्ञान,तंत्रज्ञान इत्यादि सबंधीचे शब्द निर्माण झाले असतील.स्वत;चे शरीर ,खाण्याचे पदार्थ ,शेती,स्वत:चे घर, नातेवाईक या सबंधीचे बहुसंख्य मराठी शब्द छोटे आणि जोडाक्षर नसलेले साधे शब्द आहेत. उदा; कान ,नाक, मन ,मान, घसा, इत्यादि शरीरा बाबतचे तर आई, बाबा, मामा, काका, भाऊ, ताई, माई, दादा इत्यादि नातेसंबंधा बाबतचे.तसेच लुगडे ,धोतर ,चादर ,सदरा ,उपरणे इत्यादि कपड्या बाबतचे शब्द असे अनेक मराठी शब्द साधे आणि सोपे आहेत.

एकंदरीतच मुळ मराठी शब्द हे साधे आणि सोपे असून जोडाक्षर असलेले बहुतांश शब्द हे अन्य भाषांतून मराठीत आलेले दिसतात. अनेक वस्तु,भावना,संकल्पना यासाठी मराठीत  साधे ,सोपे शब्द फार पूर्वीच वापरले गेल्याने त्यानंतर निर्माण झालेल्या इतर भाषांना याच कारणांसाठी नवीन शब्द निर्माण करावे लागले जे अर्थातच अधिक गुंतागुतीचे व क्लिष्ट आहेत. या परिस्थितीजन्य पुराव्यावरून मराठी भाषा खूप जुनी असावी असे श्री गोरे यांचे प्राथमिक निरीक्षण आहे.

तर अभिजात भाषा कोणत्या व मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळवणे महत्वाचे का या बाबत श्री प्रविण धोपट त्यांच्या पत्रात म्हणतात :

भारतात एकूण ३० अधिकृत भाषा असून त्यापैकि ४ भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. त्या ४ भाषा आहेत, संस्कृत,कन्नड, तमिळ आणि तेलगू .त्यामुळे त्या भाषांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून प्रतिवर्षी ५०० कोटी त्या त्या राज्यांना मिळतात.त्यातील १० टक्के म्हणजे सुमारे ५० कोटी त्या भाषांच्या साहित्य संमेलंनांसाठी ती राज्ये खर्च करतात.तर मराठी भाषेच्या साहित्य संमेलांनासाठी आपले महाराष्ट्र राज्य सरकार प्रतिवर्षी फक्त २५  लाख देते तर त्यावर ही वादंग आणि चर्चा होते.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर तिच्या विकासासाठी देखिल प्रतिवर्षी ५०० कोटी केंद्रा कडून मिळतील आणि त्यातील १० टक्के म्हणजेच ५० कोटी रुपयात परदेशातही अत्यंत थाटामाटात माय मराठीच साहित्य संमेलन साजरा करता येईल.

मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समितीने अथक परिश्रम करून मराठी भाषा गेल्या अडीच हजार वर्षापासून  अस्तीत्वात असल्याचे पुरावे जमवले आहेत.या समितीने केलेल्या संशोधनानुसार दोन हजार पाचशे वर्षापूर्वीच्या ‘विनयपिटक’ या बौद्ध ग्रंथात महाराष्ट्रचा उल्लेख आहे.दीड हजार वर्षापूर्वीच्या श्रीलंकेतील सिंहिली लिपीतील ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ या ग्रंथात महाराष्ट्री भाषेचा उल्लेख आहे.या पुराव्यांमुळे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळायला हवी.वरुची या पाणींनीच्या समकालीन विद्वानाने प्राकृत भाषांच व्याकरण लिहिलं.त्यान शोरशनी, पैशाची, अर्धमाधगी आणि महाराष्ट्री या प्रकृत भाषांच व्याकरण लिहिलं .त्यातला महत्वाचा उल्लेख म्हणजे ‘शेष महाराष्ट्रिवत’  हा नियम.त्यानुसार सर्व प्राकृत भाषांचे उरलेले नियम मराठी प्रमाणे होते.भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत असलेली ८० प्राचीन हस्तलिखिते या पुराव्यांना बळकटी देतात.सातवाहनांच्या काळातील ‘गाथसप्तशती’ हा मराठीतला आद्यग्रंथ आहे. भारतातल्या येकुण हजार लेण्यांपैकी आठशे लेणी महाराष्ट्रात आहेत आणि या लेण्यांमधील सर्व शिलालेख मराठीत आहेत.

तेव्हा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्याने  सहभागी होणारे सर्व लेखक, कार्यकर्ते, विश्लेषक, अभ्यासक, विचारवंत, पत्रकार, मराठी भाषेचा अभिमान असलेले सर्वसामान्य मायबोलीकर आणि  साहित्य संमेलनाचे ‘सन्माननीय’ विरोधक या सर्वांनी या पुढील साहित्य संमेलांनापूर्वी माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल या करिता एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत.कारण आपल्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद असू शकतात पण आपल्यात एक समान धागा आहे तो “ अमृततेही पैजा जिंके” त्या मराठी भाषेचा.

तसच भावनेच्या भरात आपल्याला आपली भाषा श्रेष्ठ आणि अभिजात वाटण ही गोष्ट निराळी आणि त्याला अधिकृत  राजमान्यता मिळवणं हे वेगळं. भाषा आहे तिथे भली बुरी साहित्य निर्मिती होत राहणारच. त्यामुळे भली-बुरी साहित्य संमेलनही व्हायलाच हवीत पण कशी .....

२५ लाख नव्हे तर ५० कोटी खर्चून, अत्यंत थाटामाटात आणि दिमाखात, आपल्या राजस माय मराठीला शोभेल अशी.

जय महाराष्ट्र , जय मराठी

 

आपला

मैत्रय१९६४

 

 

 

आभार आणि श्रेय

 

१)     श्री अनिल गोरे ( मराठीकाका) ,भ्रमणध्वनी ९४२२००१६७१,

ई-मेल marathikaka@gmail.com

२)     श्री प्रविण धोपट यांचे या संदर्भात रविवार दि.२३ सप्टेंबर २०१२ च्या लोकसत्ता मधिल लोकरंग या पुरवणीतील ’पडसाद’ या सदरात प्रसिध्द झालेले पत्र. 

 

टीप : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा या बद्दल फेसबुकवर वा तत्सम माध्यमांव्दारे व ई—मेल द्वारे कृपया प्रसार करा ही विनंती. या लेखातील श्री.गोरे यांची माहिती  “लाल” रंगात तर श्री प्रवीण धोपट यांची माहिती “ हिरव्या” रंगात जाणीवपूर्वक  दिलेली आहे.

 

 

 

 

२९ सप्टें, २०१२

बाप्पा निघाला

 
आज अनंत चतुर्दशी, १० दिवसांचे घरगुती गणपति बाप्पा आणि त्याच बरोबर जवळपास सगळेच सार्वजनिक गणपति बाप्पा यांचं आज विसर्जन होत आहे. हा संवाद लिहायला सुरवात केली त्यावेळी सकाळचे ९.३० झाले होते व मुंबईचा एक मानाचा असलेला गणेश गल्लीचा सार्वजनिक गणपति बाप्पा त्याच्या मंडपातून नुकताच बाहेर पडला होता. त्यामुळे मुंबईतल्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीस आता अनौपचारिकरीत्या सुरुवात झाली आहे. तर मुंबईतल्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची अनौपचारिक सांगता उद्या पहाटे लालबागच्या गणपति बाप्पाच गिरगावच्या चौपाटीवर विसर्जन झाल्यावर होणार आहे.
 
लाडक्या बाप्पाला आज निरोप द्यायचाय या कल्पनेनेच गेले दहा दिवस बाप्पाच्या आगमनामुळे आनंदमय झालेल्या भक्तजनांची आजची मनस्थिती काहीशी हळवी झाली आहे. बाप्पा पाहुणा म्हणून आलेला असल्यानं तो आज न उद्या जाणार याची कल्पना भक्तांना असली तरी जेव्हा तो क्षण प्रत्यक्षात येतो त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. हिंदू धर्मात विविध देवदेवता आहेत ज्यांची उपासना व भक्ति केली जाते. पण भक्तांना भेटायला त्यांच्या घरी तसेच दारी स्व:त येणारा आणि त्यांच्या कडून आपल कोडकौतुक करवून घेणारा लाडका बाप्पा आनंदाचे क्षण तर देतोच पण त्याच बरोबर कौटुंबिक स्नेह आणि सामाजिक उत्साहाची सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.
अस असल तरी या वर्षाच्या गणेशोत्साहावर महाराष्ट्रातील दुष्काळच अस्मानी संकट आणि त्याच बरोबर राज्यातील सिंचन घोटाळा, केंद्रातील कोळसा घोटाळा , परदेशी बड्या कंपन्यांना भारतातील किरकोळ किराणा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास केंद्राने दिलेली परवानगी या मुळे निर्माण झालेली राजकीय आणि सामाजिक अस्वस्थता याच सावट होतं. त्यातच डिझेलच्या किंमतीतील वाढ आणि सर्वसामान्य कुटुंबासाठी गरजेच्या असलेल्या घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या दरात केलेली अप्रत्यक्ष वाढ ( सवलतीत मिळणार्‍या सिलेंडरची मर्यादा ६ करून) यामुळे बिघडू पहाणारे कौटुंबिक अंदाजपत्रक याचा विचार बाप्पाच्या भक्तांच्या मनात निश्चितच  असणार होता.
पण गेले दहा दिवस ज्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा झाला ते पाहता बाप्पा विषयी भक्तांच्या मनात किती आपुलकी आणि निरपेक्ष प्रेम आहे हे दिसून येत.
या सर्व प्रेमाचा भावपूर्ण सार्वजनिक आविष्कार म्हणजे महाराष्ट्रभर पारंपरिक पध्दतीन वाजत गाजत निघालेल्या बाप्पाच्या सार्वजनिक मिरवणूका. घरात बसून दूरदर्शनच्या सर्व चॅनलवर दाखवल्या जाणार्‍या सार्वजनिक मिरवणूका व बाप्पाच्या मूर्त्यांच होणार विसर्जन पाहत असताना बाप्पाच्या वियोगाच्या कल्पनेने जर तुमचे आमचे डोळे भरून  येत असतील तर या उत्सवात सक्रिय भाग घेणार्‍या कार्यकर्त्यांची व मिरवणुकीत प्रत्यक्ष भाग घेतलेल्या भक्तांची मनस्थिती कशी असेल याची कल्पना येवू शकते.
कधी काळी मी देखील सार्वजनिक गणेशोत्सवात सक्रिय भाग घेतला असल्याने नाचत-वाजत मिरवणुकीत सामील झालेल्या प्रत्येक भक्ताचे  बाप्पाच्या मूर्तीच विसर्जन करण्याच्या क्षणाला डोळे किती पाणावलेले असतात हे पाहिलेले तर आहेच पण अनुभवलेले देखील आहे.
त्यामुळे आज मिरवणुकीत मी सामील नसेनही पण तरीही कानावर पडणार्‍या ताशाच्या आवाजाने जागच्या जागी पाऊले थीरकायला लागतात आणि मनात एकच घोष उमटतो ........

“ मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.”   
  

२४ सप्टें, २०१२

सत्त्याचा ‘बाप’ – भाग ५


बोलता बोलता त्या आठवणीत तो शुन्यातच गेला. मी ही शांत बसलो. थोड्या वेळाने स्व:ताच भानावर आला.आता मात्र त्याच्या चेहर्‍यावर काहीसं दडपण  दिसत होत. त्यानं पुढ्यातला पेग संपवला अन नविन भरला. बट नाऊ आय डिसाईड लेट्स आलावु हिम टु ओपन हिज इमोशन्स. यु नो ,आय अल्सो थिंक इन इंग्लिश व्हेरी वेल. पण नालायक मित्र म्हणतात," आय ओन्ली ड्रींक्स इंग्लिश व्हेरी वेल." दे नेहमीच जलींग ऑन मी.........
पुढे त्याला जे सांगायच होतं ते खुपच महत्वाच असावं. कारण काही न बोलताच भरलेला पेग एकाच झटक्यात पिवून नविन पेग त्यानं भरला. माझा दुसरा पेग अजुनही संपला नव्हता तरी त्याचं हे पिणं पाहुन मात्र मलाच किक बसायला लागली होती.
" हं.मी काय सांगत होतो बच्चन."
" तु ऑपरेशन थेटरच्या बाहेर...."
माझ वाक्य पुर्ण होवु न देताच तो म्हणाला," थांब आठवलं आता. मी बाहेर जातोय हे येकल्यावर सत्त्या माझा हात पकडुन म्हणाला, बाबा थांब ना. बाहेर जावु नकोस ना . बहुदा ऑपरेशन थेटर मधल्या वातावरणातला वेगळेपणा लहान वयातही त्याला जाणवला असावा . अस असल तरी मला ऑपरेशन थेटर मध्ये थांबता येणार नव्हतं हे नक्कीच. तेव्हा मी काही बोलणार तोच डॉक्टरच म्हणाले, थांबतील हं बाबा तुझ्या जवळ. हे ऎकल्यावर मी आश्चर्याने करुन त्यांच्याकडे पाहीलं. त्यांनी मला डोळ्यांनीच चुप बसायला सांगीतलं."
येव्हडं बोलुन त्यानं ...... काय केलं परत परत सांगायलाच हवं का?. समोरचा पेग संपवला आणि नविन भरला. कितवां... ते मोजायच मी आता बंद केलयं. च्यायला मी मोजत बसु की माझी पिवु. नाहीतरी तो त्याच्या खंब्यातली पितोय मग आपण का मोजत बसायच. तेव्हा आपण आपली क्वार्टर पित ऎकुया................
"मग त्याला डॉक्टरच म्हणाले, बाळा हे दुसरे डॉक्टर काका आहेत ना ते तुला हळुच एक इंजेक्शन देतील, घाबरणार नाहिस ना?. मग माझ्या लक्षात आलं दुसरे डॉक्टर म्हणजे अ‍ॅनास्थेटीक होते. त्या डॉक्टरांनी इंजेक्शन द्यायला सुरुवात केल्या बरोबर सत्त्याने माझा हात अजुनच घट्ट पकडला. एव्हडा घट्ट की ईतक्या छोट्या मुलाच्या अंगात देखिल वेळ पसंगी किती ताकद येते हे मला जाणवलं. इंजेक्शन देवुन झाल्या नंतर डॉक्टरांनी सत्त्या बरोबर इकड तिकडच्या गप्पा करत त्याच बी.पी. वैगरे चेक करायला सुरुवात केली. सत्त्याच्या बोलण्यावरुन इंजेक्शनचा इफेक्ट किती झालाय ते डॉक्टरांना कळुन येत होतं. आणि मला....... सत्त्याच्या माझ्या हातावरच्या पकडी वरुन."
येव्हडं बोलुन त्यानं ...... तेच ते . लगे रहो मुन्नाभाई और गिनते रहो सर्किटभाई.
" हं. तर माझ छोटस बाळ लवकरच गुंगीच्या अधिन झालं आणि त्याची माझ्या हातावरची पकड पुर्णपणे सुटली. माझ नव्हतं पण डॉक्टरांच तिकडे लक्ष होतचं. त्यांनी मला लगेचच  ऑपरेशन थेटर मधुन बाहेर जायला सांगितलं. मी बाहेर आलो. ही आणि सत्त्याचे आबा मला ऑपरेशन थेटर मधुन बाहेर यायला वेळ लागला म्हणुन काळजीतच होते. त्यांना मी जास्त काही न बोलता सगळं व्यवस्थीत आहे एव्हडचं सांगीतलं"
येव्हडं बोलुन त्यानं ......
"खरं सांगु बच्चु, मी बदललो तो त्या क्षणा पासुन. बेदरकार आणि बिनधास्त स्वभाव माझा. दुसर्‍यांना मदत करायची वृत्ती असली तरी स्व:ताच्या बाबतीत कधी जबाबदारीने वागलो नव्हतो. त्या मुळे जरा बॉस बरोबर पटलं नाही की सोड नोकरी अन बस घरी हे नेहमीचच. तुम्हा मित्रांना त्या मुळे माझ भारी कौतुक. पण खरं सांगु माझ्या पेक्षा माझ्या बायकोच खर कौतुक. माझ्या सारख्या वृत्तीच्या माणसांच समाज कौतुक करतो. पण खर कौतुक करायला पाहीजे ते माझ्या सारख्या माणसांना सांभाळुन घेवुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या घरातल्यांच. कारण कौतुक करणारा समाज जेवायला घालत नाही की जखमांवर औषध लावत नाही. समाजकार्याच्या धुंदीत असलेल्या माणसांच्या पाठीमागं असतातं ती फक्त त्याच्या घरातली माणस. खरे चटके तर ती सहन करत असतात मौनपणे आणि कुठलाही गाजावाजा न करता."
येव्हडं बोलुन त्यानं ......
याची ही बाजु मला नविनच होती.”त्या’च्या मनातला हा कोपरा मी त्याचा सगळ्यात जवळचा मित्र असुनही मला दिसलाच नव्हता. या सगळ्यामुळे मी ही मनात कुठेतरी हललोच. जवळची म्हंणतो त्या माणसांच्या मनापर्यत आपंण खरच पोहोचतो का?. किमान पोहोचण्याचा प्रयत्न तरी करतो का?. आयला मी का सेंटी होतोय बर........
सत्त्याला सोडुन बाहेर आलो तरी मनान मी थियटर मध्येच होतो. अस वाटत होत की सत्त्याच्या जागी मीच आहे. मनात सल होता, माझ्या सत्त्याला मी त्याच्या बरोबर थांबेन अस खोट सांगीतल्याचा.शेवटी येकदाच ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आणि आम्ही घरी आलो.  पण अजूनही सत्त्याची हातावरची पकड जाणवत होती.”
“होता हई यार यैसा फिलिंगं कभी कभी”
“नाही तस नव्हतं. कारण त्यानंतर मी सत्त्याला परत एकट कधीच सोडणार नाही असा जणू पणच केला.”
“अरेच्चा हे कारण होत का ?”
“मग माझा जास्तीत जास्त वेळ मी सत्त्यासाठी आवर्जून राखुन ठेऊ लागलो. तुमच्या पार्ट्यन मध्ये  बसायचं पण त्यासाठीच कमी केलं. माझ्यातला हा बदल माझ्यासाठी देखील अनाकलनिय होता.”
“हो ना ,तुझ्या शिवाय पार्ट्या मध्ये आम्हालाही मजा वाटायची नाही.”
“सत्त्या विषयाच्या अतिरेकी प्रेमाचं हीला देखील आश्चर्य वाटायचं. तिन मला बर्‍याच वेळा या अतिरेकी प्रेमाबद्दल सावध केलही होत. पण मी मात्र माझ्याच धुंदीत होतो.”
येव्हडं बोलुन त्यानं ......
“माझ्या अतिरेकी प्रेमानच बहुदा त्याचा स्वभाव असा हळवा झाला असावा. मुलांनी खेळल पाहिजे ,धडपडल पाहिजे अन स्व;ताच स्व;ताच्या जखमा कुरवाळल्या पाहिजेत हे मी पार विसरूनच गेलो होतो. सत्त्यान पडूच नये ,धडपडुच नये याच्या काळजीपोटी त्याच्यावर मी खूपच बंधन आणली. मी स्व:ता माझ्या लहानपणी किती मस्तीखोर होतो आणि तरुणपणी वांड होतो हे सगळ्यांनाच माहीत आहे.पण सत्त्याला मात्र मी आदर्श मुलगा बनवायचा प्रयत्न करत होतो......वेळप्रसंगी दोन द्यायचे असतात ,दोन घ्यायचे असतात हे माझंच तत्वज्ञान होत ना रे?”
तुझा हाच स्वभाव तर आम्हाला आवडायचा. आमचा संकटमोचन होतास तू. तू बरोबर असलास की कोणालाही भिडायची हिम्मत यायची.”
“गेले रे ते दिवस. तुम्हा लोकांना माहीत असलेला मी आता फार बदललोय.” 
येव्हडं बोलुन त्यानं ......
 “जाऊ दे यार. आता सगळं ठीक होईल. सत्त्याला त्याची चुक कळली आहे. चांगला मुलगा आहे तो. हुशार, शांत आणि समंजस.”
“समंजस ... “
“येखादी चूक चांगल्या माणसानं कडून पण होते. हा तर अजून फार लहान आहे.”
“त्यान चूक केली असती तर चाललं असत. जगाच्या विरुध्द जाऊन मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो असतो. पण तो पळपुटा निघाला याच वाईट वाटताय.”
“माफ कर यार सत्त्याला.
“तुम्ही अनुभवलं आहे ,चुका मी ही खूप केल्या आयुष्यात पण कधी भ्यालो नाही. चुक केली आणि त्याची किमत पण चुकवली.”
आता मला काय बोलावं ते सुचेना. हा बाप माणूस आतून किती दुखवला गेलाय ते उमजत होत. सालं त्यातच माझ्या डोळ्यात आज सारखं पाणी येत होतं....आज भुस्काट जरा जास्तच तिखट केलेलं असावं म्हणून तर नसेल ना?.
“मी आयुष्यात कधीही पळपुटेपणा केला नाही. समोरचा भिडला की दोन हात करायचेच. अश्या वेळी समोर कोण आहे ते बघायचं नाही हा माझा फंडा. त्यालाच तर तुम्ही रिस्पेक्ट द्यायचात ना?”
“अरे म्हणून काय आम्ही तुझ्या सारखे वागू शकतो का?. आम्ही पळपुटेच. तु बरोबर  असलास की आम्ही भाई इतर वेळी मात्र पळापळी. हाच तर तुंझ्यातला आमच्यातला फरक आहे बॉस.”
“हीच गोष्ट माझ्या मुलाला कळली नाही रे.एका पोरीन नकार दिला तर जीव द्यायला गेला पळपुटा.”
सांभाल यार खुदको. तुच असा खचलास तर वहिनींनी आणि आबांनी कोणाकडे पाहायचं?”
“अरे ती दोघही माझ्या पेक्षा खंबीर आहेत. त्यांची काळजी ते घेतीलच कारण त्यांना माहीत आहे की आता दोघांना सांभाळायच आहे. मला आणि त्या पळपुट्याला.”
सालं माझ्या डोळ्यातलं पाणी कमीच होत नाही आहे. फुकट देतोस म्हणून भुस्कट येव्हड तिखट बनवायच का रे शेट्ट्या. अर्थात ते सगळं मनात चालू होतं. आमची कुठली हिम्मत याच्या सारखी तोंडावर बोलण्याची.
“ह्या पळपुट्यान जीव देताना आमचा कोणाचाच विचार नाही केला. म्हातार्‍या आबांचा , सगळे हट्ट पुरवणार्‍या आईचा ,त्याची सतत काळजी करणार्‍या या बापाचा.”
“असा वेडा विचार का करतोस रे, भाई.”
पण माझ्या बोलण्याकडे त्याच लक्षच नव्हता. स्व:तशीच बोलत असल्यासारखे त्याच्या चेहर्‍यावर भाव होते.....
“एका पोरीच प्रेम मिळालं नाही म्हणून आमच्या सगळ्यांच्या प्रेमाची किम्मत शून्य करून टाकली यान एका क्षणात.आमच्या प्रेमाचा असा अपमान करण्याचा हक्क कोणी दिला ह्याला. या वरून आता माझ्या लक्षात आलंय की, त्यान ऑपरेशन वेळी सोडलेला माझा हात परत कधीच घट्ट पकडला नव्हता.मी मात्र त्याच त्या वेळच हाताला घट्ट पकडण आजही कवटाळून बसलो होतो. चलता है.चूक झाली माझ्याकडन.आता मात्र माझ आयुष्य मी जगणार आहे. ज्याच्या साठी स्व:ताला बांधून घेतलं त्यालाच माझी किम्मत नाही हे कळून चुकल आहे मला. जी मुलगी त्याची झाली नाही तिच्यासाठी जीव देतो तो आमचा नाहीच. आमच्यासाठी तो सर्वस्व होता पण  त्याच्या दृष्टीने आम्ही कोणीच नाही याच दुख: मात्र आयुष्यभर सलत राहील..... ”
त्यानंतर ही तो बरच काही  बोलला. पण काय ते माझ्या लक्षात नाही. कदाचित माझ्या आदर्शाला असा  खचलेला पाहताना मनाला खूप वेदना होत होत्या म्हणून असेल.त्यातच ते तिखट भुस्कट आणि त्यामुळे सारखे भरून येणारे माझे डोळे.....
त्यान एकदा विचारलं देखील,” तु कारे रडतोस बच्चू.”
“अरे मी कशाला रडू. शेट्ट्यान आज भुस्कट जास्तच तिखट केलं म्हणून जरा डोळ्यात पाणी आल. बस.”
त्यावर तो काहीच बोलला नाही. फक्त त्याचे लालसर झालेले डोळे माझ्याकडेच पाहत होते. मी नजर खाली झुकवली आणि सिप घेतला. पण माझा ग्लास तर चक्क रिकामा होता. का कोण जाणे परत ग्लास भरावासा वाटेनाच. माझ्याच मनावरच दडपण वाढत चालल होतं. त्यातच त्या दिवशीचा त्याचा मूड पाहून माझी मात्र बोलतीच बंद झाली होती. त्याला येव्हडा दुखावलेला या पूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे ज्याचा मला नेहमीच आधार वाटायचा, त्याला कस काय समजावं हेच कळत नव्हतं. असाच किती वेळ गेला कोण जाणे कारण शेवटी शेवटी तर तो ही गप्प होता. अश्या मनस्थितीत त्या रात्री अखेर किती वाजता आम्ही बार मधून बाहेर पडलो ते मात्र आजही मला आठवतं नाही.

***********

आणि हो सगळ्यात महत्वाच सांगायचं म्हणजे , त्या दिवशी म्हणे झिंगालेल्या अवस्थेत मला त्यांनच घरी सोडलं अस ही नेहमी सांगत असते.पण तुम्हाला अन मलाच तर सत्य माहीत आहे, त्या दिवशी खंबा कोणी प्यायला होता ते ......

१९ सप्टें, २०१२

मोरया रे बाप्पा मोरया रे




गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवींनामुपमश्रवस्तम‍म्‌।

ज्येष्ठराजं ब्रम्हणां ब्रम्हणस्पत आ न : शृण्वन्नुतिभि: सीद सादनम्‌।

*** ऋग्वेद, मण्डल २, सुक्त २३, ऋचा १




१३ सप्टें, २०१२

सत्त्याचा ‘बाप’ (भाग-४)


सत्त्याचा बाप (भाग-४)

खुप दिवसांनी याला बार मध्ये आलेलं पाहुन जुनी वेटर मंडळी एक एक करुन याला भेटायला आली. हा बाबा सगळी कडेच त्याच्या मनमिळावू आणि दुसर्‍याला नेहमीच मदत करायच्या वृत्ती मुळे  लोकप्रिय. त्या मुळे वेटर सुध्दा त्याची चौकशी करायला आले याच मला आश्चर्य वाटण्याचं कारणच नव्हतं. हा सुध्दा जणु काहीच घडलेल नाही असा शांत बसुन  या सगळ्यांची चौकशी करत होता. शेवटी शेवटी तर मला अस वाटायला लागल की जे काही गेल्या तिन-चार दिवसात घडल ते जणु काही माझ्याच बाबतीत बहुदा घडलं असावं.
या कोंडीतुन बाहेर पडण्यासाठी मग मीच विचारलं," अरे , काय घेणार?"
"काय घेणार म्हणजे. ओल्ड मंक दुसरं काय बच्चु."
बच्चु म्हटल की मी वैतागतो हे साला कधी विसरतच नाही.
यावर मी काही बोलणार तेव्हड्यात हे महाराजच म्हणाले," शंकर, फुल खंबा घेवुन ये."
यावर मी चाचरतच बोललो," यार जास्त होईल."
"बच्चु ही माझी एकट्याची ऑर्डर आहे. तुझं बोलं."
"तु खंबा एकटा पिणार?"
"मग.... मी काही तुझ्या सारखा बायकोला घाबरत नाही."
हा बोलतो यात अजीबातच तथ्य नाही असं नाही. पण मी बायकोला घाबरतॊ हे मात्र झुट. आयला बायकोला मी रिस्पेक्ट देतो यात काही चुक आहे का? पण या गोष्टीची सर्व मित्र टर उडवतात याची मला खुप चिड येते.
माझ्या चेहर्‍यावरचा राग त्याने ओळखला आणि हसुन म्हणाला," शंकर , साब के लिये भी खंबा लेके आना."
खर सांगायच तर मलाही खंबा पिण्याचा मोह होत होता पण मग.....  बायकोचा चेहरा डोळ्या समोर आला.  त्यामुळे लगेचच बायकोला रिस्पेक्ट देण्याची तिव्र भावना मनात उत्पन्न झाली .खरच सांगतो विश्वास ठेवा मी काही तिला घाबरलो नव्हतो.
या मनकवड्याने मात्र माझ्या चेहर्‍यावरचे भाव लगेचच टिपले आणि नेहमी प्रमाणे खदखदुन हसला. त्याच्या या हसण्याची मला इतर वेळी चीड आली असती पण आजच त्याच हे हसण मला सुखावुन गेलं.
मग त्यानेच विचारल,"व्होडका सांगतो. वास कमी येईल."
"नको,मी पण  ओल्ड मंक घेणार .पण फक्त क्वार्टर. ना जादा ना कम."
"बच्चु आत्ताच सांगतो नंतर नेहमी सारखी माझ्यातली मागायची नाही. पाहीजे तर अजुन खंबा मागव. चिंता मत कर आपुन बील देनेवाला है."
हे ऎकल्यावर मला परत एकदा खंबा पिण्याची सुरसुरी आली. पण मागच्या होळीच्या दिवशी माझा झालेला वकार युनुस आणि त्या नंतर कुटुंबाने होळीलाच केलेला शिमगा आठवला....... आणि बायको विषयीचा माझ्या मनातला रिस्पेक्ट.... तो ही आठवला.
मी अवंढा गिळुन म्हणालो," उद्या ऑफिस आहे नाहीतर....... "
यावर तो काहीच बोलला नाही.
थोड्याच वेळात शंकर सगळ घेवुन आला. त्याला आमचे ग्लास कसे भरायचे ते माहित होतच. पहिला घोट घेतला आणि मनाला कसं बर वाटलं. खर सांगायच याने आमच्या बरोबर बसायच बर्‍याच वर्षां पासुन कमी केल होतं. अर्थात तो आमच्या पार्ट्या कधी चुकवायचा नाही जे जितक सत्य तितकच सत्य हे ही होत की तो रात्री दहा नंतर कितीही आग्रह केला तरी अजिबात थांबायचा नाही. कारण काय तर म्हणे सत्त्या घरी वाट पाहात असेल. माय फुट. साला वहिनींना घाबरुन घरी जात असेल.
काहीही असो आज मात्र मला हवी असणारी त्याची कंपनी पुरेपुर मिळणार होती. दोघांचाही पहीला ग्लास अर्धा संपेपर्यंत आम्ही दोघही चुपचापच होतो. सहाजिकच आहे सत्त्याच्या या आत्महत्येच्या भानगडी मुळे हा काहीसा हादरला नक्कीच होता. त्या मुळे हा कधी बोलायला सुरुवात करतो याची मी वाट पाहात होतो. लेटस टेक हिज ओन टाईम यार. च्यायला मी प्यायला बसलो की माझ मराठी प्रेम कुठे जात कोण जाणे. इन दॅट टाईम  आय थींक इन इंग्लिश अ‍ॅन्ड अल्सो स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल. .........
"बच्चु काहीतरी चकणा सांग यार."
चला बाबाची एकदाची बोलती सुरु झाली. व्हेरी नाईस.
"चिकन सांगु का? टीक्का की तंदुरी."
"काहीही सांग. तुला आवडतं ते."
मी ऑर्डर दिली आणि शंकर ती आणायला गेला. मग परत हा बाबा शांत. शेवटी दोघांचाही पहिला ग्लास संपला. आमच्या ग्रुपचा एक नियम आहे फर्स्ट पेग इक्वल अ‍ॅन्ड कॉप्लीमेंटली... चुकलो यार कंपल्सरी म्हणायचं होतं. एनी वे आय स्पीक इंग्लिश व्हेरी वेल.
त्याने त्याचा दुसरा पेग भरला अन मी पण. पाहातो तर काय साल्याने रॉच सीप मारला. मी काही बोलणार यावर तोच म्हणाला," बच्चु रॉ मारणार का?"
आय वील ड्रींक बट विइथ डिसेन्सी . दीज पिपल् यु नो.........
"नको, मी आपल नेहमी सारख हाफ थम्स अप अ‍ॅण्ड आधा सोडा."
त्यानंतर त्याचा दुसरा पेग त्याने दोन सीप मध्येच संपवला . हे पाहुन मी जरा हादरलोच.
मी काही बोलणार एव्हड्यात तो म्हणाला," आज परत आपले जुने दिवस आठवले यार."
"मलाही"
"आठवतय तुला..."
"काय रे."
"माझ्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी मी तुमच्या बरोबर बारमध्ये बसलो होतो."
"होना. तुझ डेअरींग बघुन तुला आम्ही मानलं होतं"
"माझ कसलं डेअरींग. हीच म्हणाली लग्न झालय म्हणजे सगळ्यांना सोडुन माझाच विचार करायची गरज नाही. मित्र बोलावतात तर जा."
"फेकु नकोस. वहिनी अस कस बोलतील."
"खरचं बोलली. तिचा स्वत:वरचा सगळ निभवुन नेण्याचा आत्मविश्वास पहिल्या पासुनच होता आणि आजही आहे."
"खरच रे. आम्ही सगळे गेल्या ४-५ दिवसातल त्यांच वागण पाहात आहोत."
"तुझा विश्वास बसणार नाही पण आज पण तिनेच मला तुझ्या बरोबर जरा बाहेर जावुन ये असं सुचवलं."
"ग्रेट यार. मानना पडेगा."
यावर स्व:ताचा तिसरा पेग भरता भरता एक सुस्कारा टाकत त्यानं विचारलं,"तुला आठवत का रे मी नक्की कधिपासुन तुम्हा सर्वांन बरोबर बसायच कमी केल ते."
"साधारण आठवतयं. सत्त्या लहान असतानाची गोष्ट असेल... हो ना."
"बच्चु. तुला ते कळल होत तर आणि आजही ते आठवतय पण....."
यावर मी काही बोलणार तेव्हाढ्यात यान तिसरा पेग एका झटक्यात रॉच गिटकवला की.
आता मात्र मी सटपटलोच. कारण गेले कित्येक वर्ष याने पिण कमी केल होत. आणि आज... पुर्ण खंबा आणि तो ही रॉच मारण्याचा याचा विचार स्पष्ट दिसत होता. आता मात्र याला काहीही करुन थांबवायला हवं होतं हे नक्कीच.
"बच्चु चिकन यायला वेळ असेल तर भुस्कट सांग." चौथा पेग भरत भरत तो म्हणाला.
भुस्कट म्हणजे आमच्या ग्रुपची खास डीश जी फक्त आमच्या साठीच बनायची. मिक्स फरसाण, त्यावर कोथींबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अन लसणाची खमंग फोडणी.... हा चकणा, तो ही फ्री, शेट्टी आम्हाला द्यायचा ते ह्या बाबा मुळेच.
पण आम्ही सांगण्या पुर्वीच भुस्कट टेबलावर आलचं. मी काही बोलणार तेव्हड्यात शंकरच म्हणाला, " दादाले भुस्काट लागणार मले माहित नाही का जी."
या साल्यावर सगळेच इतक का प्रेम करतात कोण जाणे....
भुस्काट्च्या पहील्याच घासाला माझ्य टाळूला झणझणलचं. त्याला मात्र काही वाटलं नसावं.
" सांग बर तुला नक्की कधी जाणवलं मी तुमच्या पासुन काहीसा वेगळा झालो." त्यानं विचारलं.
मी काही बोलणार , तोच स्वत:शीच पुटपुटल्या सारखा म्हणाला," तुला कस कळणार नक्की कधी अन का."
हा बोलतोय बघुन मी आज श्रोत्याची भुमिका स्विकारायच ठरवलं........
"सत्या लहान होता त्यावेळी डॉक्टरांनी त्याच छोटस ऑपरेशन करायचा सल्ला दिला होता. जेमतेम ३ वर्षाचा होता सत्त्या."
"अरे हो आठवतय मला पण.."
"एव्हड्या लहान वयात त्याच ऑपरेशन करावं लागणार हे ऎकुन माझा धीरच खचला. पण ही खरीच धीराची. तिनच मला समजावलं की त्याच्याच भल्यासाठी डॉक्टर ऑपरेशन करणार आहेत ना?"
बोलता बोलता त्यान पु्ढ्यातला पेग देखिल एका झटक्यात रॉच मारला. आता मात्र मला काळजी वाटायला लागली कारण माझा दुसरा पेग संपण्या पुर्वीच महाराजांचे चार पेग गट्ट्म झाले होते.
" अरे बाबा सावकाश. एव्हडी घाई का रे."
पण त्याच मी काय बोलतोय या कडे कुठं लक्ष होतं.....
पुढचा पेग भरत तो म्हणला," शेवटी ऑपरेशनचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी पहिलच ऑपरेशन सत्त्याच करायच डॉक्टरांनी ठरवलं होतं. मी ,ही आणि सत्त्याचे आबा असे तिघ त्याला घेवुन हॉस्पीटल मध्ये गेलो. डॉक्टर तयारीतच होते. त्यांनी लगेचच त्याला ऑपरेशन थेटर मध्ये न्यायला सांगीतलं."
" साल्या मी रागावलो होतं मला त्या वेळी बरोबर नेलं नाहीस म्हणुन."
मी त्याच्याकडे बघितल त्याचे डोळे काहीसे लालसर झालेले दिसले. एव्हडा गटागटा प्यायल्यावर दुसरं काय होणार म्हणा....
"लहान असल्याने त्याला ऑपरेशन थेटरमध्ये येकटाच नेला तर तो घाबरेल म्हणुन डॉक्टरांनी त्याला विचारलं," तुला तपासायला आत नेताना बरोबर कोण हवं बाळा?". मला वाटलं तो हिच किंवा त्याच्या आबाच नाव घेईल. पण स्साला त्यानं बाबा बरोबर हवा असं सांगीतल. तुला माहितेय त्याच्या बाबतीत मी किती हळवा होतो. एकतर त्याच्या ऑपरेशन मुळ मी घाबरलो होतो त्यातच ते थेटर, त्यातली हत्यारं, मग भलेही ती त्याच्याच हितासाठी वापरली जाणार होती. पण ते दृष्य मी कस पाहाणारं होतो. त्याच्या शरीरावरचा छोटासा ओरखडा  देखिल मला सहन होतं नसे मग..."
मला त्याच्या हा मनस्थितीची कल्पना येवू शकत होती कारण त्याचं सत्त्याबाबतीतलं हळवेपण आम्हा सर्वांनीच अनुभवलं होतचं की.
" मालुम है यार. आय कॅन अंडरस्टंड."
" मग काय गेलो आत त्याला घेवुन. थेटर मधल्या ऑपरेशन टेबलावर त्याला डॉक्टरांनी झोपवायला सांगीतलं. सत्त्याला मी टेबलावर झोपवलं. नेहमीचेच डॉक्टर असल्याने तो त्यांना चांगलाच ओळखत होता. त्या मुळे आता बाहेर जायला हरकत नाही म्हणून मी डॉक्टरांना सांगुन बाहेर जायला निघालो....."

 

 

 

 

 

 

८ सप्टें, २०१२

सत्त्याचा ’बाप’ (भाग-३)


सत्त्याचा ’बाप’ (भाग-३) 


नंतरचे दोन दिवस धावपळीचेच गेले. मी सुध्दा रजाच घेतली होती.दरम्यान सत्त्याच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत गेली. दरम्यान कुटुंबा कडुन सत्त्याने केलेल्या भानगडीची सविस्तर माहिती कळली होती. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्हणे त्यानं एका मुलीला प्रपोज केलं होतं पण तिने नकार दिल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.अर्थात त्यामुळे त्याची प्रकृती थोडी सुधारल्यावर पोलीस चौकशी पण झाली. पण ’या’चं मित्रमंडळ भरपुर असल्याने सर्व गोष्टी निस्तरत्या आल्या .
रविवारी संध्याकाळी दरदिवशी प्रमाणे हॉस्पीटलला गेलो.तर समोर वहिनीच दिसल्या.चेहरा खुपच दमलेला पण तरीही त्यावरचा आनंद जाणवत होता.गेल्या तीन-चार दिवसात सर्व धावपळ त्याच करत असल्याचं मलाही जाणवलं होत. त्या मुळेच पहिल्यांदाच त्यांच्या बद्दल माझ्याही मनात आदर निर्माण झाला होता. मला पाहाताच त्या म्हणाल्या,
"सत्त्या, आता ठीक आहे बरं का"
"डॉक्टर काय म्हणतात"
"आता काळजीच काहीही कारण नाही असं म्हणाले. फक्त विकनेस आहे तो कमी झाला की घरी सोडतील"
माझ्या तोंडुन अनाहुत पणे वाक्य बाहेर पडलं, " ग्रेट वहिनी. मानलं तुम्हाला."
मनात कुठेतरी या बाबाची या प्रसंगातली निष्क्रीयता मनाला खटकली होतीच.
"मी कसली ग्रेट. हे नसते तर मला तर निभवता आलचं नसतं."
"असं कसं. आम्ही पाहात होतो तुमची सर्व धावपळ."
"माझी धावपळ तुम्हाला दिसली पण हे गेल्या तिन दिवसात आयसीयु समोरनं हाललेच नाहीत रे?"
हे मात्र नाकारता येत नव्हतं. हा बाबा सकाळचा आंघोळीचा वैगरेचा एक-दीड तास सोडला तर सतत आयसीयुच्या बाहेर ठाण मांडुन होता. त्याच सत्त्यावरचं प्रेम लक्षात घेता ते अपेक्षित देखिल होतच आम्हाला.
सत्त्या आता बरा झाला आहे हे कळल्यावर त्याला देखिल खुप आनंद झाला असेल हे लक्षात आलं. मी वहिनींना विचारल तर म्हणाल्या, "असतील ईथेच जवळपास कुठेतरी."
बघीतल तर हे साहेब आयसीयुच्या बाजुच्या गॅलरीत उभे राहुन  सुर्यास्त पाहात उभे. मी हळुच तिथे गेलो. त्याच्या पाठीवर हात ठेवुन म्हणालो," आपला सत्त्या बरा झाला यार. हॅटस टु यु अ‍ॅन्ड वहिनी."
त्याने माझ्या कडे पाहीलं.त्याचे डॊळे लालसर आणि पाणावलेले दिसत होते. तो म्हणाला," बर झाल आलास. तुझीच वाट पाहात होतो."
अरे हा असा काय बोलतोय. मी गेले दोन दिवस सारखा येत जात होतो हे बाबाच्या लक्षात आलेल नाही की काय?. मी थोडासा हिरमुसलोच. पण माफ केल. आपुन भी समझ सकता है उसकी हालत.
 मग मीच म्हणालो," चल सत्त्याला भेटु."
"तु जावुन ये मी तुझी बाहेर वाट पाहातो."
मला याच्या सर्कीटपणाची कल्पना असल्याने जास्त वाद न घालता सत्त्याला भेटायला वॉर्ड मध्ये गेलो. समोरच्याच बेड्वर सत्त्या होता. त्याचा निस्तेज चेहरा पाहुन मी मनातुन हाललोच. पण धीर करुन त्याच्या जवळ गेलो. मला पाहुन सत्त्या हसला. काय नव्हत त्या हसण्यात.
"कसा आहेस चिन्या"
सगळे त्याला सत्त्या म्हणत असले तरी मी मात्र  त्याला चिन्याच म्हणायचो. सत्त्याची आणि माझी खास जवळीक होती. आमच घर हे त्याच जणु दुसरं घरच होतं.
"बरा आहे."........
"अरे काका, बाबा कुठे आहे. घरी गेलाय का?"
"नाही रे, बाहेरच उभा आहे."
"मग मला भेटायला आत का आला नाही. रागावलाय का?"
"नाही रे. चिन्या"
"काका, बाबा रागावला आहे माझ्यावर."
"अरे असे वेडे विचार काय करतोस."
"खरचं काका, मी शुध्दीवर आल्या पासुन बाबा एकदाही भेटायला आला नाही रे."
आता मात्र मला काय बोलाव ते सुचेनाच. याचा असला सर्कीटपणा मला समजण्याच्या पलीकडचाच होता.
"जास्त बोलु नकोस आणि विचारही करु नकोस. विश्रांती घे."
"काका, बाबाला सांग ना रागावु नकोस, मी चुकलो, प्लीज मला माफ कर."
आता मात्र मला तिथे उभं राहावेना. डोळ्यात येवु घातलेलं पाणी कस बस थोपावलं. चिन्याच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि चटकन बाहेर आलो.समोर हा उभाच. मी त्याला काहीतरी बोलणार तेव्हड्यात ’तो’च म्हणाला," मला माहित आहे तुला काय बोलायचय. पण आत्ता नको."
"अरे पण..............."
"छोड यार. तुझा चिन्या बरा झालाय ना. मग सेलीब्रेट करुया."
“आज....
“ काय झाल. मला रिलॅक्स व्हायचयं. मग बघु पुढचं पुढे.
“ अरे चिन्याला भेटुन तर घे. तो तुझी वाट पाहातोय.
“ काय घाई आहे. तु लाडका  काका  भेटलास आणि ही तर सारखी आत बाहेर करतच आहे.मी भेटेन सावकाश."
"अरे पण..."                                                             
"चल रे. तो काही आता पळुन जात नाही आणि मी आयुष्यात कधिही पळुन गेलो नाही. माहीत आहे ना तुला.
“ एकदा दोन मिनीटं तर भेट. मग जावु आपण.
“ आता येतोस की एकटाच जावु.
त्याच्या आविर्भावा वरुन कळलं की साहेब ऎकण्याच्या मुड मध्ये नाहीत. तेव्हा मी जर जास्त बोलण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच हा बाबा एकटाच निघुन गेला असता. आणि तसही त्याला नाही म्हणायला मला आत्ता पर्यंत कधी जमलच नव्हत मग आज तरी कसं शक्य होतं. तरी सुध्दा शेवटचा उपाय म्हणुन म्हणालो,” वहीनींना सांगुन जावुया. त्या वाट पाहात बसतील.
आमचं सेलीब्रेशेन म्हणजे काय याची वहिनींना चांगलीच कल्पना असल्याने आज तरी त्या नक्कीच नाही म्हणतील याची आशा होती.
“ मी तिला तु येण्या पुर्वीच सांगुन ठेवलयं. तु आल्यावर आपण दोघं बसणार आहोत ते.
“ वहिनी हो म्हणाल्या......
“साल्या तुला खोटं वाटत असेल तर बोल तिच्याशी मोबाईलवर.
वहिनींना हा कधी खोट सांगत नाही याचा अनुभव आम्हा सर्व मित्रांना होताच. तरी देखिल आज वहिनी याला हो कश्या  म्हणाल्या याच आश्चर्यच वाटलं.अर्थात याही पेक्षा मी हॉस्पीटल मध्ये भेटायला नक्कीच येणार याची याला खात्री होती याचचं मला जास्त बर वाटलं. खोटं कशाला बोलु.
कुठल्या बार मध्ये जायच तो प्रश्नच नव्हता कारण नेहमीचा बार ठरलेला होता. आम्हाला दोघांना बार मध्ये पाहुन गल्ल्यावरचा सदानंद शेट्टी देखील जरा चमकलाच. कारण त्यालाही एव्हाना सत्त्या हॉस्पीटल मध्ये अ‍ॅड्मीट असल्याच कळलेलं होतचं. त्यामुळे तो याला बघुन हैराण झाला. याच लक्ष नाही पाहुन त्याने मला नजरेनच सगळ ठिक आहे ना विचारलं. मी पण सगळ ठीक आहे असं खुणेनच त्याला सांगितलं. हा बार म्हणजे आमच्या ग्रुपचा जणु दुसरा अड्डाच होता. प्रसंग बरावाईट कसलाही असो आम्ही जमणार ते ईथेच. पण आज प्रसंग काहीसा वेगळाच होता. कधी नव्हे ते आम्ही फक्त दोघच खुप दिवसांनी आलो होतो.